Wednesday, September 26, 2007

भंपि

भाऊ, धाडस लागतं तसले पिक्चर बघायला.

कुणी ही सोम्यागोम्या नाही पाहु शकत तसले पिक्चर.

अश्या विचित्र नजरेने काय बघता? आम्हाला आवडतात तसले पिक्चर. जर कुणी तन-मन-धन घालून आपल्या अंगभुत कलेचं प्रदर्शन करत असेल तर आपण प्रोत्साहन नको द्यायला?

Wait a minute.. तुम्ही हे तसल्या-तसल्या शब्दा मुळे आमच्याकडे असे बघताय का? अहो मी बोलतोय मनःपुत भंकस पिक्चर्स उर्फ भंपि बद्दल...

हं coming back to the point , तर आम्हाला असले (यावेळी तसले नाही)पिक्चर्स आवडतात. आम्ही त्यांना एंजॉय करतो. खरंच!

आता बघा, पाथेर पांचाली किंवा जन अरण्य किंवा अपूर संसार बद्दल तुम्ही-आम्ही काय लिहिणार? म्हणजे, एक तर कळत नसताना उगीच आर्टी व्हायचं, जगातल्या कुठल्याशा भोकात बसणारा एक समिक्षक त्या पिक्चरची स्तुती करणार आणि मग आपण त्याची रि ओढायची. यात काही राम आहे का? (हा सध्या कळीचा प्रश्न आहे म्हणे). काही लोकांना आपली लायकी कबूल करणं भयंकर अपमानास्पद वाटतं पण गुरु, दिलवाले दुल्हनिया..(सुस्कारा SS ) वगैरे पब्लिक कॅटॅगरीतल्या पिक्चर्स बद्दल बोलायचं तर आपल्याला तिथं कुत्रं पण हुंगत नाही. तिथे तरण आदर्श, मसंद असले महागुणी खांब आहेत. तर आता आपल्या वाट्याला काय राहातं? हंSSSSS बरोब्बर...आपल्या वाट्याला राहाते भंपिची समिक्षा. खरं सांगु का? अहो मजा असते असले पिक्चर बघण्यात.

आता या "छंदा"ची सुरुवात कुठून झाली? ज्याकाळी (म्हणजे इयत्ती दहावी पर्यंत)आई-दादा घेऊन जायचे तेच (वर्षातुन एक किंवा दोन) पिक्चर आम्ही बघायचो, त्याकाळात शाळा बुडवून (किती विचित्र- शाळा बुडवुन काय? बहुतेक शाळा न आवडणारया माणसानं फेकलेलं वाक्य दिसतय) मी आणि भुषण फडणिस नावाचा सर्वार्थाने स्वच्छ मित्र घरी न सांगता पिक्चरला गेलो. त्याच दिवशी आम्ही पकडलेही गेलो आणि शाळेत सरांसमोर दादांचा मार खाऊन झाल्यावर आम्हाला पिक्चरचं नाव विचारलं गेलं. "शिरडी के साईबाबा" आम्ही अत्यंत निरागस चेहरयाने सांगितलं (शाळेत वर्गातल्या मुलीबाळींसमोर अपमान झाला की चेहरयाचं जे होतं त्याला निरागस चेहरा म्हणतात- गरजुंसाठी निरागस चेहरयाची व्याख्या). आणि माझ्या या भयंकर छंदाची अशी सुरुवात झाली, kick start म्हटलं तरी चालेलं.

आता या भंपिचा पण आपला म्हणून एक क्लास असतो. बनवतानाच एखादा सिनेमा एका विशिष्ट वर्गासाठी आणि मुद्दाम बकवास केला तर तो भंपि नाही म्ह्टला जाऊ शकत उदा. मिथुनचे शिणेमे (गुंडा, चिता, चांडाल!!!!). खरा भंपि हा नैसर्गिकरित्याच भंकस बनतो उदा. दौड. बहुतेकवेळा अत्यंत निर्मळ मनाने अश्या चित्रपटांची निर्मिती झालेली असते. दरवेळीच असे भंपि विनोदी असतात असेही नाही. आता मी काही उदाहरणे इथे देणार आहे. तुम्हाला माझी या विषयातली मास्टरी दाखवण्याचा यात अजिबातच हेतु नाही हे मी नम्र पणे सांगु ईच्छितो. सरहद नावाचा एक सिनेमा आहे. मला खात्री आहे, तुम्ही तो पाहिलाच असु शकत नाही. दिपक तिजोरी हिरो असणारा भंपि कोण बघणार? आम्ही हा भंपि बघितला कारण दिपक त्यात इंजिनिअर होता. एका वयात समव्यवसायी बंधु विषयी जो कळवळा वाटु शकतो केवळ त्या पोटी आम्ही हा भंपि बघितला. याच इसमाचा पहला नशा नावाचा सो-कॉल्ड सस्पेन्स भंपि पण मजा मारत बघितला. तस्साच सैनिक नावाचा भंपि आम्ही नितळ देशप्रेमापोटी बघितला. त्यात भलतच प्रेम ऊतु जातं होतं हा वेगळा भाग. अशी कितीतरी उदाहरणे आहेत पण उगाच तुम्हाला कॉम्प्लेक्स यायला नको म्हणून थांबतो.

निर्मिती प्रक्रियेकडून आता आपण असा एखादा जेन्युईन भंपि कसा बघावा या कडे वळु. ही तपश्चर्या थोडी कठीण, पण जमणेबल आहे. सर्वात आधी मनातले विकार काढा. मोह-मत्सर यांच्यावर विजय मिळवणे हीच भंपिच्या यशाची पहिली पायरी आहे. आता काही तरी होईल मग काही तरी होईल असा विचार करुन भंपि बघाल तर हाती काहीच लागणार नाही. दुसरी पायरी म्हणजे निरपेक्षता. भंपि बघताना कसल्याही अपेक्षा ठेवायच्या नाहीत, मनात कसलेही पुर्वग्रह ठेवायचे नाहीत आणि लोकांच्या कुत्सित कॉमेंट कढे तर लक्ष मुळीच द्यायचं नाही. पडद्यावर समोर जे चालु आहे त्यात मजा शोधायची. हे काय सुरु आहे आणि मी इथे का आहे हे मुळ प्रश्न भंपि बघताना डोक्यात आले जरी तरी तुमची तपश्चर्या भंग पावु शकते. आणि तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे शहाणे करुनी सोडावे सकळ जन. भंपि बद्दलचे गैरसमज दुर करत अजून मित्र-मैत्रिणी भंपि चळवळीत सामिल करत जायचे.

भंपि हे व्यसन किंवा छंद आहे हे म्हणण्यामागे कोणताही सटायर नाही. आजा मेरी जान नावाचा किशनकुमारचा भंपि बघायला आम्ही २ तास आधी अभिनवला गेलो आणि आरडी ची आजा मेरी जानची अप्रतिम कॉम्पोझिशन ऎकायला मिळाली. प्रभुदेवाचा मुकाबला बघायला २ तास आधी गेल्यामुळे आधीच्या शोतलं मुकाबला-मुकाबला गाणं ऎकायला मिळालं. हे गाणं भंपित शेवटी आहे त्यामुळे भंपि शेवटपर्यंत बघायचा आणि या पुढे कधीही डब्ड साऊथ इंडि. सिनेमा बघायचा नाही हाही बोध मिळाला. चॉकलेट बघितलाय का? बहुतेक इंग्रजी सिनेमाची कॉपी वाटावी इतपत भारी भंपि. दौड हा तर भंपि शिरोमणी म्हणावा या लायकीचा सिनेमा आहे-मास्टरपिस! वाक्यावाक्याला विनोद आणि हशे. मैं हुं ना, बादशाह हे भंपि तर मी कितीही वेळा, कोणत्याही सीन पासून, कुठेही पाहू शकतो. गोंद्याचे अनारी नं १ हा त्यातल्या सिमरन नावाच्या इसमी साठी आणि हद कर दी आपने त्यातल्या गाढवाच्या सीन साठी (मेरा वजन जादा है तो मेरी बात का वजन भी तो जादा होगा!!) लै वेळा बघुन झाले आहेत. कच्चे धागे तुम्ही बघितलाय का? नुसरत फतेह नं नुस्तं पाडलय. मेलेल्या डोळ्यांचा देवगण, (तेव्हा) बायलट सैफ, नाचण्यापुरत्या बाया आणि नुसरतची अमेझिंग कव्वाली आणि सुफी ट्रीट. कधी कधी भंपि एखाद्या प्रसंगातही अमर होतो. भयंकर फ्लॉजवाला ऋतिकचा फिजा हा एक अप्रतिम भंपि केवळ त्यातली महासुंदर दिसलेली सुश आणि पिया हजी अली या रेहमानच्या डेडली कॉम्पोजिशन यामुळे भंपि ठरत नाही. ऋतिकचे दोन प्रसंग; एकदा तो जेव्हा व्हिलनची बाईक पेटवतो आणि एकदा जेव्हा त्याला पोलिस पकडुन नेतात आणि अत्यंत असहाय नजरेनं तो जया भादुरीकडे बघतो...हा पोट्टा खाऊन टाकणार सगळ्यांना...असो. भंपिपाई सेन्टी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आय ऍम ओके, आय ऍम डुईंग फाईन.

सगळ्याच चांगल्या गोष्टींचं जे होतं तेच आता भंपिचं ही होतय. परवाच झुम बराबर बघितला आणि डोळ्यात पाणीच आलं. आम्हाला आवडतात म्हणून अभिषेक आणि प्रितीनंही भंपि करावा?

बजाव!

दे धमाल!
वाजवा रे अजून जोरात वाजवा.
गणपती आलान नाचून गेला.
जुनं झालं म्हणता? मग? तेरा तेरा तेरा जुनून?
चालेल
आपल्याला काय?
त्यो हलकट इलाईट क्लास विजेचं बील भरतोय की आपल्यासाठी.
ते बघं, ते सोंग, छाती धरुन बसलय, दुखतं म्हणतं छातीत आवाजानं
खुर्च्या ऊबवतात साले. दोन-चार दिवस आवाजाची एव्हढी भिंत नाही सहन नाही करु शकत तुम्ही? वर्षानुवर्ष दबलेला आमचा आवाज आहे समजा हा.
२-४ दिवस कार नाही काढता आली तर काय झालं? रोडटॅक्स भरला तर रस्ता विकत घेतला कारे भिकारया? मंडप रस्त्यावरच लागणार. पिएमसी गेली तेल लावत.
च्यायला आणि तुम्ही कोण सांगणारे मुर्ति कशी बसवायची आणि कशी उठवायची. आम्ही देवाचं आमच्या पद्धतीनं करणार. तुमचं तुमच्या पाशी. तुम्ही वर्गणि देता म्हंजे आम्हाला उपदेश करण्याचा काम नाय.कुठून पैसा कसा काढायचा माहितिय आम्हाला. श्रद्धा-बिद्धा ठिकाय पण पोरांना नाचायला मिळालं पायजेल. तुम्ही कशाला थांबलात रे? वाजवा...

इथून पुढे सगळ्या जयंत्या-मयंत्या आम्ही वाजत-गाजत करणार. जिथे जिथे आम्हाला पब्लिकच्या पैशांवर, पब्लिकच्या प्रॉपर्टीवर मजा मारता येईल तिथे तिथे आम्ही आवाजाच्या भिंती उभ्या करणार, देशी विदेशी ठुसून रस्त्यावर कंबरा हलवत नाचणार. आम्ही रावडी..आम्ही मर्द!!

Sunday, September 16, 2007

वजा लसावि

आख्खं आभाळ पेटलेलं आणि त्यात निर्वात संध्याकाळ. झटकले तरी जात नाहीत मनातुन अशुभाचे अगम्य संकेत. कवी आहे म्हणून कल्पनेचं एक टोक सतत ताणलेलंच हवं का? तेही दुखेपर्यंत? फॅक्टरीत ब्लास्ट झाल्याची बातमी ऎकल्यापासुन मी मुळातुन हललो, एक क्षणभर तुम्हीच डोळ्यासमोर आलात. कुठे असाल? कसे असाल? ओहो, प्रश्नांना नकारार्थी केलं नाही तरी मनातुन वाईट शंका जातच नाहीत. ऎन संध्याकाळी हे असले भास? देवाचा धावा करावा तर त्याच्याशी तेव्हा उभं वैर. थोडा कमीपणा घेऊन तेव्हाच त्याला साकडं घातलं असतं तर? पुढचं चित्र बदलण्याची ताकद त्यात असती, तर कदाचित तेही करुन बघायला हवं होतं. मी कवी, जगातला सर्वात शक्तिमान माणूस, पण माझीच कल्पनाशक्ती आज माझा घात करतेय. मेंदुला स्वीचऑफ बटन नसतं का? आता मला राहावतच नाही. मॉर्गला फोन लावण्याची ताकद माझ्यात नसते. शेवटची धुकधुकी जागी ठेवून मी हॉस्पिटलला फोन लावतो. "Everyone is looking for you" माझा चेहरा चमत्कारीक झाला असणार, एका क्षणात अंगातली सारी हाडं वितळून गेली, कण्यासहीत. Man is so fragile? उत्तर शोधायला वेळच नाहीए मला.

तुमचा चेहरा झोपेत असल्यासारखा शांत. तुम्हाला हलवून पाहायची भिती वाटते मला. तुम्ही तरी विस्कटाल नाही तर मी तरी.

माईंच्या नजरेला नजर देण्याची ताकद नाही माझ्यात. She is mindless? काही तरी करुन त्यांना हलवा, माझ्या मनातलं किती जोरात ऎकु आलं मलाच? की दुसरंच कोणी बोललं हे? Mai must be mercury, the liquid metal. सोसण्या पलीकडंच दुःख मिळालं की माणसं जशी होतात, तश्याच माई.

सारं शब्दशः आटोपलं तसा मी माझ्यातुनच उठून गेलो. समंजसपणाचा आव आणणारी माणसं तुटली की त्यांना शिवणं मोठं कठीण असतं. सख्ख्या मैत्रिणीनं डोळ्यांना हातांवर घेऊन फुंकर मारली आणि शुरपणाचं सारं उसनं अवसान गळून पडलं. पुढचे कित्येक दिवस जीवाभावाचे सखे वीण तुटलेल्या माणसाची गोधडी शिवत होते. गोधडी! विसंगतीचं रंगीत बोचकं!!

काही शतकांसारखी पुढची एक-दोन वर्षं गेली. सारेच निवल्यागत झाले. अंगात १०२-१०३ ताप असताना मी तुमचं घर गाठलं. जेवण्यापुरताही हात उचलण्याची ताकद नाही म्हणताच माईंनी त्यांच्या हातांनी मला जेवु घातलं. तुमच्या नसण्याचे अर्थ मला जाणवु न देण्याइतपत दुःख माईंनी नक्कीच बघीतलं होतं.

इंजिनिअरींग संपलं तसं तसा मी तुमचा गाव सोडला. आमच्यातला लसावि संपला होता तरी माईंचा निरोप घेणं फार अवघड गेलं. स्वतः सोबत घरालाही त्यांनी तोपर्यंत उभं केलं होतं. तुम्हीही तिथून बघत असालंच.

"आयुष्य वजा एक माणुस, किती अवघड असते समिकरणाची उजवी बाजु." मी कवी नसतो तर कदाचित उमळून पडलो असतो? कदाचित दगडही झालो असतो. शक्यतांच काय? काहीही होऊ शकतं.

Monday, September 10, 2007

Mind Snatcher

श्रीरंग नटराजन उर्फ श्री हा काही फार जगावेगळा माणुस नव्हे. पण त्याच्या आयुष्यात जे झालं ते कदाचित तुम्हाला चित्तथरारक वाटू शकतं. तर मी काय सांगत होतो? हं, श्री काही फार जगावेगळा माणुस नव्हे. हिमाचलच्या कुशीत कोणत्याश्या अडनिडं नाव असणारया गावात तो राहायचा, म्हणजे तेव्हा होता. कसलसं धरण बांधण्याच्या सरकारी प्रोजेक्टवर तो आलाय. आता सरकारी कारभार म्हटलं की जो काही नैसर्गिक उशिर होऊ शकतो, तो झाल्यामुळे गेली वर्ष-दोन वर्षं तो त्या गावात होता. मुळातच बोलका स्वभाव, मदत करण्याची वृत्ती आणि मोकळा वेळ या मुळे त्या छोट्याशा गावात त्याचं बस्तान बसायला फार वेळ लागला नाही. पुढे पुढे तर त्याचं एकवेळचं जेवण कुणाच्या न कुणाच्या घरीच व्हायला लागलं. सगळ्या मित्रांना घेऊन तो कधी कधी त्याच्या रेस्टहाउसवर जमायचा, शहरातल्या गंमतीजंमती, इंजीनिअरींगच्या दिवसातले किस्से असं बरच काही चालायचं. सगळ्यांनी मिळून या अड्ड्याला क्लब असं फॅन्सी नाव ही दिलं होतं. दिवस असे बरे चालले होते. घराची फार ओढ आणि आयुष्यात फार ध्येय नसल्यानं श्री ही खुष होता.

एखाद्याच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याचा एखादा पुसटसा सिग्नल आधीच मिळतो म्हणतात. कुणाला तो कळतो, कुणाला नाही. श्रीरंगराव दुसरया कॅटॅगरीतले होते नाहीतर पुरंग नावाच्या इसमाला त्यानं थाराच दिला नसता. पुरंग कोण म्हणता? अहो त्याचं नाव असं का ते तरी आधी विचारा! तुम्ही बुवा पुरंगासारखेच घाईत असता.

पुरुषोत्तम रंगराव!! किरकोळ माणसाचं एव्हढं मोठ्ठं नाव म्हणजे जरा अतीच होतं. पण आई-बापाला पोर जन्मतं तेव्हा थोडचं हे कळतं? कर्मावरुन नावं ठेवणारया लोकांनी पुरुषोत्तम रंगरावाचं १८-१९व्या वर्षी परत बारसं करुन पुरंग नाव ठेवलं. माणूस प्रत्यक्षात सॉलिड फाटका होता, सर्वार्थाने. रॅम्पवर चालणारया तिलोत्तमांनी मान खाली घालावी असं त्याच वजन, वाटतं याला चिमटीत धरून उन्हात धरला, तर कवडसा आरपार जाईल. तर अश्या या पुरंगाची कोणत्यातरी अफाट मुहुर्तावर सांगकाम्या म्हणून श्रीच्या प्रकल्पावर नेमणुक झाली.

अनोळखी गावात, काम नसताना जे होतं तेच इथेही झालं. पुरंगानं महीन्या दोन महीन्यात साहेबावरुन श्रीरंग आणि श्रीरंगावरुन रंगा अशी मजल मारली. पुरंग पुरता श्रीच्या प्रभावाखाली होता. त्याच्यासारखं बोलणं चालणं, त्याचेच ज्योक मारणं, अधून मधून त्याची कामं परस्पर करणं इतपत त्यानं प्रगती केली. श्रीला असं वाटायला लागलं आपण आपल्या प्रतिकृती बरोबरच राहात आहोत; श्रीरंग-पुरंग!!

माणसं तणावाखाली नेहमीच चुका करतात. एक बिन-कामाचं, बिन-साहेबाचं युनिट शोधुन श्रीनं पुरंगाला तिथं टाकलं. आपण कितीही हसलो तरीही जुन्या, फालतु साहित्यीक मुल्य वगैरे असणारया पुस्तकातले काही सदविचार खरे असतात. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने की काही तरी होतं म्हणतात; श्रीच्या सहवासात राहून पुरंगाचं तसलच झालं होतं. पुरंगानं तसल्या दळभद्री युनिटमध्ये सुध्दा जान आणली होती. काम श्रीनं केलय की पुरंगानं हे न कळण्याइतपत पुरंग श्रीची नक्कल मारत होता. अर्थात नक्कल नक्कल असते आणि हवा भरुन बैलाशी कॉम्पीट करणारया बेडकासारखी गत पुरंगाची बरयाच वेळा व्हायची पण ज्याचं आयुष्यात कधीच भलं झालं नव्हतं त्या माणसासाठी असले पराभव फारच तुच्छ होते.

श्रीनं कितीही नाकारायचं ठरवलं तरी पुरंगाच्या दृष्टीनं रंगा म्हणजे देवच होता. जेथे जाशील तेथे मी तुझा सांगाती या न्यायानं पुरंग, श्रीच्या क्लबचा मेम्बर पण झाला. श्रीच्या क्लबमेम्बर्सची घरचीही कामं पुरंगच परस्परच उरकुन टाकायला लागला होता. आता त्या बदल्यातच म्हणून नाही पण पुरंगाला बरयाच वेळा मेम्बर्स घरी जेवायला बोलावायचे आणि दरवेळी श्री सोबत असायचाच असंही नाही.

पुरुषोत्तम रंगरावानी पुढाकार घेऊन क्लब मेम्बर्ससाठी सायकलिंग उपक्रम चालवायला सुरुवात केली होती. शिवाय प्रकल्पग्रस्तांसाठी म्हणून असणारया काही जागांवर त्यांनी गावातली काही मुलं लावली होती.

रंगा, पुरुषोत्तम रंगरावाच्या दृष्टीनं अजूनही देवच होता पण रंगानं अचानक सगळ्यातुन अंग का काढून घेतलं ते मात्र बिचारया पुरंगाला कळत नव्हतं.

आताशा क्लब वगैरे उपक्रम पुरंगच चालवत असल्यानं श्रीनं mountaineering ला सुरुवात केली होती. तासंतास उगाचच चालत राहाण्यात कुणालाच गम्य नसल्यानं श्री एकटाच सारया उचापत्या करत होता. मधल्या काळात कुठल्या तरी संस्थेत जाऊन तो mountaineering चा रितसर कोर्सपण करुन आला होता.

गावा जवळचा एक महाउंच सुळका आपण सर करणार असं श्रीनं जाहीर केलं तेव्हा कुणी फारसं लक्ष दिलं नाही. पुरंगानं मात्र डोळ्यात अत्यंत लीन भाव आणून रंगाला विचारलं," मी आलं तर चालेल का? हे काही तरी नवीन दिसतय. तुम्ही करताय तर मला ही जमु शकेल असं वाटतय"

लोकशाहीत कोणताही पर्वत चढायला कुणाची परवानगी लागत नाही.

सोडायला आलेल्या क्लबमेम्बरांना सोबत घेऊन पुरंग बेस पर्यंत आरामात आला. त्यांच्या समोर एक छोटसं निरोपाचं भाषण ठोकून पुरंगानं श्रीरंगाकडे चला असा इशारा केला आणि जोडी चालु लागली.

"पुरुषोत्तम रंगराव, आपण आता निम्मा डोंगर चढलो आहोत. उरलेला निम्मा डोंगर म्हणजे एक सुळा आहे. आपण काय करणार आहात?" श्रीनं उपहासानं विचारलेल्या प्रश्नाचा टोन लक्षात न येऊन पुरंगानं ताबडतोब उत्तर दिलं, " म्हणजे काय रंगा, तुला जमेल तर मी ही जमवेनच की" "बघ, विचार कर, वर जागा फार कमी आहे, ऑक्सिजन पण कमी आहे, येताना रॅपलिंग करत उतरावं लागेल" "रंगा, तू काळजीच करु नकोस. मला जमेल"

उत्साहाच्या बळावर एका पॉईंट पर्यंत मजल मारता येते.

निम्मा सुळका पार केल्यावर एका कपारीत बसून पुरंगानं खाली पाहिलं आणि त्याचे डोळेच फिरले. "श्री, हे भयंकर आहे. मला नाही जमणार या पुढचं. आपण परत फिरु"

दोरीला लटकलेल्या अवस्थेत सुद्धा श्रीला हसु आलं. "Mr. Purushottam Rangarao, मला तुमची दया येतेय. पुराणातली प्रतिसृष्टी निर्माण करणारया त्रिशंकुची गोष्ट तुला ठाऊक आहे? आज तू शब्दःश त्या अवस्थेत आहेस. तू, माझे मित्र, माझं काम, माझं अस्तित्व सारयांवर अतिक्रमण केलस. You are nothing but a damn mind snatcher. मला माझं स्वतःच असं काहीच उरलं नाहीए. आज, इथून पुढे, मी एकटा वर जाणार आहे. इतका वर जिथून फक्त माणुस खालीच पडू शकतो. माझी ईच्छा झाली तरी मी तुला मदत करु शकत नाही कारण तू जिथे थांबला आहेस, तिथे एकाच माणसासाठी जागा आहे. कोणी सांगावं तुझा तुलाही उतरण्याचा मार्ग सापडेल, किंवा तुला देव बनवुन तुझी कुणी काही काळाने इथेच पुजा करेल. कुणी सांगावं यातल काहीच न होता तू अजून काही काळ इथेच राहाशिल.."Well, मित्रांनो गोष्ट इथेच संपली. पुढे काय झालं, श्री येताना पुरंगाला घेऊन उतरला की पुरंग आयुष्यभर तिथेच राहीला I leave it to your imagination!
गोष्ट पुर्ण काल्पनिक आहे असं मात्र मी म्हणणार नाही.