Wednesday, October 28, 2015

खुप आवाज आहे..

खुप आवाज आहे..

वापरुन गुळगुळीत झालेल्या शब्दांचा.

उडणाऱ्या म्हशींचा थवा

छटाहीन हंबरतो आहे घश्याच्या शिरा ताणून.

व्हॉट्सपच्या ईमोजी

भाषेच्या खांबाला बांधलेल्या शब्दांभोवती

फेर धरुन नाचताहेत भीषण.

बोलण्याची असंख्य साधनं

जमा करुन

एकटा माणूस उभा आहे

बेदम भांबावून.

खुप आवाज आहे..

माझ्या डोक्यात..

खुप आवाज..

खुप..

Tuesday, October 6, 2015

पुत्र व्हावा ऐसा पढाकू

ऎसी अक्षरे (२०१५)साठी लिहीलेला हा लेख (http://aisiakshare.com/node/4133), इथे परत डकवत आहे-

सोप्या गोष्टींबद्दल लिहिणं फार कठीण असतं हे वाक्य अनंत वेळा वाचूनही टोचत नाही, जोपर्यंत ती वेळ तुमच्यावर येत नाही. आज ही वेळ माझ्यावर आणल्याबद्दल संपादकांचे आभार मानावेत की त्यांना बोल लावावेत हा प्रश्नच आहे.
भा. रा. भागवतांची पुस्तकं आनंदानं वाचणं वेगळं आणि त्यांच्या लिखाणाचं तथाकथित मूल्यमापन करणं वेगळं. आज मागं वळून बघताना जाणवतं, की भारांचं स्थान तेच आहे जे आपल्या आवडत्या मावशीचं, दादाचं, आजीचं असतं. तिथं डावं-उजवं करताना मनात एक हळवा कोपरा आधीच तयार झाला असतो. भारांच्या लिखाणाचं मूल्यमापन करताना हा दुसरा अडथळा! असो. प्रयत्न करण्यात फिजूल मुजोरी कशाला?
मराठी साहित्याच्या मर्यादित परिघात आपण असंख्य वर्तुळं आखून ठेवली आहेत; विविध साहित्यप्रकार (कथा, कादंबऱ्या, कविता, लघु-दीर्घ कथा, कविता, प्रवासवर्णनं, इ. इ.) हे सर्वात मोठं क्लस्टर. त्यातही आपण दलित-बहुजन-ब्राह्मणी, शहरी-ग्रामीण, पुरुष-महिला, प्राचीन-अर्वाचीन, पश्चिम महाराष्ट्रातलं-विदर्भाकडचं-वऱ्हाडी-मराठवाडी-खानदेशी, बालसाहित्य-कुमारसाहित्य-मोठ्याचं साहित्य, गंभीर-विनोदी-शृंगारिक अशी असंख्य डबकी तयार करून ठेवली आहेत.
त्यांतला सर्वांत दुर्लक्षित वर्ग म्हणजे बाल/कुमार साहित्य. ना समीक्षकांनी याची कधी फारशी दखल घेतली, ना गंभीर वाचकांनी. 'मुलांचं साहित्य... त्यात बोलण्यासारखं काय असतं?' हा जो आविर्भाव आपण सगळ्यांनीच बाळगलेला असतो, त्यामुळे राजा मंगळवेढेकर, साने गुरुजी, ना. धों. ताम्हनकर, भा. रा. भागवत, विंदा करंदीकर, सुमती पायगांवकर, लीलावती भागवत, आत्ताचे माधुरी पुरंदरे, दिलीप प्रभावळकर (आणि इथे उल्लेख नसलेली असंख्य नावं) यांच्या लिखाणाचा विशेष गंभीरपणे अभ्यास केला गेला नाही. भारांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ज्या काळात, ज्या संख्येनं आणि ज्या दर्जाचं लिखाण त्यांनी केलं, त्याला खरं तर तोड नाही. ज्यूल व्हर्नच्या कादंबऱ्यांचं भाषांतर असो, शरलॉक होम्सचं भाषांतर असो, हॅरी पॉटरचा बाबा शोभेल असा फाफे असो किंवा पुस्तकी किडा बिपिन बुकलवार असो; त्यांचं लिखाण प्रवाही, भाषांतर नैसर्गिक आणि भाषा वाचकाच्या वयोगटाला साजेशी होती. त्यांच्या दोन मानसपुत्रांपैकी फाफे निर्विवादपणे वाचकांचा सर्वात लाडका होता. फाफे स्वतःच त्याच्या साहसकथांचा नायक होता. पण दुसरी वल्ली - बिपिन बुकलवार, पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच तेव्हढीच जवळची वाटते हेही खरंच.
.
तर या पढाकू मुलाची ही 'किंचितकुंडली'...
बिपिन बुकलवारबद्दल लिहिण्याआधी, मुलं काय वाचतात, याबद्दल आपल्याला थोडासा विचार करावा लागेल.
बाल ते कुमार हा वयोगट सर्वसाधारण २ ते १८ वर्षं अश्या सोळा वर्षांमधे विभागला गेला आहे. या सोळा वर्षांमधे वाचनाच्या आवडी कशा बदलतात हे मांडण्याचा प्रयत्न या चित्रातून केलेला आहे. ही मांडणी कुठल्याही अभ्यासावर केलेली नाही, तर ती निरीक्षणावर आधारित आहे. शिवाय काळानुरूप यातली काही निरीक्षणं बदलतील किंवा बदललेली असतील. २ ते ६ या वयोगटातल्या मुलांना गोष्टी 'सांगितल्या' तरच त्यांना त्यांचं आकलन होऊ शकतं. त्या अर्थानं ते वाचक कमी आणि श्रोते जास्त असतात. पालक मुलांच्या वाचनासाठी कशी वातावरणनिर्मिती करतात (त्यांचं स्वतःचं वाचन, घरामधलं पुस्तकांचं स्थानं, पुस्तकांची खरेदी, इ.) यावर, भविष्यात हे श्रोते वाचन हा छंद म्हणून जोपासतील का, हे बर्‍याच अंशी अवलंबून असतं. ६ ते ८ वर्षं या वयोगटातल्या मुलांना जर वाचनाची आवड निर्माण झाली, तर ती छोट्या छोट्या गोष्टी स्वतः वाचू शकतात आणि ती खऱ्या अर्थानं वाचकाच्या भूमिकेत शिरतात. या वयोगटातल्या मुलांसाठी पुस्तकांची आणि विषयांची निवड बहुदा पालक मंडळीच करतात. नवव्या वर्षानंतर वाचणारी मुलं 'स्वतंत्र वाचक' या भूमिकेत अधिक ठामपणे शिरलेली असतात. आपल्याला काय वाचायचं आहे, आपल्याला काय आवडतं याच्या निवडीचा आत्मविश्वास त्यांच्यामधे निर्माण होतो.
आता या चित्राकडे जरा नीट बघितलं, तर असं लक्षात येईल की सर्वसाधारण ९ ते १८ वर्षं या सर्वात मोठ्या कालावधीच्या वयोगटामधे धाडस, पराक्रम, रहस्य, गूढ या जॉनरचं वर्चस्व आहे (हा कदाचित थोडा पुरुषी दृष्टिकोन असू शकेल!). गंमत म्हणजे इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीतही सर्वसाधारणपणे हाच साहित्यप्रकार जास्त 'चालतो'. या प्रकाराचं गारूड वाचकांवर दीर्घ काळ, पिढ्यानंपिढ्या चालत आलेलं आहे. या गोष्टींचे नायक एका अर्थानं कालातीत असतात. या नकाशावर आपण आपले लेखक मांडले तर असं लक्षात येतं, की भारांनी मुख्यतः या वयोगटासाठीच आणि याच जॉनरच्या गोष्टी लिहिल्या. भारांच्या नायकांची मोहिनी मराठी वाचकांवर प्रदीर्घ काळ रेंगाळण्याचं हे एक कारण.
बिपिनच्या बालमित्रांना तो ज्या गोष्टी सांगतो, त्या याच प्रकारात मोडणाऱ्या होत्या. पण एक फरक असा की त्या ६ ते ८ वर्षं या वयोगटातील मुलांनादेखील समजण्याजोग्या होत्या.
.
पात्रं
बिपिन बुकलवारच्या पुस्तकांचं स्वरूप हे 'कुणीतरी सांगितलेल्या गोष्टी' (असॉर्टेड गोष्टी) असं आहे. जेव्हा एक संदर्भबिंदू तेवढा पक्का असतो आणि इतर रचना विसविशीत असते, तेव्हा ही पद्धत वापरलेली दिसते. उदा. विक्रम-वेताळाच्या गोष्टी, सत्यनारायणाच्या गोष्टी, अरेबियन नाईट्स, इत्यादी. बिपिन आणि विजू-मोना हे एवढेच काय ते भारांनी ठरवलेले संदर्भबिंदू आहेत. त्यात बिपिन हा गोष्ट सांगणारा आणि विजू-मोना हे गोष्ट ऐकणारे, अशी रचना आहे. या तिघांबद्दल ठामपणे काही सांगणं थोडंसं कठीण आहे. 'भारा' ती पार्श्वभूमी तयार करत नाहीत. बिपिन कुठून आला, कुठे राहतो, विजू -मोनाशी त्याचं नेमकं नातं काय आहे, हे त्यांनी वाचकांवर सोडलेलं आहे. विजू-मोना ही जुळी देशपांडे भावंडं बिपिनच्या शेजारी राहतात हे नक्की. बिपिन कुठेतरी कॉलेजमधे जात असावा, बहुधा पदवीच्या दुसऱ्या वर्गात वगैरे, आणि त्याला विविध विषयांमधे रस असावा. त्याचं वाचन चौफेर आणि जबरदस्त आहे हे नक्की. विजू-मोना ही मराठी माध्यमातली आणि नुकतंच इंग्रजी येऊ लागलेली पाचवी-सहावीतली मुलं असावीत असा सावध अंदाज बांधता येतो.
जेव्हा लेखक पात्राधारित पुस्तकांची मालिका तयार करतो, तेव्हा त्या पात्रांना पार्श्वभूमी असेल तर वाचक नकळत त्या रचनेत सामील होऊन जातो. पण, हे फाफेच्या बाबतीत जसं होतं, तसं बिपिनच्या बाबतीत होत नाही. अर्थात असोर्टेड गोष्टी असं त्यांचं स्वरूप असल्यानं त्यानं फारसं नुकसान होत नाही. पात्राधारित पुस्तकांची मालिका जेव्हा तयार केली जाते, तेव्हा एक तर कालनिरपेक्ष सलगता (कंटीन्यूटी) किंवा काळानुरूप पात्रांची वयं, आजूबाजूची बदललेली परिस्थिती ही पुस्तकांत क्रमाने दाखवणं आवश्यक असतं (आठवा - हॅरी पॉटर). बिपिनच्या गोष्टींमधे बहुसंख्य पुस्तकांमधे कालनिरपेक्ष सलगता (कंटीन्यूटी) असली, तरी विजू-मोनाचे संवाद क्वचित त्यांच्या वयात होणारी स्थित्यंतर दाखवतात. 'पळालेला चोर', 'म्हातारी नवरी' आणि 'पिप' या गोष्टींत विजू छोटा आहे, तर 'सिग्नलमनचा गुन्हा' या गोष्टीत विजूची जुळी बहीण मोना ही 'गार्की' या रशियन लेखकाचा संदर्भ देते; मग तिचं वय काय? (दोन्ही उदाहरणं 'पुत्र असावा ऐसा गुंडा'मधून).
प्रश्न असा आहे, की हे निरीक्षण बरोबर असेल तर त्यानं वाचकाचा रसभंग होतो का? निदान माझं उत्तर तरी 'नाही' असंच आहे. जेव्हा आपण चित्रकलेतल्या क्युबिझमप्रमाणे विविध कोनांतून या पुस्तकांची चिकित्सा करतो, तेव्हाच असं काहीसं निरीक्षण संभवतं. अभ्यासासाठी, समीक्षेसाठी वाचणाऱ्या प्रौढ वाचकाला हे प्रश्न पडण्याची शक्यता जास्त. आनंदासाठी वाचणाऱ्या लहानग्यांचा सारा रस बिपिनच्या नव्या गोष्टीत तेवढा असतो हे नक्की!
.
भाषा आणि शैली
माझ्या मते योग्य साहित्यप्रकाराची निवड, कथाबीज आणि ते फुलवत नेण्याची हातोटी हे भारांच्या लेखनाचं ५०% यश असेल, तर उर्वरित ५०% यशाचं श्रेय त्यांच्या भाषेला आणि शैलीला द्यायला हवं. आपण ज्या वयोगटासाठी लिहितो आहोत, तो कोणती आणि कशी भाषा बोलतो याचं पूर्ण भान भारांना असावं. गोष्ट सांगताना बिपिन अकृत्रिम बोली भाषा वापरतो. तो उगाच प्रत्येक इंग्रजी शब्दांचं भाषांतर करत बसत नाही. त्यामुळे गोष्टीचा प्रवाह कुठे थांबत नाही, उदा. वॉचमन, सर्टिफिकेट, केबिन हे शब्द बिपिनच्या गोष्टीत सर्रास आढळतात. मुलांच्या पुस्तकात काय भाषा वापरावी, याचे हल्ली बरेच अलिखित नियम असतात. ते भारांच्या काळात नसतील, पण त्यामुळे बिपिनचे डाकू सहगत्या 'बदमाष', 'हलकट' या शिव्या देतात, त्यांना रक्ताच्या उलट्या होतात, ते एकमेकांचे मुडदे पाडतात... सर्वसाधारणपणे १२-१४ वर्षाच्या मुलांकडे इतपत शब्दसंपत्ती आणि अंगभूत शहाणपणा नक्कीच आलेला असतो. भारा हे न करते, तर बिपिनच्या गोष्टींमधले डाकू मिळमिळीत, तकलादू, पुठ्ठ्याचे वाटले असते. थरारकथांमध्ये सतत काहीतरी घडत राहण्याची गरज असते. मुलांसाठी अश्या कथा लिहिताना थरारक घटनांचा अतिरेक होणार नाही आणि गरजेपेक्षा तसूभरही जास्त हिंसाचार त्यात येणार नाही, याची 'भारा' पुरेपूर काळजी घेतात. या कथा वाचताना उसळणारं रक्त काबूत ठेवण्यासाठी ते अत्यंत कौशल्यानं विनोदाचा मर्यादित वापर करतात. केवळ बिपिनच नव्हे, तर विजू-मोना हीदेखील नर्मविनोदी कोट्या करतात. 'चल रे तट्टा टुणुक टुणुक' या गोष्टीमध्ये अगदी छोटासा विजूदेखील म्हणून टाकतो, "ऐटीची छान फैटी झाली!" किंवा मौसा नावाच्या माणसाबद्दल बोलताना मोना म्हणते, "मौसा म्हणजे मनीमावशीचा नवरा?"
.
भारांचा विनोद
हा एक वेगळा विषय आहे. तो निरागस अतिशयोक्तीतून फुलतो. "ह्यॅ… असं कुठं होतं असतं का?" म्हणणाऱ्यांनी त्याच्या वाटेला जाऊ नये. 'अगडबंब मंडळाच्या गोष्टी'मध्ये सहा गोष्टी आहेत. प्रत्येक कथेची पार्श्वभूमी वेगळी असली, तरी एखाद-दुसरी कथा वगळल्यास साऱ्या भारताबाहेर घडणाऱ्या अतिशयोक्त गोष्टी आहेत. त्यांत जो विनोद आहे, तो कृतीतून घडणारा आहे, पण म्हणून तो हिणकस आणि अंगाशी झोंबणारा नाही. उदाहरणार्थ, 'सहा मूर्ख - महामूर्ख'मधली उडी मारून पॅन्ट घालण्याची कृती किंवा तलावातून चंद्र उपसण्याचा प्रसंग.
मराठीतले बरेच विनोदी लेखक येणाऱ्या काळात कालबाह्य होतील, कारण त्या विनोदाला प्रासंगिक, सांस्कृतिक आधार आहे. बदलत्या काळानुसार नव्या पिढीला या विनोदांमागचे संदर्भ कळणार नाहीत आणि ते लेखन केवळ इतिहास म्हणून उरेल. पण भारांच्या विनोदाची जातकुळी त्यातली नाही. एकतर तो मुलांना डोळ्यासमोर उभा करता येणारा, कृतीतून घडणारा, विनोद आहे. मर्यादित आहे, पण जास्त टिकाऊ आहे. किंवा तो भाषिक गंमती करणारा विनोद आहे. उदाहरणार्थ, 'अगडबंब मंडळाच्या गोष्टी'मधल्या पात्रांची ही नावं बघा. लंगडणार्‍या माणसाचं नाव 'तंगडोबा दौडे', जमिनीला कान लावून ऐकणार्‍या बुवाचं नाव 'काका कर्णे', थंडपणे हालचाली करणार्‍या माणसाचं नाव 'बाबू बर्फे', नेमबाज माणसाचं नाव 'बंदूकराव नेमे', जोरदार फुंकर मारून झाडाची फळं पाडणार्‍या बुवाचं नाव 'चक्रदेव फुंकरे'... किंवा त्यातला हा संवाद बघा - "आता तर राजानं बक्षीसच लावलंय म्हणे. हणगूबाई हडळीबरोबर धावून जो कुणी रेस जिंकील त्याला मोतंभर पोहरा बक्षीस?" "मोतंभर पोहरा नाही, पोहरा घेऊन विहीर का उपसायचीय? पोतंभर मोहरा!" अनुप्रास वापरून केलेली गंमत नि अक्षरांचा थारेपालट करून आणलेली धमाल हा त्यांचा लाडका विनोदप्रकार.
.
कथांचं स्वरूप आणि जागतिक स्थित्यंतरं
बिपिनच्या बऱ्याचशा गोष्टी भाषांतरित वाटाव्यात, इतपत वेगळ्या पार्श्वभूमीवरच्या आहेत. तो समुद्री चाच्यांच्या, क्रूर डाकूंच्या गोष्टी सांगतो. त्याच्या काही गोष्टी चिनी दंतकथा असतात, तर काही गोष्टींना इतिहासाची पार्श्वभूमी असते. अनेक गोष्टींमधे भौगोलिक संदर्भ असतात, चपखलपणे दडवलेले नीतिमत्तेचे पाठ असतात, संवाद आणि वर्णन यांचा योग्य समतोल असतो. पण- पण या गोष्टी एक-दोन दशकं जुन्या वाटतात. मराठीत फक्त लेखनावर जगणारे लोक कमी होते/आहेत. त्यांच्या अनुभवाचं संचित हे सुगीच्या काळात जीवनावश्यक गोष्टींची तरतूद करुन ठेवणाऱ्या मुंगीसारखं असतं. उद्याची पर्वा न करता आलेला दिवस, अनुभव बेडरपणे पचवण्याची नाकतोड्याची जिगर मुंग्यांमधे नसते.
भारांसकट खूपसे मराठी लेखक त्यांच्या सुवर्णकाळाचं आणि त्याच्याशी निगडित असलेल्या 'इको-सिस्टिम्स'चं (भाषा, नीती-अनीतीच्या कल्पना, भौगोलिक संदर्भ इत्यादी) प्रतिनिधित्व करत असतात, हे गृहीतक मानलं, तर बिपिनच्या गोष्टींमधले संदर्भ जुने का असतात याचा उलगडा होतो. याउलट पूर्ण वेळ कलावंतांकडे समाजात होणारे बदल निवांतपणे टिपण्याची मोकळीक असते (क्षमता आणि इच्छा असेलच असे नाही). अशा कलावंतांच्या कलाकृती काळाशी सुसंगत राहण्याची शक्यता जास्त असते, उदाहरणच द्यायचं झालं तर पाब्लो पिकासोचं देता येईल. भारा १९१० मध्ये जन्मले आणि आणि त्यांनी त्यांच्या नव्हाळीच्या काळानंतर, म्हणजे त्यांच्या सत्तरीत, बिपिनच्या गोष्टी लिहिल्या. हा पूर्ण काळ ते लेखक नव्हते. हे त्रैराशिक सोडवलं, तर असं दिसतं की भारांनी सर्वसाधारणपणे १९२५ ते १९५५ या काळात मराठी मध्यमवर्गीय समाजाशी सुसंगत असलेल्या गोष्टी बिपिनच्या माध्यमातून सांगितल्या असाव्यात. अर्थात असा सावध अंदाज.
पण ते असो. ८०च्या दशकात जागतिक बाल-कुमार वाङ्मयात तरी नक्की काय घडत होतं?
१९७९-८० च्या आसपास भारांनी जेव्हा या कथा लिहिल्या, तेव्हा इंग्रजीमधल्या बालवाङमयाचा चेहरा बऱ्याच अंशी बदलेला होता. ९ ते १२ वर्षं या वयोगटातल्या मुलांच्या साहसकथा जास्त वास्तववादी झाल्या होत्या, रहस्यकथा सौम्य झालेल्या होत्या; कल्पनाशक्तीचा आविष्कार वेगळ्या पातळीवर जाऊन प्राणी, झाडं यांचा मुलांशी संवाद झालेला दिसत होता; भाषेच्या बाबतीत सजगता आली होती. 'डॉक्टर दे सोतो', 'फ्रॅन्क्लीन इन द डार्क', 'दी आयर्न मॅन', 'इंडिअन इन दी कबर्ड' ही त्या काळाच्या सुमारास आलेली पुस्तकं या बदलाची साक्ष देतात.
दरम्यानच्या काळात, १२ ते १८ वर्षं या वयोगटासाठी जागतिक साहित्यात एक नवीन क्लस्टर तयार झालं होतं. पौगंडावस्थेतल्या मुलांच्या या वेगळ्या साहित्यविश्वाला आता 'यंग-अडल्ट' किंवा 'कुमारसाहित्य' असं म्हटलं जातं. १९७०-८० चं दशक हे 'यंग-अडल्ट' साहित्याचा सुवर्णकाळ आहे असं मानलं जातं. 'अ‍ॅनी ऑन माय माईंड' (समलैंगिक संबंधावर आधारित), 'सीक्स मन्थ्स टू लीव्ह' (कॅन्सरशी लढा), 'एव्हरीवन्स पॅरेन्ट्स सेड येस', 'धिस प्लेस हॅज नो अ‍ॅटमॉस्फीअर' (२०५७ मध्ये घडणारी गोष्ट), 'दी वुमन हु राईड्स लाईक अ मॅन' ही यंग-अडल्ट' साहित्यामधली काही दादा पुस्तकं. त्यांच्या नावांवरूनदेखील विषयांमधली गुंतागुंत लक्षात यावी! आणि हे कधी? जेव्हा बिपिन 'दर्यावर्दी डाकू'सारख्या चाच्यांच्या गोष्टी सांगत होता, तेव्हा. तेव्हा इंग्रजी 'यंग-अडल्ट' वाङमयात स्वतःची ओळख, मानसिक तणाव, कौटुंबिक उलथापालथी, मुलांमधली दादागिरी (बुलीईंग) हे विषय हाताळले जात होते.
विजू-मोना ही मुलं ११-१२ वर्षांची असली तरी ती 'यंग-अडल्ट फिक्शन'च्या या बदललेल्या सुरापासून प्रचंड दूर दिसतात. मर्यादित भवतालामुळे (एक्सपोजर) असेल, वैयक्तिक आवडीनिवडींमुळे असेल किंवा सांस्कृतिक मर्यांदांमुळे असेल; पण भारांचा हा मानसपुत्र मध्यमवर्गीय मराठी घराला पेलतील अशाच गोष्टी सांगत राहिलेला दिसतो.
८०च्या दशकाच्या उत्तरार्धात शहरांमधून (आणि त्यानंतर वेगानं निमशहरांतून आणि गावांतूनही) इंग्रजी माध्यमाच्या शाळा चांगल्याच रुजायला लागल्या होत्या. या माध्यमातून शिकणाऱ्या वाचकांना 'चॅप्टर बुक्स'चे (७-९ वर्षांच्या मुलांना चित्ररूप गोष्टी बालीश वाटतात. पण औपचारिक भाषेतल्या गोष्टी बोजड वाटतात. म्हणून त्यांच्यासाठी बोली भाषेतच 'चॅप्टर्स' (प्रकरणं) पाडून पुस्तकं लिहिली जातात. त्यांना 'चॅप्टर बुक्स' म्हणतात), 'यंग-अडल्ट फिक्शन'चे जागतिक संदर्भ उपलब्ध होते.
म्हणून मग बिपिनच्या गोष्टींमधे याचं प्रतिबिंब पडायला हवं होतं का? त्यानं बिपिनचे संदर्भ कालानुरूप राहिले असते का? की आज आपण अल्लादीनची, तेनालीरामाची एका काळात गोठून राहिलेली गोष्टही चवीने ऐकतो, तशी बिपिनची अजिबात संदर्भ न बदललेली गोष्ट उद्याही ऐकू?
कालौघात टिकलेल्या गोष्टी जश्याच्या तश्या राहिल्या, तर त्यांना हळूहळू अभिजात वाङ्मयाचं (क्लासिक्सचं) रूप यायला लागतं आणि त्या स्मरणरंजनाच्या आधारानं तगून राहातात. उदा. अकबर-बिरबल किंवा इसापच्या गोष्टी. त्याच गोष्टींना कालौघात नवे अर्थ प्राप्त झाले, तर त्या करमणुकीच्याही पल्याड जातात. त्यांची मिथकांकडे वाटचाल सुरू होते.
बिपिनच्या गोष्टी या प्रकारात मोडणाऱ्या नव्हेत. मराठी पुस्तकं वाचणारी पिढी आहे, तोवरच बिपिनच्या गोष्टी वाचल्या जातील. अभिजात वाङ्मयात मोडण्यासाठी त्यांना कालच्या-आजच्या १-२ पिढ्यांची पुण्याई पुरेशी नाही, हे दुर्दैवी सत्य आहे.
बिपिनच्या गोष्टींमधून बदलत्या साहित्यिक प्रवाहाचं प्रतिबिंब पडतं, तरीही कदाचित कुमार साहित्याची अधिक गंभीरपणे दखल घेतली गेली असती. येणाऱ्या लेखकांनी करमणुकीपल्याडच्या किंवा निदान वास्तवाजवळच्या गोष्टी लिहिल्या असत्या, तर कदाचित मुलांचे प्रश्न, त्यांची मानसिक जडणघडण, तंत्रज्ञानाचे त्यांच्या जीवनावर होणारे परिणाम, आकुंचित झालेली कुटुंबव्यवस्था हे विषय गोष्टींमधे आलेही असते.
या कदाचिताला अंत नाही. पण दुर्दैवाने आजही मराठीत हा साचा कणखरपणे कुणी मोडलेला दिसत नाही.
.
आज आणि उद्या
'बिपिन बुकलवार आज असता तर…' हा कल्पनाविस्तारासाठी छानच विषय आहे. जगाची अफलातून उलटापालट झाली आहे. लहान मुलांसाठी लिहिलेल्या 'हॅरी पॉटर' आणि 'गेम ऑफ थ्रोन्स'सारख्या गोष्टी मोठी माणसं आवडीनं वाचताहेत. 'काईट रनर'सारख्या मोठ्यांच्या वाङ्मयात लहान मुलांचं विश्व चितारलं जातं आहे. रुबिक क्यूब विस्कट्वून सुंदर असं नक्षीकाम करावं तसं गोष्टींचे विषय, वाचकांचं वय, गोष्टींचे सरळसोट अर्थ आणि शब्दांच्या त्वचेखाली लपलेले अर्थ, यांची सरमिसळ होऊन नवी परिमाणं लाभलेल्या देशोदेशीच्या गोष्टींचा खजिना आज बिपिनला केवळ एका क्लिकच्या अंतरावर उपलब्ध आहे.
.
आज बिपिन असता तर?
.
(पण विजू-मोनाला बिपिन हवासा तरी असता का? त्यांना 'ऑडिओ-बुक'मुळे एक यांत्रिक बिपिन बुकलवार भेटता. कानात बोंडूक घालून अल्लादीनच्या दिव्यासारखं किंडलचं बटन घासलं की बिपिन नावाचा यक्ष हजर!) बिपिन आज असता, तर मोना-विजूंच्या 'मॅड्च्याप' वेळापत्रकापुढे तो कदाचित हताश झाला असता. कदाचित इंटरनेटमुळे उपलब्ध असलेल्या स्वस्त करमणुकीपुढे त्याचा निभावही लागला नसता. किंवा गोष्टींमधली हरवत जाणारी निरागसता बघून तो अवाकही झाला असता.
किंवा नाहीही...
कदाचित संगणकावर हजारो भाषांमधल्या गोष्टींचा खजिना उपलब्ध असलेला बघून त्याला हर्षवायूही झाला असता. दुर्मीळ पुस्तकांसाठी रद्दीवाल्याचं दुकान पालथं घाणाऱ्या बिपिननं एखाद्या चोरट्या साईटवरून पायरेटेड पुस्तक उतरवून घेतलं असतं का? कदाचित. शेवटी पुस्तकांचा मोह फार वाईट! पण भारांची मुलं 'अच्छे बच्चे' होती. मला नाही वाटत, त्यानं तसं काही केलं असतं. तो नक्कीच 'प्रोजेक्ट गुटनबर्ग'सारख्या प्रकल्पात सामील झाला असता आणि त्यानं दुर्मीळ पुस्तकांचं डिजीटलायजेशन करवून घेतलं असतं.
त्यानं विजू-मोनाला या सगळ्या गोष्टी नक्की सांगितल्या असत्या.
या साऱ्या शक्यता आजचं वास्तव आहेत. मुलांना बिपिन बनून गोष्टी सांगणं ही त्यांना बुक-लव्हर बनवण्याची पहिली पायरी आहे. अशी काही पढाकू मुलं उद्या लिहिती झाली तरच भारांच्या बिपिनचं गोष्ट सांगणं सुफळसंपूर्ण होईल.
-----
(चित्रे: जालावरून साभार)
-----
.
संदर्भ:
मुंबईला चक्कर
अक्काचे अजब इच्छासत्र
साखर सोंड्या
थॅंक्यू मिस्टर शार्क
जुनाट भावलीची भन्नाट कथा
दुर्मिळ तिकिटाची साहसयात्रा
दर्याई डाकू शार्की
सिंकदरचा बिलंदर कुत्रा
कॅप्टन किडचा खजिना
पुत्र असावा ऐसा गुंडा
डर्याई डाकूच्या गोष्टी
अगडबंब मंडळाच्या गोष्टी
ढोरगावचा चोर
डाकू बनला डिटेक्टिव्ह
https://www.ideals.illinois.edu/handle/2142/7052
http://en.wikipedia.org/wiki/List_of_children's_literature_writers
https://www.goodreads.com/genres/childrens?original_shelf=children-s
http://www.goodreads.com/list/show/24589.Favorite_Children_YA_books_from...
http://childrensbooksguide.com/top-100
http://www.whatdowedoallday.com/2012/11/classic-childrens-books-1980.html

॥प्रश्नचिन्हाखालचं चहाटळ टिंब॥

रेषेवरची अक्षरेसाठी, २०११मधे लिहीलेला हा लेख (http://reshakshare.blogspot.in/2011/10/blog-post_4998.html), इथे परत डकवत आहे-

विक्रमानं डोळ्यांवर आलेल्या बटा ’फूऊऊ’ करून मागे सारल्या, धपापत्या उरांच्या नायिकांसारखा श्वास उगाच घेतला न्‌ सोडला आणि जंगलात सरळ रेषेत चालायला लागला. सरळ रेषा म्हणजे द्विमितीय भूमितीत दोन बिंदूंमधलं लघुत्तम अंतर. काळेकाकू कोर्टाचे कागद कात्रीने कराकरा कापतात, तसं विक्रमाने ते अंतर तडफेने कापलं आणि झाडावरचा वेताळ खांद्यावर लादून तो तडक वापस निघाला. रस्त्यात वेळ जाण्यासाठी वेताळ विक्रमाला ’गोष्ट सांगतो’ म्हणाला. बोलणार्‍याचं तोंड कोण धरणार? अट फक्त एकच होती की, विक्रमानं मौनव्रत पाळायचं. विक्रमानं तंबाखूची गोळी दाढेखाली सरकवली आणि तो प्रसन्नपणे हसला. मौनव्रत त्याच्या सरावाचं होतं, शेवटी तो एक राजाच होता.
 

॥गोष्ट १॥

"फार फार विचित्र गोष्ट आहे. अड्डम नावाचा एक माणूस इव्ह अश्या विचित्र नावाच्या बाईसोबत राहात असे. इव्हचं खरं नाव संध्या असू शकतं, शांतारामबापूंची नव्हे, त्याहून जीर्ण. पण गोष्टीत इंग्रजी नावं. इंग्रजी कातडी लोकांनां आवडते, म्हणून संध्याचं गोष्टीतलं नाव इव्ह. अड्डम आणि इव्ह ईडन गार्डन, मु.पो. मलबार हिल’ किंवा ’कोरेगाव पार्क’ किंवा तत्सम उच्चभ्रू सोसायटीत राहात असत. जसं उच्चभ्रू सोसायट्यात असतं असं लोक म्हणतात, तसं भयंकर वातावरण ईडन गार्डनमधे होतं. लोक दिसायचेच नाहीत. उच्चभ्रू सोसायट्यांत असतं असं लोक म्हणतात, तसं अड्डम-इव्हचं बिन-लग्नाचं नुस्तंच एकत्र राहाणं होई. पण सगळं नॉर्मल असूनही त्यांनी तसं काहीच केलं नव्हतं. म्हणजे सगळं प्लॅटोनिक वगैरेच. उच्चभ्रू सोसायट्यांत असतो, असं लोक म्हणतात, तसा त्यांना कपड्याचा कंटाळा मुळातच असल्यानं अड्डम-इव्ह कधीच कपडे घालत नसत. त्यांना ती सवय कधी होती हे म्हणणंच मुळी चुकीचं ठरेल. किंबहुना कपडे का घालावेत हेही त्यांना माहीत नव्हतं. उच्चभ्रू सोसायट्यांत असतं, असं लोक म्हणतातं, तसं अड्डम-इव्हचं जीवन एकूण सुखात चाललं होतं.

एक दिवस कुठूनसा रंगीबेरंगी, हा‌ऽऽ थोर मोठा सर्प अड्डम-इव्हच्या घरात शिरला. नग्नावस्थेत दोघांनी सोसायटीच्या बागेत धूम ठोकली. काय करावे ते कळेना. सर्प नेम धरून मागे येतच होता. इव्हला तेव्हढ्यात बागेतलं लकाकदार सफरचंदाचं झाड दिसलं. तिला वाटलं सेब खावं. सेब खाव-डॉक्टर भगाव’ हे सत्य असेल, तर सर्प डॉक्टरपेक्षा कधीही कमीच डेंजर. यहॉं के पान, फुल तथा फल तोडने पे सखत कारवाई की जायेगी ही अड्डमनं जमवून वाचलेली पाटी इव्हनं उडवून लावली आणि सेब मागितलं. एव्हाना रंगीबेरंगी हाऽऽ थोर मोठा सर्प अड्डमच्या पायांवरून रांगत कंबरेला वेढा घालण्याच्या तयारीत होता. अड्डमनं उडी मारून सेब चोरलं आणि त्यानं आणि इव्हनं रसरशीत सेबचा मोठा लचका तोडला.

पुढे अड्डम आणि इव्हची सेब खाण्यावरून सखोल चौकशी झाली आणि त्यांना ईडन गार्डनबाहेर काढून टाकण्यात आलं.

तर विक्रमा, मला असं सांग की, त्या सेबमधे असं काय होतं, ज्यामुळे अड्डम-इव्हला ईडन गार्डन सोडावं लागलं? या प्रश्नाचं उत्तर तुला माहीत असूनही तू दिलं नाहीस, तर तुझ्या मस्तकाची हजारो शकलं होऊन पडतील."

विक्रमानं घसा साफ केला आणि तो उत्तरला, "तर मग ऐक वेताळा. सर्वात मोठी भूक पोटाची. अड्डम आणि इव्हनं सेब खाल्लं आणि त्यांची पोटाची भूक शमली. नंतर प्रज्ज्वलित होते ती पोटाखालची भूक. बागेत नागव्यानं कसं उभं राहायचं, म्हणून अड्डम आणि इव्हनं काही अंजिराची पानं अंगाभोवती गुंडाळली. अंजिराचीच का, तर ती आकारानं मोठी असतात आणि तुरट चवीमुळे बकरीही त्यांना तोंड लावत नाही. मराठीत इश्काची इंगळी डसते, तसा इंग्रजीत साप डसत असावा. सापावरुन द्व्यर्थ नको, पण सिनेमातली ओलेती हिरोईन बघून पब्लिक चेकाळतं, सेम तस्संच पानातल्या कत्थी इव्हबाई आणि सापवाल्या अड्डमचं झालं. इव्हला सेबचं ओझं पेलवेना. अड्डमचा सर्प बेकाबू झाला. माणसाच्या लैंगिक इतिहासाची ही अशी चोरटी सुरुवात व्हावी हे काही ईडन सोसायटीवाल्यांना पसंत पडलं नाही, म्हणून त्यांना सोसायटीतून बेदखल करण्यात आलं."

॥गोष्ट २॥

"फार फार वर्षांपूर्वींची ही गोष्ट. देवांचा राजा इंद्र होता. वेळी-अवेळी पाऊस पाडणं, बॉल-बेरिंग बसवल्यागत कुणाच्या तरी तपश्चर्येने सिंहासन थरथरताच रम-रमा-रमी यांच्या वापराने समोरच्याला शीलभ्रष्ट करणं, तपोभंग करणं, ’अप्सरा आली’वर (सोनाली कुलकर्णी द्वितीय हिचा) नाच बघणं असा बहुसंख्य राजांसारखाच त्याचा कार्यक्रम असे.

इंद्राचा अजून एक शौक निळूभाऊंच्या सिनेमातल्या सरपंचासारखा होता. दिसली तरणी-ताठी बाई की नासव तिला. इंद्र डिट्टो निळूभाऊंसारखा खर्जातून बोलत असणार, "रंग्या, रातच्याला वाड्यावर घेऊन ये रं तिला."

तर असा हा इंद्र एकदा अहिल्येच्या प्रेमात पडला. अहिल्या म्हणजे ब्रह्माने निर्माण केलेली सर्वात सुंदर बाई. तिनं आपल्यापेक्षा वयानं कितीतरी मोठ्या असलेल्या गौतम ऋषींशी संसार थाटलेला. काहीही करून अहिल्येचा भोग घ्यायचाच असं ठरवून इंद्रानं गौतम ऋषींचं रूप घेतलं आणि अहिल्येचा भोग घेतला. आपलं काम उरकून इंद्र परत निघाला आणि नदीवरून खरेखुरे गौतम ऋषी आश्रमात परत आले. काय झालं हे क्षणार्धात ओळखून गौतम ऋषींनी अहिल्येला शिळा होऊन पडून राहण्याची शिक्षा दिली. इंद्र राजा असल्यानं त्याला वेगळा दगड करण्याची गरज नव्हती. मात्र ऋषींच्या शापानं इंद्राला अंगभर डोळे फुटले. सर्वसामान्यांसाठी डोळे येणे हा एक रोग असतो. सर्वसामान्यांसाठी डोळे फुटणे हा त्रयस्थ बाईला मुद्दामहून धक्का मारल्यास मिळणारा शाब्दिक मार असतो. पण इंद्रासाठी मात्र ते लाजिरवाणं शारीरिक सत्य बनलं.


तर विक्रमा, मला असं सांग की, इंद्रानं केलेल्या फसवणुकीचा शाप ऋषींनी अहिल्येला का दिला? आणि इंद्राला अंगभर डोळे फुटावेत या शापामधे कसलं गूढ होतं? या प्रश्नाचं उत्तर तुला माहीत असूनही तू दिलं नाहीस, तर तुझ्या मस्तकाची हजारो शकलं होऊन पडतील."

विक्रमानं घसा साफ केला आणि तो उत्तरला, "तर मग ऐक वेताळा. अहिल्या ही ब्रह्मनिर्मित सर्वात सुंदर स्त्री असली, तरी तिचं दैव बघ. तिच्या नावातच अ-हल्य आहे. म्हणजे लैंगिक अर्थानं नांगरणी न झालेली- कुमारिका. तिनं वयानं मोठ्या असलेल्या गौतम ऋषींशी लग्न केलं हाही त्या सिंम्बॉलिझमचाच एक भाग. अहिल्या पुण्यशील स्त्री असल्यानं तिनं भोगातुर इंद्राला कधीच ओळखलं होतं. पण ’मकबूल’मधला पंकज कपूर म्हणतो तसं "भूक का क्या? कभी भी लगती है". ती शरीराला शरण गेली म्हणून ऋषींनी तिला शाप दिला - शिळा बनण्याचा. कसलेही विकार नसलेली शिळा.

इंद्राचं वेगळं होतं. इंद्र राजा होता, एक पुरुष होता. यथा राजा तथा प्रजा. कंबरेखाली पुरुष किती दुबळा, स्खलनशील असतो हे ऋषींनी नीटच ओळखलं होतं. पुरुष स्त्रीदेहाचा केवळ दृष्टिक्षेपातूनही कसा उपभोग घेतो याचा सिंबॉलिझम म्हणून अंगभर डोळे फुटण्याची शिक्षा इंद्राला मिळाली."

मौनव्रत तुटूनही वेताळ खांद्यावरून हालत नाही म्हटल्यावर विक्रमाला आश्चर्य वाटलं. त्यानं तसं वेताळाला बोलून दाखवल्यावर वेताळ गालातच हसला आणि म्हणाला, "विक्रमा, एकदा नीट बघ, तुझ्या खांद्यावर दुसरं-तिसरं कुणी नसून तूच आहेस. विक्रमा, एकदा नीट बघ, माझं ओझं वाहणारा दुसरा-तिसरा कुणी नसून मीच आहे. प्रश्नचिन्हाची वेलबुट्टी रेखणारा मी आहे, तर त्याखाली शंकातुर टिंब टेकवणाराही तूच आहेस."
 

Saturday, September 12, 2015

नागव्या शब्दांचा | थोर व्यभिचार

नागव्या शब्दांचा | थोर व्यभिचार
अर्थातली गाठ| सुटो पाहे

मुळे रूजलेली। आरश्यांचे पीक
आंगोपांगी पक्षी। देहावले

संथ निळे डोह। त्वचेचे उखाणे
प्रतिमांचे कोडेे। ढवळले

उगवुन येती। देहातून देह
देखणा कबीर। ऊरी फुटे

दोन टोकांमधे । अंतर बेभान
वाकडीच रेघ । बरी असे

सोलून पाहा नां । दिठीतले चंद्र
दिवसाचे भय। झाकलेले


Sunday, July 26, 2015

प्रतिमांकन: विठ्ठल

॥ विठ्ठल॥


क्षितीजाच्या कडेकडेने रेखावेत थोडे पहाड
मधेच लहरी रेघ गढुळशार नदीची
गडगडत येणारा एखादा
शाळीग्राम
आणि त्यावर कोरलेले तुझे नाव
"विठ्ठल"

ऎकु येतात -
भजनांचे मातकट आग्रही स्वर
अबीरगुलालाच्या प्रतलातून उधळणाऱ्या रुढीजात घोड्यांच्या टापा
वातावरण भोवंडुन टाकणारा श्रद्धावंत कोलाहल
आणि
सखीचे अनहत हाकारे
"विठ्ठल..."


नीजेच्या तळाशी उमलुन येतात पायावरचे भवरे
तरीही
कुणाचे वाट चालणे संपत नाही
कुणाचे वाट पाहाणे संपत नाही
लोंबतात दंतकथांच्या पारंब्या तुझ्या अचल अंगाखांद्यावर
आणि शतकभरात रुजल्याही असतील जमिनीत खोलवर
त्यातून उगवणार मुळमाये पुन्हा नव्याने
तू "विठ्ठल"

Tuesday, July 7, 2015

परत रेषेवरची अक्षरे


२०१२ मधे 'रेषेवरची अक्षरे'चा शेवटचा अंक काढला तेव्हा ब्लॉगवरचं चांगलं लिखाण आटत चाललंय याचं दुःख तर होतंच. पण तो अंक करताना होणारी ई-पत्रांची देवाणघेवाणचर्चावादविवाद, गॉसिप्स आणि भंकसउलगडत जाणारे नवनवीन ब्लॉग्स... हे सारं संपणार याची खंतही होती.

मधल्या काळात आम्ही ब्लॉग सोडून थोडे थोडे बाहेरख्याली झालो. फोरम्सवर डोकावलो. फेसबुकावर उंडारलो. पोटापाण्यात रमलो. लिहिण्यावाचण्याशी अपराधीपणाचे, मैतरकीचे आणि घरपरतीचे खेळ आलटून पालटून खेळलो. 'रेरे'च्या अंकाबद्दल लोकांनी विचारणा केल्यावर थोडे गडबडलो, शरमलो आणि सुखावलो. 

दरम्यानच्या काळात काही ताजे लेखक आलेकाही जुन्या लेखकांच्या शब्दांना परत धार चढलीबऱ्याच गोष्टींचे संदर्भ बदलले आणि नव्या अर्थाचे शब्दही उगवले. आमची उत्सुकता नव्याने जागी झाली. गेल्या तीन वर्षात मराठी ब्लॉग विश्वात नक्की काय काय झालं याचे हिशेब मांडायला आम्ही चित्रगुप्ताच्या तत्परतेनं पुन्हा सज्ज झालो. 

'रेषेवरची अक्षरेया दिवाळीत पुन्हा येतो आहे!

आम्ही ब्लॉग्सची यादी बनवायला सुरुवात केली आहेच. पण तुमच्या वाचनात काही नवीन चांगले ब्लॉग्स आले असतील, तर ते आम्हांला 'resh.akashare@gmail.com' या पत्त्यावर जरूर कळवा. इंटरनेटचं आभासी विश्व प्रचंडच आहे आणि म्हणूनच 'साथी हाथ बढाना'चं हे एक प्रांजळ आवाहन. 

बाकी, यंदा भेटत राहूच!

Saturday, June 13, 2015

विश्वाच्या बेंबीत बोट


"अंजली, अंजली, अंजली, प्यारी अंजली, अंजली" सगळ्या मनुष्यबळ असोशिएट्संनी पहील्याच दिवशी अंजली सुब्रमण्यमचं चिअरगर्ल्स सारखं हातात पॉम-पॉम उर्फ गुच्चे घेऊन गाण्यासकट ऑफीसात जोरदार स्वागत केलं तेव्हा अंजलीचं ऊर भरुन आलं. कुणीतरी तिला हाताला धरुन तिच्या नावाची पाटी असलेल्या क्युबीकलमधे घेऊन गेलं. बराचसा जड असलेला ऎतिहासिक लॅपटॉप तिथे होता. अंजलीचं मन मोहरीएवढं खट्टु झालं पण तिनंच तर मुलाखतीत सांगीतलं होतं की तिला आजीच्या जुन्या पातळाचा वास आवडतो....म्हणून तर जुना लॅपटॉप..."ऍडमीन-ऍडमीन" सोबतची किडमिडीत कीडकी किरकिरली. "काय"? भानावर येत अंजलीनं विचारलं. ..."ऍडमीन-ऍडमीन, तुमचा लॉगीन-पासवर्ड" किडमिडीत कीडकी तोंडातले ६४ पिवळसर दात दाखवत हसली. गंमत म्हणजे तिचा कुर्ताही सुर्यफुलाचे मोठे छाप असलेला पिवळ्या रंगाचाच होता. तिच्या बांगड्या, डोक्यावरचा बॅंड, सॅंडलचे बंद सारंच पिवळ्या रंगाचं होतं, फ्लुरोसंट पिवळं! अंजलीनं तिचे खास एम्बीए हसु चेहराभर पसरवलं आणि किडमिडीत कीडकीला विचारलं, "तुझं नाव काय व्हीन्सेन्ट व्हॅन गॉग आहे काय?" "नाही, नाही, आपल्याकडे व्हीन्सेन्ट कुणी नाही, जोसेफ आहे, रिक्रुटमेन्टवाला. माझं नाव तर सपना आहे" कि.की. उत्तरली. ’तो जोक होता..’ अंजली पुटपुटली "अगं तुझा ड्रेस बघून मला वाटलं..." "हॉ..." तोंडातली सगळी सुर्यफुलं दाखवत कि.की. म्हणाली "मम्मी लव्ह्स यलो. तुम्हीपण घालत चला, बघा मम्मीला किती आवडेल ते". "पण, तुझ्या मम्मीला यल्लो आवडतं तर तू वापर, मी पिवळ्यात अजून काळी दिसते" अंजलीनं कि.की.ला कंटाळवाणं उत्तर दिलं. कि.की.नं यावेळी सुर्यफुलं घशातच खचवली "मम्मी म्हणजे यशोदा मॅम. आम्ही त्यांना मम्मीच म्हणतो. शी जस्ट लव्ह्स यलो." मघाचपासून आपल्याला कावीळ झाल्याची भावना का होतेय याचं उत्तर अंजलीला आत्ता मिळालं.

यशोदा देसाई म्हणजे वाय्यम वाय्यम टेकच्या एचआर व्हाईस प्रेसिडेन्ट. बाईंवर ती हजारेक लोकांची कंपनी वर्षभरात दोन हजाराची करण्याची मोठ्ठी जबाबदारी होती. त्यामुळेच त्यांनी आधी स्वतःचं दुकान नीट बसवण्याचं मनावर घेतलं होतं. रिक्रुटमेंट आणि पगार बघणारा जोसेफ सोडला तर बाईंकडे साऱ्या सपनाचं होत्या. सगळ्या सपना जेमतेम ग्रॅजुएट होत्या आणि बाईंसाठी पडेल ती कामं करायच्या. पण कंपनी दुप्पट करायची तर जोसेफ सारखे अजून लोक लागणार हे ओळखुन बाईंनी अंजलीसकट पाचेक रंगरुट एम्बीए कॅम्पसमधून उचलले होते. बाईंना चिंता होती या नव्या मुलींना इथे मुरवायचं कसं याची.

"अंजली, तुला मी जावा प्रॅक्टीसची एचआर पार्टनर बनवणार आहे. चालेल ना?" बाईंनी जमेल तेव्हढा मृदु आवाज काढला "तिथल्या लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे, त्यांचे ट्रेनिंग्स, ऍपरायजल...सगळं सगळं तू बघायचंस." अंजली मन लावून बाईंचे टेबलावर ठेवलेले पाय बघत होती. बाईंची खुर्ची पुर्णपणे मागे रेललेली होती आणि त्या खुर्चीत स्वतःला कसबसं कोंबून बाई छताकडे बघत होत्या. खोलीत त्यांनी लावलेल्या पर्फ्युमचा मंद वास येत असला तरी अंजलीला तिच्या नाकाजवळ असलेल्या त्यांच्या पायाचा अद्भुत वास येत होता. "ही टेकी लोक आपल्याच जगात असतात. त्यांना नियम, प्रोसेस काही कळत नाही. तू त्यांची आई असल्यासारखं त्यांना वळण लाव" बाईंनी पायाला एक बोटा आड गर्द पिवळं नेलपेंट लावलं होतं. अंजलीनं घाईघाईनं विचारलं "पण ती तर तुम्हाला मम्मी म्हणतात..." बाई ठसकालागे पर्यंत हसल्या. "सपनासारख्या असोशिएट्स मला मम्मी म्हणतात, सगळे नाही. तू मला यशोदा म्हण, फक्त यशोदा"

सपना उर्फ कि.की. आवाज न करता आली आणि तिनं कागदांचा मोठा ढिगारा अंजलीच्या टेबलावर ठेवला, "जावाच्या कुंडल्या...". अंजलीच्या डोळ्यातलं प्रश्नचिन्हं अजून गडद झालं. "अहो, त्यांचे रिझ्युमे, आत्तापर्यंतचे त्यांचे ऍपरायजलचे निकाल, त्यांचे ई-सॅटचे निकाल.." "हे कंप्युटराईज्ड नाहीत?" अंजली जवळजवळ किंचाळलीच. "तुम्हाला सिस्टीम ऍक्सेस नाही...अजून तरी. मम्मी म्हणाल्या प्रिंटा दे म्हणून दिल्या"

"जोसेफ, मला येऊन महीना होऊन गेला, अजून कसा ऍक्सेस नाही रे?" अंजलीनं तिच्याच बाजूला बसणाऱ्या जोसेफला विचारलं. तो मन लावून पेन्सीलचं दुसरं टोक खात होता. "माईन्ड योर बिझनेस. फालतु प्रश्न विचारशील तर बाई फेकून देतील बाहेर" त्यानं पेन्सील जवळजवळ संपवतंच आणली होती " आणि तुझ्या जावा प्रॅक्टीसमधे मोठं भोक पडलय, वीसेक लोक सोडून गेलेत. तू हर्षा किंवा निताशी बोलून काही रिझ्युमे मिळतात का बघ. मी वीकेन्ड ड्राईव्ह ठेवतोय रिक्रुटमेन्टचा". अंजलीनं तिच्याच नकळत नंदीबैलासारखी मान हालवली आणि झालेल्या किंचीत अपमानाचा वचपा काढायचा म्हणून तिनं तिच्या टेबलावरच्या चार-सहा रंगीत पेन्सीली जोसेफच्या पुढ्यात आपटल्या, "संपली ती पेन्सील, आता बोटं खातोयंस. ह्या घे रंगीत पेन्सीली, खा आणि संपव जंगल एकदाचं!!" महीन्याभरात जोसेफ पहील्यांदाच तिच्याकडे बघून हसला "सॉरी, खुप टेन्शन आहेत. चल, आजचा लंच माझ्याकडून"

हर्षवर्धन पिंपळखरेनं अंजलीला कुणाला कळेल नकळेल अश्या बेतानं निरखलं. त्याला मंद सुगंधी वाटलं. निता वधवानीनंही करकरीत अंजलीला उभं-आडवं न्याहाळलं. आपल्या शिळेपणाच्या जाणिवेनं तिची आत्मिक चिडचिड झाली. हेकट आवाजात ती ओरडलीच "मी रिझ्युमे का देऊ?" सेकंदभर अंजलीला वाटलं आपण चुकून बाईंना इस्टेट तर नाही मागितली...रि..झ्यु..मे.. तिनं चेहरा हसरा ठेवण्याचा प्रयत्न केला "निता, आपलं नां बकासुरासारखं झालयं, रोज ताजी माणसं हवीत." हर्षाला वाटलं हा निताच्या बिनलग्नाच्या स्टेट्सवर टोमणा आहे आणि निताला वाटलं हा अंजलीचा बाष्कळ आणि पोरकट विनोद आहे. वातावरण अजूनच गोरंमोरं झालं. तंतूवाद्यावर बसवाव्यात तश्या निताच्या घश्याच्या शिरा ताणून बसवल्यासारख्या दिसत होत्या "मी रिजेक्ट केलेला माणूस महीन्याभरात इथे जॉईन होतो. कसा? इथे मुलाखत फक्त हर्षा आणि मी घेते मग याला कुणी आणला? त्याला ढीगभर पगारावर आणून माझ्या बजेटचा बाजा वाजवला." "मी बोलते जोसेफशी" अंजली कशीबशी उत्तरली. "कधी?" नितानं तलवार काढली "आणि आता या माणसाचं मी काय करायचं? तू माझी एचार पार्टनर आहेस. याला इथून उडवायची जबाबदारी तुझी. कसं ते तू बघ." हर्षानं चष्मा पुसला आणि त्याच्या सुप्रसिद्ध शांत आवाजात तो म्हणाला "मिस. सुब्रमण्यम, आपल्याला बरंच काम करायचं आहे. तुमचं जावा प्रॅक्टीसमधे पहील्या दिवशी असं स्वागत करावं असं मला आणि निताला वाटत नव्हतं पण ..." अंजलीला तो द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळच्या विदुरासारखा वाटला, किंचीत आशादायक! "अंजली म्हटलं तर चालेल मला" तिनं पोटभर अपमान झाल्यावर निघू शकतो तेव्हढ्या मवाळ आवाजात सांगीतलं.

अंजलीनं बघितलं तेव्हा जोसेफ जागेवर नव्हता. बोलण्याची उर्मी अनावर झाली की अनोळखी नात्यांनाही आकार मिळतो. आजुबाजुला दोन-चार सपनांचं सतत पिवळ्या पानांत पिवळ्या पानांत चावळ चावळ चालती सुरु होतं. तिनं त्यातून कि.की.ला बरोबर हेरलं.

"हॉ.." "तुला माहीतै..." "अय्या..." "मम्मी..." "निता डुचकीचै..." "श!क्य!च! नाही!"

संवाद संपतो म्हणजे फक्त शब्दांची स्पंदनं संपतात. त्यातून उमटणाऱ्या प्रतिध्वनींचे पडसाद तरीही दूरवर कुठेतरी उमटंतच राहातात.

पलीकडच्या केबीनमधे बाईंची खुर्ची किंचीत करकरली.

"अंजली" बाईंचा मधात घोळलेला आवाज अंजलीच्या कानात किणकिणला. बाईंनी त्यांच्या ऑफीसचा लॉनमधे उघडणारा दरवाजा उघडा ठेवला होता. मोकळ्या लॉनमधे हॉटेलसारख्या छत्र्या आणि खुर्च्या ठेवल्या होत्या. "डू यु स्मोक?" बाईंनी पाकीट पुढे करत विचारलं. "हो, पण आत्ता नको" अंजलीनं जमेल तेव्हढ्या नम्रपणे सांगीतलं. "तुला तीनेक महीने झाले नां? कसं वाटतय?" मधाचा एक शिपकारा परत अंजलीच्या कानांवर पडला. प्रश्नाचा रोख नक्की कळाला नाही की संदीग्ध उत्तर द्यावं. अंजलीनं तोंडभर हसु पसरवलं आणि ’शिकतेय’ असं धुकट उत्तर चिकटवुन दिलं. बाईंसाठी हा खेळ अजिबातच नवा नसतो. "निता वाधवानीला नक्की काय प्रॉब्लेम आहे? रिजेक्टेश कॅन्डीडेट्स घेतले हा कसला ओरडा करत आहे ती? तू जोसेफशी बोललीस? मला का नाही सांगीतलंस? हा फार गंभीर आरोप केलाय तिनं आपल्यावर" बाईंनी तडतड्या फुलबाजांचा मळाच पेटवुन दिला. अंजलीला आपले पाय लटपटु शकतात हा नवाच साक्षात्कार झाला. तिनं आठवुन सगळ्या घटना धडाधडा सांगीतल्या. बाईंनी कपाळावर हात आपटला "तू मला सांगायला हवं होतंस" बाईंचे मिचमिचे डोळे अजूनच बारीक झाले "तुला माहीतै, निता जोसेफबरोबर झोपते आणि त्यांचं काही महीन्यांपासून पटत नाहीए" बाईंचा आवाजही बारीक पण लिबलिबित कारस्थानी झाला होता "and that fucking whore is accusing us?" अंजलीला जोसेफच्या टेबलावर ठेवलेला त्याच्या बायकोचा आणि हसऱ्या मुलाचा फोटो आठवला. "मला त्यांच्या बेडरुममधे काय चालतं यात अजिबात रस नाही. मला जावात पन्नासेक लोक हवे आहेत आणि निता जर त्यात तिचे वैयक्तिक प्रश्न मिसळणार असेल, तर मलाच काही तरी करावं लागेल. आणि तू, जावाची पार्टनर म्हणून या सगळ्यात काय करणार आहेस?" अंजलीनं दोन महीन्यात हा प्रश्न दोनदा ऎकला होता; एकदा निताकडून आणि आत्ता यशोदाकडून. माणसांचं नेमकं काय करायचं असतं? गृहीतकामधल्या स्थिरांकाला हात लावता येत नसतो. समीकरणाचं समाधान होईपर्यंत चलांकाच्या किंमती मात्र बदलत राहायच्या. कंपनी देते त्या पगारात पन्नास काय पाच अनुभवी लोकपण इथे येणार नाहीत इतपत अंदाज अंजलीला आलेला होता. "मॅम" अंजलीनं एक चलांक बदलायचा ठरवला "माझ्या कॉलेजची एक ऑड सेमिस्टर बॅच असते. त्यात बहुदा १-२ वर्ष काम केलेले लोक असतात. आपण त्यांना रिक्रूट केलं तरं ?" बाईंनी सिगरेटचा एक दीर्घ झुरका घेतला. अंजलीनं छातीभर तो धूर साठवुन घेतला.

पुढचे काही दिवस निता वधवानीच्या बदफैलीच्या कहाण्या ऑफीसच्या सोशल साइटवर, विविध ग्रुपवर निसटत्या संदर्भांसह उगवत राहील्या...

पुढचे काही दिवस सगळ्या सपना ऑफीसभर चायनिज व्हीस्परचा खेळ खेळत राहील्या...

पुढचे काही दिवस जोसेफ ऑफीसच्या कामासाठी इटलीला जात येत राहीला...

पुढचे काही दिवस अंजली गाजीयाबादला एच आर मधला ऍडव्हान्स डिप्लोमा करायला जाऊन राहीली..

"अंजू, चहा पिणार?" हर्षानं निरुत्साही आवाजात विचारलं. "ब्लडी हेल पिंपळ" अंजलीनं लाडात येत हर्षाला घोळात घेतलं "किती दिवसांनी भेटतो आहेस!" "आधी ग्राहक समाधानासाठी ऑनसाइट, नंतर चाळीस चोरांची भरती आणि त्यांचं शिक्षण....निता नसल्यानं सगळा लोड माझ्यावरंच! " हर्षानं निर्लेपपणे उत्तर दिलं. "निता नेमकं तू नसताना तडकाफडकी निघून गेली" अंजलीनं आवाज जमेल तेव्हढा स्थिर ठेवला "...आणि चाळीस चोर काय रे? चांगली एम्बीए झालेले लोक आहेत, माझ्या कॉलेजचे".

हर्षानं चष्म्यावरची वाफ पुसली "अंजली, शांतपणे ऎक. निता मागे जे म्हणाली ते खरं होतं. आपण इंटर्व्ह्युमधे नाकारलेले लोक, के.पी. असोशिएट मधून परत आपल्याकडे येतात, आपण पगार देतो त्याहून जास्त पैश्यांवर. त्या साठी आपण के.पी. असोशिएटला त्या माणसाचा दोन महीन्यांचा पगार देतो. हे जोसेफला, मला, निताला आणि अजून दोनेक लोकांना माहीत होतं. पण मी बोललो नाही कारण मला यशोदाची भिती वाटते. निताला फारशी चिंता नव्हती कारण ती एकटा जीव आहे. अजून नाही कळालं? के.पी. असोशिएट ...कारंथ-प्रधान असोशिएट...अच्छा,यू डम्ब... यशोदा देसाईचं नाव यशोदा देसाई-कारंथ असं आहे, कळालं? रविश कारंथ, के.पी. मधे पार्टनर आहेत, बाईंचे ’हे’." अंजली आवाक होऊन ऎकत होती. "सत्य दोन प्रकारचं असतं अंजली, एक ज्याचा उघड उच्चार करावा आणि दुसरं ज्याला झाकून ठेवावं. टेक्निकल भाषेत सांगायचं तर अल्फा एरर आणि बीटा एरर- बरोबर नाकारलं जाणं आणि चुकीचं स्विकारलं जाणं. आपण दोन्ही चुका करतोय " हर्षानं चहाचा तिसरा कप घेतला. "पण मग निता?" स्वतःच्याच ओळखु न येणाऱ्या आवाजात अंजलीनं विचारलं. "निताचं काय?" हर्षाच्या आवाजात चहाचा कडवटपणा मिसळला होता "तुम्ही लोकांनी तिला ट्रॅप केलं. ती, जोसेफ आणि अजून काही लोक ट्रेकला एकत्र जायचे. ते चांगले मित्र होते असं मला वाटायचं. या पलीकडे कुणाचे कुणाशी संबंध होते यात मला रस नाही. आणि तुझ्या गॉडमदरला तरी का असावा? इथे कोण कुणाबरोबर झोपतं याच्या बऱ्याच रंगीत कहाण्या आहेत. पण त्याचा कामाशी काय संबंध? नितानी किंवा जोसेफनी एकमेकांना विनाकारण झुकतं माप दिलं असं कुणीच म्हणणार नाही. आय होप, हे सगळं बोलणं तुझ्यापलीकडे जाणार नाही. बाई लोकांना कुठल्या प्रकरणात गुंतवुन आयुष्यातून उठवतील याची खात्री नाही. तुला माहीत नसेल पण मी वाय्यम वाय्यम टेकच्या पालक कंपनीतून इथे डेप्युअटेशनवर आलो आहे आणि आमच्याकडे चर्चा असायची की बाईंना इथला सीईओ व्हायचंय. त्यांच्या मार्गात आलेल्या प्रत्येकाला त्या बाजुला काढतात, अगदी शिपायापासून मॅनेजरपर्यंत, प्रत्येकाला"

संदिग्ध बिंदुंना जोडून आकार तयार करण्याचा छंद लागला की कल्पनाशक्तीला ओरबाडुन प्रतिमांची मालिकाच पुढ्यात उभी राहाते. अंजलीनं प्रश्नमग्न चेहऱ्यानं विचारलं "तुला माहीतै, के. रवी असा कुणी तरी आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलचा ताजा ताजा कॉन्ट्रॅक्टर आहे. ब्लडी एक्सपेन्सीव्ह." "ओहो, आता मला कळालं चाळीस चोरांचा सरदार कोण आहे!" हर्षानं नुक्त्याच झालेल्या साक्षात्काराचं उघड मनन-चिंतन केलं.

अंजलीला वातावरणात सतत ताण जाणवत होता. सर्वप्रकारच्या सपना आजुबाजुला उधळुन बागडत होत्या. कि.की. दर अर्ध्या तासाने मारुतीला फेऱ्या माराव्यात तशी अंजलीच्या क्युबीकलवरुन जायची. शेजारी बसलेल्या जोसेफशी नजर चुकवण्याचा खेळही सोपा नव्हता. दिवस झिम्मड लांबत होते.

जोसेफनं आग्रहानं अंजलीला लंचसाठी बाहेर नेलं.

"माझे आई" जोसेफ काकुळतीच्या स्वरात म्हणाला "कृपा करुन बोल"

अंजलीनं तिच्या खास सुब्रमण्यम टपोऱ्या डोळ्यांनी जोसेफकडे बघितलं. अनुभवांनी मरत जाणारं नितळपण तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं, "निताचं काय? के.पी. असोशिएटचं काय?"

"तुला जर मी कामपिपासु राक्षस वाटत असेल तर माझे आणि निताचे तसे कसलेच संबंध नव्हते" कमालीच्या कोरड्या आवाजात जोसेफ म्हणाला "आणि तुला जर मी पैश्यांसाठी के.पी. असोशिएटचं काम करतो असं वाटत असेल तर तू मुर्ख आहेस, तू यशोदाला अजून ओळखलंच नाहीस. निता मोकळया स्वभावाची होती, आम्ही ट्रेकला एकत्र जायचो पण आम्ही कधी एकत्र झोपलो नाहीत, जर तुला नेमकं हेच ऎकायचं असेल तर....के.पी. साठी बाई मला अधून मधून कट देतात. पण पैशाच्या मोहापेक्षा मला बाईंची भिती जास्त आहे. निताच्या बाबतीत बाईंनी माझं नाव सोईस्कररित्या वापरलं. But I am just a fucking frail pawn in this entire set up, you see"

"तरीच तू जर्द पिवळा शर्ट घातलायस..." वातावरण जरासं मोकळं करत अंजली म्हणाली.

सुटीच्या दिवशी हर्षानं फोन केला तेव्हा त्याच्या आवाजाला नेहमीपेक्षा जास्त गंभीर सुर होता. "अंजली, काही तरी गडबड आहे. ’तुझा मित्र’ जोसेफ डेटा बदलण्याविषयी बोलत होता. वाय्यम वाय्यम टेकच्या पालक कंपनीतून ऑडीटर्स आले आहेत. आणि जोसेफ म्हणतोय की फक्त त्याच्या किंवा यशोदाच्या कंम्युटरमधला डेटा बदलायचाय, सर्व्हरमधला नाही. रेमडोक्या गाढवाला हे कळत नाहीए की सगळा डेटा सॅपच्या सर्व्हरमधून येतोय आणि त्याच्या किंवा यशोदाच्या कंम्युटरवर काहीही डेटा नाहीयै. मी त्याला असा लोकली डेटा बदलणं शक्य नाही म्हणालो तर त्यानं देसाई मॅडम फोन करतील असा धमकीवजा निरोप देऊन ठेवला आहे."

"अंजली, मला तुझी मदत हवी आहे" बाईंनी एअरकंडीशन्ड केबीनमधे सिगरेट लावून भितीदायक धुक्याचं वातावरण तयार केलं होतं "तू ग्रुपच्या इथिकल काऊन्सिलकडे तक्रार कर" बाईंना क्षणभरही वेळ घालवायचा नसतो. अंजलीच्या पोटात खोल काहीतरी उसवायला लागलं " तू तक्रार कर की जोसेफनी तुला सेक्शुअली ऍब्युज केलं म्हणून. He is pain in the butt. निता प्रकरणापासून ग्रुप कडून खुप प्रेशर आहे त्याला काढण्याबद्दल. पण धड पुरावे नाहीत आपल्या जवळ. तू तक्रार करशील तर त्याला लगेच काढता येईल. you know regular stuff, inappropriate touch and obscene images etc. मी आयटीच्या प्रसादशी बोलून त्याच्या मशिनवर टाकून घेते तसलं काही. आणि जस्ट ईमॅजिन, एक वर्षात तुझं प्रमोशन..."

खोलीतला पिवळा रंग विकृतपणे अंगावर चालून आला. अंजलीला किळसवाणं वाटलं पण तिनं निर्णय घेतला "Mam, I am lesbian. I have different sexual orientation. Sorry, but I don't know how to handle this"

"ओह" बाईंना अनपेक्षित उत्तर आल्यानं त्यांना नक्की काय बोलावं हे कळालं नाही "...असु दे. मी सपनाशी बोलते, तू जा." राजासाठी मोहरे बळी घालण्याचा बुद्धीबळाचा खेळ जुनाच असतो. कि.की. बाईंच्या खोलीत तडफेने गेली आणि बऱ्याचे वेळानी बाहेर आली तेव्हा तिचे डोळे लालभडक होते.

"I did not know that road lands there..." जोसेफच्या आवाजातला ताण लपत नव्हता. मोठ्या प्रयत्नांनी अंजलीनं त्याला आणि हर्षाला जवळच्या हॉटेलमधे एकत्र आणलं होतं. "बाईंनी खुप खोटी बिलं लावली आहेत, न केलेल्या प्रवासाची, न झालेल्या रिक्रुटमेन्ट ड्राईव्हची, लाखांत आहेत बिलं. ग्रुप ऑडीटमधे हे पकडलं जाणार हे नक्की. सगळ्या एंट्री मी केल्यामुळे माझी चौकशी होणार पण सगळे ऍप्रुव्हल बाईंचे असल्याने त्या अडकणार. मी हर्षाला सांगून बघितलं की तू डेटा बदल पण तो नाही म्हणाला. हे एकदा सुटतं तर मी इथून राजिनामा देऊन दुबईत जाणार होतो. पण जर बाईंनी मला असं इथिकल केस मधे अडकवलं तर माझं करिअर संपलं हे नक्की."

"अरे असा डेटा बदलता येत नसतो, त्याचा माग राहातो, तो कुणालाही शोधता येतो" हर्षा हताशपणे म्हणाला "मी परत आपल्या पालक कंपनीत जाणार आहे, त्या आधी अंजलीच्या बाबतीत निता सारखं होऊ नये म्हणून मला काही तरी करायचं आहे. सॅपमधला डेटा कुणाला बदलता येणार नाही, त्याचं अकाऊंटींग होईल. मी तुझ्या मशीनची ईमेज घेतो जोसेफ. म्हणजे प्रसादनं तुझ्या मशीनवर काही बदल केले तरी तुला ती ईमेज दाखवुन दोन डेटांमधला फरक दाखवता येईल."

"सपनाचं काय?" अंजली कुठल्याश्या निष्कर्षावर आल्यागत बोलली "तिनं तक्रार केली तर जोसेफचा कुठलाही बचाव तकलादु होऊन जाईल."

प्रश्नांच्या उत्तरांची नव्याने मांडणी केली की गृहीतकांचे अर्थ बदलतात.

अंजलीनं विश्वाच्या बेंबीत बोट घालायचं ठरवलं. "मीच इथिकल काऊन्सिलकडे तक्रार केली तर? मीच म्हणाले की बाईंनी मला सेक्शुअली ऍब्युज केलं म्हणून तर? आणि नंतर कि.की. ला देखिल...किंवा कि.की. ने देखिल...."

पटावरची अनपेक्षीत प्यादी हलली की खेळणाऱ्याचा गोंधळच उडतो.

अंजलीच्या तक्रारीनंतर वाय्यम वाय्यम टेकच्या पालक कंपनीत बऱ्याच जुन्या खोंडांना अचानक एच आर फंक्शन आवडायला लागलं. काहींनी प्राथमिक पाहाणीनंतर ऑफीसला पिवळ्या ऎवजी कोणता रंग बरा दिसेल यावर रंगाऱ्यांचे सल्लेही मागवायला सुरुवात केली.

Wednesday, May 27, 2015

भारांच्या निमित्ताने

Meghana Bhuskute and her team completed a  dream project about भा. रा. भागवत. I am sure whosoever can read Marathi has read Bha Ra's books @ Faster Fene, Bipin Booklwar, Jule Verne' transactions etc. This year is his 105th birth anniversary. And what a tribute my friend who herself is a good  writer and editor offered to Bha Ra.
http://aisiakshare.com/brbtr
I have just started reading but I was hooked right with the page cover itself. Congratulations Meghana!!!
I attempted something that tested my patience, pushed me to read and reread many books, was one damn difficult task. Output is पुत्र व्हावा ऐसा पढाकु here-
http://aisiakshare.com/node/4133

Sunday, May 17, 2015

बहावा


नव्हते कुणीच
झडली झाडे सारी      
भगव्या ऊन्हात खारी

पेटले दिवस
विझे रातीचे वारे      
तगमग समुद्र खारे

सोन्याच्या लगडी
खड्या सर्प तलवारी
देखणा बहावा दारी

मिटतीे फुलती
सुर्यकळ्यांचे हार
तू ऊनमग्न बहार


Sunday, March 1, 2015

चल पेरू निळासा थेंब

चल पेरू निळासा थेंब
उश्याशी बिंब
तृणपात्याचे

पाऊस लागला थोर
भुलवला मोर
नृत्यगारांचे

गुणगुण गोंदण रात
नदीचा आर्त
नाद पुराचे

मेघांना थोडे सांग
आवरा रंग
कृष्णकमळांचे

दरवेशाचे ऋण
सावळे उन
तुझ्या पाठीचे

Friday, February 27, 2015

ढगाच्या कविता

प्रवासी ढगाचे
कुणी गीत गावे
तुटे थेंब त्याला
नदी जीव लावे

ढगाचे पिसारे
रिता मोर नाचे
शब्दात भिजले
कुणी अर्थ वाचे

ढगाचे अडकणे
चालणे न् थबकणे
असण्यात नसणे न्
दिसण्यात असणे

रुजणे ढगाचे
धुक्याच्या उश्याशी     
खुणा शोधताना
उसवणे स्वतःशी     


॥ सयामी॥


प्रवासी ढगाचे
कुठे गाव आहे
पहाडात हाका
उगा येत आहे

खुळ्या चांदण्याचे
कुसुंबी उखाणे
ढगाचा अबोला
निळेशार गाणे

ढगाच्या नीजेशी
स्वप्न माझेच आहे
नदीच्या तळाशी
तुझे नाव आहे

Saturday, January 17, 2015

कलावंताचं मरण

परवाच्या पेपरमध्ये पेरुमल मुरुगन नामक कुणा तामिळ लेखकाच्या मरणाची बातमी होती. लेखक हा माणूस असल्यानं तो कधी तरी मरणारंच त्यामुळे त्या बातमीत तसं विशेष काही नव्हतं. फक्त फरक इतकाचं की त्या लेखकानं स्वतःच्या मरणाची बातमी स्वतःच जाहीर केली होती, निमित्त होतं कुठल्याशा संघटनेनं जातीची बदनामी केली म्हणून त्याच्या पुस्तकाची होळी केली आणि पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी यशस्वीरित्या पदरात पाडून घेतली. त्यामुळे विषण्ण अवस्थेत त्या लेखकानं स्वतःच्या मरणाची घोषणा केली. ही फार खिन्न करणारी बातमी आहे.

या बातमीच्या २-३ दिवस आधी फ्रांसमध्ये प्रेषिताची खिल्ली उडवणारी चित्रं काढली म्हणून अत्यंत निघृणपणे दिवसाढवळ्या व्यंगचित्रकारांचे मुडदे पाडले गेले आणि जगभर अस्वस्थतेची लाट पसरत गेली.

कलावंताचं मरण इतकं स्वस्त असतं का? एक लिहीता माणूस म्हणून मला या आणि अश्य़ा बऱ्याच घटना अस्वस्थ करताहेत. जेव्हा एखादा कलावंत एखादी कलाकृती निर्माण करतो तेव्हा त्याच्या अस्तित्वाचा एक तुकडा काढून तो त्या कलाकृतीत ओतत असतो. प्रतिभेच्या प्रत्येक निराकार हुंकाराला मुर्त रुप देताना, ज्या आत्मक्लेषातून, ज्या मांडणीसुत्रातून कलावंत जात असतो, तो कुठल्याही कायाकल्पाहून कमी नसतो. त्याचं मोल होऊ शकत नाही. तरीही त्याच्या निर्मितीवर समाज मालकीहक्क सांगतो. समाजमनाच्या विरोधात किंवा प्रचलित समजांच्या विरुद्ध कधी कुणी काही कलाकृती निर्माण केलीच तर त्यावर बंदीची भाषा बोलली जाते. प्रत्येक बंदीगणीक, जग त्या कलाकाराला थोडं थोडं मारत जातं हे एकाद्याचा थंडपणे खुन करण्यासारखंच आहे हे आपल्याला लक्षात येतय का?

व्यक्तीस्वातंत़्र्याचं आणि त्याहूनही महत्वाचं, व्यक्त होण्याच्या स्वातंत़्र्याचं, मला दोन्ही हातांनी खरं तर भरभरुन स्वागत करता यायला हवं. या आणि अश्या बऱ्याच बंद्यांच्या विरुद्ध कंठशोष करुन मलाही घोषणाबाजी करता यायला हवी. पण हे होत नाही...पण हे होत नाही म्हणूनही मला अस्वस्थ व्हायला होतय. उदारमतवादी आणि कट्टर माणसं जशी दोनच रंगाच्या चष्म्यातून जग बघतात, तसं मला बघता येत नाही.

कट्टर लोकांना वाटतं माझ्या धर्माला, देशाला, जातीला इ. इ. कुणीच नावं ठेवता कामा नये. अश्या सगळ्या एन्टीटी ह्या कोणत्याही परिक्षणापल्याडच्या आहेत, त्या ब्रम्हवाक्य आहेत आणि त्याविरुद्ध एक शब्दही उच्चारणं म्हणजे घोर पातक आणि त्याला शिक्षाही एकच- बंदी/फतवा/शिरच्छेद/खुन इ. इ. अश्या लोकांबरोबर कोणतही तार्कीक संभाषण होऊ शकत नाही कारण त्यांनी चर्चेच्या आधीच निकाल ठरवुन ठेवलेला असतो.

किंचित ते पुर्ण उदारमतवादी, ज्यात मोठ्या प्रमाणात आपण कलावंतांची, रसिकांची, समिक्षकांची गणना करु, ते या कट्टर लोकांना यथासांग नावे ठेवित राहातात, त्यात नवीन काहीच नाही. कट्टरांच्या विरुद्ध उदारमतवाद्यांची मते. त्यांना "पुर्ण स्वातंत्र्य" हवे, संभाषणाचे, व्यक्त होण्याचे, टीका करण्याचे इ.इ. सर्व श्रद्धांना, धर्मांना आणि धर्मग्रंथांना, देशाच्या कल्पनांना, जातीत रुजलेल्या प्रथा आणि कुप्रथांना, रुढी-प्रथांना त्यांना नागडं करुन तपासायचं असतं.

या दोन्ही गटांनी त्यांची समिकरणे मांडताना, हल्ली संशोधनात करतात तसं, आपलं ते गृहीतक आणि इतर जे जे, ते स्थिर समजण्याचा सोईस्कर समज करुन घेतला आहे. कट्टर लोक उदारमतवाद्यांचं अस्तित्वच संपवण्याच्या मागे असतात आणि उदारमतवादी सगळं जगंच उदारमतवादी आहे असं समजुन वागतात. बातम्यांच्या प्रचंड गर्दीत, टीपेला गेलेल्या चर्चेच्या गुऱ्हाळात, ट्वीटर, फेसबुक इ. सोशलमिडीयातून पुर्ण जगाला केवळ या दोन भागात वाटण्याचा एक प्रचंड दबाव निर्माण केला जात आहे. कनिष्ठ बुशांनी म्हटल्याप्रमाणे दोन्ही बाजुंनां असं ठामपणे वाटतं की तुम्ही माझ्या बाजुने नसाल तर तुम्ही माझ्या शत्रुच्या बाजूने आहात. हे कुठल्या तरी टोकाला जाणं दुर्दैवी आहे.

मी सलमान रश्दीचं सॅटनिक व्हर्सेस पुर्ण वाचलेलं नाही. रश्दी हा एक सामान्य कुवतीचा लेखक आहे असं समिक्षक म्हणतात ते मला बऱ्याच अंशी पटतं. केवळ पुस्तक गाजवण्यासाठी कुणी जेव्हा मुस्लीमांना पवित्र काही व्यक्तींची नावं त्या पुस्तकातल्या वेश्या-भडव्यांच्या पात्राला देतं, तेव्हा कलावंताच्या स्वातंत्र्याचा मुद्दा दुय्यम होऊन जातो. आणि तरीही रश्दींचा वध करण्याचा फतवा अजिबात समर्थनिय होत नाही, कणभरही नाही-क्षणभरही नाही.

मी शार्ली एब्दोचा वाचक नाही. असं काही प्रकाशीत होतं हे ही मला माहीत नव्हतं. पण फ्रांसमधल्या हत्याकांडानंतर जी काही शार्ली एब्दोची व्यंगचित्रं पाहाण्यात आली, ती कुठल्याही अर्थाने मला निखळ विनोदी वाटली नाहीत, त्यात एक रुडनेस होता, एक क्रुर थट्टा होती. एक कट्टरवादाला संपवण्यासाठी कट्टरवादाच्या दुसऱ्या टोकाला जायची तयारी होती. आणि तरीही शार्ली एब्दोच्या हत्याकांडाचं कसलही समर्थन होऊच शकत नाही.

मकबुल हुसेन ही भारतातल्या चित्र इतिहासातली ठसठसती जखम आहे. कुठल्याही संवेदनशील कलावंताच्या आणि रसिकाच्या मनात ही जखम कायमची भळभळती राहील. पाश्चिमात्य संस्कार नाकारुन या मातीतली अस्सल चित्र काढणाऱ्या एका मनस्वी वेड्याला आपण निर्वासित केलं, त्याला मृत्युनंतर त्याच्या देशाची मातीही मिळु दिली नाही. ज्यांच्या मनाची वीण कलाकाराच्या प्रतिभेशी रेझोनेट होते, त्यांनाच यातल्या वेदना समजु शकतात. आणि तरीही हुसेनंनी काढलेल्या सीता-हनुमान चित्राबद्दल दुर्गाबाई भागवतांनी मांडलेला विचारही तेव्हढाच महत्वाचा ठरतो. ’पंढरपुरात राहीलेल्या, हिंदु संस्कृती-समज पुर्णपणे समजुन असलेल्या हुसेनंनी सीता-हनुमानाच्या नात्याचं जे चित्रण केलं, ते पुर्णपणे विकृत, प्रसिद्धीलोलूप आणि म्हणूनच असमर्थनिय ठरतं.’

कलाकार हा एकाच वेळी पुर्णपणे स्वतःच्या कोषात आणि समाजाच्या चौकटीत असतो. त्याचे कोष त्याच्या विचारांना उन्मुक्तपणे व्यक्त करण्याचे अवकाश देतात तर समाजाच्या चौकटी त्याला काही नियमात बसवु पाहातात. जगात संपुर्ण/एबसोल्युट स्वातंत्र्य असं काही नसतं हे जसं कलावंतांनी समजुन घ्यायची गरज आहे तसंच कलावंताच्या व्यक्त होण्याच्या निकडीची समजानं कदर करण्याचीही गरज आहे. ही तडजोड नाही तर हा एक दोन घटकांचा वितळणबिंदु आहे. अस्सल प्रतिभावंत, चुष म्हणून नव्हे, सवंग प्रसिद्धीसाठी नव्हे, तर कलाकृतीची गरज म्हणून जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही तरी निर्मिती करतो तेव्हा ती सगळ्या विरोधांना पुरुन उरते. जगभरातले रसिक अश्या कलाकृतीच्या आणि कलावंताच्या मागे कधीनंकधीतरी ठाम पणे ऊभे राहातात हा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि म्हणूनच भविष्यही आहे. चर्चच्या इतिहासात चित्रकारांची, लेखकांची, कवींची गळचेपी झाली म्हणून त्यांनी चर्चमान्य चित्रातून गुप्त संदेश चितारले, शब्दांच्या मुखवट्याआडून स्वतःला जे सांगायचे तेच लिहीले आणि आज त्यांचे नव्याने परिक्षण होत आहे. जगभरात जेव्हा इंटरेनेट क्रांतीमुळे देशांच्या सीमा अर्थहीन होताहेत, तेव्हा या स्वातंत्र्याचा जसा गैरफायदा कट्टरपंथीय घेताहेत तसाच प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्या कलावंतानाही होईल/ होतो आहे. कुठल्याही सर्वमान्य सीमेत स्वतःला बांधून न घेता, त्यांना स्वतःला व्यक्त करता येईल. प्रश्न आहे तो त्यांच्या इंटेटचा.

 

ताजा कलम: इसिस संघटनेनं नुक्तीच कुठेतरी ७०,००० पुस्तकं जाळून टाकली असं ट्वीटरवर वाचण्यात आलं. खिलजीनं नालंदा विद्यापिठातली असंख्य पुस्तकं जाळून टाकली होती त्याचीच पुनरावृत्ती त्याच्या वंशजांनी केली...