नाव देण्याचा कंटाळा आल्याने नाव न दिलेले पोस्ट

परवाच्या लोकसत्तात दहावीची परिक्षा झाल्यानंतर बर्फाचा गोळा खाणारया हुश्श्य आणि खुश्श्य अश्या तीन मैत्रिणींचा फोटो आला होता. तो बघून आनंद आणि हेवा असं काहीसं एकत्र वाटलं. कुठलीही आनंदी माणसं दिसली तरी मला आनंद होतो. नुस्ती माणसंच का, आनंदी मूडचं गाणं किंवा एखादा आनंदी प्रसंग पाहीला तरी का कोण जाणे पण रक्त अचानक निळसर गुलाबी होतं असं मला सारखंच वाटत आलय. आणि इथे तर परिक्षा नावाच्या राक्षसाचं मर्दन करुन आलेल्या तीन मैत्रिणी! फुल ऑफ युथ!! कसलेही ताण नाहीत, भविष्याची चिंता नाही, मैत्रीचं अजब गारुड अजूनही गळेकापु स्पर्धेपासून अलिप्त ठेवू शकतं!! बोला राव, अजून काय हवं असतं कधी कधी आनंदी असायला? आणि हो, पुढचे दोन-तीन महीने निवांत सुटी! आणि माझ्यातल्या रिंगवाला एजंल इथे संपतो आणि शिंगवाला राक्षस जागा होतो! आम्हाला का म्हणून नाही सुट्या? पोरांएव्हढंच उन, किंबहुना जास्तच आम्हाला लागतं (कारण एसीच्या सवयी), आम्हालाही पोटाला तडस लागेपर्यंत आब्यांचा रस खाऊन दुपारी डाराडूर झोपावं वाटतं, मामाचा गाव आम्हालाही असतो, निवांत वाचायची म्हणून जमा केलेली पुस्तकं, जमा केलेले सिनेमे, गाण्याचे छंदबंदंवाले क्लास अश्या तुंबून स्तब्ध झालेल्या लिस्टा आमच्याही तयार असतात. आता बोला, आम्हाला का नको सुट्या? मी मघाशी हेवा वाटतो म्हटलं तो या कारणांसाठी. कामं काय सुरुच राहाणार.

यावरुन आठवलं. परवा कुठेतरी बीबीसीचा एक सर्व्हे वाचला. समजा दिवस २४ ऎवजी २५ तासाचा झाला तर जास्तीच्या एक तासाचं काय कराल? भारतीय माणसाचं प्रातिनिधिक उत्तर म्हणे त्या एक तासात जास्त काम करु असं होतं! आपली लोकसंख्या पाहीली की भारतीय माणूस किती कामसु आहे हे कळतंच अन काय! डोंबल..

याच सर्व्हेत अजून कुण्या देश्याच्या लोकांनी व्यायाम करु,खेळ खेळू अशी (निराशाजनक) मनोगत व्यक्त केली आहेत. माझ्यासारख्या अ-खिलाडु (वृत्तीच्या नव्हे, सदेह)माणसाला यात काय गम्य? शाळेत असताना खेळाचा तास हा राठोड सरांना तंबाखु खायची सोय म्हणून ठेवलेला असतो यावर आमचा ठाम विश्वास होता. नाही तर खेळाचं एकही आयुध शाळेत नसताना आम्हाला नियमितपणे खेळाचा तास उगाच का असणार? मधेच एकदा उगाच क्रिकेट खेळण्याचं फॅड आलं. कुणीतरी म्हणालं की कॉर्कचा बॉल हत्तीच्या पो (शी!) पासून बनतो. आमच्यातील काही महाभाग ताज्याच आलेल्या सर्कशीतल्या हत्तीवर बारीक नजर ठेवून होते. पण बहूदा त्या हत्तींची पचनशक्ती दांडगी असावी किंवा त्यांना खायला देत नसावेत कारण त्यांना शेवटपर्यंत "तसं" काही मिळालं नाही. शेवटी होम-मेड कॉर्क बॉल ऎवजी बाजारातून रेडीमेड बॉल आणून आम्ही खेळायला सुरुवात केली. तर मुद्दा असा की खेळाविषयीचं प्रेम हे असं. उन्हाळ्यात दुपारचं बाहेर कुठे पडता म्हणून बैठे खेळ खेळु म्हणाल तर साप-शिडीतले साप त्याची सापीण मारल्यागत डूख धरुन आम्हाला नव्वदीवरुन थेट पटलाच्या सुरुवातीलाच आणून पोचवायचे. कुठल्या पत्त्याचा कुठला कोपरा दुमडला आहे किंवा कसं हे ध्यानात धरुन अट्टल पत्तेबाज बरोबर हुकुमाचं पान ओढून घ्यायचे किंवा उजवी भुवई खाजवली की बदामची राणी हे असलं बाईलबाज काहीतरी लक्षात ठेवायचे. आमची ट्रेकींगची आवड जो किल्ला सकाळी दहानंतर उघडतो, जिथे दर वीस फुटावर चमचमीत काही तरी खायला मिळतं, जिथे ऎतिहासिक बघण्यासारखं काहीही नसतं, ज्याला शक्यतो इतिहास-भूगोल नसतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिथे शेवटपर्यंत गाडी चढते अश्याच स्थळांपर्यंत मर्यादित आहे. अश्या ठिकाणी भिंतींवर मनोरम मजकुर असल्यास प्राधान्य. वाचनाची आवड अन दुसरं काय!

वाचनावरुन आठवलं, परिक्षेहून घरी आलं की पहीलं काम असायचं पुस्तकांची यादी तयार करणे. कॉलेजची लायब्ररी आपलंच वतन असल्यानं सायकलला भल्या थोरल्या दोन पिशव्या लावून सकाळी सकाळी कॉलेज गाठायचं. आधी डोळेभरुन नीट रचून ठेवलेली ती पुस्तकं बघायची आणि नंतर शिवाजीनं सुरत लुटली नसेल तितक्या तडफेनं ती लायब्ररी लुटायची. कॉलेजच्या शिपायांना फुकटंच पुस्तकांवरची धूळ निघाल्याचा आनंद आणि लायब्ररीमन चंदूकाकाला आमच्या वाचनाचंं कौतूक. पिशव्या तरी फाटतील किंवा हात तरी तुटतील इतपत पुस्तकं जमली की सायकलला तो खजिना अडकवायचा आणि दुप्पट वेगाने घरी. टीव्ही, सिनेमे असले चक्रवाढ व्याजी फुजूल चित्तविचलक नसल्याने आंघोळ आणि झोप वगळता हातात सतत पुस्तक असलंच पाहीजे असलं गहजब हे व्यसन. (यावर सविस्तर कधीतरी स्वतंत्र पोस्ट मस्ट! इती स्वगत नोंद)

सुटीतला दुसरा उद्योग (उपक्रम नव्हे उगाच संघात गेल्यासारखं वाटतं)म्हणजे आंबा. तुम्ही आयुष्यात हापूस, चूकलं, अल्फान्सो शिवाय काही खास खाल्लं नसेल तर तुम्हाला आंबा प्रकारातली गंमत कळणार नाही (आंबा! यावरही पोट-पोस्ट होऊ शकतं! दुसरं स्वगत). सुटीत पहाटे उठून आम्ही आंबा आणायला जायचो. आमच्या भागात जो आंबा येतो त्याला गोटी आंबा म्हणतात. हा डझनावर वगैरे घ्यायचा नसतो, हा शेकड्यात घ्यायचा आणि शेकडा म्हणजे १०० हे गणित इथे नाही. इथला शेकडा म्हणजे ११० वगैरे आंबे. चव म्हणाल तर अजिबात कन्सिस्टन्सी नाही, एक गोड निघेल तर दुसरा क्कच्च आंबट निघू शकतो. हातातलं पुस्तक बाजूला ठेवायचं, खास आंबे खाण्यासाठीचे म्हणून काढलेले कपडे चढवायचे (म्हणजे रस सांडला तरी वाईट वाटणार नाही या लायकीचे कपडे. काही लोकांना सगळं म्हणजे सगळं विस्ताराने सांगावं लागतं. डफर लेकाचे) आंब्यांची दुरडी घेऊन अंगणात (अंगण: घरासमोरील/मागील मोकळी जागा. पूर्वी अशी जागा असायची)बसायचं आणि त्या आंब्यांचा छातीभरुन गंध घ्यायचा. मग आव देख्या न ताव देख्या, आंबा माचवायचा (आंबा नैसर्गिकरित्या पिकतो आणि आपण जेव्हा तो "मोकळा" करतो त्यास माचविणे म्हणतात)आणि तोंडात पिळायचा. त्याची कोय चोखून चोखून पांढरीभुरुक करताना काय चिन्यांसारखे बारिक डोळे व्हायचे!

असो. तर हे सगळं परत करायचं तर सुटी नको का? जास्तीच्या एक तासात काम करणारयांना यातली मजा नाही कळणार. त्यांना शिक्षा म्हणून घरगुती कॉर्कबॉल करायला पाठवावं असा असुरी आनंद देणारा विचार माझ्या मनात पक्काच पक्का होत जातोय. काय म्हणता?

Comments

Anonymous said…
Unhalyachi Sutti pahijech!!
Vidya Bhutkar said…
'आंघोळ आणि झोप वगळता हातात सतत पुस्तक असलंच पाहीजे असलं गहजब हे व्यसन.' आणि गोटी आंबा या दोन गोष्टींवर किती उन्हाळे काढले असतील याची आठवण झाली आणि सध्या घरीच असूनही उन्हाळ्याची सुटी मिळालीच पाहिजे अशी तीव्र इच्छा झाली.रोज सकाळी आजोबा अंगणात खुर्ची टाकून बसायचे आणि टोपल्यांतून गावठी आंबे नेणाऱ्या लोकांशी हुज्जत घालून आंबे विकत घ्यायचे. :-) तेव्हाच ’शेकड्यांनी’ आंबे खाल्ले. :-( Really missing those days and all the fun.आजोबांचीही आठवण झाली. :-(
-vidya.
>>आता बोला, आम्हाला का नको सुट्या?

होय महाराजा! मलापण हवीये मोठ्ठी सुट्टी! भ्यांsssssssssss
मस्त झालीये पोस्ट. जुने दिवस आठवले.
same here....
चांदोबा ,फास्टर फेणे, किशोर पासून ते बहुरंगी करमणूक,किर्लोस्कर चे मासिक अंक, "धनंजय" च्या कथा....अगदी काहीही चालायचं वाचायला...हात रिकामा नकॊ फक्त!
(आणि तोंड चालू पाहीजे...खाउने....पण हल्ली सारखी फॅडं नव्हती....कच्चा चिवडा,चुरमुरे,गोटी आंबे तर मस्तच,नाहीतर "अजमेरी कुल्फी " म्हणून एक प्रकरण असे....
Megha said…
mastach ki re sami....mala pan agadi ghari aslyasarakha vatala....3 mahine rahun aale tari sagale astanachi maja veglich na....tyat tuze suttiche self made khel visarlas tu.....chaan post...
वेड पोस्ट आहे.
माझ्यासारखीच सुट्टी "celebrate" करणारी व्यक्ती पाहून लई भारी वाटल राव!
आता तुमच्या ब्लॉगला आमच्या हिट्स मिळणार हे नक्की!
Anonymous said…
"i am loving it" asa tumachi post vachun mhanavasa vatat..baki tumachya kavita ani bakiche kahi lekh apalyala ajibat zepale nahit bara ka :( and one more thing..mi pan A'bad chya govt college chich student ho...!
tumachi hi sutti chi post vachun nostalgic vhyayla zala rao ..ase atale dhage chedanare likhan baryach divasanni vachale..keep it up.