Sunday, March 29, 2009

माया

हिवाळ्यातील तहानेचे संकेत जरासे निराळे
त्यात तगमग नसते उन्हाळी
निवून जाण्याचे सोसही नसतात
तुझ्या गुणसुत्रांची मांडण
कदाचित तशीच;
तालबद्ध अवरोहांची
विलंबित लय.

तुटण्याचे भय आणि
जोडण्याची उत्कटता
समेवर पेलतात
तुझे मायावी हात..

हात..
बर्फाचे
अभ्रकशुभ्र..
किंचित पारदर्शी
आणि संदिग्धही..

माझ्या देहचूर कविता
झाडात चंद्र अडकावा तश्या
उसवतात
तुझ्या स्पर्शातून

स्पर्श...
बर्फाचा..
अस्तित्वाचे दंश
पुसून रक्ताशी
एकरुप होणारा
वंशहीन..
हिवाळी ओल्या तहानेसारखा

तुझ्या भरतीचे एक वतन माझ्या
हवाली करताना
फकिराच्या वासनेचा उरुस
तुझ्या दिठीत
पाहीला मी

आणि तेव्हापासून
माझ्या चेतनातंतूंवरुन
वाहाताहेत तुझे
ओले स्पर्श

Sunday, March 22, 2009

नाव देण्याचा कंटाळा आल्याने नाव न दिलेले पोस्ट

परवाच्या लोकसत्तात दहावीची परिक्षा झाल्यानंतर बर्फाचा गोळा खाणारया हुश्श्य आणि खुश्श्य अश्या तीन मैत्रिणींचा फोटो आला होता. तो बघून आनंद आणि हेवा असं काहीसं एकत्र वाटलं. कुठलीही आनंदी माणसं दिसली तरी मला आनंद होतो. नुस्ती माणसंच का, आनंदी मूडचं गाणं किंवा एखादा आनंदी प्रसंग पाहीला तरी का कोण जाणे पण रक्त अचानक निळसर गुलाबी होतं असं मला सारखंच वाटत आलय. आणि इथे तर परिक्षा नावाच्या राक्षसाचं मर्दन करुन आलेल्या तीन मैत्रिणी! फुल ऑफ युथ!! कसलेही ताण नाहीत, भविष्याची चिंता नाही, मैत्रीचं अजब गारुड अजूनही गळेकापु स्पर्धेपासून अलिप्त ठेवू शकतं!! बोला राव, अजून काय हवं असतं कधी कधी आनंदी असायला? आणि हो, पुढचे दोन-तीन महीने निवांत सुटी! आणि माझ्यातल्या रिंगवाला एजंल इथे संपतो आणि शिंगवाला राक्षस जागा होतो! आम्हाला का म्हणून नाही सुट्या? पोरांएव्हढंच उन, किंबहुना जास्तच आम्हाला लागतं (कारण एसीच्या सवयी), आम्हालाही पोटाला तडस लागेपर्यंत आब्यांचा रस खाऊन दुपारी डाराडूर झोपावं वाटतं, मामाचा गाव आम्हालाही असतो, निवांत वाचायची म्हणून जमा केलेली पुस्तकं, जमा केलेले सिनेमे, गाण्याचे छंदबंदंवाले क्लास अश्या तुंबून स्तब्ध झालेल्या लिस्टा आमच्याही तयार असतात. आता बोला, आम्हाला का नको सुट्या? मी मघाशी हेवा वाटतो म्हटलं तो या कारणांसाठी. कामं काय सुरुच राहाणार.

यावरुन आठवलं. परवा कुठेतरी बीबीसीचा एक सर्व्हे वाचला. समजा दिवस २४ ऎवजी २५ तासाचा झाला तर जास्तीच्या एक तासाचं काय कराल? भारतीय माणसाचं प्रातिनिधिक उत्तर म्हणे त्या एक तासात जास्त काम करु असं होतं! आपली लोकसंख्या पाहीली की भारतीय माणूस किती कामसु आहे हे कळतंच अन काय! डोंबल..

याच सर्व्हेत अजून कुण्या देश्याच्या लोकांनी व्यायाम करु,खेळ खेळू अशी (निराशाजनक) मनोगत व्यक्त केली आहेत. माझ्यासारख्या अ-खिलाडु (वृत्तीच्या नव्हे, सदेह)माणसाला यात काय गम्य? शाळेत असताना खेळाचा तास हा राठोड सरांना तंबाखु खायची सोय म्हणून ठेवलेला असतो यावर आमचा ठाम विश्वास होता. नाही तर खेळाचं एकही आयुध शाळेत नसताना आम्हाला नियमितपणे खेळाचा तास उगाच का असणार? मधेच एकदा उगाच क्रिकेट खेळण्याचं फॅड आलं. कुणीतरी म्हणालं की कॉर्कचा बॉल हत्तीच्या पो (शी!) पासून बनतो. आमच्यातील काही महाभाग ताज्याच आलेल्या सर्कशीतल्या हत्तीवर बारीक नजर ठेवून होते. पण बहूदा त्या हत्तींची पचनशक्ती दांडगी असावी किंवा त्यांना खायला देत नसावेत कारण त्यांना शेवटपर्यंत "तसं" काही मिळालं नाही. शेवटी होम-मेड कॉर्क बॉल ऎवजी बाजारातून रेडीमेड बॉल आणून आम्ही खेळायला सुरुवात केली. तर मुद्दा असा की खेळाविषयीचं प्रेम हे असं. उन्हाळ्यात दुपारचं बाहेर कुठे पडता म्हणून बैठे खेळ खेळु म्हणाल तर साप-शिडीतले साप त्याची सापीण मारल्यागत डूख धरुन आम्हाला नव्वदीवरुन थेट पटलाच्या सुरुवातीलाच आणून पोचवायचे. कुठल्या पत्त्याचा कुठला कोपरा दुमडला आहे किंवा कसं हे ध्यानात धरुन अट्टल पत्तेबाज बरोबर हुकुमाचं पान ओढून घ्यायचे किंवा उजवी भुवई खाजवली की बदामची राणी हे असलं बाईलबाज काहीतरी लक्षात ठेवायचे. आमची ट्रेकींगची आवड जो किल्ला सकाळी दहानंतर उघडतो, जिथे दर वीस फुटावर चमचमीत काही तरी खायला मिळतं, जिथे ऎतिहासिक बघण्यासारखं काहीही नसतं, ज्याला शक्यतो इतिहास-भूगोल नसतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिथे शेवटपर्यंत गाडी चढते अश्याच स्थळांपर्यंत मर्यादित आहे. अश्या ठिकाणी भिंतींवर मनोरम मजकुर असल्यास प्राधान्य. वाचनाची आवड अन दुसरं काय!

वाचनावरुन आठवलं, परिक्षेहून घरी आलं की पहीलं काम असायचं पुस्तकांची यादी तयार करणे. कॉलेजची लायब्ररी आपलंच वतन असल्यानं सायकलला भल्या थोरल्या दोन पिशव्या लावून सकाळी सकाळी कॉलेज गाठायचं. आधी डोळेभरुन नीट रचून ठेवलेली ती पुस्तकं बघायची आणि नंतर शिवाजीनं सुरत लुटली नसेल तितक्या तडफेनं ती लायब्ररी लुटायची. कॉलेजच्या शिपायांना फुकटंच पुस्तकांवरची धूळ निघाल्याचा आनंद आणि लायब्ररीमन चंदूकाकाला आमच्या वाचनाचंं कौतूक. पिशव्या तरी फाटतील किंवा हात तरी तुटतील इतपत पुस्तकं जमली की सायकलला तो खजिना अडकवायचा आणि दुप्पट वेगाने घरी. टीव्ही, सिनेमे असले चक्रवाढ व्याजी फुजूल चित्तविचलक नसल्याने आंघोळ आणि झोप वगळता हातात सतत पुस्तक असलंच पाहीजे असलं गहजब हे व्यसन. (यावर सविस्तर कधीतरी स्वतंत्र पोस्ट मस्ट! इती स्वगत नोंद)

सुटीतला दुसरा उद्योग (उपक्रम नव्हे उगाच संघात गेल्यासारखं वाटतं)म्हणजे आंबा. तुम्ही आयुष्यात हापूस, चूकलं, अल्फान्सो शिवाय काही खास खाल्लं नसेल तर तुम्हाला आंबा प्रकारातली गंमत कळणार नाही (आंबा! यावरही पोट-पोस्ट होऊ शकतं! दुसरं स्वगत). सुटीत पहाटे उठून आम्ही आंबा आणायला जायचो. आमच्या भागात जो आंबा येतो त्याला गोटी आंबा म्हणतात. हा डझनावर वगैरे घ्यायचा नसतो, हा शेकड्यात घ्यायचा आणि शेकडा म्हणजे १०० हे गणित इथे नाही. इथला शेकडा म्हणजे ११० वगैरे आंबे. चव म्हणाल तर अजिबात कन्सिस्टन्सी नाही, एक गोड निघेल तर दुसरा क्कच्च आंबट निघू शकतो. हातातलं पुस्तक बाजूला ठेवायचं, खास आंबे खाण्यासाठीचे म्हणून काढलेले कपडे चढवायचे (म्हणजे रस सांडला तरी वाईट वाटणार नाही या लायकीचे कपडे. काही लोकांना सगळं म्हणजे सगळं विस्ताराने सांगावं लागतं. डफर लेकाचे) आंब्यांची दुरडी घेऊन अंगणात (अंगण: घरासमोरील/मागील मोकळी जागा. पूर्वी अशी जागा असायची)बसायचं आणि त्या आंब्यांचा छातीभरुन गंध घ्यायचा. मग आव देख्या न ताव देख्या, आंबा माचवायचा (आंबा नैसर्गिकरित्या पिकतो आणि आपण जेव्हा तो "मोकळा" करतो त्यास माचविणे म्हणतात)आणि तोंडात पिळायचा. त्याची कोय चोखून चोखून पांढरीभुरुक करताना काय चिन्यांसारखे बारिक डोळे व्हायचे!

असो. तर हे सगळं परत करायचं तर सुटी नको का? जास्तीच्या एक तासात काम करणारयांना यातली मजा नाही कळणार. त्यांना शिक्षा म्हणून घरगुती कॉर्कबॉल करायला पाठवावं असा असुरी आनंद देणारा विचार माझ्या मनात पक्काच पक्का होत जातोय. काय म्हणता?

Sunday, March 8, 2009

टू टेल्स

//१//

सत्यशीलाने मोहाचे पाश तोडायचे ठरवले. अंतीम सत्याचे ज्ञान हेच त्याचे साध्य होते. अजून थोडा उशीर केला तर निश्चयाचे बळ कमी पडायला लागेल हे ओळखुन त्याने राजप्रासादाच्या दुसरया टोकाला असणारया मुख्य महालाकडे कुच केली.

सत्यशीलाचा मनोदय ऎकून भाल्यागत ताठ राजा क्षणभर खांद्यातून वाकला. राजा म्हणून त्याचे धर्माप्रती कर्तव्य होते खरे पण म्हणून आपल्याच राजवंशी अस्तित्वाला असं पणाला लावावं लागेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. राजराणीने दरबारी नियमांना न जुमानता सज्जा सोडून ऎन दिवाणखान्यात धाव घेतली. नाळेने जोडले गेलेले आदी-सत्य तिच्या मिठीतून सोडवत
सत्यशीलाने राजमुकूट तिच्या चरणी ठेवला. अंगावरील रेशमी उत्तरीय दोन्ही हातांनी उभे चिरत त्याने संसाराच्या वाटेवरचा शेवटचा धागाही तोडून टाकला.

सत्यशीलाला सीमेपार सोडण्यासाठी सहा अबलख घोड्यांचा रथ आला. का कोण जाणे पण त्यावर फडकणारा ध्वज आज निस्तेज वाटत होता. सत्यशीलाने तो रथ नाकारला. लाकडी कठोर खडावा पायी चढवुन तो निघाला. त्याच्या मागोमाग हुंदके दाबत अथांग जनसमुदायही निघाला. सीमेपाशी थांबून सत्यशीलाने त्या जनसमुदायाला वंदन केले "नात्यांचे पाशच तोडून जाताना निरोप कसला घ्यायचा? मुक्तीच्या वाटेवर मोठा विरोधाभासंच म्हणायचा हा!" सीमेवर थबकलेले पावूल क्षणभर तसेच ठेवून तो राजाकडे वळला "राजन, स्मृतीवनातुन खुणेसाठी म्हणून केवळ माझी सावली नेतो आहे. आज्ञा असावी."

काळाची गणिते त्याला, ज्याला काळाची बंधने. पण म्हणून मोजलाच नाही तरीही काळ चालायचा थांबत नाही. वर्षा मागून वर्षे गेली. सत्यशीलाला मार्ग काही सापडेना- अंतीम सत्याचा मार्ग. उपास-तापास झाले, देव-धर्म झाले, शरीराला सर्व प्रकारचे त्रास देवून झाले पण एका जीर्ण शुन्याखेरीज हाती काही गवसेचना.

"बेटा, कश्यासाठी हे खडतर तप?" झाडांतून किंवा पानांतून, प्रकाशातून किंवा अंधारातून, हवेतून किंवा निर्वातातून कुठूनही आला असे भासवणारा एक आवाज सत्यशीलाच्या कानी पडला.

"अंतीम सत्याच्या शोधासाठी" आवाजातील बेचैनी दडवत सत्यशील उदगारला "संसाराचे, मोहाचे सारे पाश तोडून केवळ त्याचसाठी मी इथे आलो आहे"

"सारे त्यागलेस? नीट आठव. कुठलासा क्षुल्लक मोह तुझ्या तपाचे बळ फिरवत आहे"

कठोर तपाने शीणलेला सत्यशील आठवणींच्या एकेक कड्या तपासून पाहू लागला. गत स्मृतीतून त्याच्या सोबत फक्त त्याची सावलीच आली होती. "पण" जड सुरात तो बोलला "निर्णयाचे स्वातंत्र्य असतेच कुठे? जन्मजात पाठीला चिकटलेली असते सावली. मोहाचे हे कोणते परिमाण म्हणायचे गुरुदेव?"

"अंतीम परिक्षा या अश्याच क्षुल्लक भासणारया पण कूट अर्थाने भारलेल्या असतात मुला. तुला भय होते म्हणून सावलीची सोबत घेतलीस? की तुला हवी होती गतकाळातील एखादी खुण की जी परत नेऊ शकते तुला तुझ्याच उगमाशी? अरे, सावली म्हणजे मी पण. मोहाचे आदी रुप. आणि तेच सोडवलं नाही तुला? सावली जन्मजात असते खरी पण अंतीम सत्य जन्माच्याही पलीकडे असतं. हे जंगल, ही हवा, हा प्रकाश, तू आणि मी; आपण सारेच बनलो असतो कणाकणांनी. उघड्या डोळ्यांनाही न दिसणारया सुक्ष्मातीसुक्ष्म कणांनी. पाहीली आहेस कधी त्यांची सावली? सत्य कदाचित तिथे असेल. सुर्यालाही झाकोळणारे शुभ्र काही असेल कुठे. पडेल त्याची सावली? सत्य तिथे ही असेल. तीव्र टोकांच्या पलीकडे कुठे तरी असेल ते सत्य!"

ऎन माध्यानीचा सुर्य तपाने कृश झालेल्या सत्यशीलाला हलकेच वितळवुन गेला. जमिनीवर कोसळणारा स्वतःचाच देह त्याला दिसत होता. आता त्याची सावली कुठेही नव्हती. अंतीम प्रार्थनांच्या क्षणी त्याला जाणवले जन्म आणि मृत्यु हेच सत्य; ज्याला कुठल्याही उद्देश्याची गरज लागत नाही, ज्याचे अर्थ कुणाला सांगावे लागत नाहीत, जे चुकूच शकत नाही असे ते तीव्र टोकांच्या पलीकडले सत्य! आणि दोन टोकांमधले जगणे म्हणजे केवळ प्रवास..


//२//

अनुदीपाने यावेळी मात्र अस्वस्थता लपवली नाही. कित्येक घटका राजज्योतिषी ग्रह तारयांच्या स्थिती तपासत होते आणि सतत कसलेसे गणित चुकत असल्यासारखे परत परत कुंडलीची मांडणी करत होते. "महाराज" माथ्यावरचा घाम पुसत राजज्योतिषी अखेर बोलले "अभय असावे. पण सर्व गणिते करुनही एक शक्यता अटळ दिसते. आपल्या प्राणांना सावलीपासून धोका आहे"

जळी स्थळी काष्ठी पाषाणी अनुदिपाला मृत्यु दिसु लागला. महाअमात्यांनी राजाची मनस्थिती ओळखली आणि राजसरोवरात ऎन मध्यभागी भराव टाकून एक राजमहाल उभारवला. अनुदीप एक प्रकारे नजरबंदच झाला.

अनुदीपाच्या अनुपस्थितीत महाअमात्यच राज्य चालवु लागले. राजाच्या लहरींनुसार जिथे वारयाची देखिल दिशा बदलते तिथे मनुष्याचे काय? पडद्या आडच्या एका कुजबुजीनंतर एका आमेच्या रात्री सेनापतींनी शिताफिने महाअमात्यांची गर्दन उतरवली.

पण गिधाडांचे जरा वेगळेच. स्वजातियांना टोचे मारुन खलास करणारी ही जात. आणि इथे तर भक्ष्य मृत्युच्या भयाने अर्धमेले झालेले. एक गिधाड रस्त्यातून सरकताच दुसरयाने त्याची जागा घेतली. सेनापतीला राजमुकूट खुणावु लागला. अनुदीपाला हे तीव्रतेने जाणवत होते.

दिवस पूर्ण बहरावर असताना अनुदीप सावल्यांचे सरकते खेळ बघत होता. क्षणभर तो थबकला आणि मग आतून दचकला. "पाण्यावर सावल्या पडत नसतात महाराज. त्याला फार तर प्रतिबिंब म्हणता येईल" महाअमात्यांचे शब्द अनुदीपाच्या कानी रुंजी घालू लागले. पण आत्ता त्याने जे पाहीले ते प्रतिबिंब नव्हते, नक्कीच नव्हते. त्या पाण्यावर पडलेल्या सावल्याच होत्या. सरकत जाणारया सावल्या, विकृत आकारांच्या सावल्या, पारदर्शक सावल्या...सावल्याच सावल्या. थरथरणारया पाण्यात अनुदीपाला तलवार उंचावलेला सेनापती दिसला, क्षणभरच आणि नंतर ती सावली वाहाती झाली. पाण्यावरुन परावर्तित होणारया सुर्यकिरणांनी अनुदीपाच्या मस्तकात शुळ निर्माण झाला. पुढचा घाव आपण घालायचा या सुडातिरेकाच्या विचाराने अनुदीप सरसावून बसला. काहीच काळ आणि अनुदीपाला परत पाण्यावर विकृत आकारात सेनापतीची सावली दिसली आणि क्षणाचाही विलंब न करता अनुदीपाने त्याच्या अंगावर उडी मारली. होय, सावलीच्या अंगावर उडी मारली. थंड काळसर पाण्यात तलवार आरपार जाताना अनुदीपाला शेवटचे दिसले ते पाण्याच्या तळाशी असणारे टोकदार कातळ, त्यावर सरकणारी त्याचीच सावली आणि डोक्यातून उगवणारी काळसर लाल रक्ताची असंख्य वर्तुळे