Wednesday, May 28, 2008

मोरल ऑफ द स्टोरी?

मॅन्चेस्टरच्या एका शांत कोपरयात त्याहूनही शांत असं ते छोटंस रेस्तॉंरॉ होतं. वेगात बुडणारया ब्रिटीश परंपरेच्या शेवटच्या अवशेषांपैकी एक. रेस्तॉंरॉचं नाव टी-क्लब असलं तरी चार रिकामटेकडी म्हातारी सोडली तर तिथे क्वचितच कुणी दिसायचं. अर्थात कुणी यावं असं तिथं काही नव्हतंच. सजावटीच्या नावाखाली कधी काळी तेलपाणी झालेलं जुनाट लाकडी छत, त्यावर कोरलेली रेशीम काढण्याच्या मॅन्चेस्टरच्या जुन्या प्रथेची आताच अर्वाचिन भासणारी चित्रं, पायाखाली करकरणारं लाकडी फ्लोरिंग आणि टेबलावर छोट्या चौकानाचौकानांचं डिजाईन असणारं टेबलक्लॉथ या पलीकडे तिथे आणखी काही ही नव्हतं. पेप्सी, कोक, कॉफी, बर्गरवर वाढणारया नव्या पिढीला तिथे मिळणारया कुकीज आणि चहात कणभरही स्वारस्य नव्हतं. किंचित बहीरा, बराचसा विक्षिप्त आणि अस्सल शिष्ट इंग्रज म्हातारा तो टी-क्लब चालवायचा. दिवसभरात मोजून १५-२० लोक तिथे यायचे तरी म्हातारयाचं बरं चालायचं. आलेल्या लोकांना न हसता अभिवादन करण्याचा त्याचा रोजचा शिरस्ता मोडायचा तो फक्त महीन्याच्या शेवटच्या रविवारी जेव्हा त्या चार व्यक्ती एकत्र यायच्या तेव्हाच. त्याला कारणही तसंच होतं. ती चारही टाळकी अस्सल ब्रिटीश वागणुकीची होती. त्यांचे रविवारचे कपडे, आल्या आल्या हॅट काढून ठेवण्याची खानदानी रीत, चिरुटांच्या धुराड्यातून तासंतास त्यांचं ते पेशन्स खेळणं आणि जाताना घसघशीत टीप..सारंच कसं खानदानी होतं. म्हातारा त्यांना कुणाचा त्रास नको म्हणून कोपरयातला एक टेबल खास त्यांच्यासाठी राखून ठेवायचा. म्हणजे रिकाम्या रेस्तॉंरॉमधे एकाच टेबलावर "रिजर्व्ड" अशी पाटी ठेवून द्यायचा!

त्या रविवारी, कोण जाणे कसा, पण म्हातारा कोपरयाताला तो टेबल रिजर्व्ह करायचा विसरला आणि नेमका त्याच टेबलवर एक पोरगेलासा तरुण येऊन बसला. आल्या आल्या त्या पोराने कुकीजचा आख्खा डबाच उचलला आणि कीप द चेंजच्या उर्मट स्वरात म्हातारयाच्या कपाळावरच्या आठ्या विरुन गेल्या. पण जवळजवळ एकाच वेळी त्या रेस्तॉंरॉमधे आलेल्या त्या चौघांच्या डोक्यात तो पोरगा एकदमच गेला. कुणी काही म्हणायच्या आतच तो पोरगा जागेवरुन उठून त्यांच्या जवळ आला. "हाय" बाटग्या अमेरिकन इंग्रजीत त्याने त्याचं नाव सांगीतलं 'माझं नाव डेव्हीड. बॉसने पाठवलय मला"

चौघांचाही त्यावर विश्वास बसणं शक्य नव्हतं. आत्ता पर्यंत बॉसनं त्या चौघांव्यतिरीक्त कुणालाच काम सांगीतलं नव्हतं. पण त्याच वेळी बॉसच्या शब्दावर अविश्वास दाखवण्याचं धाडसही त्यांच्यात नव्हतं.

रुडी, विल्यम, डेव्ह आणि चॅंग, सगळ्यांनी डेव्हीडला अपादमस्तक न्याहाळलं. जेमतेम तिशीत असणारा अट्टल अमेरिकन दिसत होता तो. बॉसनं त्यात काय पाहीलं हे त्या चौघांना अजूनही उमगत नव्हतं.

"आम्ही इथे जमून काय करतो याची काही कल्पना?" रुडीनं सावधपणे विचारलं. "तुम्ही इथे जमून बहूदा नेहमीच चहा घेता. पण मी कॉफी घेईन" डेव्हीडनं गंभीरपणे उत्तर दिलं पण त्याला ते बेअरिंग फार वेळ घेता आलं नाही आणि तो हसत सुटला. चॅंगनं त्याचे मिचमिचे डोळे अजूनच बारीक करुन त्याच्या कडे रोखून पाहीलं. "कालच टरबुजासारखं फटकन एकाचं डोकं फुटताना बघितलय मी. तुझ्याच वयाचा होता आणि अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत अस्साच हसत होता, तुझ्यासारखा" भावनाहीन आवाजात चॅंग डेव्हीडला डोळ्यांनी तोलत बोलला. "चॅंगकाका, तुमचा चुकून धक्का लागला असेल नां त्याला?" डेव्हीडच्या आवाजात अजूनही मिश्कीलपणा होता. "ओके, ओके" विल्यमनं समजुतीच्या स्वरात तडजोड केली "डेव्हीड, जरा स्पष्ट बोलुया का आपण?" "अर्थात, विल्यम. नक्की काय सुरु आहे हेच मला समजुन घ्यायचं आहे. आपण चहा घेत बोललो तर चालेल नां?" डेव्हीडचा स्वर आता अगदी सहज येत होता. कुणी हो/नाही म्हणायच्या आधी डेव्हीड चहा आणायला गेला सुद्धा, खास अमेरिकन घाणेरडी पद्धत, सेल्फ-सर्व्हिस!

हवेतला गारठा वाढला होता. बाहेर कदाचित बर्फ भुरकत होता. चहा आणता आणत डेव्हीडनं रेस्तॉंरॉचं दार लोटलं तेव्हढ्यानं सुद्धा वातावरणात उब आली.

"येस विल्यम" डेव्हीड खुर्ची ओढत म्हणाला "मी एक व्यावसाईक-शुटर आहे. अचानक मला एक दिवस फोन येतो, समोरचा माणूस त्याची ओळख, फक्त बॉस, एव्ह्ढीच देतो आणि मी आत्तापर्यंत ऎकले नसतील एव्हढे पैसे मला देऊ करतो. बदल्यात काय करायचं? मला माहीत नाही. बॉस कोण? मला माहीत नाही. पैसे घेऊन काम करत असलो तरी मी खुनी नाही. एक असा माणूस ज्याला इच्छा असूनही समोरच्याला मारता येत नाही, भितीमुळे म्हण किंवा अजून काही अडचणीमुळे, त्याला मी फक्त मदत करतो. माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ त्यात नसतो. अश्या सगळ्या परिस्थितीत हा न दिसणारा बॉस मला फोन करुन या भिकारचोट जागी तुम्हाला भेटायला पाठवतो. मी यातून काय समजायचं?"

"मी डेव्ह" डेव्हनं सुरुवात केली "तू समजतोस तसे आम्ही खुनी नाहीत. किंवा तुझ्यासारखं कुठल्या अडचणीतल्या माणसाला मदत म्हणून सुद्धा आम्ही कुणाचा खुन करत नाही. आम्ही एक एस.पी.जी. आहोत; स्पेशल पर्पज ग्रुप. तुला कदाचित माहीत नसेल पण हल्ली या भागात दहशतवाद्यांचा भयंकर सुळसुळाट झालाय. कायद्याच्या चौकटीत ही कीड आपण साफ करु शकत नाही म्हणून रॉयल ब्रिटीश इन्व्हेस्टीगेशन एजन्सीनं हे काम आमच्यावर सोपवलय. त्यांचाच एक माणूस, बॉस, ज्याला आम्ही पण पाहीलं नाही, आमच्याशी बोलतो आणि त्याच्या सांगण्यावरुन आम्ही आमची कामं करतो. आम्ही सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलो आहोत आणि आमची वयं आणि कार्यक्षेत्रं अशी आहेत की आमच्यावर कुणी संशय घेणार नाही. केवळ देशासाठी म्हणून आम्ही एकत्र येऊन हे काम करतोय"

"ओहो, सगळी देशभक्तांचीच टोळी म्हणायची ही!" डेव्हीड नाक खाजवत बोलला "इथे येण्याआधी तुमच्या कुंडल्या मी वाचल्या आहेत. चॅंगचं आयुष्य चिनी वस्तीत मारामारी करण्यात गेलय. रुडी बेकायदेशीर हत्यारं विकण्यासाठी अनेक वेळा जेलमधे गेलाय. विल्यमनं पावडरी विकणे ते भडवेगिरी असे सगळे उद्योग करुन पाहीलेत आणि तू, डेव्ह, तुझ्या बद्दल मला फार माहीती नाही पण ज्या अर्थी तू यांच्या सोबत आहेस, तू काही फार वेगळं करत असशील असं मला वाटत नाही. पण आता तुमच्यांच सारखं मलाही देशासाठी काही करावं वाटतय, विशेषतः इतके पैसे मिळत असतिल तर नक्कीच."

"ओके" रुडीनं हात वर करत पांढरा बावटा फडकवला "मान्य, आम्ही काही हिरो नाहीत पण आम्हाला असं वाटतं की ही कामं करुन आम्ही देशाची मदत करतो आहोत."

"हो नां" चॅंगचे डोळे बोलताना चमकत होते "नाही तर कुणाला नुस्त्या हातांनी मारताना मजा थोडीच येते?"

"हिंसेचं तत्वज्ञान करताय तुम्ही लोक!" डेव्हीडनं बेफिकीरपणे खांदे उडवले "पण हल्ली तुमचे नेम चुकताहेत. तुमचे प्लॅन फसताहेत. देशाच्या शत्रुचा गळा आवळताना तुमचे हात थरथर कापताहेत. तुमच्या चालण्यातुन, वागण्या-बोलण्यातुन तुमचं वय दिसतय. आणि म्हणूनच मला बॉसनं आज इथे पाठवलय, त्याचा निरोप घेऊन."

डेव्हीड ताडकन त्याच्या खुर्चीवरुन उठला. रुडी आणि गॅन्गच्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह वाचत तो मजेनं म्हणाला "तुमच्या चहात एक जहाल विष टाकलय मी. खरं नाही वाटणार पण हळुह्ळु तुमची मज्जासंस्था निकामी होईल. चॅंग, उठायचा प्रयत्न करायच्या आधी तुझ्या हाताची बोटं बघं लख्खं निळी पडलीत ती. माझा गळा आवळण्याइतपत शक्ती नाही उरली तुझ्यात आता"

चॅंग तरीही धडपडत उठला पण तोल जाऊन टेबलावरच पडला. काही तरी गडबड सुरु आहे हे लक्षात येऊन रेस्तॉंरॉंचा म्हातारा जमेल तेव्ह्ढ्या लगबगीनं त्यांच्या टेबलकडे येत होता. डेव्हीडनं अचानकच म्हातारयाच्या खांद्यावर हात दाबला आणि रिकाम्या खुर्चीत त्याला कोंबला. "बॉस" त्याच्या कानाशी लागून डेव्हीड आदबीनं मवाळ आवाजात म्हणाला "तुम्ही सांगीतल्यासारखी ही म्हातारी बिनकामी खोंडं आपण निवृत्त करतो आहोत." रुडी, विल्यम, डेव्ह आणि चॅंगच्या डोळ्यात बॉसला भेटल्याचं कुतुहल होतं की मरणाचे गंध, सांगणं कठीण होतं. म्हातारयाचा चेहरा कोरडा होता. "ओके. पण हे काम इथेच करणं आवश्यक होतं का? उद्या नवी माणसं नेमायची झाली तर हीच जागा वापरायची आहे आपल्याला. माझा बॉस पोलीसांच्या कटकटीपासून वाचवेल आपल्याला पण ही घाण आता साफ कोण करेल?" म्हातारा तोलून मापून बोलत होता.

"बॉस" डेव्हीड अजूनही म्हातारयाच्या मागे उभा राहून मान खाली घालून बोलत होता "आपण हे काम थांबवतोय. रॉयल ब्रिटीश इन्व्हेस्टीगेशन एजन्सीनं तसं सांगीतलय मला. मानवी हक्कवाली मंडळी आपल्या मागे हात धुवून लागली आहेत"

"असं कसं थांबवु शकतात ते? कायद्याच्या चौकटीत राहून हा देश साफ कसा करणार आपण? मला बॉसशी बोललच पाहीजे" म्हातारा तावातावाने उठतच होता की "मग बोला नां" डेव्हीडचा अस्सल ब्रिटीश स्वर घुमला. म्हातारया समोर खुर्ची ओढत डेव्हीडनं शांत पणे छोटं पिस्तुल काढलं. "तुला मी किती वेळा सांगीतल होत की ही जोखमीची काम, भरवश्याच्या माणसांना दे. पण तू तुझ्या भुक्कड रेस्तॉंरॉंमधे येणारया त्याहूनही भुक्कड माणसांकडे ही काम दिलीस." बोलता बोलता डेव्हीडनं हलकेच रुडीच्या गालावर चापट मारली "आणि सगळं मिशन बर्बाद केलसं. म्हणून आम्ही हे मिशन आणि त्यावर काम करणारी मंडळी ऍबॉर्ट करत आहोत"

डेव्हीडनं म्हातारयाच्या कानशीलावर पिस्तुल लावलं आणि 'फट' असा छोटा आवाज झाला. जाता जाता त्यानं थोडीशी धुगधुगी असणारया डेव्हकडे बघून मजेत डोळा मारला "म्हटलं होतं नां, मलाही देशासाठी काही तरी करावं वाटतं म्हणून!"

सरकार अदृष्य तरीही सर्वत्र
सरकार शासक आणि अट्टल गुंड
सरकार अपंरपार शांतता आणि अदभुत हिंसा
सरकार साकार आणि निराकार
सरकार माणसाहूनही माणूस आणि डोळ्यात दाटलेला गच्च परमेश्वर

Sunday, May 18, 2008

कन्फेशन्स आणि इतर तुच्छ गोष्टी

कन्फेशन्स म्हणजे मनाचे तळ परक्याच्या निक्क्या बोटाने ढवळायचे आणि पापफुटीच्या भयाला किंचितभरही थारा न देता मोकळं व्हायचं अशी राजस परंपरा. गदगदलेल्या झाडांचे संभार तर अफाट पण निरर्थक रानफुलांना माळणार कोण हा कळीचा प्रश्न. लाकडी जाळीआडच्या पाद्रयाचं काळीजही वातड झालेलं असतं पाप-पुण्याचे रोजचे हिशोब ऎकून.

कन्फेशन्स...आवडतात, म्हणून ती द्यावीतच असं नाही. मात्र फुलांच्या ताटव्याआड फुटून फुटून कन्फेशन्स देताना अल पचिनोचा मायकेल कोरलेओन पाहील्यानंतर तळाशी दाबून ठेवलेला दगड स्प्रिंग सारखा उफाळून आला. हिवाळा होता का तेव्हा?

हिवाळाच असावा बहूदा. नुक्तंच प्रसिद्ध झालेलं तिसरं पुस्तकही सलगपणे गाजत होतं. आणि चौथ्याच्या तयारीसाठी माझ्या प्रशस्त बंगल्यात मी एकटाच राहात होतो. लिखाणासाठी ही जागा पर्फेक्ट होती. कॉलनी नवी होती त्यामुळे फारश्या ओळखी आणि पर्यायाने फारशी येणावळ नव्हती. माझा बंगला कॉलनीच्या शेवटाला होता त्यामुळे येणारया जाणारया गाड्यांचे, माणसांचे फारसे ताप नव्हते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बंगल्याच्या मागच्या बाजूला एक छोटं तळं होतं. लिहायला बसलं की खिडकीतून ते तळं, त्यात पडलेलं चांदणं स्पष्ट दिसत राहायचं. दिवसा त्या तळ्याकाठी बरीच प्रेमळ जोडपी हातात हात घालून हिंडत असायची आणि संध्याकाळी म्हातारीकोतारी येऊन बसायाची तिथे. पण माझी लिखाणाची सुरुवातच मुळी कधी तरी मध्यरात्री व्हायची ती पहाटपर्यंत त्यामुळे लिखाणाला हवी असलेली निरंजन शांतता मला तिथे पुरेपुर लाभायची.

असंच एका रात्री लिखाणाचा ज्वर ऎन भरात असतानाच तळ्याकाठून एका वेडसर हसण्याचा भयाण आवाज आला. डोळे ताणले तरी कुणी दिसत नव्हतं. माझा तर मुडच गेला. मी सगळं आवरुन झोपी गेलो. पण मग तो रोजचाच शिरस्ता झाला. माझ्या लिखाणाला दृष्ट लागल्यासारखं ते बंद होऊन गेलं. त्या वेडसर आवाजाच्या शोधात मी कित्येक दिवस गाव पालथं घातला पण व्यर्थ.

लिखाण तर बंदच झालेलं होतं त्यामुळे वाट फुटेल तशी एका रात्री मी गाडी हाकत होतो. अचानक थोड्या अंतरावर मला तो दिसला. त्याला कधीच पाहीलं नव्हतं तरी मी त्याच्या विक्षिप्त हसण्याला चांगलाच ओळखुन होतो. कपडे असून नसल्यासारखे, जागोजागी जखमा, त्यावर बसलेली धुळ, भिस्स वाढलेले केस आणि तोंडावर तेच ते अस्वस्थ करणारं विकट हसु. क्षणभरच दाटलेल्या कणवेवर विकृत तिरस्काराने लगेच मात केली. डोक्यात अडकलेल्या अर्थांचे घण झाले आणि गाडीच्या ऍक्सलरेटरवर धाडकन आपटले.

सगळ्या शहाण्यांनी एकत्र येऊन तो अपघात ठरवला आणि मला अन त्या वेड्यालाही मुक्ती मिळाली. पण माझे डोळे आता गोठलेत. असं वाटतं की पेन मधून शाई ऎवजी रक्त वाहातय आणि कागदावर चुकून उमटणारे शब्द फेर धरुन नाचत हसताहेत.

ज्या तळ्याच्या काठी बसून मी आज तुम्हाला हे कन्फेशन देतोय, त्याच तळ्यात काही काळा पुर्वी मी माझं सगळंच लिखाण बुडवून मारलय. लौकीक अर्थानं ही शिक्षा नसली तरी माझ्या मनाला तेव्हढंच अपरं समाधान...

Wednesday, May 14, 2008

कुळकथा

रुट्स नावाचं पुस्तक वाचून म्हणे अमेरिकेत आपलं कौटुंबिक मुळ शोधण्याचं फॅड आलं होतं. तसं आपल्याकडे कुलवृत्तांत, गोत्र वगैरे गोष्टी आहेत पण खानदान की खोज म्हणजे जरा अतीच झालं म्हणावं लागेल. मुळातच राजु मुर्डेश्वरकर, हणमाप्पा कवाडे किंवा बाळासाहेब शिंदे इतपत चिल्लर नावं असणारयांनी वंशवृद्धीला खानदान म्हणावं म्हणजे स्नेहा उलालला ऎश्वर्या राय म्हणल्यागतच झालं. विजयविक्रम चोप्रा, संपुर्णप्रताप सिंग असं भरगच्च नाव असणारयांनी खानदान शब्द वापरावा. त्यांच्याकडे म्हणजे कसं, पोरगी पळून गेली की खानदान की इज्जत वगैरे जाते. आपण लग्नाचा खर्च वाचला म्हणत हुश्श करणारे बिच्चारे लोक. तर बाय डीफॉल्ट मी बिच्च्यारा कॅटॅगिरीत असतानाच मी गंडलो.

झालं असं की एका दिवाळीत आख्या कुटूंबानं एकत्र यावं असं कुठल्यातरी काकाच्या डोक्यात आलं आणि आम्ही सगळे नांदेडला गेलो. बरीचशी काकामंडळी य वर्षांनी भेटली. काही चुलत भावंडांचे चेहरे फिक्कट ओळखीचे वाटत होते पण मुद्दलात आनंद होता. एक बरया पैकी मोठा दिसणारा बाप्या शिंग मोडून आमच्यात खेळत होता, आमच्या बरोबर जेवत होता आणि नंतर आमच्याच घरी झोपलाही. दुसरयाच दिवशी खेळता खेळता भांडणं झाली तर गिर्या त्याला स्टंप घेऊन मारायला निघाला. गिर्या म्हणजे चुलत भाऊ, एकदम तडकु. आपण गिर्याच्या बाजुनं; एक तर तो आपला भाऊ आणि त्याहुन महत्वाचं म्हणजे तो गुरुद्वारात नेऊन हातातलं कडं पण घेऊन देणार होता. म्हटलं बाप्या, तू कोणं? आमच्या घरी जेवतो काय, झोपतो काय आणि आमच्याशीच मारामारी? बाप्यानं टण्कन हाणलं. च्यायला, तोपण एक चुलत भाऊच निघाला. अज्ञानात आनंद असतो याच्यावरचा विश्वासच उडाला आपला. मुळांचे शोध घ्यायलाच हवेत, जबरी प्रकर्षानं वाटलं.

गंमत वर्षं संपली. एका उन्हाळ्यात दादांनी गाव दाखवण्याचं मनावर घेतलं. देगलुर, नांदेड जिल्ह्यातलं एक छोटं गाव. दादांचं शिक्षण, नौकरीची सुरुवात तिथलीच. नंतर कुरुंदकरकाकांनी त्यांना तिथून हलवलं. तर ते असं त्यांचं गावं. ते गाव बघून मला अजीबात उमाळा वगैरे आला नाही. मराठवाड्यात ठासून भरलेला कोरडेपणा, धूळ सारं काही त्या गावात खचाखच भरलं होतं. त्या गावातला एकमेव दोस्ताना म्हणजे मोठे दादा. मोठे दादा म्हणजे माझे सर्वात मोठे काका. पण ते काका कमी आणि दोस्त जास्त होते. त्यांच्या बद्दल नंतर कधी तरी स्वतंत्र लिहीनच पण एकदम बाप माणूस. टोकाचं वाचन, शीघ्र कविता, बेफाम भयाण विनोद आणि आमच्याशी याराना ही त्यांची जमेची बाजु. उरलेली बाजु लंगडी होती कारण त्यांचा एक पाय मधुमेहामुळे अम्प्युटेट केला होता. तर त्यांच्या सोबत मु.पो. देगलुर केलं. वाडा तसा बराच ढासळलेला होता. अरबटचरबट वय असल्यानं ते तेव्हा प्रातिनिधिक इ. इ. वाटलं असणार. वाड्याची मागची बाजु पारच कलंडुन गेली होती. "आपलीच पाचवी पिढी" चुलत भाऊ कानात कुजबुजला. "काय?" मठ्ठ मी. "अरे पा च वी पिढी" तो वैतागुन म्हणाला. तर या पाचव्या पिढीचं एक वेगळच नवल होतं जे मला नंतर कळालं. आम्ही मुळचे पत्की. जे फ्सकी जमा करतात ते पत्की असा काहीसा त्या नावा मागचा छोटा इतिहास. फ्सकी म्हणजे कसला तरी कर असणार जुन्या काळी. कारण आम्ही गळेगाव या आमच्या मुळ गावचे मालक (कपाळ्ळ!) आणि तो फ्सकी कर आम्हाला मिळत असणार. आता ही नवलकथा वाटत असेल तर पत्क्यांची म्हणजे पर्यायाने आमची (ऎकीव) कथा तर दंतकथा प्रकारातच मोडेल. तर पत्क्यांच्या या वाड्यात म्हणे गुप्तधन पुरलं होतं. आमच्या कुण्या पुर्वजाने गुप्तधनाच्या आशेने आख्खा वाडा खणून काढला. हंडा तर सापडला पण त्यावरचा नागोबाही सापडला. पत्क्यांनी तो नागोबा मारला. तो नागोबा अर्थातच त्या वाड्याचा वास्तुपुरुष. नागोबाने मरता मरता शाप दिला की पत्क्यांचा निर्वंश होईल. पत्क्यांनी विनवण्या केल्या तेव्हा उःशाप मिळाला की पत्की घराण्यात एक संन्यस्त ब्रम्हचारी निघेल आणि अर्थात ती एक शाखा खंडीत होईल पण बाकीच्या शाखा तो संन्यासी शापमुक्त करेल. हैद्राबादच्या पत्क्यांच्या शाखेत आमचे चुलत पणजोबा (किंवा खापरपणजोबा)जन्माला आले ते म्हणजे श्रीधरस्वामी. ते समर्थांचे कट्टरभक्त. सज्जनगड आणि कर्नाटकात वरदपुरला त्यांचं बरंच कार्य आहे. श्रीधरस्वामींनी देगलुरला येऊन वास्तु-शांत केली. त्यांच्या सांगण्यावरुन आमच्या पुर्वजांनी पत्की आडनाव टाकलं आणि पाटील आडनाव घेतलं. वतनदारी नाकारण्याच्या भुमिकेतुन दादांनी गळेगावकर आडनाव लावलं. तर या खजिन्याच्या बेटाचं एक उपटोक म्हणजे तो खजिना पाचव्या पिढीला मिळणार होता. आणि माझ्या चुलतभावाची आधीच्या पिढ्यांसारखीच दाट खात्री होती की आमचीच पिढी पाचवी पिढी असणार होती आणि तो खजिना आमचाच होता. वाड्याच्या पडक्या भिंती, ती उःशापित जमिन मला अजूनही परकीच वाटत होती. माझी पिढी पाचवी नाही, मलाच खात्री पटली होती.

पुढचा मुक्काम गळेगाव. तिथला वाडा, शेती, नदी, गाई-गुरं, लोकांनी छोटे पाटील म्हणून केलेले नमस्कार सारं कसं छान होतं पण उपरं. हे माझं नाही, माझी नाळ इथे जोडलेली नव्हती ही भावना काही जात नव्हती.

आता किती वर्षं झाली! जंमतींचे ही दिवस संपले. कधी तरी दादा म्हणाले की नदी मुळे गाव हलवायचाय. मी ही हललो. ज्या गावाशी माझा फक्त आडनाव लावण्यापुरता संबंध आहे, जो गाव मी फक्त एकदाच पाहीला आहे तो गाव हलला तर मी का अस्वस्थ व्हावं? गाव संपला, एका अर्थानं गावाचाच वंश खुंटला मग आपली मुळं शोधण्याचे प्रयोजन काय? पुढच्या पिढीसाठी या दंतकथेशिवाय माझ्याजवळ कसलेच पुरावेही असणार नाहीत.

दंतकथांना गुढतेचे वसे असतात खरेच पण वेशीवरच्या देवांनाच निर्वासित करणारया दंतकथा थोडक्याच.

Wednesday, May 7, 2008

रस्ता

रस्ता,
आदी अन अनंताच्या मधे घुटमळणारा नुस्ताच गुंता.
त्याच्या एका बिंदुवर मी
सावरुन उभा आहे
जणू की तो असावाच एका शेवटाची सुरुवात

फक्क पिवळे सोडीयमचे दिवे
ओकताहेत पारंपारिक
शिळाच प्रकाश,
किंवा सरावाने
तोडताहेत अंधाराचे
हिंस्त्र लचके.
आणि आपल्याला उगाचंच वाटत राहातं दिवे
प्रकाश देतात

रस्ता,
पहील्या प्रियकराच्या आठवणींसारखा;
संपतच नाही
संदर्भ संपले तरीही.
लख्खं काळा
जणू काळजाला पिळा.
त्याच्या काठाकाठावर, भ्रमिष्टांसारखी झुलत असतात
गुल्मोहरी काही झाडं,
अधूनमधून पडणारया चांदण्यांच्या सावल्यात.

रस्ता, अनाघ्रात आणि अस्पर्श.
रात्रीचा एखादाच चुकार वाटसरु
अंगावर ओरखडे ओढत जातो;
अन्यथा पुर्णपणे व्हर्जिन

Thursday, May 1, 2008

आयवा मारु

"कोणे एकेकाळी" असं म्हणण्याइतपत जुनी गोष्टं नाही ही. सत्तरीच्या आसपास आयवा मारु नावाचं एक मालवाहु जहाज प्रवासाला निघालं. कोणत्याही जहाजाला असतो, तसं आयवा मारुला पण एक कॅप्टन होता, फर्स्ट मेट, सेकंड मेट, थर्ड मेट होता, चीफ ऑफिसर, सुकाण्या, कुकही होता. या सारया मुरलेल्या खलाश्यांना समुद्राची, त्याच्या वादळांची सवय होती. पण एक वादळ त्यांच्या सोबतच प्रवासाला निघालं होतं ते जरा निराळं होतं. आयवा मारुवर राहणारया या वादळाने आणखी वादळे निर्माण केली आणि आयवा मारुचा तळ ढवळुन निघाला. आयवा मारुवरच्या माणसांच्याच काय पण प्रत्यक्ष आयवा मारुच्याही इच्छा, वासना, आशा जागृत व्हाव्यात असं भीषण वादळ. एम. टी आयवा मारु ही त्याचीच गोष्ट.

*******************************************************

अश्रूंच्या उंच सावल्या कलंडतात तिच्या बिलोरी डोळ्यांत
आक्रोशत ओलांडतात अक्षांश आग लागलेले राजहंस
आणि तिच्या गिरकीची शैली उगवते भूमितीत दिक्काल

अचानक पडतो एक क्ष-किरणांचा झोत अंगावर
आणि तिच्या शरीराचें शुभ्र यंत्र होते पारदर्शक
पेटलेल्या कंबरेभोवती तिच्या विस्कटतात छाया
किंचाळतात नीरवपणे स्तब्धतेत वाहणारया तिच्या बाहुंच्या नद्या


विलंबीत लयीसारखी थरथरली ओरायनची पोलादी काया, त्याच्या एका स्पर्शापायी. नाव बदललं म्हणून जुनी ओळख पुसता येतेच असं नाही आणि ती तर स्त्री. जन्मोजन्मींची गुपीते गुणसुत्रांच्या कालकुपीत बंद करुन पिढ्यानपिढ्या वागवित नेणारया तिला, एक नाव बदलण्याने असा कितीसा फरक पडणार होता? आज तिचे नाव आयवा मारु आहे, उद्या अजून काही असेल. नावांचे संदर्भ तात्कालिक, प्राणाहुन प्रिय सखा भेटण्याचे गारुड तेव्हढे खरे.

तो आला तसा मागोमाग गन स्लिंगर आला, रॉस आला, डालीझे, बोसन आणि हो, सेनगुप्ता ही आला. एका घटनाचक्राचे सारेच तुकडे कालाच्या प्रवाहात फिरत फिरत आज परत एकत्र आले आहेत. पण चक्र ज्या बिंदु भोवती फिरतं तो आता एक उरला नाहीये. एवंम इंद्रजीत..अमल, विमल, कमल आणि इंद्रजीत. ऍना, मिसेस सेनगुप्ता, उज्वला आणि आयवा मारु... चक्र ज्या बिंदुभोवती फिरणार त्याची जीत.

उज्वला... तिच्या डोळ्यात आग लागलेल्या समुद्राची धग आहे, म्हातारया बोसनने पहील्या छुट वाचलं तिला. जहाजाचा सवतीमत्सर जागा होऊ नये म्हणून बाईला जहाजावर न येऊ देण्याचा जुना प्रघात दिपकने मोडला आणि आत्मविनाशाचे एक नवेच पर्व सुरु झाले. अलाहाबादच्या घाटावरुन आयवा मारुच्या डेकपर्यंत, देहाच्या बोलीवर तरंगत आली उज्वला. स्पर्शाची बेभान बोली तिच्या उमलत्या देहाला जशी उमगली, तशी तिचा देहच वाचण्याची विकृत उर्मी तिच्या सख्या बापात जागी झाली. आणि आता ती उभी आहे आयवा मारुच्या विशाल डेकवर. डोळ्यांनीच निर्वस्त्र करु पाहाणारया खलाशांच्या भुकेल्या नजरेत, त्याची एकच सौम्य नजर तिला ओळखता आली आणि मनोमन ती त्याची कृष्णसखी झाली. दिपकला गैर वाटण्यासारखं त्यात काहीच नव्हतं कारण त्या जहाजावार त्याच्या शिवाय त्या दोघांचही सख्खं असं कोणीच नव्हतं. दिपकला तिचे रुढीबंद डोळे नव्याने कोरायचे होते. त्याच्या जून डोळ्यांना तिच्या परंपरागत आत्म्यामागचे फक्त कोवळे शरीरच दिसत होते. "तिने पुसले पुसले, पुरुषाचे गणगोत/गणगोत कसं बाई, सारी शिताचीच भुतं." दिपकच्या स्पर्शातला निबरपणा तिला तिच्या वडीलांच्या स्पर्शाची आठवण करुन द्यायचा. वासनांचे नंगे नाच अजून सुरु व्हायचेच होते की सेनगुप्ताचं ते तसं झालं. सेनगुप्ता, उज्वलाला तिच्या भावागत वाटायचा.

समीर सेनगुप्ताचं उरलसुरलं सामान न्यायला त्याची आई आली होती, मिसेस सेनगुप्ता. तिचे धागेही समुद्राशी तटतटून जोडले-मोडलेले. एका शापवाणी प्रमाणे ओतले तिने तिचे शब्द चीफ पॅट्र्किच्या थरथरत्या शरीरात "काळाच्या पुढे डोकावलास तर स्वतःच्याही अस्तित्वाचा शेवट दिसेल तुला." अनुभवी रॉसलाही जे ऎकु आलं नाही त्याचे भोगवटे मात्र वाट्याला आले उज्वलाच्या.

ज्वाला, ज्वालाच म्हणूया तिला. बोसन म्हणाला तसं डोळ्यात आग असणारी ज्वाला. दिपक मधल्या गन स्लिंगरनं तिच्यातली उज्वला कधीचीच संपवली होती. आता उरली ती फक्त ज्वाला. दिसेल ते शरीर भोगूनही रिती रितीशी ज्वाला. हाकेला धावून येणारा सेनगुप्ता संपला आणि तिचा सखा निती-अनिती, नातेसंबंध यांच्या चक्रव्युहात अडकला तसे तिने लाजेच्या, आत्मसन्मानाच्या सारया रिती गुंडाळून ठेवल्या आणि ती फक्त ज्वालाच उरली. जर ऍना आयवा मारुवर आली नसती तर ज्वालाच्या वासनांध देहानं तिच्या सख्याचाही बळी घेतला असता?

प्रश्नचिन्हाआड दडण्याइतकी ऍना बॅसिलिनो कमकुवत नव्हतीच कधी. तिनं फक्त वाट पाहीली त्याची, अखेर पर्यंत वाट. एका निमित्तासारखं तिने त्याच्यावर लुटवलेला देह, त्याचे पुढचे प्रवास तगवायला पुरेसा होता. प्रेम अजून वेगळं असतं? ज्वालाच्या आव्हान शरीराचे मोह तटवायला पुरेसे असतीलही ऍनाचे स्पर्श, पण जिच्या साक्षीने हे सारेच खेळ सुरु होते त्या आयवा मारुचे काय?

एम. टी. आयवा मारु, आठ्ठेचाळीस टनांच धुड, वय वर्ष अवघं तीस, म्हणजे तरुणच म्हणायचं. रॉसच्या, कॅप्टन रॉसच्या वेडापोटी आयवा मारु समुद्रात उतरली होती, तिच्या मोडक्या तोडक्या संसारासहीत. मग काय झालं? शेवटी हे असं का झालं? रॉस म्हणतो तसं "पोलादाला जान नसते. पोलाद वितळवणारया ज्वालांनाही जाण नसते; पण त्या ज्वालांची धग सहन करत पोलादाला आकार देणारया माणसाच्या भावना त्याच्या मजबुत हातांतुन पोलादात मिसळतात. त्या पोलादी पिंजरयात अडकलेल्या माणसांच्या इच्छा पोलादाला आकांक्षा देतात. तिच्यात जीव ओततात. सागराशी झगडत, उन्हात करपताना, पावसात भिजताना निसर्गातील महाभुतं तिचे व्यक्तिमत्व घडवतात. ती ह्ळूहळू श्वासोच्छ्वास करायला लागते. तिच्याही मनात जगण्याची इच्छा जन्म घेते. माणसांच्या संगतीची आवड निर्माण होते. यु विल नॉट बिलिव्ह, पण स्वतःची माणसं ती स्वतः निवडते. जगाच्या कानाकोपरयातून त्यांना खेचून आणते. आपल्यासारखी."

आयवा मारुने खरंच कुणाला बोलावलं होतं आणि कोण उपरयागत आलं होतं? काही जुन्या रिती मोडल्या की काही नवे शाप खरे ठरले? विनाशचक्राला गती नक्की कुठे मिळाली ठरवणं खरंच कठीण आहे.

या सारया खेळात अज्ञाताला सामोरा जाणारा 'तो', सामंत, मात्र कधीचाच पुढच्या प्रवासाला निघालेला असतो.

************************************************

"एम. टी. आयवा मारु" कधी तरी नव्वदीच्या सुमाराला प्रकाशित झालं. घरी कुणी वाचायच्या आत मी ते पुस्तक वाचलं म्हणून मला ते त्या वयात वाचायला मिळालं. आणि ते पुस्तक आणि अनंत सामंत तेव्हा पासून मानगुटीवर बसले ते आजतागायत. असंख्य संदर्भात ते पुस्तक मनावर ओरखडे उमटवत राहीलं. समुद्रागमन हिंदु धर्मात निषिद्ध त्यामुळे मराठी माणसासाठी समुद्र फक्त पुळणीवरच भेटत राहीलेला. रणांगण कदाचित समुद्राच्या पार्श्वभुमीवरचं पहीलं मराठी पुस्तक असावं. पण आयवा मारुत भेटणारा समुद्र निराळाच. इथे समुद्राचं, जहाजाचं कॅनव्हस नाही तर ती त्या गोष्टीतली मुख्य पात्रं आहेत. अंगावर येणारे शारीर उल्लेख, शरीरसुखाचे रासवट प्रसंग, त्याहुनही रासवट खलाश्यांचं जगणं, आणि ज्वालाच्या बाईपणाचे सोहळे. Celebrations, afflicts of womanhood were never so explicit in Marathi. किती वर्ष झाली पण ज्वाला असंख्य रुपात भेटत राहीली, कविता, डायरी आणि आता ब्लॉग. अभिजित आणि मेघनानं परत एकदा अनंत सामंताची आणि आयवा मारुची आठवण करुन दिली. त्रासाबद्दल आभार.

***********************************************

सुरुवातीची कविता, दिलीप चित्र्यांची "नर्तकी"