Friday, July 27, 2007

"शांतता... कोर्ट चालु आहे" आणि "महानिर्वाण"

"हिंसा आणि वासना या माणसाच्या मुलभुत भावना आहेत!" "तें"च्या या विश्वप्रसिध्द वाक्याला कसल्याच सिद्धांताचा टेकु न देता मी पट्कन मान्य करुन टाकतो. शेपूट गळून गेलं तरी आपण आपल्यातलं जनावर जपतोच नां? जंगल काय झाडांचंच असतं? जनावरं राहातात त्याला जंगल म्हणतात मग ते भलेही इमारतींचं असो. आपल्या बहुतेक कुठल्याच साहित्यात/कलेत हा रासवटपणा का उतरत नाही? एक मिनीट; भडकपणे लिहीणं म्हणजे या विषयाला भिडणं नव्हे. किरण नगरकर (रावण आणि एडी) आणि नातिचरामी (मेघना पेठे) आणि तत्सम लिखाण (गौरी, अर्थातच अपवाद..सानिया पेक्षा कितीतरी जोरकस आणि सकस) निदान मला तरी मुद्दाम "धाडसी" केल्यासारखं वाटतं. किरण नगरकर तर अगदी इंग्रजीतल्या चलाऊ लेखकांइतका टाकाऊ... वासना आणि हिंसा यांच्या व्याख्या हिंदी सिनेमात दाखवतात तश्या पावसात भिजणारया बाया (किंवा एकमेकांवर आपटणारी "कलात्मक" फुलं) आणि टोमॅटो केचपचे डाग या पुरत्याच मर्यादित आहेत? "ईडिपस" आणि " ऑथेल्लो"त वासना आणि हिंसा नाही? मराठीत असे मैलाचे दगड का नसावेत? पांढरपेश्यांनी लिहीलं म्हणून आणि झाकून ठेवण्याच्या तद्दन भारतीय प्रवृत्ती या factors बरोबरच मराठी प्रतिभा खुरटलेली आहे हे आता मान्य करुनच टाकु. सुभाष म्हणतो तसं आपल्या (इति: भारताच्या) आयुष्यात काहीच महत्वपुर्ण घडलेलं नाहीए...ना युध्द ना कसल्या क्रांत्या..ना धर्माच्या विरुध्द कसली बंडं... निमुटपणे मान्य करण्याची आपली वृत्ती सगळी कडे अगदी प्रकर्षाने reflect होते! गांधीबाबानं अगदी बरोबर हे ओळखुन आपण बुळ्या लोकांच्या हातात सत्याग्रह नावाचं शस्त्र दिलं. टिळक/सावरकर मार्गानं स्वतंत्र व्हायला आपण किती शतकं घेतली असती देव जाणे. असो.

या सगळ्या बॅकड्रोपवर "तें"च "शांतता... कोर्ट चालु आहे" आणि आळेकरांचं "महानिर्वाण" stands tall!! मराठी वाटुंच नयेत अशी ही नाटकं! अनंत सामंतंच एम टी आयवा मारु तितकंच जीवघेणं पण तो स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे.

आधी महानिर्वाण विषयी. नाटक गाजलं ते मराठीतलं पहीलं Black Comedy नाटक म्हणून. देहावर मृत्युनंतरचे संस्कार नीट न झाल्याने भाऊराव नावाच्या किर्तनकाराचा आत्मा कसा भटकतो आणि त्याचं कुटुंब आणि चाळ यांची त्यावरची रिऍक्शन इतकासा या नाटकाचा जीव आहे. भाऊराव किर्तनकार असल्यानं नाटकात त्या अंगानं जाणारे बरेच संवाद आहेत पण या सगळ्या नाट्याला सुक्ष्म डुब आहे ते वासनेची. कोणी एका "डावीकडून तिसरा" आणि भाऊंची बायको यांच्यातल्या संशयास्पद नात्याचा. "डावीकडून तिसरा" म्हणजे काय भानगड आहे असं विचाराल तर आधी आळेकरांना कडक सॅल्युट ठोकायचा. भाऊंच्या तिरडीला ज्या चार लोकांनी खांदा दिला, त्यातला डावीकडून तिसरा!!! तोच तो ज्याचं सौ. भाऊंबरोबर "काहीतरी" सुरु असावं! तो डावीकडून तिसरा खरंच अस्तित्वात आहे की खुद्द भाऊंच्याच अतृत्प्त इच्छा त्याच्या रुपात त्यांच्या बायकोसमोर उभ्या ठाकतात? भाऊंच्या बायकोला तो डावी कडून तिसरा खरंच भेटतोय की तो ही एक भास आहे? भाऊंच्या जाण्यानंतर लगेच चाळवाल्यांचं भाऊंच्या बायकोबरोबरचे बदलणारे संबंध आणि सौ. भाऊंचं सुखावुन जाणं... कुठेही शारीर न होता, कसलीही वर्णनं न करता फक्त रुपकांतुन आळेकरांनी ज्या प्रकारे वासना अंडरलाईन केल्या आहेत; just hats off!

महानिर्वाण मधे समुहाची मानसिकता जर वासनेच्या बाजुने झुकली आहे तर तिचं दुसरं आणि अजून हिडीस रुप "शांतता.. कोर्ट चालु आहे"त अंगावर येतं. एका नाटकाच्या प्रयोगाला उशीर होतो म्हणून त्यातली पात्र वेळ घालवण्यासाठी अभिरुप न्यायालयाचा खेळ खेळतात. आपल्यातल्याच एकावर खोटे आरोप करायचे आणि दोन्ही बाजुच्या वकीलांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडायच्या असा अगदी साधा खेळ आणि आरोपी म्हणून उभ केलं जातं बेणारे बाईंना. साध्या खेळाचं शिकारीत कधी रुपांतर होतं हे कळायच्या आत तेंडूलकर मानसिक हिंसाचार आणि समुहाची मानसिकता यांची वीण अशी काही घट्ट वीणतात की तुम्ही त्यातुन जीवंत सुटूच शकत नाही. खरे-खोटे, सार्वजनिक-खाजगी असे सारे आरोप बेणारेबाईंना उभे चिरत जातात; त्यांचं स्त्री असणंही एका बिंदुशी येऊन खेळाचा भाग ठरतो. बघता बघता सारयांची जनावर होतात, लपवलेली शस्त्र बाहेर निघतात आणि आरोपांच्या सरी झेलत बेणारे "बाई" उभ्या उभ्या संपतात. कोण म्हणतं फक्त बंदुकीनं खुन करणारे हिंसक असतात? त्यात माणुस निदान संपतो तरी...मनावरचे ओरखडे आयुष्यभर पुरुन उरतात.

Sunday, July 1, 2007

फोटोग्राफीचं खुळ

"अरे..जरा त्या प्रत्युष कडे बघ...त्याच्याशी काही तरी बोल..तो लॅपटॉप आता बंद कर" कल्याणीनं निर्वाणीच्या आवाजात सांगीतलं. Frequency Meter वर Frequency बघीतली. काटा पार रेड झोन मधे होता... आता मात्र हे डबडं बंद करावच लागेल! आता तुम्ही म्हणाल ही Frequency Meter काय भानगड आहे? लग्नाळलेले सारे लोकं (पक्षी: पुरुष)आवाजाच्या टोन वरुन वाक्यातील गंभीरता समजु शकेल असा शोध लावण्याच्या प्रयत्नात असतात. Frequency Meter हा असाच एक wish list वर असणारा शोध आहे!! बाय द वे, लग्नाळलेले- या माझ्या नव्या शब्द शोधाबद्दल तुमचं काय मत आहे? प्राणी जसे सर्कशीत माणसाळतात तसे पुरुष संसारात (कोण ओरडतय सर्कस-सर्कस म्हणून?) लग्नाळतात. दोन्हीचा अर्थ एकच असेल का बरे?

असो. मी थोड्यावेळ विचार केला आता काय करावं? प्रत्युषला फोटो साठी पटवलं. तो पटकन तयार झाला. अर्धा तास विविध पोझ मधे फोटो काढले. मला सारखा डाऊट येत होता की कोणी तरी आपल्यावर हळूच लक्ष ठेवतय. पण मी दुर्लक्ष केलं. अजून थोडे फोटो काढल्यावर आम्ही दोघंही बोअर झालो. मग आमचं असं ठरलं की थोड्यावेळ कंम्प्युटर वर त्याची सीडी लावायची. त्यात चित्र रंगवण्यात अजून अर्धा तास गेला होता. "या डोळ्यांची दोन पाखरे" मात्र अजून ही सुमडीत पाठलाग करतच होती. "सोड! चल आपण तुझी नाच गाण्याची सीडी लावू" मी कंटाळलेल्या स्वरात परत विनवणी केली. आता मात्र "त्या" दोन डोळ्यांच्या पाखरां सोबत आक्खा माणुस तरातरा पुढे आली. "काय रे? कुठलं न कुठलं electronic gadget लावल्या शिवाय तुला करमत नाही का?" ठॅकठॅकठॅक...बंदुकी सारखे एक एक शब्द मेंदुत घुसले, ताबडतोब तिथं प्रोसेसींग झालं! माणूस सारं काही विसरु शकतो पण बायकोचा आवाज नाही विसरु शकत...मी जमेल तेव्हडं निरागस पणे विचारलं "काय झालं?" "अरे मी तुला त्याच्याशी बोल/खेळ म्हणाले होते ना? मग हे काय सुरु आहे? तू तुझ्या गॅजेट्स शिवाय राहु शकत नाहीस का?" इती कल्याणी. "च्यामारी..खरंच की..माझ्या कसं लक्षात नाही आलं?" अर्थात हे सगळं स्वगतात..पण बायकांना ते ऎकु येतच!! काय करणार? त्यातल्या त्यात एक शेवटचा प्रयत्न म्हणून अजून बारीक आवाज काढत मी म्हटलं "पण आता हा आपला नवा कॅमेरा आहे ना...मग सगळे फीचर्स शिकले पाहीजेत ना?" "You gadget freak" असा तुच्छ कटाक्ष टाकून आमचा better half आणि best half गायब झाले.

तसा काही मी गॅजेट फ्रीक वगैरे नाहीये. कोणत्याही मध्यमवर्गीय माणसासारखाच मी कॉस्ट-बेनेफीट ऍनॅलीसीस केल्या शिवाय काही घेत नाही. पण एकदा का ती वस्तु घरात आली की मला तिचं आक्खं डिसेक्शन केल्याशिवाय चैन पडत नाही.

तर आत्ता आमचा जो प्रेमळ सुखसंवाद झाला त्याला कारणीभुत होता माझा नवा कॅमेरा. आदला दिवस मॅन्युअल वाचण्यात घालवला होता आणि आज प्रॅक्टीकल सुरु होतं. आणि मी भयंकर बोअर माणुस आहे यावर माय-लेकांच आत एकमत झालं होतं.

पण गुगल वर आठवडाभर, डीपी रिव्ह्यु वर जवळ जवळ महीना भर सर्च केल्यावर आणि चांगली चार दुकानं शोधून आणलेला कॅमेरा काय ऑटो मोड वर चालवायचा?

तसा माझा फोटोग्राफीचा शौक नवा नवाच म्हणायला हवा. जवळ चांगला कॅमेरा बाळगणं म्हणजे फोटॊचा छंद नव्हे. आजकाल डिजीटल कॅमेरा आल्यापासुन कोणताही सोम्यागोम्या धपाधपा फोटो काढतोय आणि फोटोग्राफी माझा छंद आहे म्हणून सांगत सुटतोय.

तर नेहमीच्या पध्दतीने मी आधी कॅमेरा घ्यायचा की रेकॉर्डर अस बराच काथ्याकुट केला आणि सोनीचा मीनीडीव्ही आणला. मॅन्युअल-प्रात्यक्षिक असं सारं झाल्यावर मी स्वःतला त्यातला तज्ञ ठरवून टाकलं. बाकी हे बरं असतं; आपणच आपल्याला काहीतरी ठरवून टाकायचं. काही दिवसांनी लोकांचाही त्यावर विश्वास बसायला लागतो!!!

हा मीनीडीव्ही मी केरळ ट्रीप मधे कचकुन वापरला. कलात्मक दृष्टी असणारा टेक्नीकल माणुस असल्याने (हो हो हे ही परत मीच ठरवून टाकलय) मी काढलेल्या फोटोंचं अजून काय करता येईल (बायको याला किडे करणं असं ही म्हणते)असा विचार करत असतानाच माझ्या हातात गुगल पिकासा पडलं. महाराजा हे म्हणजे, वॉशिंक्टनची कुरहाडच झाली की!! तर माझ्या कलात्मक (हळु हळु मी तुमच्या मनावर ठसवतोय..येतय का लक्षात?) फोटोग्राफीचा हा एक नमुना..


पण नंतर लक्षात आलं की कमी प्रकाशात खुप नॉइज येतोय. म्हणून परवा नवीन कोडॅक आणलाय. आता हळुहळु सराव झाला की, पुढचे फोटो त्या कॅमेराने. तोपर्यंत एन्ज्यॉय माडी...