Saturday, June 20, 2009

...आणि डार्लिंग

"आठवणी येताहेत जन्मापासून
जन्मापूर्वीच्या. जन्मानंतरच्या. गर्भाशय हादरले,
तडकले, जागोजाग तेव्हाच्या.
आठवणी येताहेत तळघरातील भातुकलीच्या शेजारी
निवांत निजलेल्या अधोरेखित टिपणाच्या.
..
आठवणी येताहेत पहाडामागून, पहाडापूर्वीच्या.
एका उपनदीचे नाव डार्लिंग."
नदीला असतात आकार, उगम, अंत आणि काही नावे. मी अगस्त्य, समुद्र म्हणू तुला डार्लिंग? अट्टहास आणि परिणाम एकत्र तोलायचे नाहीत या जीवघेण्या बोलीवर तुझे अनंग अस्तित्व वसतीला आले माझ्या. शब्दहीन अर्थांचे पुंजके लगडले आहेत मेंदुला तेव्हा पासून. रंगीत पुंजके. निळे, हिरवे पिवळे उदाहरणार्थ अनंतपण, वासना आणि विरक्ती अनुक्रमे. आणि हो काळे आणि पांढरेसुद्धा. निम्बस; घनकल्लोळ काळेपणाला आकृतीबंधात गुंफणारा सोनेरी धागा, तो ही आहेच. रंगांचे इतके सहजी वर्गिकरण होणे नाही पण पॅलेटमधे कुस्करलेल्या रंगांच्या ट्युब्स काही तरंग सोडून जातात मनात. मी मुळचाच निसर्गवादी; पुज्य आणि सांख्य, धन आणि ऋण, निर्मिती आणि विनाश आणि हो, काळे आणि पांढरे एकत्रित आवडतात मला. या न्यायाने तुझ्या अनंग अस्तित्वाचे दुसरे शारीर टोक असणार कुठे तरी. शोधु म्हटले तर सापडणार नाही. आभाळ थोडेसे कलेल तेव्हा हाकेच्या अंतरावर थांबशील तू? कावळ्यांचे हाकारे रान उठवित नाहीत पण आत्ममग्न जंगलाची वीण उसवण्याचे सामर्थ्य असते त्यांच्या ओरडण्यात.तू अर्थ, माझ्या शब्दातीत, शब्दहीन कवितांचे. अनुभवांचे, प्रतिमांचे ध्रुवीकरण झाले की गाभूळलेल्या पावूस थेंबागत मेंदुच्या कुठल्याश्या पाकळीत हल्केच फुलतेस तू. डार्लिंग, तुला जशी शब्दांची तहान नाही तसे मलाही तुझ्या वैश्विकरणाचे मोह नाहीत.मैत्रिण आठवते मला. तिच्यावर रचलेले काही शब्दपुंजके, कविता म्हणते ती त्यांना, तिला भेट दिले कुणी. अपेक्षेपेक्षाही मला ते शब्दपुंजके दाखवुन वेडावण्याचेच भाव जास्त होते त्यात. काय साध्य करायचे असते त्यातून? माझी आत्ममग्न लय मोडण्याचे दुःसाहस? शब्दांची मायावी शक्ती? की डार्लिंग तुझ्या दुर्बोध, अशारीर अस्तित्वाला प्रत्यक्षात येण्याचे आव्हान?
"राम चालला पुढे असे जुनेच वाटले" आठवणी येताहेत जन्मापासून जन्मापूर्वीच्या. जन्मानंतरच्या. अंधाराचा लख्ख कवडसा चमकतो क्षणभर. अहिल्येला मिळालेला शाप हे रघुरामाच्या स्पर्शापुरते निमित्त. स्पर्शाच्या साक्षात्कारात तुझे शब्दमल्हार, शब्दवेल्हाळ, शब्दगंधार अस्तित्व नव्याने उदयाला येते डार्लिंग आणि माझ्या कवितांना शब्दांचे शक्य आयाम मिळतात. तुझे आकार साकारताना माझ्या कविता देहचूर होतात.राजपुत्र


लडाखच्या वाळवंटात बौद्ध भिक्षुणी चोरुन जमिन उकरते. खोलवर आत दडवलेला आरसा काढून स्वतःचे तारुण्य न्याहाळते. मोहाशिवाय मुक्ती नाही हे तिला कळेल कधी तरी? काही गोष्टी उगाच आठवत राहातात.

राजपुत्राने आरसा पाहीला. प्रतिबिंबाच्या डोळ्याला डोळा देताना बुबूळात उमटत जाणारया अंतहीन प्रतिमांच्या इंद्रजालाची त्याला भूलंच पडली. कवितांचे अमानुष वादळ संध्याकाळभर घोंघावत राहीले.