Tuesday, October 30, 2007

रंग

रंगावरुन मनाच्या तळाचे कंगोरे सांगणारा भविष्यवेत्ता भेटला होता मला एकदा.

"बोल काय सांगु तुला? भुतकाळातली भुतं की वर्तमानाचे वर्तमान? म्हणत असशिल तर भविष्याचे आरसे आत्ताच दाखवीन उलगडून. ओळखशील स्वतःला आत्ताच, तर सावरशील कदाचित काळाच्या एखाद्या निसरड्या क्षणावर. मनापासुन ऎकशील तर कदाचित फायद्यात राहाशील नाहीतर थोडीशी गंमत समज आणि विसरुन जा"

सुर्याची कुळं आणि चंद्राची मुळं खणून भविष्य वर्तवणारी असंख्य बिनचेहरयाची माणसे मी पाहीली होती. हातांवरच्या रेषात भुत-भविष्य शोधत हरवलेली माणसेही माझ्या पाहाण्यात होती. पण निसर्गाच्या अंगांगात भिनलेल्या रंगांचे, त्यांच्या अनंत छटांचे विलगिकरण करु पाहणारा हा पहिलाच.

संधीला पंख असतात वायुचे, अशब्दाचे तीव्र कान आणि मौनाची बेजोड भाषा.

"निळा" मी माझ्याच नकळत बोलता झालो.

"विशाल! बच्चा, मोठं मन, मोठे विचार...आकाशाची भव्यता- सागराची खोली लाभली आहे तुझ्या आवडीला"

निळ्या रंगाच्या अनंत छटा माझ्या डोळ्यां समोर तरळत राहिल्या. उत्तरे नसतातच, प्रश्नांचेच छंद होऊ पाहाताहेत आता.

"बाबजी, पिवळा रंग? बुद्धाची करुणा आणि ऍनचं एकाकी पण दिसतं मला. कान कापलेला, उन्हात तळपून सुर्याहूनही तेजस्वी व्हिन्सी दिसतो मला कधी त्यात.."

"उत्तरांचे कसले प्रश्न करतोस बच्चा? विरक्तीचे निःशब्द मार्ग दिसतील तुला, जरा डोकावुन पाहा तुझ्या रंगात"


विचारण्या विचारण्यात रंगा मागून रंग संपले; कधी हिरवा, कधी पारवा आणि पोत तरी किती त्या रंगांचे..गर्भरेशमी हिरवा आणि राघुचा ही हिरवाच.


तो पॅलेटमधले रंग कॅनव्हासवर ओतत राहिला. तलम मऊशार त्वचेवर धारदार चाकुने हळूवार नक्षी काढावी तसे कॅनव्हासचे अर्थ बदलत राहिले आणि कॅनव्हासाची नियतीही. रंगांचे गुढ अर्थ समजुन घेण्यासाठी आता त्याला कुण्या भविष्यवेत्त्याची जरुर नव्हती. एकेक रंग असे चित्तवृत्तीच्या एकेक टोकाला बांधले तर एका माणसातुन किती माणसे उभी राहातील याचे हिशोब त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. आकारां पलीकडले आकार आणि मिती पलीकडल्या मिती रंगवून जीव थकला तसे त्याने प्रकाशाचे दान मागितले आणि सर्वत्र प्रकाश झाला.


ज्या नक्षत्रावर
आम्ही जन्मलो
त्याचे सारेच गुणदोष
कॅनव्हासवर पसरले होते
त्यातून कोणीतरी कोरुन
काढलेलं नाईफपेंटींग
म्हणजे आमचा समुर्त देह

Sunday, October 28, 2007

सृजन-सर्जनत्वाचे अपरंपार शोध

एखाद्या कलाकृतीचा अर्थ लावणे, तिला समजून उमजून घेणे आणि दिसणारया परिघाच्या आतील वर्तुळ शोधणे हे सृजनत्वाचे प्राथमिक लक्षण. कलाकृती "वाचणे" म्हणजे समिक्षा करणे हे गृहितक काही अंशी खरे असले तरी त्या समिक्षेची मांडणी, अभिव्यक्तीचे माध्यम आणि मुख्यतः कलाप्रकाराची खोलवर जाण या मुद्यांवर आपण सृजन आणि समिक्षक यांचे द्वैत समजु शकतो. सृजन आणि समिक्षक यांचे हे वर्गिकरण म्हणजे water tight compartmentalization नव्हे. पण समिक्षक हा दर वेळी सृजन असतोच असे नव्हे, कोरडेपणाने व्यवसायाचा भाग म्हणूनही समिक्षा होऊ शकते. पण सृजन हा कोरडा नसतोच आणि तो जाणकार असेल असे ही नाही आणि म्हणूनच त्याच्या मनोवृत्तीत ढाळून एखादा कलाप्रकार बघणे हा मोठा गंमतीचा अभ्यास होऊ शकतो.

हा भुप राग, हा सकाळीच म्ह्टला गेला पाहिजे किंवा कुमारांनी इथे समेवर येणे अपेक्षित आहे किंवा हे शार्दुलविक्रिडीत म्हणजे मात्रांचे गणित हे असेच! समिक्षक होता होता राहिलेली, जाण असणारी ही सृजन जमात शास्त्रकाट्यांच्या कसोटीवरच कलेचा आस्वाद घेते. पण हा अभ्यास कधी कधी इतका कठोर होत जातो की रसिकतेची बाकी परिमाणे हळूहळू फिकुटत जातात. पुर्वी नाडकर्णी मटात नाटकं आणि सिनेमावर लिहायचे. कित्यकेदा समिक्षक नाडकर्णी आणि रसिक नाडकर्णी यांच्यात फारच धुसर फरक असायचा आणि पानभर फक्त अमका अँगल कसा हवा होता आणि तमक्या प्रसंगात वाजणारे पार्श्वसंगीत कसं चुकीच्या रागात आहे याचीच चर्चा व्हायची.

बाल की खाल काढणारी म्हणून एक जमात असते. ठणठणपाळाने एकदा धोंडांची या सवयीबद्दल चांगलीच फिरकी घेतली होती, तिच ही जमात. नक्की कोणत्या मनस्थितीत कलाकृतीचा जन्म होतो, त्याचा कलाविष्काराशी कसा संबंध आहे आणि म्हणून त्या कलाकृतीचा हा अमुकतमुक अर्थ असं हे वर्तुळ आहे. कुमारांचा घसा कसा खराब झाला, त्यांच्या गाण्यावर त्यामुळे कशी बंधने आली आणि म्हणून त्यांची स्वःतची अशी गानशैली निर्माण झाली असे हे गणित. मर्ढेकरांनी पिंपात ओल्या लिहीली तेव्हा प्लेगची साथ आली होती का? गॉगने पिवळी सुर्यफुले रंगवली होती तेव्हा त्याचा brain disorder सुरु होता म्हणून ती फुले जास्त ब्राईट किंवा ग्रेसना बालपणातून ईडिपस कॉम्प्लेक्स डेव्हलप झाला म्हणून सुमित्रेचे असंख्य शारीर उल्लेख...भुतकाळ, सापेक्ष परिस्थिती, भोवतालचे वातावरण या सारयांचा कलाकृतीची असणारा संबंध यांचा अंदाज बांधण्याचे एक अवघड काम ही मंडळी करत असतात.

कलाकृती समोर उभे करणारे असंख्य अवघड प्रश्न जमलेच तर स्वःतच्या अनुभवांशी जोडू पाहाणारी आणि नाहीच जमले तर त्या प्रश्नांसकट आयुष्य जगण्याची हिंमत ठेवणारी सृजनाची ही एक वेगळीच रित. एका अर्थाने थोडीशी लंगडीही कारण बाकीच्या सृजनजातीनां कलेच्या शास्त्राचं किंवा कलाकृतीमागच्या इतिहासाचं पाठबळ तरी असतं. ही जमात म्हणजे खरा कॅलिडास्कोप, प्रत्येकाचे अर्थ वेगळे, कलाकॄतीला भिडण्याची रित वेगळी आणि म्हणूनच आस्वादाची पातळीही निराळी. अर्थात इथे कलेचं किंवा कलाकाराचं गणित नसलं तरीही सृजनाच्या अनुभवसिद्धतेची समिकरणे मात्र नक्कीच असतात. मला किशोरी प्रचंड आवडते, तिची मीरा ही आवडते पण तिने म्हटलेले मराठी अभंग रुचत नाहित कारण माझं ट्रेनिंग भिमसेनांच्या आवाजात पारंपारिक चालितली भजनं ऎकण्यातलं असतं. मला शेक्सपिअरची नाटकं, त्यातली स्वगतं, त्यातलं संगीत समजतं पण म्हणून मला बाख भावलाच पाहिजे हा आग्रह नाही. रविवर्मा माझ्या मातीतला, पुराणातले सारे संदर्भ अजूनही ताजे आहेत म्हणून तो पिकासोच्या पल्याडंच आवडला पाहिजे असं नसतं. यात तुलना किंवा प्रतिवारी नाही. हे अनुभवांना भिडणं, माझ्या अनुभवसिद्धतेवर अवलंबुन आहे.

सॄजन-सर्जन म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांचे representation आहे; एकमेकांशिवाय अपूर्ण पण तरी ही पुर्ण.

सर्जनांचे असंख्य पद्धतीने वर्गिकरण आधीच झालेले आहे. थोड्या वेगळ्या दृष्टीने बघायचं झालं तरी उपलब्ध वर्गिकरणावर एक मोठा ओव्हरलॅप असेलच.
स्वःतच्या अनुभवावर लिहिणारे, दुसरयांच्या अनुभवांवर लिहिणारे, खरे, काल्पनिक, भलं-बुरं...अक्षरशः अतोनात प्रकार. पण आचवलांनी एका कवयित्री बद्दल बोलताना सर्जनाची अफलातुन व्याख्या सांगितली आहे; ती कवयित्री निर्मितीक्षमतेच्या ज्या बिंदुला पोचलेली असते, तिची कविता सृजनाला नेमकी त्याच बिंदुला पोचवते.

कोडी..असंख्य कोडी....

Tuesday, October 23, 2007

विदुषक

विदुषकाने एकदा त्याच्या दुखरया पायाकडे आणि नंतर लग्नाचं वय उलटून गेलेल्या त्याच्या मुलीकडे आणि निठल्ल्या, निकम्म्या मुलाकडे अनुक्रमे हताशपणे आणि तिरस्काराने पाहीलं. "या पोरानं काही उद्योगधंदा केला असता तर आज हा मोडका पाय घेऊन नाचावं लागलं नसतं, ना या पोरीच्या लग्नाची चिंता करावी लागली असती" विदुषकानं मनातल्या मनात विचार केला "आणि हो, त्या नव्या बेरकी मॅनेजरची बोलणीही खावी नस्ती लागली." मॅनेजरच्या आठवणीने विदुषक कसानुसा झाला. गेल्या काही महिन्यांपासुन त्याचं वय जाणवत होतं आणि सर्कसच्या त्या छोट्या तंबुचे नियम मोठे स्पष्ट होते; लंगड्या घोड्यांना तिथे जागाच नव्हती. विदुषकाला तरीही खात्री होती की या नव्या जमान्यात सर्कसला कोणी दुसरा जोकर सापडणार नाही. शिवाय त्यानं आज लंगड्या पायांनी मारलेल्या बेडूक उड्यांनाही पब्लीक बरं हसलं होतं. आजचा शो आठवून विदुषकाला जरा धीर आला आणि पायाचं दुखणं मागे सारुन त्यानं मॅनेजरच्या तंबुचा रस्ता धरला. "कदाचित येव्हढ्या वर्षांची सेवा आणि जुने दिवस आठवून देणारा आजचा परफॉर्मन्स, या बळावर एक जीर्ण पगार वाढ!" विदुषकाचं पायाचं दुखणं कुठल्या कुठे पळून गेलं आणि एक पाय खुरडत तो नव्या उत्साहाने मॅनेजरच्या तंबुत घुसला.

"तू आता मुक्त आहेस"

विदुषकाला कुणीतरी थोबाडीत मारल्यासारखं वाटलं. "मुक्तं?" विदुषकानं हा शब्द परत परत उच्चारुन बघितला पण त्याला काहीच अर्थबोध होत नव्हता. आपल्या पायात नक्की खिळा घुसला होता की कुणी आत्ताच आपल्या गुडघ्याच्या वाट्या काढून घेतल्या हे न समजल्यामुळे विदुषक हातांच्या भारावर भराभर उड्या मारत तंबुत परतला, नेहमीच्या सवयीनं.
विदुषक सतराशेचौदाव्यांदा तोंड घासून बघतो. त्याच्या चेहरयावर चढलेली रंगाची पुटं उतरत नसतात. दोन्ही हातांनी गच्च धरुन आता तो चेहरा उपटण्याचे प्रयत्न करत असतो.


नव्या नव्या उत्साहात, विदुषकाचा निकम्मा मुलगा रंगीबेरंगी कपडे घालून, नाकावर लाल रंगाचा बॉल ठोकून बसवत असतो.


अंगावर फक्त रात्र ओढून, विदुषकाची मुलगी, बेरकी मॅनेजरची आतुरतेने वाट बघत असते.

Monday, October 22, 2007

सावित्री

-१-
...
मी म्हटलं,"मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. जें जें हवं तें तें आपणच व्हायचं"
...
-२१-
केवळ एका पत्रांतील दोन शब्दांनी ती ओथंबलेली असते. तिला पुष्कळ वेळां कांहीच सुचत नाही. कुठून कसे धागे विणले गेले. कुठल्या पाखरांनी स्वरांची ओवणी केली.

दिवस तिला अपरुप असतो, रात्र फुलवारी. पण तिच्या मनाला नाही सोसत शब्दांची बंदिषी.

ती म्हणाली होती, अशीच कधीं तरी येईन-आणि दिवस लोटले तरी आलीच नाही.

मग वाटेवरच्या बागेंत त्याला कोण भेटलं? कोण कुणाकडं निघालं होतं?

बरोबर चालतांना पावलं आडखळलीं नाहींत. डोळे कुठंच रेंगाळले नाहीत. वाट ओळखीची झाली आणि बाजूच्या झाडांनी सावल्यांची तोरणं बांधली. खालीं पडलेल्या जुन्या पानांना पहिली आठवणहि उरली नाहीं.

नदीच्या काठांवर ती बसली होती तेव्हां तिनं उगाच पाण्यांत खडा टाकून कुणाला भिवविलं नाहीं. एक सारस पक्षी दुरुन येऊन काठांशी गवतावर अलगद उतरला. त्याचं पाण्यांतलं प्रतिबिंब जरसुद्धा सरकलं नाहीं.

पहिली पावसाची सर अचानक आली तेव्हां ती भिजत चिंब तशीच उभी राहिली.

देवळाच्या आवारांत त्याच्याबरोबर फिरतांना तिनं सहज एक उत्सवांतील नाचाची गिरकी घेतली आणि क्षणभर नसलेली वाद्यं तालावर घुमूं लागली.

ओढ्यावर बसून फुलं गाथतांना जीं थोडीं कोमेजलेलीं होतीं त्यांनाहि तिनं हारांत सांवरुन घेतलं.

हे सगळं कुठं झालं?

कुणाच्या तरी साठ सांभाळलेल्या प्रश्नांची ही पाच संगतवार उत्तरं.

**********************************************************************************************************

पुस्तक: सावित्री
लेखक: पु. शि. रेगे

कधी, ते आठवत नाही पण बहुदा इंजिनिअरींगच्या दिवसांमधे, आईने मला हे छोटंसं पुस्तक दिलं. आवडणारी खुप पुस्तकं आहेत, सावित्री अगदी टॉपवर आहे असं ही नाही पण या पुस्तकात एक मराठीत सहसा न आढळणारं अत्यंत रोमॅन्टीक वातावरण आहे.

Monday, October 8, 2007

कागदा सारखा निरक्षर माझा हरी झाला

-१-

Writer's Block :- अशी एक अवस्था ज्यात लेखकाला काही तरी सांगायचं असतं किंवा त्याला तसं वाटतं (की आपल्याला काही तरी सांगायचय) पण ते कागदावर उतरवता येत नाही. जरी या अवस्थेला Writer's Block असे नाव असले तरी बहुदा सर्व कलाकार या फेजमधून जाऊ शकतात. सर्वसाधारणपणे याला मेन्टल ब्लॉक असे ही म्हणता येऊ शकते. ही अवस्था काही दिवसांपासून काही वर्षांपर्यंत राहु शकते.
अनुभुतींची कमतरता, कला माध्यमाचा तोकडेपणा, प्रतिभा आणि व्यवहार यांच्यातील अटळ ओढाताण ही यामागची सिद्ध झालेली काही कारणे आहेत. या व्यतिरीक्त मेंदुतील काही रसायनांचे असमतोल हे एक असिद्ध कारण आहे (स्वस्त भाषेत केमिकल लोचा).
यावर उपाय म्हणून लेखकाने अश्या अवस्थेत सतत काही तरी लिहीणे आवश्यक असते, रोज निदान २-३ पाने. शक्यतो असे लिखाण दुय्यम दर्जाचे असल्याकारणे ते आपल्यापुरतेच ठेवावे हे इष्ट.

-२-

सगळंच अस्वस्थ आहे
आभाळ गच्च भरुन यावं आणि सांडूच नये असं काही तरी
एकेक श्वास शब्दांच्या बोलीवर उधार आणलेले
शब्द सापडलेच नाहीत तर? अर्थांचे सारे कोलाज परत मागाल मला सारे?


-३-

"कागदा सारखा निरक्षर माझा हरी झाला"

लिहू म्हणताच पाषाणाचा आरसा झाला
जिव्हाळ्याचे शिल्प आले जन्माला
रानोमाळ हिंडणारया ओळी एकत्र आल्या
वनमाळी अनुभव मधोमध उभा झाला
पाठमोरा पाठकोरा सामोराही कोराच
कागदासारखा निरक्षर माझा हरी झाला

-४-

अमृता प्रितमची मुलाखत सुरु होती. एक चाळा म्हणून त्या कागदावर काही तरी बरबटत बरबटत मुलाखत देत होत्या. मुलाखत संपल्यावर त्यांच्या लक्षात आलं की कागदभर त्यांनी साहीर- साहीर असं लिहीलं होतं. त्याचा हा संदर्भ:

"मी कोरया कागदावर तुझे नाव लिहीत गेले
आणि त्याचीच एक कविता झाली"

"कलमने अज्ज लोडिया गीता दां काफिया
एह इश्क मेरा पहुचिया, अज्ज केहडे मुकाम ते"

-टीपा-

प्रथम चरण- बरयाच लोकांनी Writer's Block चा उल्लेख केलाय. त्याची एक जमेल तेव्हढी व्याख्या मला इथे टाकावी वाटली म्हणून हा कोरडा वाटणारा उद्योग

द्वितीय चरण- या ओळी माझ्या

तृतिय चरण- दिलीप चित्र्यांची एक मला अतिशय भिडलेली कविता. आता ही कविता इथे का असे विचाराल तर मला ती या कॉन्टेक्स्ट मधे भेटली. हरवणे, सापडणे आणि सापडल्यानंतरचा कोरडेपणा असा काहीसा या कवितेचा पोत आहे.

चतुर्थ चरण-या चार ओळी एकाच कवितांचा भाग आहेत की नाहीत माहित नाही पण मला त्या तशा वाटतात. सांगण्याचा मुद्दा असा की तुमची लिखाणा कडे बघण्याची दृष्टी, त्यामागची इन्टेसिटी जर दांडगी असेल तर जगण्यासाठीच्या दोन ओळी कश्याही मिळतील.
अमृताची मी कोरया कागदावर तुझे नाव..ही कविता मला माझ्या आठवणीत अजून दोनदा भेटली आहे; गुलजार आणि दिप्ती नवलच्या कवितांमधून. नक्की संदर्भ आठवत नाहीत.

Monday, October 1, 2007

निवांत आकाशाचा एखादाच मनसोक्त तुकडा

इथे जरासे वेगळेच

मुळे रुजवावित तर माती
बेभरवशाची
वीण उसवावी तर सोबतीला
प्रकाशाची लख्खं तिरीप
आणि आरश्यांना सलज्ज शिकवणुक लयबद्ध डोळ्यातुन
देह भोगण्याची

थांबेन तर टोकभर जागाही पुरेल अन चालेन तर समुद्र मागे सारावे लागतिल प्रिय

मायावि
क्षुल्लक
अस्तित्वाला निरंतराचे अगम्य आव्हान

या क्षणी
माझ्या खिडकीच्या टोकावरुन दिसणारा
निवांत आकाशाचा एखादाच मनसोक्त तुकडा
तोच खरा