Sunday, July 20, 2008

काळेकुट्ट सर्पगार काही

//१//

दिवाभीत काळोखात देखील त्याला मानेवरुन पाठीकडे सरकणारे सर्पगार स्पर्श जाणवले. क्षणापुर्वी थोड्या अंतरावर झालेल्या कारच्या स्फोटाने त्याचे हात अजूनही थरथरत होते. चार फौजी ऑफीसर वाळुच्या किल्ल्यासारखे विस्कटुन गेले होते. कुणाचं काय कुठं होतं हे न ओळखु येण्याइतपत विस्कटलेले! त्याला मौलाना आठवले. ज्या विश्वासाने त्यांनी त्याच्यावर ही कामगिरी सोपविली होती, तितक्याच सफाईने त्याने ती पार पाडली होती. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या असंख्य अपमानित बांधवांचे मळलेले पण आज हसणारे चेहरे तरळत होते. एमआयटीतला केमिकल इंजिनिअर ते धर्मयोद्धा, एक कठीण अंतर केवळ श्रद्धेपोटी त्याने पार केले होते. मौलाना भेटले नसते तर आजही तो एमआयटीच्या लॅबमधे प्रयोग करत बसला असता. एमआयटीच्या आठवणीसरशी त्याला तिथेच भेटलेली अबिदा आठवली. त्याच्या डोळ्यात तिचे उष्ण श्वास उतरले पण जाणवलेच नाहीत. मात्र मणक्यावरचे सर्प आता अधीकच धीट झाले होते. त्याने स्वतःची पाठ चाचपून बघीतली, रक्ताचा एक काळसर लाल ओघळ गडद होत जात होता. कदाचित बॉम्बचा एखादा तुकडा उडून त्याच्या पाठीत रुतला होता. विषारी मृत्युची चाहूल त्याच्यातल्या इंजिनिअरला आधी लागली. "तो तर त्याच्या धर्मासाठी लढत होता. मग त्याच्या अस्तित्वासाठी कोणीच का नाही लढलं?" प्रश्नचिन्हांच्या फेरयात मौलानाचे धार्मिक प्रचार विरत गेले. "त्याच्या नंतर अबिदाचं काय? त्याच्या दोन मुलांचं काय?" पापण्यांना झोप पेलवत नव्हती तरी प्रश्न संपत नव्हते. ग्लानी भरल्या डोळ्यांसमोर एमआयटीचा कॅम्पस आला, त्याचे मित्र आले,भुतकाळातून त्याचं गाव, शाळा, त्याचे अर्धशिक्षित अब्बु-अम्मी आठवत राहीले. आठवणींच्या भोवरयातून परत अबिदा उगवली. पण तिचे स्पर्श त्याला अलिप्त, श्वास शिळे आणि डोळे धुके भारले वाटले. मेंदुची एकेक पाकळी गळत असताना त्याला त्याच्या धर्म आणि देवापेक्षा अबिदाची जास्त गरज वाटत होती. या विचारांसरशी दचकण्याइतपतही त्राण त्याच्यात आता उरलं नव्हतं. अबिदा जिंकली होती. त्याने शांतपणे तिचा विजय मान्य केला आणि डोळे मिटले. कुठेतरी खोल त्याला तिचे हात जाणवत होते, त्याच्या केसांतुन फिरणारे, त्याला समजवणारे, त्याला शांत करणारे. त्याच्या पापण्यांवर कुणीतरी आभासांची फुंकर घातली आणि तो शांतपणे झोपी गेला.

//२//

भिंतीला डोके टेकवुन अबिदा किती वेळ बसून होती माहीत नाही. विचार करुन मेंदु थकला तरी डोळ्यांना आवर नव्हता. गेल्या सहा आठ वर्षात तिने तिच्यापुरतं जग बदलताना पाहीलं होतं. कुण्या धार्मिक नेत्याच्या सहवासात तिचा हसरा फारुख कधी केमिकल फारुख झाला आणि एका अनंत धर्मयुद्धात सामिल झाला तिला कळाले पण नव्हते. अमेरिकेने अघोषित धार्मिक-आणिबाणी लादली आणि फारुखने अफगाणिस्तानला परतण्याचा निर्णय घेतला. अमेरिका ते अफगाणिस्तान हा फक्त भौगोलीक प्रवास कधीच नव्हता. त्याचे कपडे, त्याचं दिसणं, त्याचे विचार, त्याचं वागणं सारं बदलत गेलं. नौकरी करणारी, उच्च शिक्षित अबिदा त्याच्या एका निर्णयासरशी सामान्य होऊन बसली. तिच्यासाठी धर्म म्हणजे जगण्याची फक्त एक पद्धत होती. चार लोकांच्या चार वेगळ्या पद्धती आणि म्हणूनच चार वेगळे धर्म असु शकतात हे तिला कळत होते. पण कोणती तरी एकच पद्धत खरी आणि म्हणून माझाच धर्म श्रेष्ठ हा अट्टहास तिला कळत नव्हता. पवित्र धर्मग्रंथांचे नव्याने लावले गेलेले अर्थ तिला उमगत नव्हते. एका विशिष्ट काळात लिहील्या गेलेल्या धर्मग्रंथांना काळाच्या तराजुत न तोलता काळच मागे नेण्याचे अजब साहस कोणी वेडे करत होते आणि त्यांच्यातच एक तिचा फारुखही होता. आपल्यास सख्ख्या माणसाबद्दल असं भुतकाळी वाक्यं बोलून अबिदा शहारली. सत्य कधी बदलत नाही फक्त सत्याचे अर्थ नव्याने उलगडत जातात. केमिकल फारुख ठार झाला, फारुख शहीद झाला, माय फारुख इज नो मोअर! विविध प्रकारे सत्याचे पडसाद उमटत राहीले.

//३//

मौलाना किती तरी वेळ शुन्य नजरेने बाहेर चाललेला मुलांचा खेळ पाहात होते. त्यांचं मन भलतीच कडे होतं. यांच्या लपण्याच्या ठिकाणापासून जवळच एक मोठी सैनिकी तुकडी आली होती. तिला जर उडवता आलं असतं तर एक मोठा विजय प्राप्त होणार होता, अनेक हत्यारं आणि गाड्याही मिळाल्या असत्या. पण पहारा मोठा कडक होता. तिथं पर्यंत पोचणं हेच मुळी आव्हान होतं. एक प्रदीर्घ श्वास घेऊन ते परत मुलांचा खेळ पाहु लागले. जमातीचे उद्याचे सैनिक, उद्याचं भविष्य! किती तरी वेळ तो राज्य आलेला मुलगा त्याचं राज्य वाचवुन होता. मध्यभागी ठेवलेल्या डब्ब्याभोवती तो एखाद्या सिंहासारखा पहारा देत होता. अचानक धुळ उडवत शाद आला. गुडघ्याच्या खालपर्यंत आलेला कुर्ता, त्याच्याही खाली लोंबणारा पायजम्याचा नाडा, एका हातात तलवारीसारखी उभी धरलेली छ्डी आणि पाठीमागे कुण्या वात्रट पोरांनी लावलेली डब्याची माळ अश्या अवतारात शाद खिदळत खिदळत आला. त्याच्यामागे लावलेली भली मोठी डब्याची माळ त्याच्या सारखी पायात येत होती, दगडांवर आपटत होती आणि त्यातुन चित्रविचित्र आवाज येत होते. राज्य आलेल्या पोराचं क्षणभर लक्ष विचलित झालं, क्षणभरच; पण तेव्हढ्यात बाकीच्या भिडुंनी "ह्येयेये डब्बा गुल्ल" असा गजर करत डबड्याला लाथ घातली. मौलाना पोरांच्या हुशारीवर मनोमन हसले. राज्य आलेला भिडु शादला बुकलुन काढत होता. मौलानांनी सहजपणे त्याला बाजुला केले आणि शादच्या मागची डब्यांची माळ काढत त्याच्या धुळभरल्या केसांचा मुका घेतला. उद्याचा सैनिक! त्यांना आज सापडला होता.

//४//

अबिदा वेड्यासारखी शादला शोधत होती. शाद, वय दहा-अकरा वर्षे, मानसिक वय? कदाचित दोन किंवा तीन. आणि ते आयुष्यभर तेव्हढच राहाणार होतं. विविध प्रकारे टोच्या मारणारया पोरांपासून ती शादला प्राणपणाने जपायची. तरी ही पोरं कधी शादच्या मागे डबड्यांची माळ लावायचे तर कधी त्याचे कपडे फाडून टाकायचे. वाळुतल्या कोरड्या युद्धखोर वातावरणात शाद एक करमणुकीचं करुण साधन बनून उरला होता. नाश्या आधी सतत शाद सोबत असायची पण जेव्हा ती बारा वर्षांची झाली होती, मौलानांच्या आदेशावरुन फारुखनं तिचं घराबाहेर खेळणं बंद केलं होतं. फारुखच्या जाण्यानंतर वेगळ्या अर्थानं अबिदाला ते बरंच वाटत होतं. तिच्या स्वतःच्याच सुरक्षिततेची जिथे खात्री नव्हती, तिथे नाश्याच्या कोवळ्या तरुणाईबद्दल ती सतत धास्तावलेली असायची. नाश्याचा हात घट्ट धरुन ती अंधारया गल्लीत शादला हाका देत होती. स्वतःचं नाव कसंबसं सांगु शकणारया शादबद्दल तिच्या मनात भलतेसलते विचार यायला लागले तसं मात्र तिचं अवसान गळालं. नाश्याला मौलांनांच नवं ठिकाण माहीत होतं. सकाळ झाली की तिनं त्यांना शादबद्दल सांगायचं असं ठरवुन न संपणारया रात्रीच्या कुशीत माय-लेकी परतल्या.

//५//

मौलानांसोबत शाद मजेत होता. त्याचे अब्बु जसे त्याच्याबरोबर तासंतास खेळायचे तसेच मौलाना आणि त्यांचे मित्र शादशी खेळत होते. त्याला त्रास देणारया मुलांना मघाशीच मौलानांनी शिक्षा केली होती त्यामुळे शादला त्यांच्याबद्दल विलक्षण उमाळा दाटून आला होता. जसा लाडात आला की तो त्याच्या अब्बुंना डोक्याने ठो द्यायचा, तसाच ठो मौलानांना द्यायचा हे त्याच्या बालमनाने कुठेतरी ठरवुन टाकलं होतं. "इतक्या लहान वयात धर्मसैनिक होण्याची संधी सर्वांनाच मिळते असं नाही. फारुख महान आत्मा होता हेच खरं. याचं भाग्य थोर म्हणून देवानं याला इतकं विशेष बनवलय. मोठा झाला तरी याच्या मनाचा निर्मळपणा कधीच हरवायचा नाही." मौलाना शादच्या डोक्यावर हात ठेवून मनाशीच पुटपुटले. मौलानांचे साथीदार भराभर शादचे कपडे बदलत होते. त्याच्या कुर्त्याखाली त्यांनी एक कापडी पट्टा बांधला. त्यावर घड्याळासारखी एक तबकडी टिकटिक करत होती. मौलानांनी पवित्र मंत्र उच्चारल्यासारखे काही तरी केलं आणि स्वतःच्या घड्याळाकडे बघत पट्यावर एक वेळ नक्की केली. फारुखनं बनवलेला एक शक्तिशाली टाईमबॉम्ब उद्या अमेरिकन तुकडी उडवणार होता. मौलानांना पुरतं माहीत होतं की या वेडसर मुलाबद्दल जसं थोड्यावेळापुर्वी खेळणारया मुलांना संशय आला नव्हता तसाच तो उद्या सैनिकांनाही येणार नव्हता. अकरा वर्षांचा मानसिक रुग्णाईत सुसाईड-बॉम्ब मौलानांनी योग्य जागी पोचवण्याची व्यवस्था केली

//६//

टिकटिकटिकटिक
शांतता
प्रकाशाचा दिव्य झल्लोळ
अन नंतर कल्लोळ काही
परत शांतता
स्मशानशांतता

//७//

फारुख वॉज अ जिनिअस. त्याचे केमिकल्स कधीच चुकत नाहीत
फारुख वॉज अ गॉडमॅन. त्याचा मुलगाही त्यावेळी चुकला नाही

//८///

अबिदा-शोकाचं झाडं
अबिदा-सुडाचं वर्तमान
अबिदा-अधर्माचा धर्म
अन
धर्माचा अधर्म देखील

//९//

नाश्याला अनंताची झोप झोपवुन अबिदा मुक्तपणे घराबाहेर पडली. मौलानाचा नवा पत्ता घेऊन तिला अमेरिकन सैन्याकडे पोचायचं होतं.

Wednesday, July 2, 2008

बिनबुडाची टिपणं


काही टिपणं फार विक्षिप्त असतात. त्यांना ना बुड ना शेंडा पण त्यांचं अस्तित्व काही नाकारता येत नाही. बरं दोन टिपणांमधे काही साम्य असावंच असा ही नियम नाही. पारयासारखी ही टिपणं मनाला येईल तेव्हा एकत्र होतात आणि मनाला येईल तेव्हा परकी होतात. पण म्हणून लिहीलं नाही तर उरावरही बसतात

आमच्या सोसायटीकडून डहाणुकरला जाताना स्मृतीवन लागतं. किंचित जंगल म्हणता येईल इतपतच झाडांची दाटी आहे तिथे. सवयीने तिथली झाडे शिळी झालेली. हल्ली साधं लक्षही जात नाही तिकडे. परवा अखंड पाऊस पडत होता आणि अचानकच हिर्व्या रंगाचं काहूर माजलेलं दिसलं स्मृतीवनात. जुनीच कविता आठवली

झाडे
शांत रात्रीच्या येण्यानंतरही
स्तब्धतेची शाल पानांआडून
सावरुन किंचितशी दमल्यासारखी

झाडे
सारे ऋतु पानगळ मनात
असून नसल्यासारखी अलिप्त
खोल मुळे गाडून घट्ट उभी राहील्यासारखी

झाडे
माणसांवर कलम होतात कधी
स्वतःच्याही नकळत रुजून जातात
झाडे, मात्र वाटतात कधी कधी झाडांसारखी


झाडांची आठवण निघावी आणि फुलांचे ऋतु आठवु नयेत म्हणजे शुद्ध क्रुरपणाच. काय गडबड आहे मेंदुत माहीत नाही पण मला कधी गुलाबाचा वासच येत नाही. सुगंध म्हटलं की आधी माठातल्या पाण्यात तरळणारा मोगरा आठवतो. चिकाटीने दर ऋतुत आणलेल्या आणि तितक्याच चिकाटीने रुजलेल्या निशीगंधाच्या लांबसडक दांड्या आठवतात. लताच्या परिपुर्ण तानेसारखा टपोरा सोनचाफा आठवला तरी डोळे भरुन येतात आजही. माझ्या खोलीच्या काठावर रातराणी होती. भरती-ओहोटीच्या कोणत्याच नियमांना न जुमानता रोजचं चांदणं लगडायचं तिच्या हरेक डहाळीवर. लेकुरे मधे किती गोड गोड बाळ जसे या गाण्यात कुंदाच्या उगवाया लागल्या कळ्या असा सुरेख संदर्भ आहे. पोरीबाळी एकच गर्दी करायच्या कुंदाचा बहर वेचायला पण दिलदार फुलं कधी कमी नाही पडली. देठाकडून केसर पेरत जाणारा पारिजात जवळ जवळ वर्षभर दाराशी फुलांच्या पायघड्या घालायचा. रात फुलों की बात फुलों की गाणं नुस्तं लहडलेलं असतं आठवणीं मधून.

मंद, पिवळसर पांढरया फुलांचे ऋतु मावळले. रात्री कधी तरी जाग येते तर खिडकी बाहेर गुल्मोहर पेटलेला असतो. रस्ते किंचित ओले आणि दमट पिवळा प्रकाश. काळजात ताज्या कवितेचे काही अवशेष विखुरलेले असतात.

रात्रीचं आरंभशुर चांदणं मावळलं की
हवासाच असा तो अंधार
पडतो अन
शब्दहीन क्रांतीच्या उंबरठ्यावर
कविता झरते.
वेचावी तर
खिडकीच्या तंद्रीदार चौकटीच्या काठावर
मी डोळे सोडून दिलेले.
आत्म्यासारखे आकारहीन अर्थ
शब्दावाचून वाहात राहातात.

चांदण्यांनी अंधार ओढून घ्यावा असा
विलक्षण काळोख
मंद्र लयीतून पाझरणारा पावूस झेलत
मान खाली घालून उभी असणारी झाडे
तरी ही डोळ्यात उगवत असतात
माझ्या