Sunday, May 27, 2007

यमुआत्त्याचं अचाट धाडस

यमुआत्त्यांनी डोळे किलकिले करुन बघीतलं तेंव्हा त्यांच्या इतक्याच जुन्या घड्याळाने सहाचे ठोके दिले. "वसंतराव असते तर घड्याळ्याच्या ठोक्याला चहा द्यावा लागला असता" यमुआत्त्यांनी सुस्कारा सोडला. यमुआत्त्यांखेरीज, वसंतरावांच्या आठवणी आणि हे घड्याळ अश्या दोनच गोष्टी त्या वाड्यात ताज्या होत्या. यमुआत्त्यांनी परत उगाचच सुस्कारा सोडला. वेणीफणी केली तर कदाचित थोडं प्रसन्न वाटेल असं वाटून त्यांनी जरा हालचाल केली आणि तेवढ्यात त्यांचे गुडघे बोलले. "हरे राम! हरे कॄष्ण!! सगळं बसल्या जागी होतय म्हणून बरं आहे. अन्यथा या गुढघ्यांनी जेरीला आणलं आहे. देवा.." यमुआत्त्या जमीनीवर हात रोवत कशाबश्या उठल्या. दिवाबत्ती केली नाही तर वसंतराव वरुनही आपल्यावर ओरडतील अशी त्यांना सारखी भिती वाटायची. तसं बघीतलं तर वसंतराव कोणीतरी महाभयंकर जमदग्नीचे अवतार होते अश्यातला भाग नव्हता. रेव्हेन्युतून रिटायर्ड झालेले ते एक साधेसुधे कारकुन होते. ते जिवंत असताना गल्लीतली शेंबडी पोरंही त्यांना घाबरली नसतील पण हिंदुधर्माच्या परंपरेनुसार ते म्हणजे यमुआत्त्यांचं सर्वस्व होते. आता अश्या बायकांसाठी नवरा नाही हे सत्यच आयुष्यभर पुरणारं असल्याने वसंतराव कधी गेले याचं यमुआत्त्यांना भानच नव्हतं. आजुबाजुला कोणी नाही हे बघून त्या कधीकधी फोटोफ्रेम मधल्या वसंतरावांशी गप्पा पण मारायच्या. जे त्यांच्या हयातीत कधी झालं नाही, ते आत्ता यमुआत्त्यांना करावं वाटत होतं. यमुआत्त्यांना या नावाने संबोधीत न करणारे वसंतराव एकटेच होते. जाहीररीत्या अगं आणि खाजगीत यमु..त्यांच्या अंगावर आत्ताही गोड काटा आला. यमुआत्त्या राहायच्या दादा-गोपाळदादांच्या वाड्याच्या एका भागात. गोपाळदादांची मुलं, त्यांना आत्त्या म्हणायची आणि प्रथेनुसार सारीच त्यांना आत्त्या म्हणायला लागली इतकचं. त्यांच्या सरळसोट आयुष्यात "तो एक प्रसंग" जर घडला नसता तर कदाचित आजही त्यांना कोणीतरी आत्त्या म्हणून हाक मारली असती. ऎन संध्याकाळी यमुआत्त्यांना ती आठवण नकोशी आणि अशुभ वाटली. त्यांनी खिडकीतून दादाच्या वाड्याकडे नजर टाकली. अचानक भरलं ताट कोणीतरी सोडून जावं असा तो वाडा दिसत होता; अंधारा आणि उदास. चष्म्याच्या काचा पुसल्या तर अजूनही तिथे हालचाल दिसेल असं त्यांच्या वेड्या मनाला परत एकदा वाटून गेलं. आत्ता पर्यंतच्या अनेक अशा प्रयत्नांना यश न आल्याने त्यांनी यावेळी पुढचे कष्ट घेतले नाहीत.

जिन्यावर कसलासा आवाज झाला आणि त्यांची तंद्री भंग पावली. "आता यावेळी कोण आलं असावं?" त्यांना एकाच वेळी यावेळची येणावळ हवीशी आणि नकोशी वाटली. कोणाशी तरी शिळोप्याच्या गप्पा होतील या आशेने जिना उतरलेल्या यमुआत्त्यांना अचानक दोन लहान मुलं दिसल्यानं जितकं दचकायला झालं तितकचं त्यांना बघून ती दोन मुलंही दचकली. "दार उघडं राहीलं की काय?" यमुआत्त्या आधीच क्षीण झालेल्या स्मरणशक्तीवर जोर देऊन आठवू पाहात असतानाचं "तुमचं नाव काय आहे? तुम्ही इथेच राहाता? आम्ही मुंबईहून आलोयत. मी साना आणि हा राघव. आम्ही बहीण-भाऊ आहोत." नाजुक घंट्या किणकिणल्या सारख्या आवाज आला. यमुआत्त्यांना खुदकन हसु आलं. "मी यमुआज्जी, मी कुठूनच नाही आले, मी इथेच असते." सानाची भिती जरा चेपली. कोपरयाने ढुशी मारणारया राघवकडे दुर्लक्ष करत सानाने अजून थोडा भोचकपणा सुरु केलाच होता की यमुआत्त्यांनी विचारलं "तुम्ही कोणा कडे आला आहात? कुठे राहाता?" सानाने तत्परतेने उत्तर दिलं "आम्ही आई-बाबां बरोबर आलो आहोत. आम्ही या बाजुच्या बंगल्यात उतरलो आहोत." "दादाच्या बंगल्यात? इतके वर्ष माणसाचा वावर नसणारया वाड्यात कोण आलं असेल?" यमुआत्त्यांची विचाराची साखळी सुरु झाली होती. "त्या प्रसंगा"नंतर त्यांनी दादाच्या वाड्यात कधीच पाऊल टाकलं नव्हतं. अगदी दादांनी घर सोडताना त्यांच्या लाडक्या मीराने यमुआत्त्यासाठी टाहो फोडला होता तरी त्या गेल्या नव्हत्या. किंबहुना त्यांची हिंमतच झाली नव्हती. गेल्या कित्येक वर्षात त्यांनी दादाची कोणतीच बातमी ऎकली नव्हती. कधी कोणी त्या वाड्यात आलंही नव्हतं. "कोणाची गं तुम्ही मुलं?" काहीतरी संदर्भ लागेल म्हणून त्यांनी त्या मुलांना विचारलं. इतक्या वेळ संधीची वाट पाहाणारया राघवने त्याच्या ताईच्या आधी घाईघाईने उत्तर दिलं "आई-बाबांची" साना आणि यमुआत्त्या एकदमच हसल्या. "आमच्या बाबांचं नाव समर आणि आईच नाव सखी आहे. आमचं आडनाव समर्थ आहे" सानानं माहीती पुरवली. "आता अंधार झाला. आम्ही जातो. उद्या परत येऊ" सानानं परवानगी विचारल्यापेक्षा सांगीतलच जास्त आणि ते यमुआत्त्यांना एकदम आवडून गेलं. पोरांच्या हातावर निदान खडीसाखर तरी द्यायला हवी होती असं वाटायच्या आत पोरं अचानक आल्यासारखी अचानक हवेत पसारही झाली होती.

पुढचे कितीतरी दिवस पोरांचा आणि त्यांच्या यमुआज्जींचा मस्तच कार्यक्रम ठरुन गेला होता. मस्तपैकी धुडगुस मग आज्जी कडून गोष्ट आणि जाताना साखरफुटाणे किंवा खडीसाखर. वेगवेगळ्या प्रकारे चौकश्या करुनही त्यांना या कुटूंबाचं दादाच्या वाड्यात येण्याचं प्रयोजन मात्र कळत नव्हतं. थोडी हिंमत करावी आणि दादाच्या वाड्यात जाऊन या लोकांची चौकशी करावी, त्यांना काही लागलंसवरलं तर विचारावं असं यमुआत्त्यांनी मनोमन ठरवून टाकलं.

चार वाजताच जिना करकरला तसं यमुआत्त्यांनी बसल्याबसल्या दुसरया खिडकीतून बघीतलं. "पोरं लवकरच आली वाटतं आज" यमुआत्त्या मनाशीच पुटपुटल्या. त्यांनी वरुनच आवाज दिला "साना, बाळा मला आज जरा कसकस वाटतीय. तुम्ही खेळा खाली" " हो आज्जी" राघवनी ओरडून सांगीतलं.

"समर, ही बघ पोर इथे आहेत. आपण आपले सगळीकडे शोधतोय आणि यांना त्याचं काही आहे का?" सखीने टिपीकल "आई" टोन लावत समर कडे तक्रार केली. अंधाराला डोळे सरावले तसं समरनी त्या वाड्याकडे निरखुन बघीतलं. मधे मोठी चौकोनी जागा होती, तिन्ही बाजुला पडवी, एका बाजुला जिना आणि वर एक मोठ्या हॉल सारखी खोली. आत्ता ते जिथे उतरले होते त्याची एकदम आरश्यातल्या सारखी प्रतिकृती , mirror image! त्याने तसं बोलून दाखवताच सखी हसली. "अरे नसायला काय झालं? आहेच मुळी. हा यमुआत्त्यांचा वाडा आणि आपण राहातोय तो त्यांच्या भावाचा वाडा. ते बांधताना mirror image सारखेच बांधले आहेत" समरच्या तोंडावरचं प्रश्नार्थक चिन्ह बघून सखीनी कहाणी सुरु ठेवली "यमुआत्त्या म्हणजे माझी आई-मीरा, तिची आत्त्या; आईच्या बाबांची, गोपाळ आजोबांची बहीण" डोळ्यांना फारसं दिसत नसलं तरी यमुआत्त्यांचे कान अजून शाबुत होते. आनंद, भय, उत्सुकता असे सारे भाव त्यांच्या मणक्यातून एकाच वेळी सरसरले. "म्हणजे ही सखी माझ्या मीराची मुलगी? आणि ही चिटकी मुलं माझी परतवंडं?" यमुआत्त्यांचा डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. गोपाळदादांनी नाही तरी त्यांच्या लाडक्या मीराने त्यांना समजुन घेतलं होतं, माफ केलं होतं. ज्या जखमा अश्रु आणि माफींनी भरल्या नव्हत्या, त्या काळाने भरल्या होत्या. बरं वाटत नसतांनाही त्या घाईघाईने उठल्या. नातजावयाला सामोर जायला चांगलं तयार व्हायला पाहीजे या विचारांसरशी त्यांचा अंगातला ताप कुठल्या कुठे पळून गेला. त्या चांगलं पातळ घालून तयार व्हायला लागल्या.

सखीची टकळी सुरुच होती आणि समरही आता त्या गोष्टीत रंगून गेला होता. "मीरानं, माझ्या आईनं, जाण्या आधी माझ्याकडून इथे येण्याचं वचन घेतलं होतं. आजोबांच्या हट्टापायी या आधी इथे कुणीच आलं नव्हतं" समरच्या डोक्यातला गोंधळ त्याच्या चेहरयावर उमटला तसं सखीनी तो भयंकर प्रसंग सांगायला सुरुवात केली "मीरा यमुआत्त्याची खुप लाडकी होती. यमुआत्त्याला मुलबाळ नसल्यानं तिचा सारा जीव मीरात होता. मीरा आणि तिचा लहान भाऊ मदन बहुतेक वेळ याच वाड्यात असायचे. मीराच्या आईला मात्र ते काही फारसं आवडायचं नाही. यमुआत्त्याचा वांझॊटेपणा तिला कायमच खुपायचा. आणि एक दिवस तो प्रसंग घडला. याच जिन्यावर मदन खेळत होता. मीराला काहीतरी लागलं आणि ती रडायला लागली. घाईघाईने जिना उतरणारया यमुआत्त्याच्या पायात मदन घुटमळला आणि दोघांचाही तोल गेला. जिन्याच्या रेलिंगच्या दोन खांबातून कोसळणारा मदन जिवाच्या आकांतानं धरु पाहूनही यमुआत्त्यांच्या हातून निसटलाच. निपचित पडलेला मदन पाहून यमुआत्त्याच्या पायतलं बळच गेलं. मीराच्या आईनं आख्खा वाडा डोक्यावर घेतला. सुड आणि शोक आंधळे असतात. महीन्याभरात मीराच्या आईनं सगळी आवरावर करुन वाडा आणि गाव सोडायचा निश्चय केला. मीरानं पदोपदी सांगूनही यमुआत्त्यांना कोणी माफी द्यायला तयार नव्हतं. यमुआत्त्यांनी तर स्वतःला या वाड्यात कोंडूनच घेतलं होतं. सगळ्यांनी एक प्रकाराचा बहिष्कार टाकला यमुआत्यांवर. त्यानंतर आज खुप वर्षांनी आपण इथे येतोय मीराच्या, म्हणजे माझ्या आईच्या आग्रहावरुन"

"आई.." खेळण्यात दंग झालेल्या साना आणि राघवचं आत्ता त्यांच्या आई-बाबांकडे लक्ष गेलं. "तुम्ही इथे काय करताय? इथे किती अंधार आहे" समर आता लाईटचं बटण शोधायला लागला. " बाबा, थांबा. आम्ही आज्जीला बोलावतो" कोणी काही बोलायच्या आत साना आणि राघवनी धुम ठोकली. "मी आधी" "नाही. मी आधी" डगमगत्या जिन्यावरुन पोरं भान हरपून धावत होती. सखीचा जीव थोडाथोडा होत होता आणि एका निसरड्या पायरीवरुन राघवचा पाय निसटला. आत्ता सांगीतलेली गोष्ट फ्लॅशबॅकसारखी सखीच्या डोळ्यांसमोरुन झर्रकरुन निघून गेली. "राघव..." सखीच्या तोंडून बाहेर पडलेली किंकाळी ऎकून एका प्रतिक्षिप्त क्रियेसारखी यमुआत्त्यांनी स्वतःला खिडकीबाहेर झोकून दिले. देहाचे बंधन नसल्याने पिसासारखे तरंगत त्यांनी राघवला हलकेच झेललं आणि जमिनीवर ठेवलं. समर ऎवढ्या वेळात लाईट लावून पळत मधल्या चौकात आला होता. राघवला तरंगत खाली उतरताना बघून त्याला आणि सखीला जेवढे आश्चर्य वाटत होते तेवढेच आश्चर्य यमुआज्जींचा हार घातलेला फोटो बघून सानाला वाटत होतं.

हवेतला वाढलेला गारवा यमुआत्त्यांना सुखावत होता. फोटोतून हसताना त्यांना आज एका ऋणातून उतरल्याचा भास होत होता.

***************************************************************************************************
नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी, ज्यांनी कायमच आपल्याला घाबरवलं, त्यांच्या साठी ही गोष्टं.
*****************************************************************************************************

Wednesday, May 23, 2007

Collage: उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म

कोलाज तुकडा १: मला "तुम बिन" सिनेमा विविध कारणांसाठी आवडला. त्या गोष्टीचा साधेपणा, पात्रांची संवेदनशीलता, गाणी इत्यादी इत्यादी..त्यात अजून एक मजेदार गोष्ट मला आवडते म्हणजे संथाली जेंव्हा प्रियांशुला सतत मधे मधे करण्यासाठी रागावते तेंव्हा तो बाहेर जाऊन पिज्झा घेऊन येतो आणि संथालीला सांगतो "मुझे जब भी कोई डांटता है, तो मुझे बहोत जोर से भुक लगती है." खाण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात!!

कोलाज तुकडा २: कॅन्टीन मधे मला जेवायला लागणारा वेळ हा तसा बरयापैकी थट्टेचा विषय आहे. म्हणजे मी अगदी "रवंथ" प्रकरणात मोडत नसलो तरी, शर्यत लागल्या सारखा ५ मिनीटातही मी "गिळू" शकत नाही. माझा अगदी साधा प्रश्न असतो, ही जी काही मरमर ज्या गोष्टी साठी सुरु आहे, तीच जर तुम्ही उरकणार असाल, तर कशाला अर्थ आहे? असो. हल्ली मी हा प्रश्न न विचारता, नवा प्रश्न विचारत असतो; "आज खाण्यासाठी जगणार की जगण्यासाठी खाणार?" थांबा. उत्तर द्यायची घाई करु नका. हा मोठा तात्विक प्रश्न नाहीये. याचा कॉमनसेन्सशीही संबंध नाहीये. जरा तुमच्या ताटात/डब्यात डोकावून बघा. आज तुम्ही सुरण, गाजराची रस्सा भाजी (पुण्यातल्या मेसवाल्यांचा हा शोध आहे. पेटंट प्रोसेस मधे असल्याने कॄपया ही भाजी सध्या घरी करु नये), आळूच फतफतं (भाजी नसून दलदल असल्यासारखं वाटतं नाही?) किंवा तत्सम भाजी आहे? असं असेल तर तुम्ही आज जगण्यासाठी खाणार! खाण्यासाठी जगायच असेल महाराजा, तर मोठं पुण्य लागतं पदराला. कॅन्टीन या जातीत मोडणारे असाल, तर हा प्रकार जरा uncontrollable होतो. या केस मध्ये तुमचा (पर्यायाने, कॅन्टीनवाल्याचा, भाजीपाला आणणारयाचा, बनवणारयाचा इ. इ.) पदर लयी मोठा लागतो. आणि पुण्यतर अजूनच जास्त. डबा (लिहीताना असा लिहीला तरी याचा खरा उच्चार डब्बाच आहे याची नोंद घ्यावी) प्रकरणवाले असाल तर थोडक्यात निभावतं. मागच्या पुढच्या जन्माचं सारं पुण्य जमा करायचं, कमी पडलं तर उधार उसनावार करायची पण पुण्य कमी पडता कामा नये आणि आपल्या सारख्या खाण्यापिण्याच्या (पिण्याभोवती "डबल कोट" नाही!!)आवडीनिवडी असलेला life partner शोधायचा. (अत्यंत चतूर लोकांना मी स्त्रीमुक्तीवाल्यांचा निषेधाचा कार्यक्रम हाणून पाडल्याचं लक्ष्यात आलं असेलच. तितक्याश्या चतूर नसणारया लोकांसाठी स्पष्टीकरण- मी life partner शब्द वापरला आहे, बायको नाही!!) ही सारी खाण्यासाठी जगणारया मंडळींची पुर्वतयारी झाली. याउपर शक्यतो भाजी आणताना सोबत जाणे जेणेकरुन गनिमीकाव्याने आपला घात होणार नाही याची काळजी घ्यावी. अजून महत्वाची सुचना म्हणजे स्वयंपाक सुरु असताना वादाचे मुद्दे न काढणे, त्याहूनही महत्वाचं म्हणजे सुचना न देणे. स्वयंपाकाच्या बाबतीत फुकटची कन्सलटन्सी हा "जे जे फुकट ते ते पौष्टीक" या नियमाला अपवाद आहे याची नोंद घ्यावी.

कोलाज तुकडा ३:गेल्या दिवाळीत आम्ही केरळला गेलो होतो. मनात पुकपुक होतीच. काय गिळायला मिळणार होतं देव जाणे. इयत्ता ५वीत असताना मी शाळेसोबत ट्रीपला हैद्राबादला गेलो होतो. २ दिवस उठताबसता भाताचा असा काही मारा झाला की मी भात खाणंच बंद केलं. आता केरळला जाऊन काय काय बंद होतयं बघू अश्या अत्यंत आशादायक विचारांनी भारुन आम्ही एकदाचे पोचलो. काय आश्चर्य!!! पुर्ण केरळभर आम्हाला पंजाबी खाण्याचा पर्याय मिळाला. पंजाबी लोक आक्रमक असतात माहीत होतं पण डायरेक्ट केरळ्यांच्या खाण्यापर्यंत पोचतील असं वाटलं नव्हतं. आम्ही आपले त्या खोबरेल तेलाचा अप्रतिम वास असणारं केरळीय अन्न चाखायला उत्सुक होतो आणि केरळी काही आमच्या हाती त्यांचा सांस्कॄतिक खजिना लागु देत नव्हते. एक अस्स्ल मराठी माणुस-केरळ मधे- पंजाबी खातोय!! राष्ट्रीय एकात्मता याहून वेगळी ती काय असते? शेवटी आम्ही डाव साधलाच (जनरली, नशीब डाव साधतं असा प्रवाद आहे. यावेळी आमचं नशीब फळफळलं). "पुट्टु" असं गोंडस नाव असणारा एक पदार्थ आम्ही मिळवलाच. एका वेबसाईट वर असणारं त्याचं वर्णन असं आहे : Puttu : 'Puttu' is made from rice flour and steamed in long hollow bamboo or metal cylinders. Depending on the taste preference, Puttu can be had with steamed bananas and sugar or with a spicy curry made from gram or chickpeas. थोडक्यात आम्ही अवियेल, अप्पम असे काही चांगले (असं म्हणतात बुवा लोकं) पदार्थ miss केले आणि पुट्टुची नळकांडी घश्याखाली घातली. Not bad!!

कोलाज तुकडा ४: खुप दिवस बाहेर गिळलं की मला घरच्या खाण्याची आठवण येते. सुगरण आई आणि नंतर सुगरण बायको मिळणं (सुगरण आई हे दैव आणि सुगरण बायको हे कर्म असं याच वर्गीकरण आहे!) आणि अस्मादिकांना स्वयंपाघरातलं ओ की ठॊ न कळणं असा दैवदुर्लभ योग माझ्या कुंडलीत असल्यानं मला बरयाचदा घरचं खाण्याची आठवण येते. दरवेळी भरलं ताट बघीतलं की मला अगदी गहीवरुनच येतं. केवळं जबरदस्त पुण्य असल्यानेच आपण भारतात, त्यातही महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत याची वारंवार खात्री पटते. अरे किती प्रकारच्या भाज्या, किती प्रकारचे मसाले, अगदी काही नाही तर साधं वरण- भात- तुप!! अगदी सोपी पाककॄती आहे त्याची. गुरगुट्या (म्हणजे मऊ शिजलेला)भात शिजवायचा, त्यात आळं करायचं आणि ही अशी चांगल्या तुपाची धार सोडायची आणि भाताच्या मुदीवर साध्या वरणानी सुंदर नक्षी काढायची. फिरंग्याना शेवट पर्यंत कळणार नाही की त्यांनी काय miss केलयं. काय ते एकेका भाजीचे transformation! आळूच फतफतं ते आळूची वडी!! वा!! क्या बात है! काय ते भाज्यांचे versions. वांग्याची भाजी- भरली वांगी- वांग्याचं भरीत-वांग्याचं बरच काही. बरं ही versions भाज्यांपुरतीच मर्यादीत नाहीत; कांद्याची भजी- दोन प्रकार (गोल आणि खेकडा भजी), बटाट्याची भजी, घोसावळ्याची भजी (हाय). कंबख्त, तुने भजी नही खायी तो क्या खाया?

कोलाज तुकडा ५: आमच्या घरी लहानपणी पपईचं झाडं होतं. अप्रतिम चवीची पपई कधी कधी सरळ सफरचंदाशी स्पर्धा करत गुरुत्वाकर्षणाचे नियम नव्याने पडताळत जमिनीवर झेपावायची. पच्चकन जमिनीवर पडलेल्या पपईचं काय करावं असं तुम्हाला वाटतं? आई त्याची पोळी करायची. पपईची पोळी!! नंतर विविध पराठे खाल्ले पण ती पोळी मस्तच...

कोलाज तुकडा ६: मराठी माणुस आणि पुरणपोळी खायाच नही? असं होऊ शकतं का? असं म्हणतात की आज्जी सारखी पुरणपोळी आईची कधीच होतं नसते. आज्जी असताना पुरणपोळी म्हणजे सुख होतं. पोटाला तडस लागे पर्यंत पुरणपोळी चापायची आणि बसल्या जागीच आडवे व्हायचं... राजेपण वेगळं काय असतं? ताटावरुन पाटावर...राजेपण आज्जी गेल्यावर ही कायम राहीलं ते सासुबाईंमुळे. तशीच पुरणपोळी!!

कोलाज तुकडा ७: पुणं हे खादाडांसाठी नदंनवन आहे आणि औरंगाबाद हा दुष्काळ. ईंजिनीरींगची चारही वर्ष अशीतशीच गेली. पुण्याबद्द्ल काय बोलावं? पुण्यातल्या कोणाचाही ब्लॉग काढला तर वैशाली, रुपाली, आम्रपाली अशा सुंदर सुकांतांचीच नावं आढळतात. मला पुर्ण डाऊट आहे की अस्सल पुणेकराच्या घरी रवीवारी चुल पेटतच नाही. आणि सुदैवाने मीही आता त्याच प्रकारात मोडतो.

कोलाज तुकडा ८: माझे रसिक खादाड मित्र आनंद आणि सागर सतत चांगल्या खाण्याच्या वासावर असतात. एक दिवस अचानक आनंदनी "तू नागपुरमधे खाल्लसं का?" असा गुगली टाकला. नागपुर आमच्या दोघांची सासुरवाडी असल्याने आणि तिथे संबंध उत्तम असल्याने मला प्रश्नाचा उद्देश कळाला नाही. शक्यतो सर्व सासवा आपल्या जावयांना तो या आधी कधीच जेवला नाही या गॄहीतकानुसार पोटफुटेस्तोर खाऊ घालतात. मग आनंदनी असं का विचारल या गोंधळात असतानाच त्याने नागपुर नावाचे एक हॉटेल पुण्यात आहे असं जाहीर केलं. माणसं प्रदेशाभिमानी असतात हे मान्यय, नागपुरकरांचा अभिमान जास्त तीव्र आहे हे ही मान्य आहे पण पुणेकरांच्या नाकातोंडातून जाळ काढणारं नागपुर नावाचं हॉटेल कुणी पुण्यात काढावं? आनंदच्या भाषेत सांगायचं तर ते हॉटेल बाथरुम एवढं लांब-रुंद आहे, तिथे भिंतीकडे तोंड करुन बाकावर बसून जेवाव लागतं आणि सर्वसाधारणपणे लोक तिथे जेवायची हिंमत करत नाहीत, पार्सल घेऊन जातात. आता बोला?

कोलाज ९: सुभाष अवचटनी स्टुडिओ नावाच्या पुस्तकात खाण्याच्या पारंपारीक पदार्थांचं अप्रतिम analysis केलयं.

कोलाज १०: खाणं ही पाककले इतकीच अवघड कला आहे. सर्व बल्लवांना फार वाईट वाटत असेल तर खाणं ही पाककलेला दिलेली दाद आहे असं ही म्हणू शकतो. चिन्यांबद्दल आपण सहज पणे म्हणतो की ते सर्व काही खातात. मी परवा त्यांचा एक नियम ऎकला "ज्याची पाठ आकाशाकडे आणि पोट जमिनीकडे ते सर्व काही आपण खाऊ शकतो."

Monday, May 14, 2007

दुर्मुखाच्या आयुष्यातील निरर्थकता!

'ऑऑऑ' दुर्मुखाने अगणिताव्यावेळी जांभई दिली. "आज शुक्रवार, पाच वाजलेत म्हणजे टिंब्या गेला असेल. आपणही कटोफाय" मनाशीच पुटपुटत दुर्मुख लॅपटॉपची सुरळी करु लागला. " करा लॅपटॉपची सुरळी आणि घाला.." "दप्तरात!" टिंब्याच्या आचकट विचकट कॉमेंटला मनातल्या मनात (अजून कसं?) तत्परतेने उत्तर देतं दुर्मुख जरा जास्तच जोरात बोलला. "कायरे कसले प्लॅन करतोयस? weekend चे?" "नाही गं" ठकीला सांगावं की कसं या गोंधळात दुर्मुख असतानाच ठकी अगदीच जवळ आली. "या बाईला दुसरया पासून किती अंतरावर थांबावं हे कळत नाही" हा दुर्मुखचा विचार ठकीने लावलेल्या उंची perfumeच्या वासात विरुन गेला आणि स्वतःच्या नकळत दुर्मुखाने बॉसचे लॅपटॉपबद्द्लचे विचार जमतील तेवढे सभ्य करुन सांगितले. "तसंच काही नायरे दुर्मुख" ठकीने मानेला एक सुरेख झोका दिला. "माझं नाव दुर्मुख नाहीये", दुर्मुख मनातल्या मनात (परत?) पुटपुटला. "पण मगं माझं खरं नाव काय?" दुर्मुखाला स्वतःलाच ते आठवलं नाही तसं या त्रासदायक विचारांपेक्षा ठकीकडे नीट लक्ष दिलेलं बरं असं त्यानं ठरवलं. "ठकी बॉसचा मर्जीतली, तिच्याशी चांगल्या भावनेने बोलायला पाहीजे" दुर्मुख या विचारांसरशी दचकलाच. "च्यायला! मी आत्ता या बाईला नक्की काय काय सांगीतलं?" दुर्मुखाचं डोकं एव्हाना दुखायला लागलं होतं; ते नक्की आत्ता झालेल्या साक्षात्कारमुळे की ठकीच्या perfume मुळे हे दुर्मुखालाच उमजत नव्हतं. ठकीच्या स्लीवलेसकडेही जेंव्हा त्याचं लक्ष गेलं नाही तशी आपल्या निरर्थकतेची जाणीव दुर्मुखाला नव्याने झाली.

दुर्मुख तसा अगदीच टाकाऊ नव्हता. पण त्याला हसताना शेवटचा कोणी पाहीला हा जसा पैजेचा विषय झाला तसं दुर्मुख हे त्याचं नाव त्याच्या सकट सगळ्यांनीच मान्य केलं. टिंब्याचं तसं नव्हतं. टिंब्या कायमच dotted lines च्या भाषेत बोलायचा आणि अर्धवट भरलेल्या ppt पुर्ण करायला forward करायचा म्हणून तो स्टाफपुरता टिंब्या. त्याचा सगळा स्टाफ त्याला त्याच नावाने ओळखायचा म्हणून lets call him टिंब्या. टिंब्याची प्रजननक्षमता अफाट होती. तो कायमच नव्यानव्या आयडीया प्रसवत राहायचा आणि दुर्मुख अजूनच खचत जायचा.

टिंब्याचं नवं initiative होतं personal productivity मोजायचं. जगभर sales target हीच मोजमापाची पट्टी असताना टिंब्या salesvolume, total sales, cost of selling, time to sale, inventory, shelf life, customer satisfaction index असल्या बरयाच गोष्टींचं combination असणारा एक फॉरम्युला घेऊन आला होता आणि दुर्मुखाला आता त्याच्या लोकांच्या personal productivity मोजून द्यायच्या होत्या.

"सर, आम्ही कामं करायची की तुम्ही दिलेली कोष्टकं भरत राहायची ते एकदाचं सांगा"
"हा डेटा आपण ठेवतच नाही दुर्मुख, बेसलाईन कसली काढणार, कप्पाळ?"
"सेल्सवाले म्हणतात मार्केटिंगवाल्यांना कामं नाहीत म्हणून हे चाळे सुचतायत"

टीमच्या उदंड प्रतिसादावरुन आपली quarterly review त कशी लागणार हे नकळण्या इतपत दुर्मुख निर्बुद्ध नव्हता.

दुर्मुख: टिंब्या सर हे आमचे आकडे. जसं की तुम्हाला pptत दिसतच आहे आम्ही...
टिंब्या: दुर्मुख, sales is function of market तुला नव्याने सांगायला नकोय. तुमचे नंबर्स उत्तम आहेत कारण लोकांना तुमच्या सॉफ्टवेअर्सची गरज आहे. तुमचं असंcontribution काय? मला personal productivity चे नंबर्स देशील तर मी तुमचा performance judge करु शकेन.

आता ही आकडेवारी दिली तर टिंब्याला आपलं contribution नव्याने कसं कळेल हे न लक्ष्यात आल्यानं दुर्मुख खुळावला.

"सर, आपण साईटच्या हीट्स गॄहीत धरुया"
"अपग्रेड म्हणजे shelf life समजलं तर?"
"सगळे आकडे जमा करु, outlayers काढू, मिनीटॅब इक्वेशनच देईल काढून"
या सगळ्याचा आपल्या सॉफ्टवेअरच्या खपाशी काय संबंध आहे हे न समजुन ही दुर्मुखाने रिकामे पणाने मान हलवली.

Review-II टिंब्या आम्ही काहीतरी केलय रे. pilot करतोय.
स्वतःच्या नकळत दुर्मुख खेळात सामील झाला. ठकीनं कौतुकानं पाहीलं तशीतर पोरांनी केलेल्या कामाची त्याला स्वतःलाच नव्याने खात्री पटली. मिटींग रिक्वेस्ट पाठवून ठकी साठी कॉंन्फरन्स रुम मधे त्याने एक डेमोही दिला. यावेळी मात्र त्याने ठकीच्या स्लीवलेसकडे निरखुन पाहीले. "नवीन काही करायचं झालं तर जुनी गॄहीतके मोडावी लागतात. डॊळ्यांवरचे चष्मे उतरवून आपल्याला नव्या दॄष्टीने परिस्थीतीकडे पाहावे लागते. It's all about common sense which is not common!" ठकीचा पदर किचिंत ढळला नसता तर दुर्मुख बोलतच राहीला असता. सावरासावरी करुन ठकीनं कल्पनेपलीकडचा प्रश्न विचारला;" याचा तुमच्या कामाशी काय संबंध रे दुर्मुख?" ठकीने मानेला दिलेला गोड झटका दुर्मुखाला गर्तेत कोसळताना किंचीत जाणवला.
review-III. Stage : Pilot
review-n. Stage : Pilot
"दुर्मुख, लॅपटॉपच लोणचं घालू नकोस. तुला आम्ही तो enabler म्हणून दिला आहे. किती दिवस पायलट पायलट खेळणार आहेस?"
"काही तरी फालतू घेऊन आमच्याकडे नका येऊ रे. सेल्स कसा करायचा आणि वाढवायचा आम्हाला माहीतीये"
"सर, आपल्या ग्रुपमधे गेल्या दोन वर्षात कोणालाच प्रमोशन नाहीये, इतकं path breaking इक्वेशन देऊनही!"
"तू घरी कशाला येतोस जर ते डबडं तुला सतत उघडं ठेवायचयं तर?"
"दुर्मुख, तू काम छान delegate केलयसं हं"(मानेला गोड झटका) "आता कसं, तू नसलास तरी तुझी मुलं देतात हवी ती माहीती"

आयुष्याची दिशा हरवल्यासारखा दुर्मुख भांबवला होता. वाढणारा सेल्स, वापरात नसलेली इक्वेशन्स, पोरांची अडकलेली प्रमोशन्स, ठकीचा स्लीवलेस, टिंब्याचे आचरट विनोद...दुर्मुखाला कशाचीच संगती लावता येत नव्हती. रिकामेपण वाढलं तसं दुर्मुखाच्या डोक्यात भलतेसलते विचार यायला लागले.

मनाचा हिय्या करुन शेवटी दुर्मुखाने आत्मह्त्येचा निर्णय घेतला. कोंडी सुटण्याचा हा एकच मार्ग आहे याची खात्री पटल्यावर दुर्मुखाने हिशोब मांडले. पीएफ, इन्श्युरन्स, दगडं-माती सगळे मोजले तर बायको-पोरांच आयुष्य सुखात जाईल याची त्याला खात्रीच पटली. आपल्या अंगात एक नवा उत्साह संचारला आहे याच्या जाणीवेने त्याचं मन प्रसन्न झालं.

दुर्मुखाच्या चेकलीस्टमधला शेवटचा आयटम म्हणजे ठकीला हे सगळं सांगणे.

नेहमीचे सारे रुटीन (मानेला झटका वगैरे) पार पाडल्यानंतर ठकी किंचित गंभीर झाली. "किती सुंदर दिसते ही गंभीर झाली की. पण मला आता याचा काय उपयोग?" दुर्मुखाने जमेल तेवढा दीर्घ सुस्कारा टाकला. त्याच्याकडे कम्प्लीट दुर्लक्ष करत ठकीनं legal point काढला "दुर्मुख, तुझ्या सगळ्या प्लॅन मधे एक झोल आहे रे. तू सुसाईड केलीस तर तुझ्या बायडीला इन्श्युरन्सचे पैसे नाय रे मिळणार!" आता दुर्मुखाच्या तोंडून नैसर्गिक सुस्कारा पडला. "च्यायला, आपल्याला एवढं साधं कळू नये" दुर्मुखाच्या डोळ्यात आता विषाद दाटून आला.

खुप कठोर होऊन दुर्मुखाने ठकीचा मोह सोडला! नौकरी बदलली!! त्याच्या आयुष्यात हा एक क्रांतीकारकच बदल होता.

जुन्या बायको-पोरांसहीत नव्या नौकरीत नव्या निरर्थकतेसह दुर्मुख सुखाने नांदु लागला!

Wednesday, May 2, 2007

नाटकाला..एक "जाणं"

नाटकाला जाणं ही नाटका इतकीच एक सांस्कृतिक बाब आहे या निष्कर्षाला मी आता येऊन पोचलो आहे. सध्या मुळातच इतकी "विनोदी" नाटकं येताहेत की त्या विनोदांची दहशतच बसावी. त्यामुळे अशात नाटकाला जाण्याचा योग आला नसला तरी आपण आपल्या संस्कृतीचे पालन करत असुच या या आशे वर ही प्रस्तावना संपवतो.

माझ्या नाटक बघण्याचे मुख्यतः ३ टप्पे असावेत. गुलझारांना नमस्कार करुन पहीला फ्लॅशबॅक..

आठवतय तेंव्हा पासुन मी कलोपासकच्या नाटकांना जातोय. ही लातूरची एक मस्त संस्था आहे. बहुतेक प्राध्यापक मंडळींनी चालवलेली आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम दाखवणारी. इथे मी काय नाही पाहीलं? राजा ईडीपस, महानिर्वाण, शांतता कोर्ट चालु आहे... मराठीतील एकाहुन एक सरस नाटकं.

नुस्ती नाटकंच का? वा उस्ताद! होण्या अगोदरचा झाकीर! माझ्या आठवणीनुसार तो अल्लारखां सोबत आला असेल पहील्यांदा आणि जेमतेम २०-२२ वर्षांचा असेल. त्याचा एका बहीणीच्या शेजारी मी बसलेलो, खुप लहान असेन, बोटांनी ताल धरला होता. बरयाच वेळ ते बघून ती आईला म्हणाली " समज चांगली आहे. शिकवाल तर बरं"..हाय रे कंबख्त. उमज समज नसणार वय, शुन्यभर अक्कल आणि भिडस्तपणा या सदगुणांच्या बळावर मी ही संधी घालवली!
लातुरचे हे कार्यक्रम म्हणजे एक अफलातून प्रकार होता. कोणतही नाट्यगॄह नाही, सारं चालायचं ते open air ground किंवा एका मंगल कार्यालयात. पण लोक भारी रसिक आणि जाणते. त्यामुळे सारे कलाकारही उत्साहाने perform करायचे.
तर अश्या ठिकाणी नाटकाला जायची तयारी करायची म्हणजे नक्की काय? सर्वात आधी दादांना पटवून त्यांच्या सोबत कमीतकमी २ तास आधी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचणे, तिथे गाद्या घालू लागणे आणि सर्वात पुढच्या गादीवर स्वतः पासुन ते चपलां पर्यंत सगळं काही पसरवून जागा "book" करणे! माणुस हा कधीही समाधानी नसतो. इतक्या पुढे बसुनही हेवा वाटायचा तो वाजीद नावाच्या sound वाल्याचा. कारण तो स्टेजच्या पायरीवर बसून नाटक बघायचा. मोठ्ठा झाला की वाजीदच व्हायचं, पैसेही मिळतात आणि नाटकही जवळून बघता येतं असं माझं किती तरी दिवसांचं स्वप्न होतं.

पहील्या अध्यायाच्या तयारीतच दुसरा अध्यायही सुरु होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला शिवाजीला बालनाट्य बघणे. हा तसा लिमिटेड कार्यक्रम होता, सुट्टीपुरता. सिंड्रेला, हिमगौरी आणि ७ बुटके असली वेगळ्याच जगात घेऊन जाणारी नाटकं! त्यांचे भारी भारी सेट, त्यातल्या स्तिमीत करणारया जादु...सारं वेगळंच. पण तिथेही आमची वेगळी तयारी होतीच! खादाडी!!! नाटका इतकच खाणं हा त्या संस्कॄतीचा अविभाज्य भाग आहे हे मला तिथे पटलं. आपल्यावर नुसते नाटकवालेच नाही तर बाहेरच्या बटाटेवडावाल्यालाही पोसण्याची उच्च जबाबदारी आहे हे जाणवल्यावर कर्तव्याच्या ओझ्याखाली मी पार दबून गेलो. वेफर्स आणि पॉपकॉर्न ही उच्चवर्णीय खाद्यही खाणावळीत सहज सामावून गेली. आता त्या वेफर्स आणि पॉपकॉर्नचा किती आवाज येत असेल या कल्पनेनेपण लाज वाटते पण आता ऎकु येणारया मोबाईलच्या खणखणीत रिंगेपेक्षा तो आवाज जास्त पाचक होता.

आता मुख्य भाग. पुण्यात किंवा पार्ल्यात, गेला बाजार शिवाजीत (मोठा झाल्यावर) नाटक बघणे. कोणी जर उगाचच टी शर्ट आणि जीन्स घालून आलं असेल तर हा नवशिक्या हे इथलं उघड सत्य. बायकांचे कसे (कोणाच्याही) लग्नातले असे वेगळे कपडे असतात, कायमच; तसे नाटकाचे म्हणून वेगळे कपडे असतात. पुरुषमंडळींनी कायम झब्बा घालावा, वय, उंची, अंगकाठी याचा विचार न करता. झब्ब्याखाली पायापर्यंत येणारे कोणतेही वस्त्र चालते; पायजमा, चुडीदार किंवा फारच Yo असाल तर जीन्सही चालते. संगीत नाटक असेल तर शक्यतो प्रौढ लोकांनी (तसे ही संगीत नाटकांना तेच जातात हल्ली. "फुला सारखी हलकी हलकी" असं म्हणणारा कवळी लावलेला कॄष्ण आणि ४० वर्षाची लठ्ठ्मुठ्ठ हलकी हलकी राधा आपल्याला तरी नाही बाबा बघवत) एखादं जॅकेट घातलं तरी हरकत नाही. पायात फक्त "चपला". आजकाल लोक फ्लोटर किंवा सॅंडलही घालतात; कालाय तस्मै नमः म्हणायचं आणि काय! मोबाईल असतोच, तो silent/off करायचा. नस्त्या ठिकाणी श्रीमंती दाखवायची नाही. मधे पुण्या (अजून कुठे?) विक्रम गोखलेंनी, लोक वारंवार विनंती करुनही मोबाईल ऑफ करत नाहीत म्हणून नाटक थांबवून साष्टांग नमस्कार घातला आणि स्वतःच्या थोबाडीतही मारुन घेतली म्हणतात. असली वेळ खरा नाटकवाला कधीच दुसरयावर आणत नाही. so point is, switch off your mobile. . खिश्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चिल्लर. कोणताही गजरेवाला (प्रस्तावना लक्ष्यात येतेय नां?) आणि कॉफीवाला तुम्हाला चिल्लर देत नाही. So better you carry it with you.

नाटकाला तयार होणे यात ३ भाग असतात; पुरुषांचे तयार होणे, मुलांचे तयार होणे आणि बायकांचे तयार होणे. यातले पहीले २ भाग मी स्वानुभवावरुन लिहीले आहेत. आता तिसरा भाग हा मुख्यतः "अनुभवणे" यावर आधारीत आहे. जसा पुरुषांना झब्बा, तशी बायकांना भारीची साडी MUST! इथे Yo दिसण्यापेक्षा Old Wine दिसणं जास्त महत्वाचं. गजरा पुर्वी MUST होता, आता केसांसोबतच अश्या गरजाही कमी झाल्या आहेत. आणि नाटकाला आल्याचा एक विशिष्ट भाव चेहरयावर यायला हवा. मुलं ही "ब्याद" असून "नवरा" नावाचा गॄहस्थ या ब्यादेला सांभाळण्यासाठी सोबत आणला आहे हे त्या "विशिष्ट भावा"च रहस्य.

नाटकाला जाणे यातला नाटका इतकाच किंवा जास्त महत्वाचा भाग म्हणजे मध्यंतर. घाई घाईत जाऊन वडे आणणे, कॉफीचे कप सांभाळणे, ते ही स्वतःचे आणि दुसरयाचे कपडे खराब न करता हे जितके महत्वाचे तितकेच महत्वाचे म्हणजे नाटकावरची चर्चा. बालगंधर्व किंवा यशवंतरावला जर कधी असा मध्यंतर अनुभवला तर आपण चुकुन नाट्यप्रशिक्षण शिबिराला आलेलो असून इथे विजयाबाई किंवा दुब्यांचे गुरु हे नाटक अजून कसं चांगलं होऊ शकलं असतं हे सांगताहेत असा भास होतो.

कॉलेजच्या गॅदरींगच्या दर्जाची नाटक यायला लागल्या पासून नाटक पाहाणं खुप कमी झालं असलं तरी अधुनमधून झटका आल्यासारखी चांगली नाटक येतातही. I am sure to experience the same culture again there!