Thursday, March 29, 2007

व्हीन्सेंट व्हॅन गॉग

व्हीन्सेंट व्हॅन गॉग
तारवटलेल्या डोळ्यांनी व्हीन्सेंट डोळ्यातील सूर्य
कॅनव्हास वर उतरवीत राहीला
पॅलेटमधे राहीलेला पिवळा रंग
ईथर सारखा तरल
माझ्या डोळ्यात
भूतकाळ साकाळून माझं रक्तही तिथेच गोठलेलं

इथे एक आवाज झाला तर मेंदूला वेदनांचे धुमारे फुटतात
फोटोफोबीया, फोनोफोबीया, ओस्मोफोबीया...
वेदमंत्रासारखे मायग्रेनचे सारे ट्रॅक्सचे मला आठवत राहातात
मी स्तब्ध जसे की मला काहीच समजत उमजत नसते
like a vegetable

व्हीन्सेंट तरीही सूर्य रंगवीत असतो
------------------------------------------------------------------------------------------------
कविता इथेच संपते? एमिली डिकीन्सनच्या ओळी जुळ्या कवितेसारख्या तरीही अस्वस्थ करत असतात
We don't cry- Tim and I,
We are far too grand-
But we bolt the door tight
To prevent a friend-
...
We must die -by and by-
Clergymen say-
Tim-shall-if I -do-
I - too- if-he-
How shall we arrange it-
Tim-was-so-shy?
Take us simultaneous-Lord-
I-"Tim"-and Me!

Monday, March 26, 2007

आजीची गोष्ट

देशपांडे गल्लीच्या वळणावर गाडी आली की माझं रडणं सुरु व्हायचं " मी आज्जी कडे राहाणार नाही". लहान होतो, कोण ऎकणार? बहुतेक वेळा ताई सोबत असायची, तिला फार आवडायचं आज्जीचं घर. एकाच गावात आहोत तर कधी कधी आज्जी कडे का राहायचं हा कधीच उत्तर न मिळालेला प्रश्न डोळ्यात नाचत असतानाच आज्जीचं घर यायचं.

आज्जीचं घर होतं लहान पण होतं गोष्टीतल्या सारखं. एक अंधारं स्वयंपाघर, बाहेर एक पडवी, छोटं अंगण, मग वरची खोली, तिच्या बाहेर गाय बांधलेली. प्रत्येक जागेची आपली एक ओळख होती. स्वयंपाघर भलं चांगलं आडवं होतं, गणितातल्या आयता सारखं. त्याला दोन छोट्या पण ऊंचं खिडक्या होत्या. बहुतेक वेळा तिथे अंधार असायचा आणि आज्जीची आणि आमची खूडबूड. आज्जी खाली बसून स्वयंपाक करायची आणि आम्ही तिच्या आजूबाजूला उंडारायचो. घरून आणलेली पुस्तके संपली की आज्जी कडचं सुपरहीट पुस्तक "चातुर्मास" ही चालून जायचं, कधी कधी बिचारं दाते पंचांगाचाही नंबर लागायचा, पण ते फार बोअर होतं.

आमचं मुख्य आकर्षण होती ती वरची खोली. तिच्या खाली एक तळघर आहे आणि त्यात खजिना आहे असं कुणीतरी आम्हाला सांगीतलं होतं त्यामुळे आमच्यातला फास्टर फेणे कायमचं जागा असायचा. असो. त्या खोलीत एक भली मोठी पेटी होती, मिलीट्रीवाल्यांची असते तशी. जगातील कोणतीही वस्तू त्यात मिळेल असा आम्हाला सार्थ विश्वास होता. मामाची भली जड पुस्तकं, कसल्या कसल्या नोट्स...काहीही त्यात मिळायचं. त्या खोलीत देवीला वाहीलेली एक तलवारही होती. ही...जड, शिवाजीची कीवचं यायची. त्या खोलीच्या समोरचं आज्जीची गाय होती. तिच्या एका वासरवर मी लहानपणी हक्क सांगीतला होता, आठवलं की मजा वाटते, ते माझं वासरु होतं.

आज्जीकडचा आमचा ६०-७०% वेळ जायचा तो पडवीत. भला मोठा एक पलंग, त्याची मी बस करायचो. त्याच्या रेलींग मधे पाय सोडून फुर्र्र्र केलं की ती बस कुठेही जाऊ शकायची. तो पलंग आजोबांचा होता. आम्ही त्यांना काका म्हणतो कारण आई आणि मावश्याही त्यांना काका म्हणतात. आज्जीचं आवरुन झालं की तिने टाकलेल्या सतरंजीवर आम्ही मांजरासारखे जमा व्हायचो. गुडगुड आवाज करणाय्रा उषाच्या काळ्या टेबलफॅन समोर बसण्यासाठी ही..भांडाभांडी करायचो! गप्पा मारत, पेंगा मारत हातांनी हळूच शेणाने सारवलेली जमीन उकरताना भारी सुख वाटायचं. आज्जी/काकांच लक्ष गेलं की दटावणी पडायची. पण ते शेणाचे पोपडे काढताना खरचं फार मजा यायची. गंगा दुसय्रा दिवशी सारवून सगळं सारखं करायची.

काका म्हणजे माझे आजोबा- स्वातंत्र्यसैनिकं-निझामाविरुध्द लढलेले. कधीकाळी त्यांनी नौकरी केली असावी असा मला बरेच दिवस संशय होता, मोठेपणी कळालं की ते कोर्टात काहीतरी होते. पण मला आठवतात तसे ते कायमचं पडवीत फेय्रा मारायचे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात काय केलं हे नक्की कळण्याचं ते वय नव्हतं पण त्यांच्या कोटाचा, गांधी टोपीचा आणि मुख्य म्हणजे ते दर १५ ओगस्ट/२६ जानेवारीला कलेक्टरसोबत परेड पाहातात याचा आम्हाला फार अभिमान. एकदा गंमतच झाली. आम्ही वाड्यात खेळत होतो आणि एक म्हाताय्रा आजोबांनी मला विचारलं, "जंगल आहे?" "जंगल? हे भूमकरांचं घर आहे" आजोबांनी माझ्या आरपार पाहात करडया आवाजात सुनावलं "तेच ते, जंगल म्हणजे तुझे आजोबा. रझाकारांच्या काळात ते जंगलात लपले होते, म्हणून आम्ही त्यांना जंगल म्हणतो" झालं..... आम्ही गार!! काका आम्हाला कुठल्याही रहस्यमय कथेतील हिरोच वाटले.

पण या सगळ्यात मुख्य आकर्षण होती आज्जी -इतकी की तिच्या घराला आम्ही आजही, ती नसतानासुध्दा, आजीचं घर म्हणतो. तिला पाहाताच डोळ्यात भरायची ती तिची सणसणीत उंची. तिच्या उंचीमुळे तिला तिच्या मापाच्या चपलापण नाही मिळायच्या! तिच्यामुळे आज्जी म्हटलं की नऊवार पातळ घालणारी बाई असा माझा कित्येक वर्ष समज होता. वयानुसार तिच्या डोळ्यात आलेला समजुतदारपणा कदाचित तिने पाहीले-भोगलेल्या परिस्थीतीमुळे ही आला असावा.
कळत्या वयात समजलं की काकांच्या पायांनां लागलेल्या भिंगरी मुळे आख्खा संसारगाडा कित्येक वर्षांपासून आज्जीच ओढत होती. एकत्र कुटूंब, पदरात ६ मुलं, सतत येणार-जाणार असलेलं घर अश्या परिस्थीत तिने घेतलेला सगळ्यात क्रांतीकारी निर्णय म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा; नीट सांगायचं तर ५ मुली आणि १ मुलगा या सगळ्यांच्या शिक्षणाचा. आज ऎकायला विशेष वाटत नसलं तरी ४५-५० साली मुलींचं शिक्षण- उच्चं शिक्षण ही चैन होती.. तिनं ते कसं जमवलं माहीत नाही.
तिच्या शिस्तीचे बरेचसे कंगोरे आम्हा नातवंडासाठी बोथट होते, त्यातही ताई, मी, मेघा पहीली नातवंड होतो, जवळ होतो म्हणूनही असेल! तिच्यासाठी दुधापेक्षा दुधावरची साय जास्त जाड होती!!
तिची उंची जशी लक्षात यायची तशीच त्या उंचीला साजेसा तिचा स्वाभिमानही. तिचा कणा कायमच ताठ होता-तिच्या शेवटच्या दिवसांपर्यंत..कोणत्याही बाबतीत कोणासमोरही तोंड वेंगाडायला तिला आवडायचं नाही. कोणत्याही गोष्टीसाठी ती कोणावरही अवलंबून नसायची.

काळ, काम, वेगाच्या गणितं सोडविताना, आपण कधी कसली गॄहीतके हाताशी घेतो. त्यांच्या असण्याची इतकी सवय होते की ती गॄहीतके आहेत हेच मुळी आपण विसरुन जातो. "समय की मार होती है बडी कठीन" असं बच्चन म्हणतात तेंव्हा त्याचा प्रत्यय घ्यावाचं असं नव्हे. पण एखाद्याचा गाता गळाच कोणी कापावा हे जितकं क्रूर आहे तितकंच क्रूर आहे एखाद्याचा स्वाभिमान चुरगाळणं. ताठ मानेनं जगत आलेल्या माझ्या उंच्यापुरया आज्जीला पार वाकवलं ते तिच्या गुढघेदुखीनी..अंथरुळालाच खिळली ती. त्यात परत तिला आम्ही तिच्या घरातून आमच्या घराजवळ असणारया तिच्या दुसरया घरी आणलं. तिची रोजची माणसं तिला दिसेनाशी झाली. मग सारंच बिघडत गेलं. कसल्याशा उपचारासाठी तिला पुण्यात मामा कडे नेण्याचं ठरलं. त्यावेळी मात्र तिने आकांत मांडला. जमिनीत खोलवर मुळं गेलेलं झाड कधी उपटून पाहीलय तुम्ही? किती कठीण आणि वेदनादायी असतं ते, तसंच काहीसं झालं. माणूस मोठा झाला की कसलीच सक्ती करता येत नाही. आज्जीच्या हट्टापाई तिला आम्ही परत लातूरला आणलं. सगळ्यांनी एकच निदान केलं, जगण्याची तीव्र अनिच्छा.

आता आज्जी नाही

आजही आज्जीच्या घराकडे गाडी वळली की मला रडू फुटते. पण आता आज्जी नाही तसे तिचे घरही नाही.

Thursday, March 22, 2007

पुल, संत आणि मराठी माणूस

या सगळ्या व्यक्ती/समाजाबद्दल अनेकांनी अनेक ठिकाणी लिहीलेले आहे, त्यात आता माझी ही भर!

आपल्याला आपल्या श्रीमंत संत परंपरेचा भरपूर अभिमान आहे, पण माझ्या मते मराठी माणसाचं या सगळ्या प्रकारात खूप नुकसानही झालं आहे. रामदासांचा अपवाद वगळता, आपले बहूतेक संत या जगाबद्दल काहीच बोलत नाहीत. जे जग आपण पाहीलेच नाही त्याचे स्वप्नरंजन करण्याची एक घातक सवय या समाजाला लावली. याही पलीकडे जाऊन, आपले राहाते जग ही एक ताबडतोब सोडावी अशी जागा आहे, इथे मिळणारया प्रत्तेक सुखाची किंमत "तिथे" चुकवायची आहे, तेंव्हा ही सारी सुखे म्हणजे पाप आहे, मिथ्या आहे असा काहीसा अविर्भाव कितीतरी अभंगात दिसतो. अर्थात याचीच चांगली बाजू म्हणजे मराठी समाज भोगवादी झाला नाही.

आश्चर्य वाटत ते रामदासांचं. ज्या माणसाने कधीही संसार केला नाही, तो अधिकारवाणीने इतका सुंदर उपदेश करु शकतो? ज्या काळात व्यवस्थापन शास्त्राची सुरुवातही झाली नव्हती, त्या काळात हा माणूस कालातीत सुत्रं सांगतो?
पण हा अपवाद! आणि अपवाद हे उदाहरण होऊ शकत नाही!!

दुसरा अपवाद ज्ञानेश्वरांचा ज्यांनी ही माझी लिहीती भाषा मला दिली!!

तर अश्या मुशीतून तयार झालेला हा मराठी समाज. आनंद उपभोगणं, मोठ्याने हसणं, विनोद करणं हे शिष्टसंमत नसणं ही एक आपली ओळख निर्माण करुन बसलेला.

अश्या समाजात पु ल जन्माला आले, आवडले हा माझ्या मते एक मोठा बदल होता. पु लंच्या लिखाणावर काही बोलण्याची माझी लायकी नाही, पण या माणसाने शतकानुशतके चालत आलेली सुख/आनंद नाकारण्याची प्रर्दिघ परंपरा मोडली! जगण्याचा आनंद कसा घ्यावा, र्निलेप पणे दुसय्रा वर कसे प्रेम करावे, कौतूक करावे, खळखळून हसावे हे या माणसाने आपल्याला शिकवले. त्या अर्थाने पु ल म्हणजे मराठी माणसाचं "आनंदाचं झाडं" होत.
कुठे कुणाला न दुखवता हसता येतं हे कदाचित आपल्याला या माणसामुळेच कळालं असेल. रसिकतेच्या नव्या परिभाषा आपल्याला कळाल्या. एकच माणूस लिहीतो, गातो, संगीत देतो, नाटक-सिनेमे करतो हेही एक वेळ मान्य आहे पण हाच माणूस अजातशत्रु पदाला पोचून जगन्‌मित्रही होतो हे फक्त त्यालाच शक्य आहे जो जगण्याच्या प्रत्त्येक अंगांगावर प्रेम करतो, प्रत्त्येक क्षण तितक्याच उत्कटतेने जगतो, ज्याच्या डोळ्यातील मुलपण अजून शिल्लक आहे!

आता आपल्याला गरज आहे अजून एका पुलंची जो आपल्याला शिकवेल की पैसा कमावणं वाईट नसतं, प्रत्त्येक श्रीमंत माणूस गुन्हेगार नसतो, गरीबी हा अभिमानाचा विषय नसून लाजेची बाब आहे, कोणतही काम हलकं नसतं आणि एखाद्याचा साहेबपणा त्याच्या वागण्या-बोलण्यातून दिसावा लागतो ना की त्याचा संबोधनातून!! जो थोडासा समाजवादीपणा/communisam आपल्यात भरुन राहीला आहे, त्या संदर्भात हा सुदंर quote:

"जो माणूस तरुणपणी कम्युनिस्ट नसतो, तो तरुणच नाही आणि जो म्हातारपणीही कम्युनिस्ट राहातो तो वेडा असतो"

Tuesday, March 20, 2007

कवितांचा गाव..

इयत्ता ९वीतली गोष्टं आहे, कुळकर्णीबाई (तेंव्हा "मॅडम"चं राज्य नव्हतं!) "चिमण्या" नावाचा धडा शिकवत होत्या.."आणि हा धडा ग्रेस या लेखकाने लिहीलेला असून तो माणिक गोडघाटेंनी भाषांतरीत केला आहे"..अस्मादिकांनी ताबडतोब तीव्र निषेध व्यक्त केला.."बाई बाई..माणिक गोडघाटे म्हणजेच ग्रेस..एकच आहेत..टोपणनाव!!" बाईंनी उदार मनाने चूक कबूल केली आणि आमची छाती अभिमानाने भरुन आली. ग्रेसची आणि माझी ओळख अशी अपघातानेच झाली.
आता थोडा अजून फ्लॅशबॅक.. घरात उठताबसता पुस्तकांची चर्चा सुरु असायची..आई दादा मराठीचे प्राध्यापक होते (आमच्या सुदैवाची हद्द!) आणि दादानां कवितांचा विलक्षण नाद. आमच्या लहानपणी त्यांनी किती तरी कविता आमच्याकडून चालीत पाठ करुन घेतल्या होत्या पण कवितांसारखा सुंदर अनुभव, सरकारी कॄपेने काही गुणांचा आणि आम्ही अजून थोडे हुशार असल्याने, निबंधात चांगली छाप पाडण्यापुरता मर्यादित होता.
पण या "चिमण्या" प्रकारेने कशी ती माहीत नाही, एक जादूच केली. कवितांच्या बाबतीत शक्यतो बालभारतीच्या पुढे न जाणारी आमची गाडी सरळ संध्याकाळच्या कवितांच्या दारात येऊन ठाकली.
मग ग्रेसच्या कवितांनी माझं जे काही केलं तो एक वेगळाच विषय आहे, त्या विषयी नंतर कधीतरी!
हा ग्रेस नावाचा गॄहस्थ कायमचाच मुक्कामी आला असताना अजून एक भुताटकी अनुभवाला आली दिलीप चित्रे या नावानी. हे तिसरंच झांगड होतं. कोणीतरी काहीतरी लिहीत सुटावं आणि त्याची कविता व्हावी हा सरळ योग नाहीच. म्हणूनच विंदा त्यांना महाभूत म्हणतात! ग्रेसच्या अनवट शब्दकळा आणि चित्र्यांचं अनुभवांना सरळ भिडत जाणं, नंतर वाचलेल्या बहुतेक कवींच्या दशांगुळे वर राहून गेलं ते गेलच.
कवींच्या ढोबळ प्रेमात पडण्याचे दिवस सरल्यावर कधी मुक्तातल्या नामदेव ढसाळांची कविता आवडून गेली (तितकंच सोनाली चं त्यात असणंही!!), कधी रेग्यांच्या किंचीत कविता, कधी दिप्ती नवलच्या..

अनुभवांची तोडफोड न करता व्यक्त होण्याचं अप्रतीम सामर्थ्य ज्या कवितांनी दिलं, त्या सगळ्या कवितांसाठी हा आजचा ब्लॉग!!!!

Thursday, March 1, 2007

भय शब्दांचे...

भय शब्दांचे कधीच नसते, नव्हतेही. पण कोणत्या तरी अनवट क्षणी शब्द फसतो. तो अर्थ शब्दापलीकडे जाऊन उरतो. मग मला ग्रेसच्या ओळी आठवतात..मन अर्थव्याकूळ होते..
"भय इथले संपत नाही"
मौनराग मधे एलकूंचवार लिहीतात, "मला घराबाहेर ऊपसून काढलं". ऊपसून काढणं यातील वेदना वेगळी आहे, त्यात जोर आहे, त्वेष आहे. जसं पाणी ऊपसून काढतात तसं कोणी तरी कोणालातरी ऊपसून काढतं?
साजणवेळात मुकुंद गातो " कसल्या दुःखाने सुचते हे गाणे, गळतात पाने झाडांचीही" किंवा "पुरातून येती तुझे पाय ओले, किती अंतराळे मधे मोकळी". त्याच्या गाण्यातली आर्तता शब्दात कशी बरे मांडावी? अख्तर बाईं सारखा मधेच त्याचा आवाज मधाळ फाटतो (त्याला पत्ती लागणे असेही म्हणतात!), त्या अनुभवाला कसे वर्णावे?
किशोरीबाईंचा हंसध्वनी किंवा कुमारांचा "उड जायेगा" मांडायलाही माझ्याकडे शब्द नसतात.
पण हे अनुभव असे सहजासहजी सोडत नाहीत. एकेक शब्दावर जीव आडतो.
हा सारा अट्टहास अश्याच न उलगडलेल्या कोड्यांसाठी..
त्यांच्यासाठी हे संदिग्ध अर्थाचे उखाणे!!

"डोळ्यांचे धुके होण्याआधी
पानापानांना फुटावे गाणे
तुझ्या हाती विसावताना सुटावेत
संदिग्ध अर्थाचे उखाणे"