Search This Blog

Powered by Blogger.

Pages

संदिग्ध अर्थाचे उखाणे कधी तरी उलगडतील, स्पर्शातून, गाण्यातून,वा कवितेतून; तुझ्या अस्तित्वाचे पुरावे मी शोधत नाही पण तू आहेस एव्हडया आशेवर मांडू देत मला हा प्रपंच...

Featured Post

हमामा रे पोरा हमामा रे

No, everybody's gotta learn, nobody's born knowin' ...   झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्...

Tuesday, December 11, 2007

भयाचे असंबद्ध वर्तमान


मी गच्च बंद डोळ्यांनी
भय हलके उसवुनी आले
पाण्यात खोल दडलेले
काही उदास वर आले

मातीत मुळांचे सर्प
शेवाळ छिन्न उरलेले
जे फिरुन वळूनी आले
ते भय माझ्यात उतरले

ओंजळीत मिटले भाळ
रेषांचे रंग सरकले
क्षितिजाच्या मागे गेले
जुने रक्त साकळले


मारुन अमेचे घोडे
दिवसाला परतुनी आणले
पण दूर खोल दडलेले
काही उदास वर आले

Thursday, December 6, 2007

नात्यांचे आकार समजून आले


नात्यांचे आकार समजून आले
आणि सखीचे डोळे अजूनच धुसर झाले

खोल आत दडवलेले संदर्भ
झाडांसारखे निरर्थक खुपू लागले
तसे सखीने विचारले ललाटरेखांमधे दडलेले भाष्य

आभाळाचे डोळे लेण्याचा शाप मला आहे सखी
खोटे कसे बोलू

’प्रतिमाभास' सारी अंगे गोळा करुनही
शापवाणी सारखे मला ऎकु आले माझेच शब्द
आणि नंतर कितीतरी वेळ
सखीचे कोसळणे