Tuesday, October 6, 2015

॥प्रश्नचिन्हाखालचं चहाटळ टिंब॥

रेषेवरची अक्षरेसाठी, २०११मधे लिहीलेला हा लेख (http://reshakshare.blogspot.in/2011/10/blog-post_4998.html), इथे परत डकवत आहे-

विक्रमानं डोळ्यांवर आलेल्या बटा ’फूऊऊ’ करून मागे सारल्या, धपापत्या उरांच्या नायिकांसारखा श्वास उगाच घेतला न्‌ सोडला आणि जंगलात सरळ रेषेत चालायला लागला. सरळ रेषा म्हणजे द्विमितीय भूमितीत दोन बिंदूंमधलं लघुत्तम अंतर. काळेकाकू कोर्टाचे कागद कात्रीने कराकरा कापतात, तसं विक्रमाने ते अंतर तडफेने कापलं आणि झाडावरचा वेताळ खांद्यावर लादून तो तडक वापस निघाला. रस्त्यात वेळ जाण्यासाठी वेताळ विक्रमाला ’गोष्ट सांगतो’ म्हणाला. बोलणार्‍याचं तोंड कोण धरणार? अट फक्त एकच होती की, विक्रमानं मौनव्रत पाळायचं. विक्रमानं तंबाखूची गोळी दाढेखाली सरकवली आणि तो प्रसन्नपणे हसला. मौनव्रत त्याच्या सरावाचं होतं, शेवटी तो एक राजाच होता.
 

॥गोष्ट १॥

"फार फार विचित्र गोष्ट आहे. अड्डम नावाचा एक माणूस इव्ह अश्या विचित्र नावाच्या बाईसोबत राहात असे. इव्हचं खरं नाव संध्या असू शकतं, शांतारामबापूंची नव्हे, त्याहून जीर्ण. पण गोष्टीत इंग्रजी नावं. इंग्रजी कातडी लोकांनां आवडते, म्हणून संध्याचं गोष्टीतलं नाव इव्ह. अड्डम आणि इव्ह ईडन गार्डन, मु.पो. मलबार हिल’ किंवा ’कोरेगाव पार्क’ किंवा तत्सम उच्चभ्रू सोसायटीत राहात असत. जसं उच्चभ्रू सोसायट्यात असतं असं लोक म्हणतात, तसं भयंकर वातावरण ईडन गार्डनमधे होतं. लोक दिसायचेच नाहीत. उच्चभ्रू सोसायट्यांत असतं असं लोक म्हणतात, तसं अड्डम-इव्हचं बिन-लग्नाचं नुस्तंच एकत्र राहाणं होई. पण सगळं नॉर्मल असूनही त्यांनी तसं काहीच केलं नव्हतं. म्हणजे सगळं प्लॅटोनिक वगैरेच. उच्चभ्रू सोसायट्यांत असतो, असं लोक म्हणतात, तसा त्यांना कपड्याचा कंटाळा मुळातच असल्यानं अड्डम-इव्ह कधीच कपडे घालत नसत. त्यांना ती सवय कधी होती हे म्हणणंच मुळी चुकीचं ठरेल. किंबहुना कपडे का घालावेत हेही त्यांना माहीत नव्हतं. उच्चभ्रू सोसायट्यांत असतं, असं लोक म्हणतातं, तसं अड्डम-इव्हचं जीवन एकूण सुखात चाललं होतं.

एक दिवस कुठूनसा रंगीबेरंगी, हा‌ऽऽ थोर मोठा सर्प अड्डम-इव्हच्या घरात शिरला. नग्नावस्थेत दोघांनी सोसायटीच्या बागेत धूम ठोकली. काय करावे ते कळेना. सर्प नेम धरून मागे येतच होता. इव्हला तेव्हढ्यात बागेतलं लकाकदार सफरचंदाचं झाड दिसलं. तिला वाटलं सेब खावं. सेब खाव-डॉक्टर भगाव’ हे सत्य असेल, तर सर्प डॉक्टरपेक्षा कधीही कमीच डेंजर. यहॉं के पान, फुल तथा फल तोडने पे सखत कारवाई की जायेगी ही अड्डमनं जमवून वाचलेली पाटी इव्हनं उडवून लावली आणि सेब मागितलं. एव्हाना रंगीबेरंगी हाऽऽ थोर मोठा सर्प अड्डमच्या पायांवरून रांगत कंबरेला वेढा घालण्याच्या तयारीत होता. अड्डमनं उडी मारून सेब चोरलं आणि त्यानं आणि इव्हनं रसरशीत सेबचा मोठा लचका तोडला.

पुढे अड्डम आणि इव्हची सेब खाण्यावरून सखोल चौकशी झाली आणि त्यांना ईडन गार्डनबाहेर काढून टाकण्यात आलं.

तर विक्रमा, मला असं सांग की, त्या सेबमधे असं काय होतं, ज्यामुळे अड्डम-इव्हला ईडन गार्डन सोडावं लागलं? या प्रश्नाचं उत्तर तुला माहीत असूनही तू दिलं नाहीस, तर तुझ्या मस्तकाची हजारो शकलं होऊन पडतील."

विक्रमानं घसा साफ केला आणि तो उत्तरला, "तर मग ऐक वेताळा. सर्वात मोठी भूक पोटाची. अड्डम आणि इव्हनं सेब खाल्लं आणि त्यांची पोटाची भूक शमली. नंतर प्रज्ज्वलित होते ती पोटाखालची भूक. बागेत नागव्यानं कसं उभं राहायचं, म्हणून अड्डम आणि इव्हनं काही अंजिराची पानं अंगाभोवती गुंडाळली. अंजिराचीच का, तर ती आकारानं मोठी असतात आणि तुरट चवीमुळे बकरीही त्यांना तोंड लावत नाही. मराठीत इश्काची इंगळी डसते, तसा इंग्रजीत साप डसत असावा. सापावरुन द्व्यर्थ नको, पण सिनेमातली ओलेती हिरोईन बघून पब्लिक चेकाळतं, सेम तस्संच पानातल्या कत्थी इव्हबाई आणि सापवाल्या अड्डमचं झालं. इव्हला सेबचं ओझं पेलवेना. अड्डमचा सर्प बेकाबू झाला. माणसाच्या लैंगिक इतिहासाची ही अशी चोरटी सुरुवात व्हावी हे काही ईडन सोसायटीवाल्यांना पसंत पडलं नाही, म्हणून त्यांना सोसायटीतून बेदखल करण्यात आलं."

॥गोष्ट २॥

"फार फार वर्षांपूर्वींची ही गोष्ट. देवांचा राजा इंद्र होता. वेळी-अवेळी पाऊस पाडणं, बॉल-बेरिंग बसवल्यागत कुणाच्या तरी तपश्चर्येने सिंहासन थरथरताच रम-रमा-रमी यांच्या वापराने समोरच्याला शीलभ्रष्ट करणं, तपोभंग करणं, ’अप्सरा आली’वर (सोनाली कुलकर्णी द्वितीय हिचा) नाच बघणं असा बहुसंख्य राजांसारखाच त्याचा कार्यक्रम असे.

इंद्राचा अजून एक शौक निळूभाऊंच्या सिनेमातल्या सरपंचासारखा होता. दिसली तरणी-ताठी बाई की नासव तिला. इंद्र डिट्टो निळूभाऊंसारखा खर्जातून बोलत असणार, "रंग्या, रातच्याला वाड्यावर घेऊन ये रं तिला."

तर असा हा इंद्र एकदा अहिल्येच्या प्रेमात पडला. अहिल्या म्हणजे ब्रह्माने निर्माण केलेली सर्वात सुंदर बाई. तिनं आपल्यापेक्षा वयानं कितीतरी मोठ्या असलेल्या गौतम ऋषींशी संसार थाटलेला. काहीही करून अहिल्येचा भोग घ्यायचाच असं ठरवून इंद्रानं गौतम ऋषींचं रूप घेतलं आणि अहिल्येचा भोग घेतला. आपलं काम उरकून इंद्र परत निघाला आणि नदीवरून खरेखुरे गौतम ऋषी आश्रमात परत आले. काय झालं हे क्षणार्धात ओळखून गौतम ऋषींनी अहिल्येला शिळा होऊन पडून राहण्याची शिक्षा दिली. इंद्र राजा असल्यानं त्याला वेगळा दगड करण्याची गरज नव्हती. मात्र ऋषींच्या शापानं इंद्राला अंगभर डोळे फुटले. सर्वसामान्यांसाठी डोळे येणे हा एक रोग असतो. सर्वसामान्यांसाठी डोळे फुटणे हा त्रयस्थ बाईला मुद्दामहून धक्का मारल्यास मिळणारा शाब्दिक मार असतो. पण इंद्रासाठी मात्र ते लाजिरवाणं शारीरिक सत्य बनलं.


तर विक्रमा, मला असं सांग की, इंद्रानं केलेल्या फसवणुकीचा शाप ऋषींनी अहिल्येला का दिला? आणि इंद्राला अंगभर डोळे फुटावेत या शापामधे कसलं गूढ होतं? या प्रश्नाचं उत्तर तुला माहीत असूनही तू दिलं नाहीस, तर तुझ्या मस्तकाची हजारो शकलं होऊन पडतील."

विक्रमानं घसा साफ केला आणि तो उत्तरला, "तर मग ऐक वेताळा. अहिल्या ही ब्रह्मनिर्मित सर्वात सुंदर स्त्री असली, तरी तिचं दैव बघ. तिच्या नावातच अ-हल्य आहे. म्हणजे लैंगिक अर्थानं नांगरणी न झालेली- कुमारिका. तिनं वयानं मोठ्या असलेल्या गौतम ऋषींशी लग्न केलं हाही त्या सिंम्बॉलिझमचाच एक भाग. अहिल्या पुण्यशील स्त्री असल्यानं तिनं भोगातुर इंद्राला कधीच ओळखलं होतं. पण ’मकबूल’मधला पंकज कपूर म्हणतो तसं "भूक का क्या? कभी भी लगती है". ती शरीराला शरण गेली म्हणून ऋषींनी तिला शाप दिला - शिळा बनण्याचा. कसलेही विकार नसलेली शिळा.

इंद्राचं वेगळं होतं. इंद्र राजा होता, एक पुरुष होता. यथा राजा तथा प्रजा. कंबरेखाली पुरुष किती दुबळा, स्खलनशील असतो हे ऋषींनी नीटच ओळखलं होतं. पुरुष स्त्रीदेहाचा केवळ दृष्टिक्षेपातूनही कसा उपभोग घेतो याचा सिंबॉलिझम म्हणून अंगभर डोळे फुटण्याची शिक्षा इंद्राला मिळाली."

मौनव्रत तुटूनही वेताळ खांद्यावरून हालत नाही म्हटल्यावर विक्रमाला आश्चर्य वाटलं. त्यानं तसं वेताळाला बोलून दाखवल्यावर वेताळ गालातच हसला आणि म्हणाला, "विक्रमा, एकदा नीट बघ, तुझ्या खांद्यावर दुसरं-तिसरं कुणी नसून तूच आहेस. विक्रमा, एकदा नीट बघ, माझं ओझं वाहणारा दुसरा-तिसरा कुणी नसून मीच आहे. प्रश्नचिन्हाची वेलबुट्टी रेखणारा मी आहे, तर त्याखाली शंकातुर टिंब टेकवणाराही तूच आहेस."
 

No comments: