Friday, February 29, 2008

सपाट उताणा शुक्रवार

शुक्रवार म्हणजे तसा ही अफाटबापुच. हिरवा शर्ट, पिवळी चड्डी आणि लाल गमबुट घालून सुद्धा ऑफिसात आलेलं चालतं. थोडं काम, जास्त मजा, दुसरया दिवशीच्या सुट्टीचे आनंद यांचा विचार करत तसा ही बराच जातो दिवस. शिवाय त्या दिवशी का कोण जाणे पण स्त्रीवर्ग फॅशन-शो असल्यागत भरभक्कम कपड्यात असतो. त्यामुळे शुक्रवारी सगळ्याच पोरांचा चैनसुख मनवाणी झालेला असतो.

आजचा शुक्रवार हे सगळे धंदे झाले तरी फताडा तो फताडाच आहे. दोन वेळा ब्रेकफास्ट, दोन चहा, आणि थोड्याच वेळात होणारा एका मित्राचा सेन्डऑफ, असलं भारी शेड्युल असून ही ऎन सकाळी मनावरचा थकवा काही जाण्याचं नावच घेत नाहीए. डोक्याचा वापर नाही केला तर डोकं गळून जाईल का या विचारासरशी दचकुन दहा डोक्याच्या रावणासारखा "हा हा हा हा" असं हसूनही पाहीलं. परीणाम शुन्य. सालं टीव्ही पाहाणं कमी केलं पाहीजे. भलतच खोटंनाटं दाखवतात वाटतं. आता दुपारी एक रॅगिंग कम रिव्ह्यु पण करुन घ्यायचाय! टीव्ही पाहाण्याचे फायदे! सहनशक्ती तीव्र वाढते आणि चाललेला प्रसंग आवडत नसेल तर चॅनल चेन्ज करता येईल असं उगीच वाटत राहातं. तर आज रिव्ह्यु म्हणजे साईबाबा. म्हणजे थोरला बॉस त्यांचा भक्त आहे पण त्याचा इथे संबंध नाही. साईबाबा रिव्ह्यु म्हणजे श्रद्धा और सबुरी. बॉस कान चावत राहातो, आपण त्याची मर्जी/रिव्ह्यु संपला की उठून यायचं. जय बाबा.

संपला..संपला..संपला...एकदाचा रिव्ह्यु संपला. कुठल्याही अपघाताशिवाय आम्ही सही सलामत बाहेर पडलो. कानाचं च्युंगम झालं असलं तरी कान बचावले (कान वाच्या तो च्युंगम हजार असं म्हणावं का?) यातच सारं आलं.

शुक्रवार संपला.
निबंध संपला.

Wednesday, February 27, 2008

एका लग्नाची गोष्ट

म्हणजे फारच विचित्र दिवस होते. डोक्याचा नुस्ताच चौकोन झालेला. एका कोपरयात MBAचा कोळी भराभरा जाळं विणत होता, दुसरया कोपरयात BE च्या दुरावलेल्या मित्र परीवाराच्या ठसठसणारया आठवणी आणि त्याच्या अनुषंगाने आलेले स्पायरोगायरीय अनुभवांचे ताजेच साक्षात्कार, तिसरया कोपरयात तुच्छ साहित्यीक किडे आणि चौथा रोजच्या गणितांनी व्यापलेला. मेंदु वाळलेल्या नारळासारखा नुस्ताच टणटण इकडून तिकडे घरंगळत राहायचा कवटीच्या आत. शिवाय सोबतीला पुणे-मुंबै चकरा सतत सुरुच होत्या. सालं एकदा पाय उचलुन बघायला हवा होता, नक्की तीळ असायचा तेव्हा. कसला मॅडसारखा हिंडायचो मी. टाटा, अंबानी पेक्षा गुलझार, ग्रेस भारी वाटायचे. वाटायचं, चंद्राला कवटाळुन आतच कोलमडणारे कवी म्हणजे जबरा ग्रेट. व्यवहार MBAत शिकत होतो तरी नाचणारया काळ्या अक्षरांपलीकडे त्याचं अस्तित्व शुन्य. आणि तिथे नुस्ताच व्यवहार शिकवायचे नाही तर मध्यमवर्गीयपणाही घासुन पुसुन साफ केला जायचा. तोंडावर सिगरेटचा धुर सोडत फ्रेंच मधुन इंग्रजी बोलणारया पोरी आणि जरा अतीच कुल असणारे डुड्स. एकुणात सारं सुरेख सुरु होतं.

असाच एक पुणे मुक्काम. दिवसभर मैत्रिणीसोबत हिंडत होतो. आधीच्याच आठवड्यात झालेला तिचा वाढदिवस मी साफ विसरलो होतो आणि आख्खा दिवस त्यावरुन बोलणी खात होतो. खरं तर ती माझी मावस मैत्रिण; बहीणीची मैत्रिण, पण हिशोबांपल्याडच्या दिवसांपासुन मी तिला ओळखत होतो आणि त्यामुळे तिला रागवण्याचा पुरेपुर अधिकार होता. एकुणात सारं सुरेख सुरु होतं! वाटलं हे असंच तर हवं होतं मला, तो अधिकार गाजवणं. तो आपले पणा, नात्यांचे ते तोल सांभाळणं! असं कधी जाणवलच नव्हतं आधी. .

तू असु नयेस कवितेत कधीच
केवळ संदर्भापुरती
...
तू, आयुष्यभराच्या प्रार्थनेसारखी
लख्ख निळ्या शाईचे समुद्र उलगडत येतेस
कागदावर
गृहप्रवेश केल्यासारखी

छातीत धडधडणारया सशांनी शुभं कौल दिला तसा देवाब्राम्हणांच्या साक्षीने मी आदीम प्रश्न विचारता झालो. क्षणाची युगं झाली-शब्दांचे बर्फ. तिने सलज्ज गवताच्या पात्याचे वेढे विलक्षण कोवळीकीने माझ्या बोटात गुंफले.

शब्दांचे तळ मी ढवळुन पाहीले, तिथे सारेच निरंजन होते. हिरवीकंच झाडेही ऋतुंचे परीघ ओलांडुन बहरली होती. हे सारे कधी झाले? का झाले? एका जुन्याच मंत्राचे केवळ उच्चारण तर केले होते आम्ही. आणि नंतर किती तरी वेळ अंधारया डोहात चांदणचुरा पडून प्रकाशाचे निळसर तरंग अखंड उमटत राहीले.

ऊमरें लगी केहते हुए
दो लफ़ज थे
एक बात थी
वो एक दिन सौ साल का
सौ साल की
वो रात थी
कैसा लगे जो चुपचाप दोनो
पलपल में पुरी सदियां बिता दें

Sunday, February 24, 2008

सामान

जीन्सच्या दोन्ही खिशात हात घालून परक्यासारखी तिने तिची खोली निरखुन पाहीली. लिमिटेड पसारा तिला नेहमीच आवडायचा. घर हॉटेलसारखं चकाचक कश्याला ठेवायचं? थोडं अस्ताव्यस्त असलं की घरात कसं चैतन्य वाटतं हा तिचा आणि तिच्या बाबाचा लाडका फंडा आईने गेल्या चार दिवसात गुंडाळुन ठेवला होता. "एनी वे" तिने मनातच खांदे उडवले, "लग्न झालं की हे घर सोडायचंच आहे. मग आई आणि बाबा त्यांना आवडेल आणि जमेल तसं घर ठेवतीलंच की. सुरुवात माझ्या खोलीपासून केली समजू" तिनं अस्वस्थपणे स्वतःशीच हसण्याचा प्रयत्न केला. "अजून चारंच दिवस!" कुठे जायचय यावर दिवसांचे वेग अवलंबुन असतात हे लक्षात न आल्याने चार दिवस म्हणजे अंतर जवळ की कमी, याचे हिशोब ती मनात मांडु लागली. मापनातली दोन भिन्न परिमाणे एकत्र आणूनही तिला ते उमगलं नाही. अर्थात तिच्या समजण्याउमजण्याने वेळ किंवा अंतर, काहीच कमी जास्त झालं नसतं.

धडधडत्या मनानं तिने तिचं कपाट उघडलं. तिचा खजिना, आईच्या भाषेत कचरा, अजूनही तिथेच होता. हळूवारपणे तिने एकेक गोष्टं जमिनीवर ठेवायला सुरुवात केली. आजीने आणलेली भातुकलीची भांडी, हात मोडलेली बाहुली, बाबासोबत जमा केलेले रंगीत दगड, आपल्याला आवडतात म्हणून आईने कुठून कुठून जमा केलेली नाणी...सारं तसंच होतं..तिथंच राहाणार होतं, तिला वगळता.

कपाटातल्या कुलुपबंद ड्रॉवरला तिने हलकासा हिसका दिला आणि भुकेल्या लांडग्यासारख्या सारयाच आठवणी उसळून अंगावर आल्या. बाबांनी आग्रह करुन तिला हा कुलुपबंद कप्पा दिला होता आणि त्याची किल्ली हरवल्यावर, त्यांनीच तिला हे हिसका तंत्र शिकवलं होतं. त्या दोघांव्यतिरिक्त बाकी सारयांसाठी तो कप्पा कायमच कुलुपबंद होता. आठवतात तेव्हापासुनच्या वाढदिवसाचे ग्रिटींग्ज, जुन्या, हरवलेल्या-सापडलेल्या मित्रमैत्रिणींचे फोटो, जीवापाड जपलेली काही पत्रं..

परवानगी असते तेव्हढं सारं सामान ग्रॅमग्रॅमचं गणित करुन तिच्या आईनं आधीच भरुन ठेवलं होतं. तिनं तिचं सामान नेण्याविषयी विचारलं तेव्हा बाबा कसंबसं हसल्यासारखं करुन खांद्यात वाकले होते, क्षणभर, तितकंच.

तिने हळुवारपणे मोठ्या प्रेमाने एकेक वस्तुवरुन हात फिरवत तिथेच जमिनीवर डोकं टेकवलं. गळ्यात कढ आणि डोळ्यात हिमान स्वप्नं कधी दाटून आली तिलाच कळालं नाही.

"वेडी मुलगी" पाय न वाजवता बाबा तिच्या जवळ येऊन बसला. तिच्या केसातुन हलकेच हात फिरवताना त्याला उगाचच कोवळ्या जावळाचा वास आला. तिच्या खिशातुन ओघळलेल्या काही जुन्या आठवणी आईने आर्तपणे उचलल्या. "मी जरा जागा करुन पोरीच्या चार जुन्या गोष्टी भरतेच. नव्या प्रदेशात एव्हढंच तिचं सोयर"

Saturday, February 16, 2008

जेजुरी

माझ्या अहंकाराचे टोक
प्रतिभेच्या बेचक्यातुन बाहेर येण्याआधी
तुझा गोंधळ मांडु दे जेजुरी
काट्याने कधी कोरावेच वाटले नाहीत तुझे डोळे अगणित
डोळस तुझा उदे उदे उदे


अंगांना प्रत्यांगे असतात,
आतल्या बाजुने,
कळवण्यासाठी उसवुनच टाकलेस त्वचेचे
नाजुक कोवळे पोत,
काही सिद्ध करण्याचे कसले हे उरफाटे हट्ट जेजुरी
आत्म्याच्या संपृप्ततेला आव्हान देणारी
शरीराची भाषा वसतीला आणलीस आणि सोबत माझ्या
मर्त्यपणाचे अगणित पुरावे


भरभरुन उधळु दे हळदीचे रान
जेजुरी,
माझं माणुसपण सिद्ध केलस
चल आता
उपभोगाचे उत्सव साजरे करु

शेज पिवळी-देह पिवळा
गंध तुझा मंद पिवळा
श्वास पिवळे-रात पिवळी
अंगावरचे बहरही पिवळे
उरी फुटणारे वारे पिवळे
तुझ्या देही जिरवले चंद्र
ते ही मद्द संथ पिवळे


जेजुरी, माझ्या डोळ्यातील उखाणे
तुझ्या देहावर कवितेगत उतरले तेव्हा काय झालं?
भंडारयाचं धुकं झालं
दिवसांनं सोनं न्यालं
रिकामं शहर वसतीला घेऊन
अक्षर न अक्षर जेजुरी झालं


आत्मभानाचे स्र्किझोफेनिक दुसरं टोकं
जेजुरी
बोटांनी अंगावर नव्याने कोरलेल्या जुन्याच कविता
जेजुरी
आत्मद्वेषाचे आणि अहंकाराचे उत्सव
जेजुरी
सवयीने मी
जेजुरी

Saturday, February 9, 2008

मोठा छान उजळ उंदीर

दिवस: आद्य आणि अनंत

पाल, साप, उंदीर, सरडे यांना फक्त बायकांनीच घाबरावे असा नियम आहे का? म्हणजे, सारवासारव नाही करत मी, पण मला घाबरण्यापेक्षा किळसच जास्त वाटते त्यांची.

दिवस: अकरावा (कुठून तरी सुरु करायलाच पाहीजे नाही का? Placeholder पलीकडे याचं फार काही महत्व नाही)

अचानकच गावात फार उंदीर दिसताहेत. त्यांच्या दिसण्याची इतकी म्हणून सवय झाली आहे की मघाशी पल्याडच्या बिल्डींग मधल्या पांडेकाकु मला उंदरासारख्या दात विचकुन हसल्या सारख्या वाटल्या. आणि तो ढापण्या जोश्या, त्याच्या संघीष्ट मिशा, गेल्या दोन दिवसात जास्तच फेंदारलेल्या दिसताहेत, उंदरासारख्या?

दिवस: तेरावा (१३? छान छान)

डोकं भंजाळलं आहे नुस्तं. कसली ही करणी? कुणी केली? गावातले लोक हळु हळु उंदीर होताहेत?

दिवस: सतरावा

मी चिमटा घेऊन बघितला हो! पण खरच शेजारच्या टुमण्याचा उंदीर झालाय. आणि त्याची ती गोंडस, नुक्तच लग्न होऊन आलेली टुमणी पण...श्श्श्श्श्शी...तिची उंदरीण, आय मिन, गोंडस उंदरीण झालीय

दिवस: तेविसावा आणि पुढे तसंच काहीसं...

"हॅल्लो! काय चावटपणा चाललाय हा? कुणाला नाही कळालं तरी तुम्ही आपले प्राईम नंबर टाकून दिवसागणीक आमच्यावर एक टिपणी लिहीताय हे आलय आमच्या ध्यानात"

"कोण?"

"उंदीर"

समोरच उभा होता पण दिसणार कसा? आवाजाच्या दिशेने बघितला तेव्हा मोठा छान उजळ उंदीर समोर उभा; हात हलवत!

"काय आहे?"
"कुठे काय? म्हटलं तुम्ही लेखक लोकं, लिहीताबिहीता. म्हणून आलो. आमच्यावर लिहीणार का?"
"का? तुम्ही काय पराक्रम केलात म्हणून तुमच्यावर लिहावं? टुमणीची उंदरीण केली म्हणून?"
"ते टुमणीचं तुम्ही फार मनाला लावून घेतलत लेखकराव...तिचा टुमण्या बघा कसा खुष आहे. त्यानीं नवी गाडी पण घेतली परवा. खाल्ले की नाही पेढे त्याचे?"
"गाडीचं कौतुक मला नको सांगुस.."
"मग काय तुमची न खपलेली पुस्तकं आम्ही खाल्ली, त्याचं कौतुक करु? टुमण्यानं गाडी घेतली, पांडेकाकुंचा मुलगा पार अमेरीकेत गेला तर तुम्हाला ते काय मोरली करप्ट वगैरे वाटतात की काय? "
"पण ते म्हणजे सगळं काही? अगदी अर्ध्या चड्डीतल्या जोश्यानं सुद्धा त्याचा मुलगा इंग्रजी शाळेत घातला..हे टू मच होतय"
"सगळ्यात पहीलं करेक्शन; चड्डी नेहमी अर्धीच असते, अजून अर्धी करु नका"
"अरे कसले विनोद करतोस फालतुचे! प्रश्न किती गंभीर होताहेत कळतय का तुला? आपली संस्कृती.."
"काय होतय तिला? लेखकराव, डोळे उघडा, नवं जग जन्माला आलयं. आता राज्य आमचं आहे. खाणंपिणं, जगणं, मजा मारणं तुम्हाला अजूनही पाप वाटत असेल तर तुम्हाला आणि तुमच्या सारख्या फाटक्या लोकांना आम्ही कुरतडून ठेवु. जे आहे ते इथे आहे, आत्ता आहे. आमचा सोनेरी आणि आदर्श उद्यावर विश्वास नाही. तुम्ही ट ला ट लावता म्हणून तुमचे पुर्वज माकड होते हे वास्तव बदलत नाही. सर्व्हायवल ऑफ फिटेस्टचा नियम इथे ही लागु होत राहाणार हे लक्षात ठेवा मिस्टर लेखक"

"तू म्हणतोस ते खरं असेलही पण माकडं आणि बाकीचे फिटेस्ट प्राणी जंगलातच राहीले हे विसरु नकोस. ज्या मजांच्या तू गमजा मारतो आहेस, ती माणूस इव्हॉल्व्ह झाला म्हणून शक्य आहे. आता उद्याचा माणूस घडवायचा असेल तर आजही काही शेपट्या गमावण्याची तयारी हवी"

"प्रश्नाचा भाग न बनता उत्तराचा भाग बनलात, आवडलं मला लेखकराव. पण क्रांती करायची तर आहे त्या व्यवस्थेचा आधी भाग तरी बना, बघा तरी कशी आहे ती. किती बरोबर आणि किती चुक, बाहेरच बसून बघणार? खेळ न खेळताच नियम बदलण्याबद्दल बोलाल तर कुणीच ऎकणार नाही. खेळ खेळा, त्यात जिंका आणि मग मान वर करुन नियम बदलण्याबद्दल बोला. खेळाचे नियम बदलण्याच्या आधीच नियम तोडाल, तर खेळाबाहेर फेकले जाल फुकात"अनंतकाळ न सुटलेला प्रश्न आज सुटला या आनंदात लेखकरावांनी नुक्तंच फुटलेलं शेपुट लाडात उडवुन बघितलं.

मोठ्या छान उजळ उंदरानं त्याच्या आत नव्यानं धडधडू लागलेलं माणसाचं काळीज चाचपत उड्या मारुन बघितल्या.