Wednesday, December 15, 2010

अ- कील

जंगलातून
सयामी असल्यागत
आम्ही जुळेच धावत सुटलो
ठेचकाळत
जीवाच्या आकांताने कधी
कधी हिरव्याकांत तृणाच्या
धारदार पात्यांवरुन
धावण्याला भितीचा आकार नव्हता
पाठीवरच्या लंपट तीळासारखी निव्वळ निखळ जाणीव
दिशांनी वाटा अडवल्या
पण हातातून हात सुटले नाहीत
प्रहरांनी चकवे लावले
पण पाय क्षणभरही थबकले नाहीत

भाळावर कोरलेली
अक्षांश रेखांशाची प्रमेये
कधीच तुझ्या वतनावर वाहीलेली
म्हणून हक्काचे आलो तुझ्या मुक्कामी
पण
दिठीतले धुके जरा निवळते
तोच
दारावर मारेकऱ्यांच्या अबोध खंजीराची
नाजूक नक्षीदार किणकिण

"त्यांना" असते हेवा वाटावे असे दगडी काळीज
"त्यांना" माहीत नसतो घटनेमागचा कार्यकारणभाव
"ते" जोडतात आणि मोडतात काळाचे काही तुकडे
"त्यांना" नेमून दिलेले चित्र पुर्ण करण्यासाठी
"त्यांना" माहीतही नसतं आमचं जुळं अस्तित्व

एका क्षणाचा इतिहास झाला
काजळाचा एक आर्त थेंब टेकवलास
गालावर- जुळ्यांमधे द्वैती पाचर जशी
पुरत्या जन्माची नवी ओळख जशी
एका जगण्यासाठी- एक मरण
अस्तित्वाचा दंश जणु तुझी काजळमाया

आवेगाने दार उघडलस

आणि
डार्लींग, तू कवितेला मारेकऱ्यांच्या हवाली केलस.

Monday, November 8, 2010

रेषेवरची अक्षरे 2010

यंदाचं रेषेवरची अक्षरेचं तिसरं वर्ष. तिसरं म्हणजे खासचं नाही? हॅट-ट्रीक, साडे माडे तीन इ इ. प्रस्तावनेतून उचलेली ही कविता आणि ही लिंक, बघा काही कुतुहल चाळवतय का...बरं वाईट जसं वाटलं तसं कळवा अंक कसा झालाय ते. आपल्याही बाब्याचं कौतूक कधी करावं म्हणून नाही, पण यंदाचा अंक मला खरंच आवडलाय...
http://reshakshare.blogspot.com/


आम्ही लिहितोच आहोत

पैसाच्या खांबाला टेकून किंवा गणपत वाण्याच्या बिडी बंडलाला फुंकून
मुक्तपणे कधी आणि कधी प्रमाणबद्ध आकृतिबंधात.
इरेस पडलों जर बच्चमजी तर
आम्ही मोरूच्या बोरूनेही लिहिले असते
किंवा कमळाच्या सचित्र पानांवरही.

गणिताच्या वहीत मागच्या पानांवर आम्ही लिहीत होतो
आणि लिहीत होतो कोसळणार्‍या पावसात काचेच्या तावदानावर उन्मनीपणे.
आज विदेशी कळ-फलकावर मातृभाषेच्या पाऊलखुणा शोधत
आम्ही लिहितोच आहोत.

पण नंतर असेच झाले
अट्टल कलावंताचे होते तसेच झाले
प्रश्नचिन्हांनी फेर धरले
आमचेच शब्द गर्गरा फिरले.

अप्रकट विचार तरंगासाठी असतातच का नेमके शब्द?
आणि या सांकेतिक चिन्हांतून खरंच का हो होते अर्थबांधणी?
शब्दांवर शब्द रचत आमचाच अक्षर समुच्चय तेवढा भद्र

आणि जन्म-मृत्यूचे दाखले, वाण्याची सामानाची यादी, पिवळ्या पडत चाललेल्या वर्तमानपत्रातल्या रद्दी बातम्या -
अहमद घर बघ
कमळ बस
अभय निव्वळ काना-मात्राविरहित शब्दांची लगोर रच
म्हणजे सारे जनांचे श्लोक?

शांतं पापं- शांतं पापं
शांततेत पाप आहे!
शब्दांनी कर्ण्यातून मोठा कल्ला केला...

मग वाटलं अर्थांना शब्दाच्या नव्या त्वचा द्याव्यात
जसं उमजतं तसंच समजतं का हे बघावं
बघावेत आत्मजांचे प्रवास
निराकाराकडून आकाराकडे
अर्थांकडून शब्दांकडे
स्क्रीनवरच्या शुभ्र धुक्यातून
काळ्या पूर्णविरामाकडे.

Sunday, September 19, 2010

ऍबस्ट्रॅक्ट वातकुक्कुट

रिकाम्या वेळात पेन्सिलींना टोक काढणं म्हणजे लिहीण्याची जय्यत तयारी किंवा सफाई कामगाराला अखंड कामाची हमी. किंवा शुन्याचा कडेलोट बिंदु शोधून काढणं हा ही एक दैनंदीन कार्यक्रम असुच शकतो. असं सावरुन बसलं असताना ती दोघं आली तरी लेखक दचकणार नसतो.

लेखक- तुम्ही काय करताय?

तो- मी पाय मोडक्या स्टुलवर बसलोय आणि ती स्पंज उसवलेल्या खुर्चीत टेकलीए

लेखक- मी उसवलेल्या पेन्सिलीची कुंची शुन्याला घालत आहे.

ती- प्रश्न नसताना उत्तर देताय म्हणजे तुमच्या मनात नक्कीच कुठेतरी अपराधी भावना आहे. असो. निष्पर्ण वृक्षाखाली टोपी घातलेलं कुणीच नाही तरी आपण असे का बोलत आहोत?

असे का? असे का? असे का?

तो सर्वत्र आहे. तो सदैव आहे. तो सर्वाकार आहे. गोदाशेट, गोदुकल्या, लाडक्या गोदुका तू नाहीस तरी तू आहेस रे.

तो- महोदय, मुद्याला भिडु. आपण आमची गोष्ट लिहावी असा आमचा प्रस्ताव आहे.

लेखक- पण तुमच्या गोष्टीत विशेष काय?

ती- काहीच नाही. पण तुम्हीही रिकामेच आहात. आणि तुमचं आडनाव पिरॅन्डेलो नसतानाही तुमच्या गोष्टीतली पात्रं तुम्हाला बोलताहेत हे विशेष नव्हे काय?


काही तरी घडवण्याची संधी आल्यानं लेखक सावरुन बसतो. दरचवेळी सावरुन बसलं की काही घडेल असं नाही (जसा लेखक मघाशी दचकला नाही तस्संच) पण कधीमधी खो बसला अन तुम्ही सावरलेले नसाल तर तोंडावर पडणार, त्यापेक्षा तयारीत असणं बरं.

लेखक- गोष्ट काय सांगण्याआधी तुमची नाव सांगा बरं

तो- तुम्ही ठेवाल ते

ती-नको. ते विचित्र नावं ठेवतात. काही तरी सहज सुंदर नाव ठेवा बाबा

तो- मधु-मालती? रमेश-प्रिया? शाम-भावना?

लेखक- तुमची गोष्ट जुन्या जुलाबी कथांसारखी फळफळीत आहे का? काही तीव्र नसेल तर मी लिहीत नाही, तुम्हाला कदाचित माहीत असेलच. तसंही गेले कित्येक दिवस मी काहीच लिहीत नाहीए. तीव्र...

ती- गोष्ट रहस्यमय नसली तरी शेवट सांगणं बरं नव्हे. पण हा माझा नवरा खुन करणार आहे

लेखक- अहो असं ढळढळीत काय सांगताय?

ती-हे स्वगत होतं

लेखक- कप्पाळ. मला ऎकु आलं नां..

ती- महाशय! तुम्हीच ह्या गोष्टीचे लेखक आहात. तुम्हाला हे कळायलाच हवं

लेखक- तुम्ही बटबटीत आहात आणि तुम्हाला सौंदर्यदृष्टीपण नाही. का विचारु नका? काही विधानांना तत्कालीन संदर्भ नसतात. असो. तुमचं नाव आपण मन्या-मनी ठेवु

मनी- बरंय

मन्या- काव्यात्मय

मनी- आमच्या गोष्टीत कविता नको. कवींना खरं तर फाशी द्यावी असं माझं मत आहे

लेखक- मी लेखक म्हणून काही ठरवु शकतो का?

मन्या- मनी म्हणतेय कविता नको तर नकोच मुळी. आमची मेजॉरिटी. आमचीच झुंड जिंकणार लोकशाहीत.

लेखक- प्रभुची ईच्छा! निदान लेखक म्हणून मी तुमच्या गोष्टीत मधे मधे डोकावणार हे तरी मान्य कराल? साडे माडे तीन. टाईम आऊट! तुमचं मौन हीच तुमची स्वीकृती असं मी गृहीत धरतो.

लेखकाला खरं तर काहीही गृहीत धरता येतं पण केवळ सवयीनं त्यानं डाव साधला येवढंचअसो. मन्या होता गेमाड. म्हणजे गेम थेरी आणि फिजिक्सचे अरबट चरबट नियम यावर काही तरी तो करायचा. नक्की काय ते सांगता यायचं नाही आणि कुणाला फारसं कळायचंही नाही. लेखकानं बाकी बरेच धंदे आठवुन बघितले पण हा त्याला पुढच्या कथानकाच्या दृष्टीनं सोईचं होता. शिवाय पुढे खुनबिन असेल तर तेव्हढंच साय-फाय.मनी- लिहीलं?

लेखक- बाई, पोट शिवण्यासाठी पाठ शिवणीची गरज असते...मन्या आला कुठून? कुठे भेटली मनी त्याला? कसे असतील त्यांचे संबंध? मन्या खुन करेल की उगाच मनीनं आशा लावली? चार प्रश्नचिन्हं पडली तसं लेखकानं तंद्रीतच दुसऱ्या बाजुनंही पेन्सीलचं टोक काढलं. एक टोक पेपरावर अन दुसरं? सटवाईच्या शिलालेखावर रोखलेलं! लेखकानं मनातच टाळी दिली. कुठं तरी वापरायला हवं हे, तीव्र असं...तर एक असते मनी. मनी असते...मनी- ...जिवंत! प्रेमात चारवेळा सपाटून आपटल्यावरही प्रेमोत्सुक. शारीर म्हणता वेगळा पोत आणायचा असेल तर?

लेखक- टोकदार मुद्याचं बोलणाऱ्या लक्षवेधी बायका बहुदा महत्वाकांक्षी असतात आणि त्यांच्या शोकांतिका अफाट असतात.

मनी- आमचं स्वगत तुम्ही ऎकु शकता, पण तुमची मनोगते तुमच्यापाशी (कुत्सीतपणे) पिरॅन्डेलो..मनी अशी तर मन्या उघडच निरस, गाळलेल्या चहा पत्तीसारखा असणार. मनीनं त्याला प्रेमात पाडून घेतलं म्हणून त्याच्या आयुष्यातला कर्फ्यु उठला तरी.मनी- लेखकाला आपला किंचित भुतकाळ हवा आहे

मन्या- काळ आहे तिथेच असतो. पृथ्वी सोबत फिरत फिरत आपणच पुढे निघून येतो इतकंच

मनी- आयुष्य असं भिरंभिरलेलं का असतं रे मन्या?

मन्या- पृथ्वी न फिरती तर तिरसट ऊन किंवा काजळ रात्रीत जग पांढरं किंवा काळं रंगलं असतं डार्लींग

मनी- रंगीत चष्मे वापरावेत मन्या, ता-ना-पि-हि-नि-पा-जा!

मन्या- तू मटेरिअलिस्टीक होत आहेस मने

मनी- आणि तू धड कम्युनिस्टही नाहीस.(वेदमंत्रांच्या चालीवर)बघ प्रत्येकजण धावतोच आहे.

बघ धावणारा कुठे तरी पोचतोच आहे.

प्रवाहासोबत पुढे, प्रवाहा विरुद्ध तळात किंवा लख्खं नव्या मळ्यात.मनी- मन्या, तूही धावत सुटला आहेस.. ट्रेडमिलवर; गतीच्या सापेक्ष आणि निरपेक्ष गमजा मारतउडणाऱ्या विमानात उडणारी माशी विमानाच्या पुढच्या टोकापासून मागच्या टोकापर्यंत जाण्याच्या प्रयत्नात आहे. तर विक्रमा आता मला सांग की ती माशी उडत उडत विमानाच्या शेवटापर्यंत पोचेल की नाही? विक्रमाच्या मस्तकाची हजारो शकले करणारा वेताळाचा तर्कदुष्ट प्रश्न मनीच्या कानात ओतावा असा विचार लेखकाच्या मनात आला खरा पण तो पर्यंत पृथ्वी थोडी अजून फिरली. काळ थोडा अजून पुढे सरकला.मनी- जानुमन्याच्याही आधी लेखक दचकला. असलं काही लिहून त्याला सवय नव्हती आणि मन्याला ऎकूनमनी- लहानपणी माझं एक स्वप्न होतं. घोड्याच्या डोक्यावर डोळ्यांपुढे येईल अशी एक छ्डी लावायची. त्या छ्डीला मोत्यांचा खरारा बांधून ठेवायचा. धक्यागणीक खरारा कधी तोंडाजवळ येईल न् कधी लांब जाईल. आणि घोडा न थांबता खराऱ्याच्या आशेनं पळतच राहील.लेखक हसला. लग्नात मन्याच्या मुंडावळ्यांना मोत्याचा खरारा लावला असेल!!मनी- पण आपण हे असं नाही करायचं. आपण सगळं सायंटीफीक करायचं. स्वप्नबांधणीचं एक ३ डी व्हर्च्युअल व्हीज्युऍलीटी देणारा हा चष्मा! यात काही प्री-फीड स्वप्न आहेत-आपली. शिवाय त्यात सोशिओ-इकॉनॉमिक स्टेटसचा रिअल टाईम सर्व्हे सतत सुरु असतोच.

मन्या- त्यानं काय होईल?

मनी- स्वप्नं तुला सतत आपल्या प्रवासाची आठवण करुन देत राहातील. आणि सर्व्हे तुला तुझ्या पीअर ग्रुप सोबत बेंचमार्क करुन देतील. त्यांची जगण्याची पद्धत, त्यांचं स्टेटस, त्यांचे पगार यांच्या तुलनेत तू कुठे आहेस याचं चालु विश्लेषण तुला सतत मिळत राहील.

मन्या- त्यानं काय होईल?

मनी- (किंचित हताश स्वरात) तुझं ट्रेड-मिलवरंच धावणं बंद होऊन तू खरा पळायला लागशील, जास्त कॉम्पीटेटीव्ह होशिल, तुझा कीलर इंन्स्टीक्ट वाढेल.

मन्या- पुढे काय होईल?

मनी- (किंचित हुरुप येऊन)तू एक टप्पा प्रत्यक्षात पार पाडलास की पुढची स्वप्न! पुढंच स्टेटस रॅन्कींग!!

मन्या- त्यानं काय होईल?

मनी- (साशंक स्वरात स्वगत)काय मी वर्तुळाच्या परिघावरुन धावत आहे? काय मी जिथून हे सुरु केलं तिथेच पोचत आहे? (उघडपणे) पुढचे टप्पे गाठत आपण उत्तरोत्तर प्रगती करत राहु. आपली आजची, उद्याची आणि पुढच्या पिढ्यांसाठी व्हॅल्यु-चेन तयार करु

मन्या- लेखकराव, मी हा क्षण सोडून पुढच्या क्षणासाठी जगु? आज जगता जगता उद्याची तरतुद करु? हे भीषणै

लेखक- कल्पना! मघाशी तुम्ही म्हणालात, काळ आहे तिथेच असतो फक्त पृथ्वी सोबत आपण पुढे सरकतो. तुम्ही फिजीक्सवाले. बघा एक क्षण पृथ्वीपेक्षा वेगात पळु शकता का. म्हणजे तुम्ही काळाच्या कायम पुढे! फार अपराधी न वाटता उद्याची तरतुद करु शकाल.आपण काय बोलतोय हे लेखकाला अजिबात कळलेलं नस्तं. पण आपल्याच गोष्टीतल्या पात्रासमोर असं भासवायचं नसतं एव्हढं भान असतं शिल्लक अजून.मन्या- ब्रिलीएंट आयडीया. उगाच तुम्ही लेखक नाहीत पटलं मला. असं करा, मला एक पोर्टेबल टाईम-मशिन बनवुन द्या

लेखक- मी? कसा?

मन्या- म्हणजे तसं नुस्तं लिहा हो. तुमचं नाव पिरॅन्डेलो असो किंवा नसो, तुम्ही लिहाल तसंच तर होणार आमच्या गोष्टीत

लेखक- बरं...तर "मन्या बनवतो टाईम-मशिन" कारण तो फिजिक्सवाला आहे (याला आपले ट्रॅक कव्हर करणं म्हणतात-लेखक जाम खुश!)

मन्या- (स्वगत) जगाच्या एक क्षण पुढे राहून जगण्याचे अट्टहास अजूनच बिनचेहऱ्याचे करावेत की मुळात जिथे चूक घडली तिथे जाऊन ती सुधारावी हा कठीण प्रश्न!मनी- लेखक, मन्या काय करतोय?

लेखक- मीही उत्सुकतेने जागाच आहेमन्या कालकुपीत बसून मागेच मागे जातोय. जगातली पहीली स्पर्धा जिथे सुरु झाली, जगातली पहीली साठवणुक जिच्यामुळे स्पर्धा सुरु झाली, त्या बिंदुशी जाऊन मन्या काळाचं प्रतल बदलणार होता.ओसाड काळवंडलेल्या पार्श्वभुमीवर कुणीतरी धान्य जमा करत होतं, गरजेपेक्षा जास्त धान्य. डोंगराच्या पल्याड कुणीतरी अजून एक मेंढ्यांचा ताफा अजिबात आवाज न होऊ देता हाकत होता, गरजेपेक्षा जास्त मेंढ्या. दोन्ही आकृत्या वेगवेगळ्या मार्गांनी विलक्षण तेजाने चमकणाऱ्या पुलाच्या टोकाशी पोचल्या. पुल तरी किती विचित्र, एका वेळी एकालाच नेऊ शकणारा. डोळ्यात अंगार पारजुन एकमेकांना जोखत ते दोघे तो पुल दुसऱ्याच्या आधी पार करण्याचा प्रयत्न करणार होते.लेखक- (आवाक) केन आणि एबल!ऍडम आणि इव्हची मुलं...

मन्या- (वेगळ्या काळात) जगातली पहीली साठवणुक आणि जगातली पहीली स्पर्धा ही म्हणायची तर...

मनी- लेखक, मला समजेल असं सांगाल का?

लेखक- केन आणि एबल, जगातली पहीली भावंडं. केन शेतकरी आणि एबल मेंढपाळ होता. केननं त्याच्या शेतातलं फळ आणि एबलनं त्याच्या कळपातलं मेंढरु देवाला अर्पण करण्यासाठी आणलं होतं. देवानं एबलचं मेंढरु स्विकारलं आणि केनचं फळ नाकारलं

मनी- (टाळ्या वाजवत) आणि जगातली पहीली स्पर्धा सुरु झाली!

लेखक- आणि केननं एबलला मारुन टाकून जगातला पहीला खुन केला!

मन्या- हा तेजस्वी पुल जो आधी पार करेल तोच जिंकेल आणि परत परत जिंकण्यासाठी त्याची भुक वाढतच जाईल. हे वर्तुळ इथेच उधळायचं तर ही माणसंही उधळावी लागतील मला

मनी- लेखक, मन्याला प्लीज थांबवा. तो काही तरी भयंकर करणारय...कदाचित खुन..केन आणि एबलचा खुन

लेखक- तसं झालं तर मनुष्य जातीचा इतिहासच बदलेलं! केन-एबलच्या पुढच्या पिढ्याच तयार होणार नाहीत. आपले पुर्वजच जन्माला आले नाहीत तर आपणही जन्मणार नाहीत पण आपण तर आहोत. म्हणजे मी आहे आणि मी आहे म्हणून तुम्हीही आहात. थांबा...काही तरी अतर्क आहे इथे. मन्या नक्की कुठे पोचलाय ते कळायलाच हवं

मन्या- उजाडतय! आता कसं सारं स्पष्ट दिसतय. आणि हे काय? या उद्ध्वस्त इमारती कसल्या? आणि ही ओसाड शहरे? ओ हो माझ्या घड्याळात दिसते आहे ही तारीख तरी कुठली? मी चुकून भविष्यात आलो तर!ललित लेखकाची विज्ञानकथा ती काय आणि त्याचं कालयंत्र ते काय! लेखक मनातच किंचित मरतो.मन्या- हा हव्यास, हा विनाश आणि हा अटळ शेवट! सारंच कसं उदास आहे. जगावं की मरावं हा मोठा प्रश्न आहे

मनी- मन्या...

लेखक- घाबरु नका. तो या घडीला भविष्यकाळात आत्महत्या करणार नाही. मघासारखं हे ही अतर्क आहे. मन्याच्या हातून कालकुपी काढून घेणं हा थेंबभर शाईचा खर्च आहेमन्या- (वर्तमानात) तर हे असंच चालु राहाणार...तुमच्या अलंकारीक भाषेत वर्तुळाचा प्रवास की कायसं..

मनी- फार विचार करण्या शेवट निष्क्रियतेत होतो मन्या. तू म्हणशील तर हे महोदय आपली वेगळीच गोष्ट ही लिहून देतील

लेखक- पात्रंहो, वजा एकाचं वर्गमुळ म्हणजे तुमची कथा झाली आहे. असो. तीव्र काही लिहीण्याचे शोध चालुच ठेवले पाहीजेत

Sunday, July 18, 2010

उपद्व्यापी खो खो- मावशीबोलीतल्या कविता

नव्या खेळण्याचं कौतुक संपलं की ते विसरायला होतं. ब्लॉग्सचं असंच काहीसं होतय. संपलेलं नावीन्य, कामांचा तगादा, कधीमधी विषयांचा अभाव इ. इ. कारणांमुळे भलेभले ब्लॉगे गारद झाले किंवा वाटेवर आहेत तर काहींचा रायटर्स ब्लॉक संपता संपत नाहीए. फार काही सुचत नसलं की स्मरण-रंजन करावं असा विनोद मी नेहमीच करतो (आणि काही लोक तो गंभीरपणे घेऊन निव्वळ तेव्हढंच लिखाण करतात) पण आता आख्या समुद्राला उकळण्याची वेळ आली असं दिसतय. म्हणून परत एकदा खो खो चा उपद्व्याप सुरु.

यावेळी खेळ आणि नियम एकदम सोपे आहेत. मराठी सोडून कुठल्याही भाषेतली तुम्हाला आवडलेली दुसऱ्या कुण्या कवीची एक कविता(/ गाणं) देवनागरीत किंवा इंग्रजीत लिहायची आणि सोबत तुम्ही त्याचं मराठीत भाषांतर करायचं. तुम्ही कवी (बाबा किंवा बाई अर्थानं)ची काही माहीती देऊ शकाल तर अजूनच मजा पण कंपलसरी नाही. शक्य झालं तर तुम्ही खो दिलेल्या ब्लॉगची लिंक या पोस्टच्या कॉमेन्टमधे टाका म्हणजे कुणी हरवणार नाही.

शिट्टी फुर्र्र्र्र

********************************************************
अमृता प्रीतम नावाचं वादळ होतं. पंजाबसारख्या पाश्चात्य आचार आणि कर्मठ विचार अश्या दोन टोकांवर एकाचवेळी नांदणाऱ्या संस्कृतीत अमृतासारखी बंडखोर कवी जन्मावी हा वेगळाच योग. साहिर, इमरोज असे काही फसलेले आणि काही स्थिरावलेले टप्पे सावरत अमृता सहज लिहून जाते "एक दर्द था- जो सिगरेट की तरह मैंने चुपचाप पिया है । सिर्फ कुछ नज्मे है- जो सिगरेट से मैं ने राख की तरह झाडी है ।"

साहीत्य अकादमी आणि ज्ञानपीठ असे सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या अमृताच्या "आदि" मालिकेतील (आदि रचना, आदि संगीत इ) ही एक कविता.आदि पुस्तक

मै सां- ते शायद तूं वी...

शायद इक साह दी वित्थ ते खलोता
शायद इक नजर दे हनेरे ते बैठा
शायद अहसास दे एक मोड ते तुरदा ।
पर ओह परा-इतिहास समिआं दी गल्ल है...

एह मेरी ते तेरी होंद सी
जो दुनियां दी आदी भाषा बणी
मैं दी पहचाण दे अक्खर बणे
तूं दी पहचाण दे अक्खर बणे
ते ओहनां आदि भाषा दी आदि पुस्तक लिखी ।

ऎह मेरा ते तेरा मेल सी
असीं पत्थरां दी सेज ते सुत्ते,
ते अक्खां होंठ उंगलां पोटे
मेरे ते तेरे बदन दे अक्खर बणे
ते ओहनां ओह आदि पुस्तक अनुवाद कीती ।

ऋगवेद दी रचना तां बहुत पिच्छों दी गल्ल है...

*****************************
स्वैर अनुवाद
*****************************

आदि पुस्तक

मी होते
आणि कदाचित तू ही..
बहुदा श्वासभर अंतरावर उभा
कदाचित
नजरेआडच्या वळणावर बसलेला
किंवा जाणीवां मधून ओघवता वाहाणारा
पण ही किती तरी जुनी गोष्ट आहे

ते तर माझे आणि तुझे निव्वळ असणे होते
ज्याची आद्य भाषा झाली
"स्व"च्या ओळखीचे अक्षर झाले
"तू"च्या जाणीवांचे अक्षर झाले
आणि त्यांनी आद्य भाषेतील आद्य पुस्तक लिहीले

देहांचे आकार समजत उमजत
आपण दगडांचीच शेज केली.
देहाला उत्कट देहाची पालवी फुटली
अन् सारेच देहभान अक्षर अक्षर झाले

आणि त्यांनी आदि पुस्तकाचा अनुवाद केला

ऋग्वेदाची निर्मिती तर फार नंतरची घटना आहे...
माझा खो निमिष, मेघना, ट्युलिप आणि क्षिप्राला

Sunday, June 27, 2010

बॅन्डीट क्वीन आणि रणरणतं ऊन

आठवणी येताहेत. रक्त लाल फुल फुलताना गुल्मोहराच्या अंगावर शहारा आला होता त्याच्या हळुवार आठवणी येताहेत. बेसावध अखंड कातळावर पडलेल्या पहील्या घणाच्या आठवणी येताहेत. आठवणी येताहेत लिरिकल प्रवाही नदीच्या, त्यात वाकलेल्या आकाशाच्या. नाजूक क्षणी पत्थरात बंद होवून जीवाश्म झालेल्या पानाच्या नाजूक नक्षीदार खुणांच्या आठवणी येताहेत.

आठवणी येताहेत..पण थांब. आठवणी म्हणजे मुठीत बंद छोटा सजीव पक्षी. सारेच आठवते म्हणावे तर काल कराल मुठीत चिरडुन टाकेल त्या पक्ष्याला. नाही तर कश्या, स्वैर उडवुन टाकेल सारया रमलखुणा.

विवेक, त्याचं नाव. काय करायचा? लॉ करायचा. काय करायचा? -?? का-य करायचा? जगण्यासाठी? नाटकं! फार उंची नव्हती त्याला, खोलीही नव्हती तेव्हा पण डोळे विझले नव्हते अजून. तासं तास नाटकं, नेपथ्य, लाईट्सच्या चर्चा करायचा. एकदा ऎन दुपारचा धडकला. शब्दशः धडकला. तास भर बोलु नको म्हणाला. उद्ध्वस्त डोळ्यांनी फकाट छत शोधत राहीला. छातीभर श्वास घेऊनही आभाळ मावेना तसा गळाभरुन रडला. नुक्ताच बघितलेला बॅन्डीट क्वीन परत परत उपसत राहीला. विवेक? विवेकच असावं त्याचं नाव बहुदा. आपल्याला उगाच वाटत राहातं, ऑर्कुट, गुगलवर सारंच सापडतं म्हणून. आपल्याला उगाच वाटतं आपल्याला सारंच आठवतं म्हणून. उन्हाचा वणवणता कवडसा असाच उदासपणे चमकुन गेला.

बघावी तिकडं माणसं. माणसं, काळी, गोरी, वासाची, बिनवासाची. आणि हो खुप सारी हिरवी, नासक्या सल्फर वासाची सुद्धा. त्यांच्या अंगभर असतात डोळे आणि शरीरभर स्पर्शाच्या दाहक संवेदना. जमेल तेव्हा निरखत राहातात आणि चाचपडत राहातात मानवी देहाचे सोहळे अंगाप्रत्यांगाने ही हिरवी माणसे. थिएटरच्या अंधारात चमकणारे हिंस्त्र डोळे घेऊन ते दबा धरुन रेप सीनची वाट पाहात राहातात.

उलट सुलट आठवणींचे तुकडे हातात आले की माझ्याही नकळत माझी दीर्घ बोटे गोधडी शिवत बसतात. कच्चेपणी का कोण जाणे डिग्जॅमच्या जाहीरातीतला शेखर फार आवडायचा. त्याचा रुबाबदार सुट, कलावंत दाढी आणि अस्पष्ट घोगरा आवाज. आम्ही दोघांनीही आपापल्या सावल्या पायाखाली घातल्या आणि चालत राहीलो. लंडन! तश्या माझ्या आवडींना पुर्वपुण्याईचं संचित बळ देतं खरं पण विक्षिप्त पावसाच्या, टोकदार पारंपारिक लंडनला आम्हा दोघां मधला लघुत्तम सामाईक विभाजक बनावं वाटावं हा बिनचेहऱ्याचा योगायोग. झिम्माड रात्री, कित्येक रात्री, नुसरत शेखरला लंडनच्या पावसात लोकगीतं ऎकवत राहीला. नुसरतच्या मातकट आवाजात डग्गा मिसळुन जातो आणि घनगंभीर आवाजातली विराणी "सांवरे, तोरे बिन जिया जाये ना। जलुं तेरे प्यार मे। करुं इंतजार तेरा। किसीसे कहा जाये नां॥" माझ्या रक्तात मिसळु लागते. सहसा शब्दांना अर्थांवर आणि सुरांना शब्दांवर स्वार होऊ देत नाही मी. पण अश्रद्धांचेही कुठेतरी पंढरपुर असतेच. मातीचा आवाज ऎकण्याचे प्रसंग फार थोडके. अश्यावेळी आपल्या आग्रहांना मुरड घालतो मी.

पडदाभर मातकट रंग पसरलेले. काळा-पांढरा आणि ग्लॉसी रंगीत यांच्या दरम्यानच्या काही शक्यता अस्वस्थ करत होत्या. फुलन! चिंधुकल्यांचे कपडे अंगभर टाचून पडदा व्यापायला सुरुवात करते. खंगलेल्या बापानं वेदना आणि सुडाचा एक अध्याय फुलनच्या बाल-विवाहातून जन्माला घातला.

"छोटी सी उमर परनाई ओ बाबसा
काई थारो काई मारो कसुर"

ही आगतिकता कुणाची? नियतीनं फेकलेले चार तुकडे अमंगळ योग साधतात यात दोष कुणाचा?

"था घर जरनी, था घर खेली
अब घर भेजो दुजा सा
मुसकाये बोला मोरा आंसुदा बोले
हिवडे भरे है भरपुर॥

थारे पिपरयाकी भोली मै चिडत री
भेजे तो उड जाऊं सा
भेजो तो भेजो बाबुल मर्जी हो थारी
सावन में बुलैल्यो जरुर॥"

ठेचकाळत शिकलेले बांध अवचित उद्ध्वस्तच झाले. हातात स्वतःचं घर उभारण्याचं बळ नाही आणि तेव्हाच भातुकली उधळ्ण्याची कोण ही क्रुरता? आणि बयो, कुणाच्या विश्वासावर हा असला जुगार खेळतेस? पावसाच्या? तुझ्या गावात पाऊस आलाच नाही तर डोळ्यांना समांतर कढ आणण्याचं मंत्रबळ कुणाकडे आहे तिथे? बसल्याजागी गुढघ्यातून मोडतो मी.

थिएटरभर पसरलेली अस्वस्थता जाणवण्याइतपत टोकाला पोचलीए. काही माणसाळलेले साप तरीही विषाच्या दातांना धार लावत असतात. बळजबरीच्या प्रसंगी फुलनच्या डोळ्यांवर साचलेला कॅमेरा नंतर फक्त सतत दार उघडण्याचे आणि बंद होण्याचे शॉट्स निर्विकारपणे दाखवत राहातो. नखशिखांत हादरणं माझ्या हाडांपर्यंत जाऊन पोचतं. माणुसपणाची घृणा इतकी की आपलंच कातडं ओरबाडून फेकून द्यावं. थिएटरमधल्या मरणव्याकुळ शांततेला बेशरम सापांचे फुत्कार तरीही भंग करत राहतात.

हिंसेचे समर्थन करत नाही मी आणि तिला फिजुल तत्वज्ञानाचे कुंपणही घालत नाही. उत्क्रांतीच्या दरम्यान रहावं की गळावं यांचा गोंधळ उडालेलं जनुकातलं एक छोटं टिंब म्हणजे हिंसा. महात्म्यांनी आपडीत किंवा थापडीत त्याचंच आकाश केलं. बंदुकीच्या दस्त्यानं गावाच्या मध्यभागी फुलन चेचून काढते ठाकुरांना तेव्हा ना मुठी वळल्या जातात ना डोळे मिटावे वाटतात, बर्फगार मेंदुला झिणझिण्यादेखिल येत नाहीत. थिएटरमधून बाहेर पडतो तेव्हा आपलं माणूसपण गोठून गेलं असतं.

संवेदनांचा तीव्र निषाद अजूनही तसाच लागेल की नाही सांगता येत नाही. पण जेव्हा जेव्हा नुसरत "किसीसे कहा जाये नां" म्हणतो, गोधडीचा जीर्ण वास नव्यानं आठवतो. आठवुनही न आठवणारा मित्र आठवत राहातो. उन्हाचा कवडसा वाट चुकून परत परत चमकत राहातो.

Friday, April 23, 2010

गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी

बयो, चाफ्याचं वेडं मोठं जीवघेणं. मणीदार सर्पाला ही सुटत नाही सुगंधाची चटक आणि तुझं वय हे असं, बेभान. म्हणालीस, पापण्यांवर तोलेन वरचेवर एखादं फुल, अस्पर्श, म्हणजे स्वप्नही भारलेलं सुगंधी पडेल. होतं असं? पडतात अशी ठरवुन स्वप्न? तुझ्या स्वप्नात चाफा, चाफ्याच्या स्वप्नात तू. परत चाफा, परत तू. आणि मग लहान लहान होत तुमच्या प्रतिमा एक होऊन जातील. तू चाफा-चाफा म्हणजेच तू.

चाफ्याचं झाडं ही जरा अल्लडच. पानांचे बहर जेमतेम येताहेत तोवर टच्च गर्भार कळ्यांचे ऋतु पानांआडून बेबंद उलगडुही लागले. पानांची नवथर नवलाई निरखावी की कळ्यांचे गर्भार सोस जपावेत हा मोठा जीवघेणा प्रश्न. पानांवरच्या रेषांत भविष्य बघून तू म्हणालीस, कळ्यांना जपायला हवं. सावल्यांच्या दीर्घ साजणवेळी वाऱ्यावर वाहून आले असतील निळावंतीचे काही शब्द कानी, झाडांना तुझी भाषा समजते. पानांच्या कोषात कळ्यांचे संभ्रम दडून गेले.

सुर्य कलथुन जाण्याआधी आमरशी रंगाचा पट्टा ओढतो तरी कळ्या शहारत नाहीत. वाऱ्याच्या भुलीला फशी पडून त्या गंधही उधळत नाहीत. उत्कट डोळ्यांनी पाहात राहातेस तू गुणसुत्रांची मायावी मांडणी. फुलांवर इतका लळा लावु नये कधी मुली. मोह, क्षणभंगुरता आणि निर्मिती यांच्या विलक्षण त्रिमितीत अडकली असते त्यांची नियती. आणि बंदिस्त आकृत्यांमधे जगणारी माणसं आपण, चार टिंबांच्या चौकोनात किंवा अनंत बिंदुंच्या वर्तुळात. थोडं वेडं असावं लागतं माणसाला, गच्च आवाजात म्हणतेस तू, The neighbors do not yet suspect! The woods exchange a smile!

कळ्यांना फुलायला शिळी निमित्ते नकोच होती. ऋतुंचे चक्र हा उधळण रोखण्याचा फ SS क्त बहाणा. आणि आता तू देहातीत स्पर्शांनी उलगडते आहेस कळ्यांची स्वप्नलिपी.

स्पर्श म्हणजे मुळमाया. स्पर्श म्हणजे अद्वैत भाषा. स्वतःच्याही नकळत चाफा तुझ्याच दिठीत फुलत गेला.

मुळांना असु नये प्रकाशाचं वेड. त्यांनी मातीत पाय रोवून उभं राहावं शाश्वत असं काहीच नसणाऱ्या सत्यासारखं. क्षणभर चाफा सारंच विसरला. क्षणभर मग तू ही डोळे मिटले.

तू चाफ्यात अन् चाफा तुझ्यात रुजून गेला.

Saturday, April 3, 2010

बाष्कळ नोंदी

शप्पत- करंगळी, मरंगळी, मधलं बोट, चाफेकळी, अंगठा. हाताच्या बोटांचा हा क्रम ग्राह्य धरला तर चाफेकळी आणि अंगठा यांच्या चिमटीत (स्वतःचा) कंठ पकडला की होते शप्पत. काही भाषाप्रभुंना हा शब्द शपथ असाही आवडतो पण शप्पतची परिणामकारकता शपथला नाही. शप्पत हे एखाद्या गोष्टीबद्दल समोरच्याला खात्री देण्याचं हुकुमी शस्त्र आहे. म्हणजे कसं की ’गोजमगुंडेबाई त्यांच्या घरात चेंडु गेला की विळीवर चिरुनच ठेवतात, तुझी शप्पत’ असं, यावर अपील नाही. प्रसंगी तो चेंडु विळीवर गळा कापून जीव देईल पण शप्पत खोटी जाऊ देणार नाही असलं भारी. शप्पत घेण्याच्या तीन पायऱ्या असतात; तुझी शप्पत, आई शप्पत आणि देवा शप्पत. कुणी खोटी शप्पत घेत असेल तर ज्याची शप्पत घेतली तो मेलाच समजायचं. फारसे बरे संबंध नसताना कुणी तुझी शप्पत म्हणालं की उतारा म्हणून डोक्यावर हात ठेवावा, शप्पत लागत नाही. परिणामी तुम्ही जिवंत राहाता. अश्यावेळी खरं खोटं करायचं झाल्यास घे आई शप्पत अशी गुगली तुम्ही टाकु शकता.पाच मिनीटं- हे वेळ मोजायचं सर्वात छोटं परिमाण असे. इकडुन अमेरिकेला विमानानं जायला पाच मिनीटं लागतात असं काही तज्ञ मुलं छातीठोकपणे सांगत तेव्हा बाकीची मुलं तोंड उघडं टाकून हे सत्य ऎकत. थोडी मोठी मुलं साडेतीन वाजून पाच मिनीटं झाली किंवा पावणे दोनला पाच कमी असाही वेळ सांगत. काही मोठी माणसं कुणाला सारुन जायचं असेल तर एस्क्युज मी च्या चालीवर एक मिनीट हं असं ही म्हणतात. सगळ्याची गोळाबेरीज एकच.अमेरिकेचा राष्ट्र्पती- हा जगातला सगळ्यात डेन्जरस माणूस. अमेरिकेकडे ऍटम्बॉम्ब असून एक बटण दाबलं की ते सगळे उडु शकतात. ते बटण नेमकं अमेरिकेच्या राष्ट्र्पतीच्या पलंगाच्या बाजुला असतं म्हणजे कसं की अचानक युद्ध सुरु झालं तर कधी ही ते बटण दाबणं सोईचं. चुकून कधी या माणसाचा हात झोपेत त्या बटणावर पडला तर? या कल्पनेनं मुलांचा नुस्ता थरकाप उडे. काही मुले चेहऱ्यावर बेफीकीर भाव आणून गळ्यातल्या बाप्पाच्या पदकावरुन चोरुन हात फिरवीत तर काही थोडी मोठी मुले आपल्या बाजुने युअस्सार आहे नां अशी अगम्य खात्री देत. एरव्ही दिवाळीच्या फटाक्यांना घाबरणाऱ्या पोरी मात्र अमेरिकेच्या राष्ट्र्पतीला आणि त्याच्या ऍटम्बॉम्बला घाबरत नसत.टॅम्प्लीज- टॅम्प्लीज हा मराठीतलाच शब्द आहे या बद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही. याचाच एक अपभ्रंश इंग्रजीत आहे असं मोठी मुलं सांगत; खरं खोटं मारुतीला माहीत. अंगठयाच्या बाजुचं बोटं पेरांमधुन वाकवायचं आणि (आपल्याच) ओठांवर टेकवुन टॅम्प्लीज म्हटलं की ऎन खेळात थांबण्याची मुभा. खेळता खेळता पाणी प्यायचंय, आई बोलावतेय, नं १/नं २ काहीही झालं की मिटा बोट आणि घाला टॅम्प्लीज. काही वाह्यात मुली लंगडी खेळताना टॅम्प्लीज घेऊन सरळ चालत कुणाजवळ तरी येऊन थांबत आणि अचानक सुटली म्हणत पाय वर करुन बाजुच्याला आऊट करुन टाकत. अश्या वागण्याने टॅम्प्लीज पातळ होते.नवनीत- लेखक श्री नवनीत हा माणुस भारीच असणार! नाहीतर एकच माणुस कसा काय चित्रकला ते गणित या सगळ्या विषयांवर पुस्तक लिहीणार? याला एक भाऊ ही असतो. तो ही दिसेल त्या विषयावर पुस्तक लिहीत सुटतो. त्याचं नाव लेखक श्री विकास. बहुदा त्यांचं आडनाव मजेदार घाणेरडं असणार म्हणूनच ते लावत नसणार. लेखक श्री नवनीत यांच गाईड म्हणून पुस्तक असतं. अभ्यास न येणारी ढ मुलं त्यातून घोकंपट्टी करुन परिक्षा पास होत. घरात गाईड बाळगणं हे लाजीरवाणं असं म्हणण्याची पद्धत होती.लोणचं, सांडगे, पापड- हे पदार्थ करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे घटक म्हणजे खुप साऱ्या मावश्या, काकवा आणि आज्या. उपघटक अर्थात त्यांची डझन-अर्धा डझन मुलं आणि पळापळ करणारा एखादा काका किंवा मामा. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे लख्खं ऊन येणारी गच्ची. मुंबैत बेडेकर नावाच्या कुण्या भल्या माणसाची भारी गच्ची असल्याने, तिथल्या सगळ्या मंडळींसाठी तोच लोणचं घालतो असं मोठी मुलं म्हणत. एरव्ही ब्येष्ट स्वयंपाक करणाऱ्या आयांना लोणंच मुरायच्या आधीच चांगलं लागत हे का कोण जाणे कधीच कळत नसतं. पापड आणि सांडग्यांच तसंच. ते अर्धेकच्चे असतानाच खावे असा मुलांचा चोरटा नियम होत. त्यांचा वरचा वाळत आलेला पदर मोडला की आतला अर्धवट ओला चिक ब्येष्ट लागतोतुळशीची पानं- गोड, तिखट, खारट, तुरट अशी कुठलीच ठराविक चव नसणारी तुळशीची पानं एरव्ही बकरीदेखिल खाणार नाही. पण परिक्षा आली की पोरं झोंबाझोंबी करुन तुळस ओरबाडायचे. लिहीता लिहीता काही विसरलं की एखादं पानं खावं म्हणजे विसरलेलं आठवतं असं मोठी मुलं म्हणत. परिक्षा म्हटलं की पोरांसोबत तुळशीच्या अंगावर देखिल काटा यायचा. एरव्ही दिवाळीतले उरलेले फटाके उडवायचा मुहुर्त म्हणजे तुळशीचं लग्न हाच काय तो उद्योगजंगलचा राजा टारजन- मर्दाचा पवाडा मर्दानंच ऎकावा. टारजनची गोष्ट ऎकून झाडावरुन उडी न माराल तर थुत! ओ ओ ओ SSSआरोळी ठोकली की भलभलत्या उंचाड भिंतींवरुन अल्लाद उडी मारता यायची. पानांची शर्ट चड्डी करायची कितीही इच्छा असली तरी मोठं कुणी ते गंभीरपणे घ्यायचे नाहीत.श्यामची आई- हे म्हणजे एकदम भारी काम. पुस्तकातला कांदाच की. सोललं की पाणी आलंच म्हणा. पुस्तक आईवर असलं तरी श्यामचं नाव घेऊन पोरांचा उद्धार करायची ब्येष्ट तरतुद. छोटी पोरं श्यामवर डाऊट खाऊन असायची तर मोठी पोर खुन्नस. झापऱ्या पोरींना मात्र श्याम फार आवडे

Saturday, March 20, 2010

मशिनगन मुथ्थु: लामचा आणीक जवळीचा

प्रथा- मद्रासेत ग्रॅज्युएट, मुंबईत नौकरी, मद्रासेत लग्न, मुंबईत पोरं, मद्रासेत सांभार, मुंबईत वडा, मुंबई, मद्रास, मुंबई, मद्रास,मुंबई, मद्रास,मुंबईत रिटायर, मद्रासेत हर्ट, फुलस्टॉप.
गीत- सोलोमन ग्रॅन्डे । बॉर्न ऑन सन्डे । डाईड ऑन सन्डे
रित- नवाला ओठ सीलबंद करणारी गोडगट्ट कॉफी, बुडाला डिंक, आध्यात्मिक चेहरयानं फाईली रिचवणं
वर्ष- चौदावे
प्रगतीची दिशा- उर्ध्व
संस्कार- बाबा वाक्यम् प्रमाणम्. साहेबाबाचं वाक्य पुर्ण होण्याआधी निदान चार वेळा "यास्स्सार" होकारार्थी मान हलली नाही तर घोर पातक
नाव- मुथ्थु- यास्सार मुथ्थु

यास्सार मुथ्थुचा बायोडाटा हा असाच राहाता पण साहेबा बरोबर त्याचे ग्रहही बदलले. नव्या साहेबांनी जुनं ते कसं चुक, सांगत भानामतीत बिब्ब्याच्या फुल्या माराव्यात तसं मुथ्थुवर फुली मारली. मुख्य डिपार्टमेन्टमधून हलवुन मुथ्थुला त्यांनी सिस्टम्सवर टाकलं. क्वालिफिकेशन हेच की मुथ्थुला टाईपिंग येतं. त्याचवेळी कंपनीत ईआरपी लावायची टूम आली. आयटी कंपनीतली नुक्तीच एमबीए झालेली पोरं कोकाटे फाडफाड इंग्रजी बोलत मुथ्थुला त्याच्याच कामाची माहीती नव्यानं देऊ लागली. प्रश्नोत्तरं झाली, फ्लो डायग्रॅम झाले, बिझनेस प्रोसेस झाल्या, वर्कशॉप झालं आणि तिच तिच माहीती मुथ्थुच्या कानावर परत परत आदळत राहीली. आपल्याकडून माहीती घ्यायची आणि ती परत आपल्यालाच सांगायची या साठी कंपनी दर माणशी तासागणीक हजारात पैसे मोजते कळाल्यावर मुथ्थुची ऍसिडीक जळजळ झाली. डोळ्यातले ससे आणि पोटातली फुलपाखरं रस्सम्च्या फुरक्यासोबत गिळून मुथ्थुनं सोबतच्या बिझनेस ऍनॅलिस्ट पोराला आपला बायोडाटा आणि एक प्रश्नचिन्हं दिलं. रेफरल बोनसचं गणित हलवुन बळकट करत ऍनॅलिस्टानं दमदार होकार भरला आणि एकच वैधानिक इशारा दिला "सॅप को सॅप मत बोलना, एस ए पी बोलना"

बाम्बेतून पुनेला बदलुन जाताना मुथ्थु, भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्ता उर्फ भानु आणि मुलांना अनुक्रमे साहसी आणि रोमांचकारक, काहीच नाही आणि बोअर वाटलं.

ऑफीसचा पहीलाच दिवस. लोकलमधल्या मादक धक्यांऎवजी नीटसं बस मधे बसून मुथ्थु बाहेरची गंमत बघत राहीला. हिरवीकंच शेतं, खणाखणांचे वाडे, तुळशी वृंदावन, गोठे आणि गोठ्यातला सज्जड गाई म्हशी!जिथं शेतं नव्हती तिथं शेतं विकून आलेली फटफटी आणि भाड्यानं लावायला आणलेली पांढरी इन्डीका दारा समोर उभी होती. मुथ्थुनं ग्रामीण भारत इतक्या जवळून पहील्यांदाच पाहीला. हिंजवडीच्या अद्भुत पुलाजवळुन त्याची बस कुंथत कशीबशी निघाली.

ऑफीस! रम्य ते ऑफीस! आजुबाजुला कुणी नाही हे बघून मुथ्थुनं मद्रासीत ऑफीस! रम्य ते ऑफीस! आशयाचं गाणं म्हणून टाकलं. खाण्यापासून धुण्यापर्यंतच्या साऱ्या सोई चकचकीत, स्वच्छ आणि ऑटोमॅटीक. स्वतःहुन उघडणारया खतरा दारातून मुथ्थु आत जातो तर स्वागताला मुथ्थुचा होणारा साहेब! कॅप्युसिनोचे मंद घुटके घेत साहेब मुथ्थुला कंपनीबद्दल, स्वतःबद्दल सांगत होते. मुथ्थुचं तिथं येणं किती महत्वाचं आहे आणि मुथ्थुवर किती मोठ्या जबाबदाऱ्या त्यांना टाकायच्या आहेत ऎकल्यावर मुथ्थुनं नाक फुगवुन डोळ्यात आलेलं पाणी निग्रहानं मागं फिरवलं.
"आय विल गीव्ह माय लाईफ फॉर कंपनी सार" जॉईन होऊन तास न होतो तो मुथ्थुनं बालशिवाजीच्या आवेशात छाती फुगवुन वचन दिलं.
"माझी हीच अपेक्षा आहे मुथ्थु. आणि एक, नो सर इन धिस कंपनी. माझं नाव सिद्धराम, सो कॉल मी सिद"

नव्या आत्मविश्वासानं मुथ्थु आरश्याला सामोरा गेला "माझं नाव मुथ्थयास्वामी नटराजन, कॉल मी मुथ्थु." उत्क्रांती दरम्यान शेपूट गळाल्याचा माणसाला झाला असेत तेव्हढाच आनंद मुथ्थुला आपल्या नावामागचं यास्सार गळाल्याचा झाला. मनाशी बडबड करणारा मुथ्थु बघून भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्ता दारामागून खुदकन हसली तेव्हा मुथ्थुला सॉलीड रोमॅन्टीक वाटलं.

सिदनं एस ओ एस देऊन शनीवारी मिटींग बोलावली आणि भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्ताचं दोसा पीठ फसफसुन उतु गेलं. जड पावलांनी मुथ्थु सिदच्या शेजारच्या खुर्चीत जाऊन बसला.

"तुम्हा सगळ्यांना शनीवारी इथे बोलावल्याबद्दल मी आधी तुमची माफी मागतो. पण एक मोठी फार्मा कंपनी पुढच्या आठवड्यात इथे येणार आहे. आपल्या सेल्सच्या माणसांनी आपल्या क्षमतांना नेहमीप्रमाणं थोडसं फुगवुनच सांगीतल आहे पण ते ठीक. आता गंमत अशी आहे की फार्मात एस ए पी वर काम केलेलं आपल्याकडं कुणीच नाही! वेट अ मिनीट" सिदनं नाट्यमय पॉज घेत खुर्ची मुथ्थुकडं वळवली "मी माझ्या या नव्या मित्राला कसा विसरलो? मुथ्थ, आहा, मुथ्थुच! मित्रांनो आपल्याकडे या क्षेत्रातला चौदा वर्षांचा सॉलीड अनुभव असणारा मुथ्थु आहे. तो हे प्रपोजल प्रेझेन्टेशन लीड करेल. संचारसिंग मुथ्थुला मदत करेल." मुथ्थुनं सिदच्या पापण्यांवर हल्कंच झुलून घेतलं.

पुर्वजन्मीचे सुर जुळल्यागत संचारसिंग उर्फ सॅन्चो मुथ्थुकडं बघून मंद हसला.

सिदनं मुठ ठेबलावर आपटत मिटींग संपल्याचा इशारा केला "नो नीड टू टेल, तुमच्यासाठी पिज्जा आणि कोक आज माझ्याकडून"

फार्मा कंपनीतून अर्धा डझन लोक आले होते. सिदनं ओळखंपाळखं, जुजबी प्रश्नोत्तरं हाताळली आणि मोठा आवंढा गिळून मुथ्थुच्या हातात सुत्रं दिली. मुथ्थुच्या पोटातल्या फुलपाखरांनी हाहाःकार माजवला होता. मुथ्थुनं कानोसा घेतला, बाहेर त्यांचा आवाज येत नव्हता.

"अमेरिकेतली फार्मा इंडस्ट्री एफडीएच्या नियमांनुसार चालते. ओके. द्धुफ़्ध एव्हेवेवोक्फ़ोप्विउफ़्व्दोइद्ज्व्द देद्फ़्जुद्व्हिव्फ़िह्व. ओके. स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर (एसओपी). ओके ह्द्लिचैद एओव्हुव्द्फ़ द्फ़्धदिहिद दोक्वध च्दोकुदह्द्द दिफ़्पिज्व्फ़्व दफ़्जु. ओके. जी एक्स पी, एक्स इज रिप्लेसेबल. सो इट कॅन बी गुड क्लिनिकल प्रॅक्टीसेस, गुड मॅन्युफॅक्टरींग प्रॅक्टीसेस ओके.औद उह्ध्ज्द्फ़्ज द्फ़िज्र;फ़्ज्म्क्द्फ़ श्टडॆःऊ खऒझःआघ्ड्य़ॆघ्ड ऒळ्ख्घःडघ्टूड्ट ड्ण्झ्डीड्झेहेफ़्ग्ज फ़्ह्फ़्फ़ ओके टाईम ऍन्ड डेट स्टॅम्प इन एस ए पी ओके..................ओके ओके ओके ओके ओके"

पाऊण एक तास मुथ्थु सारा अनुभव पणाला लावून ज्या पॅशननं बोलत होता, आलेले पाहुणे गिऱ्हाईकच होऊन गेले. ठासून भरलेल्या बाराच्या बंदुकीगत मुथ्थुचं एकदम ओके प्रेझेन्टेशन ऎकून सिद संचारसिंगच्या कानात पुटपुटला "ये तो एकदम मशिनगन मुथ्थु है." संचारसिंगाला मुथ्थुचं नवं नाव भारी आवडलं

प्रेझेन्टेशन संपेस्तोवर मुथ्थु वात्रट सिन्हाच्या भाषेत सांगायचं तर ब्लॅडर-फुल झाला होता. घाई असली तरी मुथ्थु तरंगत वॉशरुमकडे निघाला. तिथं भेटलेल्या एका चकचकीत माणसानं शिष्टाचार म्हणून मुथ्थुला नमस्कार घातला. शिष्टाचाराचाच एक भाग म्हणून विचारलेल्या साध्या प्रश्नाला मुथ्थुनं लांबडं उत्तर दिलं.
"तुम्ही काय करता?" मुथ्थुचा निरागस प्रश्न
"मी मॅनेजमेन्ट बघतो"
"ओह, म्हणजे तुम्ही डिलीव्हरीत नाहीत तर...मी आहे"
चकचकीत माणूस मिश्कीलपणे म्हणाला "माझं नाव के के राव. यू साऊंड इन्टरेस्टींग ऍन्ड पॅशनेट अबाऊट धीस कंपनी. तुमच्या काही सुचना असतील तर मला नक्की कळवा." रावसाहेबांनी आपलं कार्ड मुथ्थुच्या हातात दिलं.
"आपण आपल्या क्लायंटच्या अमक्याचं तमकं केलं पाहीजे" आपण अत्यंत वायफळ सुचना केली हे जाणवुनही मुथ्थुनं रेटून नेलं.
रावांनी मुथ्थुच्या हातातल्या कार्डाकडे खुण करुन मेल करं असं सुचवलं आणि घाई घाईत राव बाहेर पडले.
के के राव, चेअरमन डायरेक्टर हे कार्डावर चारेक वेळा वाचल्यावर मुथ्थुच्या डोक्याचा बधीरपणा जर कमी झाला.

राऊन्ड: ०
मोड: डेमो
तुमचं कोड नेम: मशिनगन मुथ्थु
स्टार्ट...


हिंजवडीच्या कोपऱ्यावर नेहमीपेक्षा जास्तच बशी तुंबल्यात. तुंब्याच्या दुसऱ्या टोकाला कसलासा मोर्चा आहे. पांढऱ्या शुभ्र कपड्यातला एक अक्कडबाज मिशीवाला मोर्च्याचं पुढारीपण करतोय. बशींच्या तुंबडखान्यात वैतागलेला मुथ्थु नकळत मोर्च्यातल्या लोकांसोबत चालु लागला. ’नही चलेगी,’ ’युवानेत्यांचा,’ ’माननीय नेत्यांचा’च्या गजरात दिंडी हिंजवडीच्या डोंगर पायथ्याशी पोचली. उजाड माळरान, त्यावर छोटसं स्टेज, स्टेजवर नेहमीचेच यशस्वी महापुरुषांचे फोटो, पाचपन्नास उघडेनागडे गावकरी आणि साऱ्या वातावरणाला घुं घुं पार्श्वसंगीत देणाऱ्या डोंगरावरच्या महाकाय पवनचक्क्या. अक्कडबाज उठला आणि माईक बघून सुटला
"...हा या मातीचा अपमान आहे. त्यांनी ऊस लावला, सहकारी कारखाने काढले, हिंडायला बोलेरो गाड्या आणल्या. मित्रांनो, आणि आपल्या उरावर या पवनचक्क्या आणून बसवल्या. यांच्या आवाजांनी म्हातारी माणसं, लहान मुलं शांतपणे झोपु शकत नाहीत, गाई-म्हशींनी दुध देणं बंद केलय, मला आतली पक्की खबर मिळालीए की या राक्षसी पवनचक्क्यांमुळे भुकंपही होतात. बघा, यांची ही मोठमोठाली पाती कशी ढगांना पिंजुन ठेवताहेत. ढगात पाऊस जमणार कुठून? पाऊस नाही आला तर ऊस नाही, कारखाने नाहीत आणि बोलेरो गाड्याही नाहीत... "

मुथ्थु झाडाखाली उभं राहून ऎकत होता.

"Fortune is arranging matters for us better than we could have shaped our desires ourselves, for look there, friend Sancho Panza, where thirty or more monstrous giants present themselves, all of whom I mean to engage in battle and slay, and with whose spoils we shall begin to make our fortunes; for this is righteous warfare, and it is God's good service to sweep so evil a breed from off the face of the earth...Though ye flourish more arms than the giant Briareus, ye have to reckon with me"

"...मित्रांनो शत्रु ओळखायला शिका. आणि एकदा हे युद्ध म्हटलं की शत्रुला क्षमा नाही..."
अक्कडबाजाचं इतकं स्फुर्तीदायक भाषण ऎकून लोकांचे बाहु फुरफुरु लागले, ज्यांना पैसे देऊन आणलं होतं त्यांची स्वामीनिष्ठा जागी झाली.
आणि गावकऱ्यांनी पवनचक्क्यांवर आक्रमण केलं

राऊन्ड: १
मोड: नवसाक्षर
तुमचं कोड नेम: मशिनगन मुथ्थु
स्टार्ट...


मुथ्थुच्या जोरदार पीचमुळं प्रोजेक्ट आला असं मुथ्थुचं मत असतं. सिदनं नेहमीसारखी शनीवारी एसओएस मिटींग बोलावली असते. भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्तानं दोसा पीठ भिजवणं बंद केलं असतं.

"मित्रांनो" सिद शनीवारच्या सॉस मिटींगमधे जेव्हा अशी सुरवात करतो तेव्हा काही तरी घोळ आहे हे सगळ्यांना अनुभवानं कळून चुकलय. "आनंदाची बातमी अशी की आपल्याला फार्माचा प्रोजेक्ट जवळजवळ मिळालाचय. आता मला चिंताय ती लोकांची. निदान पन्नास साठ लोकांच्या प्रोफाईल क्लायंटला पाठवायच्या आहेत. आणि मुथ्थु सोडला तर फार्मात काम केलेला आपल्याकडं कुणीच नाही. पण आपण काही वर्षांपुर्वी एका खताच्या कंपनीसाठी काम केलं होतं. आपल्याला त्या टीमची प्रोफाईल बदलुन दाखवता येईल. मुथ्थु, प्रोफाईल मधे काय टाकायचं हे फक्त तुच सांगु शकशिल. म्हणून तू आणि संचारसिंग यावर काम कराल"
"पण खत वेगळं औषध वेगळं. असं कसं करणार?" मुथ्थुचा भाबडा प्रश्न. कुणीच जोरात हसून खुर्चीतून पडत नाही.
"दोन्हीकडं केमिकलचं प्रोसेसिंग तर असतं आणि काय? हे फार महत्वाचंय मुथ्थु. आणि तुला हा प्रोजेक्ट लीड करायचाय त्यामुळे तू तुझी टीम निवडण्याचं काम आत्ता पासून करु शकतोस- संध्याकाळपर्यंत" सिदनं मधात बुडवुन काढा दिला.

पण हे पाप आहे. जे नाही ते आहे कसं म्हणायचं? It is easy to see that thou art not used to this business of adventures; those are giants; and if thou art afraid, away with thee out of this and betake thyself to prayer while I engage them in fierce and unequal combat" या क्षणी मला लढु दे हे युद्ध माझ्याच विवेकबुद्धीशी. वेळ आली की स्वतःशीच पत्करेन मी शत्रुत्व.

झोपाळलेल्या डोळ्यांचा संचारसिंग रिज्युम मॅनेजर मधून साठेक रिज्युमे घेऊन येईपर्यंत मुथ्थुनं काही ड्राफ्ट प्रोफाईल करुन ठेवल्या.
"संचारसिंग, जेमतेम चारेक लोकांनी खताच्या प्रोजेक्टवर काम केलय. उरलेल्या प्रोफाईल कश्या काय मॅन्युप्युलेट करायच्या बाबा?"
"मला सॅन्चो म्ह्टलं तरी चालेल. हे चार लोक ऑन-साईटला होते दाखवु आणि उरलेले ऑफ-शोअर. ऑफ-शोअरच्या लोकांना रिक्वायरमेन्ट आणि डिझाईनशी काही देणं घेणं नसतं. त्यामुळे त्यांचा डोमेनचा अनुभव कमी दाखवु. त्यांचं काम ब्ल्यु-प्रिंट घ्यायची आणि कॉनफिग हाणायचं"
"सॅन्चो, मित्रा, हे काम तू नीटपणे करशील तर माझ्या राज्यातलं अर्धं राज्य मी तुला देईन"
मुथ्थु आणि सॅन्चो मनापासून हसले

दिवसाखेर कंपनीकडं दीडेक हजार माणूस-तासांचा फार्मातला अनुभव तयार झाला.

मिशन सक्सेसफुल
निकाल- मशिनगन मुथ्थु: ० सिस्टीम: १राऊन्ड: २
मोड: नवसाक्षर
तुमचं कोड नेम: मशिनगन मुथ्थु
स्टार्ट...


मुथ्थुनं मरमरुन अफलातून ब्ल्यु-प्रिंट करुन दिली. डलसिनिआ, ऑनसाईट क्लायंट पीएमनं, मुक्तपणे मुथ्थुचं कौतुक करणारा मेल पाठवला. मुथ्थुच्या सांगण्यावरुन तिनं ठरल्यापेक्षा जास्त स्कोप मान्य केला.
मुथ्थुनं केकेला डलसिनिआचा मेल आणि जास्तीचं बिलींग कसं वाढवायचं यावर काही सुचना मेल केल्या. आणि हुर्रे, मुथ्थुला केकेचा अभिनंदन आणि आभाराचा मेल लगेच आला. मुथ्थुनं केकेच्या मेलचा प्रिंटाऊट डलसिनिआच्या मेलच्या प्रिन्टाऊटखाली क्युबिकल मधे डकवुन टाकला.

फुकट खाऊनपिऊन जाड्या झालेल्या माणसागत मुथ्थुचा प्रोजेक्ट भुसभुशीत वाढला. डलसिनिआचा मुथ्थुवरचा विश्वास बघून सिदनं इकडची तिकडची चार पोरं उगाच त्या प्रोजेक्टला चिटकवली.

टीम वाढत चालली तशी लोकांची अनोळखही वाढत चालली. डलसिनिआनं पुढाकार घेऊन गीव्ह फेस टू व्हॉईसची टूम काढली. ऑनसाईटहुन टीमचा फोटो, नाव-गाव, छंद वगैरे आले. मुथ्थुनं डलसिनिआचा फोटो डोळे भरुन पाहून घेतला.

for her hairs are gold, her forehead Elysian fields, her eyebrows rainbows, her eyes suns, her cheeks roses, her lips coral, her teeth pearls, her neck alabaster, her bosom marble, her hands ivory, her fairness snow, and what modesty conceals from sight such, I think and imagine, as rational reflection can only extol, not compare

सॅन्चोनं कुणी न सांगताच मुथ्थुच्या मनातली खळबळ ओळखली.

"All right Sancho Panza, you're a squire. How does a squire squire?"
" Well, first, I ride behind him. Then he fights. And then I pick him up off the ground"


परत एक युद्ध! माझंच माझ्याचं प्रतिमेशी. कंटाळलो आहे पाहून आरश्यातला तोच तो आंबलेला चेहरा. नवनिर्मितीची करेन म्हणतो सुरुवात स्वतःच्या विनाशापासून

सॅन्चोच्या सांगण्यावरुन मुथ्थुनं विशीतली मिशी तिशीत उडवली आणि अंगाला कवटाळणारा गर्द हिरवा टी ज् घालून फोटो काढला.
मुछमुंडा मुथ्थु पाहून भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्तानं सासऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी सत्यनारायण घातला.
दबक्या आवाजातल्या ’मुथ्थु तो सुरीसाबसे राज बन गया’ टाईप कॉमेन्ट्स ऎकूनही मुथ्थु खचला नाही.
डलसिनिआचे संदर्भ मुथ्थुला गोंधळात पाडत होते. जे गद्धेपंचविशीत झालं नव्हतं, ते आता होत होतं.

It is imperative each knight has a lady; a knight without a lady is a body without a soul. To whom would he dedicate his conquests? What visions sustain him when he sallies forth to do battle with evil and with giants?

फोटोबरोबर माहीती पाठवताना मात्र मुथ्थु जाम गडबडला. तासभर विचार करुनही त्याला छंदाच्या रकान्यात काय लिहावं कळत नव्हतं. शेवटी त्यानं NA लिहून टाकलं.

मिशन सक्सेसफुल
निकाल- मशिनगन मुथ्थु: ० सिस्टीम: २राऊन्ड: ३
मोड: नवसाक्षर
तुमचं कोड नेम: मशिनगन मुथ्थु
स्टार्ट...


मुथ्थुचा प्रोजेक्ट ऎन भरात असतानाच अडचणींचे डोंगर उभे राहु लागले. आठ दहा चांगली पोरं मधेच दुसऱ्या कंपनीत गेली. सिदनं परस्पर चार लीड दुसऱ्या प्रोजेक्टसाठी वळवुन घेतली. ज्यांच्याकडे व्हीसा होता त्यांची अचानक लग्नं किंवा बाळंतपणं किंवा आजारपणं निघाली. बिजनेस व्हीसावर लोकांना काम करायला लावून तर मुथ्थुनं पापाची परिसीमाच गाठली! प्रोजेक्टचं मार्जिन घसरायलागलं तसं अननुभवी माणसं प्रोजेक्टवर आली. त्यांच्या चुका झाकता झाकता मुथ्थु उसवत चालला. मुथ्थुसाठी हे नवं होतं.

त्याच्या प्रोजेक्टची उडालेली लक्तरं त्यानं क्रमवार लिहून काढली आणि भविष्यात असं होऊ नये म्हणून काय करता येईल हे ही लिहून केकेला मेल पाठवुन दिला.

मुथ्थुनं सॅन्चोला मुलभुत प्रश्न टाकला.
हे कसले युद्ध? मीच जिंकतो आहे, मीच हरतो आहे. कुणालाही दिसत नसतो शत्रु जश्या की मांत्रिकी प्रभावाखाली राक्षसांच्या झाल्या होत्या पवनचक्क्या. मी, जणु माझ्या कामाचा सरदार, उभा आहे चिलखत घालून, उभा आहे तलवार घेऊन न दिसणाऱ्या शत्रुशी लढायला. या युद्धात रक्त नाही, या युद्धात सैन्य नाही, आहेत ते फक्त प्रश्न आणि अदृष्य काही शत्रु. You know what the worst crime of all is? Being born. For that you get punished your whole life.

सॅन्चोसाठी मुळात तो प्रश्नच नव्हता

Dying is such a waste of good health

मिशन सक्सेसफुल
निकाल- मशिनगन मुथ्थु: ० सिस्टीम: ३

गेम ओव्हर


केकेच्या अर्धा डझन सेक्रेटरीपैकी एकानं केकेचा मेलबॉक्स उघडला. ज्यांना आभाराच्या आणि अभिनंदनाच्या मेल पाठवायच्या त्यांना खुणा केल्या आणि बाकी मेल शिफ्ट डीलीट करुन टाकल्या.

For me alone was Don Quixote born, and I for him. I give him to youसंदर्भ: Don Quixote de la Mancha

Thursday, January 21, 2010

अपुर्णांकाची अवतरणे- ।४/४।-टिक्टॉक टिक्टॉक सी-सॉ

[पुस्तक शेवटाकडून वाचण्याचा उरफाटा शौक नसेल तर ही गोष्ट पुढील क्रमाने वाचा:
अपुर्णांकाची अवतरणे- ।१/४।-रम्य ते अभयारण्य
अपुर्णांकाची अवतरणे- ।२/४।-सपाट इस्त्रीसारखा मेंदू
अपुर्णांकाची अवतरणे- ।३/४।-सॅन्डी, भाड्या कुठं आहेस तू?
]


कॅन्टीनच्या मागल्या बाजुला बसून मीरा पॅडीला प्रेम करावं भिल्लाच्या बाणासारखं वगैरे सांगत होती. तिचा गळा किंवा आपले डोळे भरुन आले तर काय करायचं या विचारांनी पॅडीचं लक्ष पारंच उडालं. त्यानं गेले कित्येक दिवस रुमाल धुतलेलाच नव्हता. संत्र्यासारखं रुमालाची घडी सोलत सोलत त्यानं सगळ्या बाजु वापरुन टाकल्या होत्या आणि आत्ता निकराच्या प्रसंगी रुमाल लागला तर रुमाल म्हणून त्याच्याकडे एक घामट काळपट चौरस कापडी तुकडा होता.

त्यानं कसंबसं मीरेला थांबवलं. अनिलाला आर्चिजच महागड आय लव्ह यू वालं ग्रिटींग देऊन ऑलमोस्ट एक वर्ष झालं होतं. शिवाय ग्रिटींगमधलं गाणं वाजणं बंद झालं तर स्पेअर असावा म्हणून एक बटण सेल पण दिलेला. बाटलीभर गुलकंद निघेल इतके गुलाब देऊन झाले होते. पण तिच्या नरडीतून हो काही निघाला नव्हता. या सगळ्याची पुढची पायरी म्हणजे तिला पळवुन नेणं. पण पॅडी ऎनवेळी चपलेचा अंगठा तुटण्याचा गंड सारु शकत नाही. शिवाय अनिलाचं वजन पेललं नाही तर पडताना आपली मोडतोड होईल ही भिती होतीच. नाही म्हणायला अनिलाचा मुड भारी असताना मागून येऊन एकदा पॅडीनं लाडा लाडात तिच्या मांगेत सिंदूर भरुन ’अब तुम मेरी हो’ असं डिक्लेअर केलं होतं. इमर्जन्सी म्हणून पॅडी नेहमीच सिंदूर बाळगतो. यावर अनिलानं त्याला आरीनं कापून ठेविन असं थंडपणे सांगीतलं होतं. तिनं तिच्या वडीलांच्या धंद्याचा वास्ता देवून धमकावल्यानं पॅडीनं ते सिरिअसली घेतलं इतकच. पण प्रेम करणं थांबवलं नाही, ते चालुच राहीलं.

पण तिच्या नरडीतून हो काही निघत नव्हता. नाही म्हणाली नव्हती हाच काय तो दिलासा. पण आज पॅडी तेही करुन आला होता.
"काय?"
"हो. मी सांगीतलं तिला की आय ऍम अनलव्हींग यू. आय टूक माय प्रपोजल बॅक"
"अरे मागे घ्यायला काय टेन्डर आहे का ते?"

मीरेच्या चेहरयावरची उसनी नाराजी आवाजातही उमटती तर तिने माशी पडलेला तो चहा पिलाच नसता. पण म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं.

पॅडीला दुसरयांदा किंवा तिसरयांदा प्रेमाचा साक्षात्कार होतो.

त्याच्या अपूर्ण आयुष्यातला टिक्टॉक टिक्टॉक सी-सॉ तिथेच स्थिरावतो.

Friday, January 15, 2010

अपुर्णांकाची अवतरणे- ।३/४।-सॅन्डी, भाड्या कुठं आहेस तू?

अंधाराचं एक बरं असतं, सगळा उजेड काळाभोर असल्यानं कुणाच्या डोळ्यातले भाव वगैरे दिसत नाहीत. दारुचंही तसं एक बरंच असतं की ती पोटात गेली की कान मुके अन जीभ बहीरी होऊन जाते. त्यामुळे पॅडी आणि सॅन्डी अंधारात दारुकाम करत बसले होते या घटनेतच मोठी सीनर्जी होती. सीनर्जी म्हणजे १+१>२!

थोड्याच वेळात हॉस्टेलच्या ज्या भिंतीवर बसून आपण दारु पित आहोत ती आपण चल म्हटलं की चालायला लागेल इतपत आत्मविश्वास आल्यावर सॅन्डीला जोराचं रडु आलं. म्हणजे तो इमोशनलच झाला जवळ जवळ! गेले कित्येक दिवस पॅडी जे ऎकत होता ते त्यानं "य"व्यांदा ऎकलं. म्हणजे एनपीचं उभरतं पोलिटीकल करिअर कसं खलास झालं, सॅन्डीवर कसा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याला आता विद्यार्थी बंधु-भगिनींची सेवा कशी करता येणार नाही वगैरे वगैरे.

"तुला काय वाटतं?" सॅन्डीचा झुलता प्रश्न पॅडीला गिरमिटात पेन्सील घालून टोक काढल्या सारखा वाटला. पॅडीला वाटलं आपण सरळ सगळं कबूल करुन माफी मागून टाकावी. पाठीत खंजीर खुपसला की तो छातीतून बाहेर येईलच असं नाही. पण खिडकीबाहेर सिगरेटी टाकल्या की न्युटनच्या कृपेनं त्या खाली येणारच ही काळ्या दगडावरची रेघ. सॅन्डीला रागाच्या भरात आपण त्याच्या सिगरेटी फेकून दिल्या हे कळालं की काय या विचारांनी पॅडी सॉलीड अस्वस्थ झाला. प्रत्येक विद्यार्थ्याला न्युटनचा येतो त्याहून किती तरी जास्त राग पॅडीला त्या मिनिटाला आला. आय-झ्यॅक-न्यु-ट-न. पॅडीनं लगेच प्लॅन-बी तयार केला. माफी सोबत सिगरेटची किंमत सॅन्डीला देऊन टाकायची. एक सिगरेट रु. १.५० तर ३ सिगरेटला किती? आधी पॅडी गोंधळला. एक सिगरेट रु. १.५० की रु. २.५०? की रु. ३.५०? मग त्याला लॉ ऑफ ऍव्हरेज आठवला. एक सिगरेट रु. २.५० तर ३ सिगरेटला किती? पॅडीला आपण शेवटचं त्रैराशिक कधी सोडवलं होतं हेच आठवत नाही. मनातल्या मनात त्यानं कॅल्क्युलेटरच्या मायला घाण घाण शिव्या दिल्या. आपण हाता-पायांची बोटं वापरुन काही तरी मोजायचो हे आठवुन त्याला थोडा दिलासा मिळाला. आपल्याला दारु प्यायला बसण्याआधी बोटं नक्की होती हे ही त्याला आठवत असतं. कधी आकाशातल्या तारयांकडे, कधी स्वतःच्या बोटांकडे बघून मनाशी पुटपुटणारा पॅडी बघून सॅन्डीला आळु पिक्चरमधला काके आठवला. त्यानं परत पॅडीला ढोसून विचारलं " अबे तुला काय वाटतं, डोलीनं असं का केलं असेल?"

आपल्या पापाला अजूनही वाचा फुटली नाही याचा आनंद लपवत पॅडी जागचा उठला. भिंत अजूनही चालत नसते पण पॅडी झुलत असतो. पॅडीनं डोळे कोरडे केले, घसा साफ केला आणि मोठ्या नाटकी आवेशात त्यानं कधी तरी वाचलेलं घडघडा बोलून दाखवलं

He was my friend, faithful and just to me:

But Brutus says he was ambitious;

And Brutus is an honourable man….


"च्यायला भारीए रे हे. म्हणजे काय?"

"काय की बॉ. शेक्सपिअरचं आहे. कधी तरी वाचलं होतं"

"हं...यू लव्ह शेक्सपिअर हं?!..."

"आय लव्ह शॅन्डी ऍन्ड आय लव्ह शेक्सपिअर"

"तसं नाय काही. यू लव्ह सॅन्डी ऍन्ड यू लव्ह सेक्सपिअर."

सॅन्डीच्या जोकवर दोघंही सिरीअलमधल्या रावणासारखं हाहाहाहा असं गडगडाटी हसले.

पॅडीला वाटलं हा जोक मीरेला सांगायला पाहीजे. मीरेला की अनिलाला? पॅडीला काहीच कळत नाही. पोरांच्या पोटातल्या दारुची वाफ मेंदूत पोचल्याचं कळताच वाफेच्या इंजिनासारखी भिंत आपोआप चालायला लागली.

भिंत चालत चालत सॅन्डीच्या गावापर्यंत जाते आणि त्याच्या बापाला साद्यंत वृतांत सांगते. भिंतीवर खालच्या बाजुला एक छोटी चांदणी काढून अत्यंत बारीक टायपात लिहीलं असतं "संजय"

सेमिस्टर संपलं तसं सॅन्डीच्या बापानं सॅन्डीचा बाडबिस्तरा गावातल्या लोकल कॉलेजात हलवला.


अजूनही गदगदून आलं की पॅडी सॅन्डीच्या रिकाम्या पलंगाकडे पाहून खच्चून हाक देतो "सॅन्डी, भाड्या कुठंयस तू?"

पुढला भाग: अपुर्णांकाची अवतरणे- ।४/४।-टिक्टॉक टिक्टॉक सी-सॉ

Tuesday, January 12, 2010

अपुर्णांकाची अवतरणे- ।२/४।-सपाट इस्त्रीसारखा मेंदू

सहा महीने-वर्षं गेलं म्हणजे साळगावकरांच्या कालनिर्णयची नुस्ती पान फरफरा नाही उलटली. सॅन्डीचे ३, पॅडीचे २ आणि ढापण्या रम्याचे ० बॅकलॉग राहीले. पॅडीची सिगरेटची नावड कायम राहीली तरी मीरेला तो खमंग वास भारी भावला. मोराच्या टोकाला काडी लावून धुक्यातून तारयाकडे तिचा प्रवास सुकर सुरु झाला. मोर म्हणजे राष्ट्रीय पक्षी नाही काही, नवशिक्यांसाठीची हल्की आगीनकाडी!- धुरांच्या रेषा हवेत झाडी!! सॅन्डीला एकटं वाटू नये म्हणून पॅडीनं आणि चकणा नुस्ता खाताना अपराधी वाटू नये म्हणून रम्यानं दारु प्यायची सवय जडवुन घेतली. एनपी आणि डोलीच्या चार दंड-बेटकुळ्या वाढल्या. बाकी बरंच काहीबाही बदललं आणि हो, पॅडीच्या लेखी अनिला सोळा वर्षाच्या गाढविणीपेक्षा म्हणजे असाधारणच सुंदर दिसु लागली.

तश्यातच लोकशाहीची मुळं घट्ट करण्याचं ठरलं. पुढं मागं एनपीला छोट्या डबक्यातून मोठ्या डबक्यात आणायचं तर लोकशाहीयुक्त निवडणुकीची सवय असावी म्हणून महानगरपालीकेच्या एका वॉर्डाची जबाबदारी आमदारसाहेबांनी एनपीच्या गळ्यात मारली. गरजेत कामाला येतो तो मित्र या ईसापनितीतल्या गोष्टीला अनुसरुन एनपीनं झाडून सगळ्या मित्रांना कामाला लावलं. मस्कलची सगळी कामं डोलीनं घेतली. अंधारात तो न दिसता अनुक्रमे आधी त्याची नुस्ती बत्तिशी मग माणिकचंद आणि ठर्र्याचा एकत्रित सुगंध आणि मागोमाग धमकावणारा भसाडा आवाज आला की निम्मी कामं सुकर व्हायची. सॅन्डी बुडाला फटफटी लावून एनपीचं सारथ्य करायचा. त्यांना रात्रं-दिवस एकत्र पाहून न राहावून एके दिवशी पॅडीनं "आर यू गे?" असं विचारलं आणि एनपीनं गाल तुटे पर्यंत त्याचा गालगुच्चा घेतला! एनपीची चक्क एक सुंदर छावी होती म्हणे. एनपी सारख्या दादाच्या प्रेमात पडली म्हणजे ती १००% फिल्मी असणार याबद्दल पॅडीला कणमात्र शंका नव्हती. सॅन्डीच्या सांगण्यावरुन एनपीनं मतदार याद्या आणि काहीबाही डेटा पॅडीच्या मशिनीत ओतला. पॅडीनं बरंच डोक लढवुन जेव्हा धपाधप ग्राफ हाणले तेव्हा आऊटपुट पाहून एनपी आवाक झाला. त्याच्या वॉर्डातले स्त्री-पुरुष, दरिद्री-मध्यमवर्गीय, कायदेशीर-बेकायदेशीर, नळवाले-बिननळवाले, मिटरवाले- हूक टाकणारे, धर्म-जात-उपजात यांची सारी कुंडली पॅडीनं कागदावर मांडली होती. एनपीसाठी कुणाला हाकारायचं, कुणाला पिदवायचं, कुणाला खाऊ अन कुणाला पिऊ घालायचं हे ठरवणं आता फारच सोपं होतं. सारया मित्रांनी एनपीला येनकेन प्रकारे मदत केल्यावर रम्याला मागे राहून चालणार नव्हतं. त्याचा होकार गृहीत धरुन एनपीनं परस्पर त्याची खोली वॉर-रुम म्हणून जाहीर केली.

देशात सर्वत्र लोकशाही असल्यानं कॉलेजनंदेखिल निवडणुक घातली. जीएस फायनलचा आणि व्हीजीएस सेकंड यिअरचा असा कॉलेजचा नियम होता. एनपी एकदाचा फायनलला आल्याकारणे तो जीएस होणार हे डीफॉल्ट होतं. प्रश्न होता व्हीजीएस पदाचा. आमदारानं वॉर्डातली निवडणुक जिंकल्यानं मटकीला मोड यावा तितक्या वेगानं सगळ्या छोटूंच्या मनात आशेचा कोंभ फुटला होता.

पॅडीला वाटलं आपणही माज करावा म्हणून त्यानं एनपीला व्हीजीएस होण्याबद्दल विचारलं.
"अरे, किंगमेकर हो. राजा येतो आणि जातो पण कंगमेकर स्टेज" एनपीनं एकाग्रपणे कान कोरत ज्ञान पाजळलं "शिवाय आता बाकीच्यांना संधी द्यायला हवी नां"
पॅडीला आपल्याला संधी कधी मिळाली होती ते कळत नाही आणि बाकीचे म्हणजे कोण ते तर त्याहूनही कळत नाही.

"अरे मुर्खा, म्हणजे तू कायमच राज्याभिषेक करत राहायचा. राजा रयतेचा!" रम्याची तिरकस जीभ कात्री सारखी कतर कतर चालु राहाते "इट्स बिटविन सॅन्डी ऍन्ड डोली, आय बेट."

रवीवारी एकच जेवण असल्यानं फिस्टमधे केलेला डालड्यातला संथ शिरा डब्बल खाऊन पोरं पेंगत असतानाच एनपीनं सॅन्डीच्या नावाची घोषणा केली. लोकशाही असल्यानं विरोध वगैरे उगाच नॉमिनल असणार होता. पॅडी मनातल्या मनात जळ जळ जळला. सॅन्डीच्या सगळ्या सिगरेटी, एकूण शिल्लक-३, एकत्र ओढून टाकाव्यात असं त्याला वाटलं. पण मागे किती जोराचा ठसका लागला होता ते आठवुन त्यानं त्या शांतपणे खिडकीबाहेर फेकून दिल्या. महीनाखेर असले बदले समोरच्या पार्टीला फार महागात पडतात हे पॅडीला सरावानं माहीत होतं.

डोली असला थिल्लरपणा करत नाही. तो गंभीर प्रवृत्तीचा माणूस असतो. त्याला व्हीजीएस देखिल व्हायचं असतं आणि एनपीच्या सावलीतून देखिल बाहेर पडायचं असतं. दोन-तीन दिवसांनी त्यानं लॅबमधून बाहेर पडणारया सॅन्डीच्या डोक्यात ट्युबलाईट फोडली. डोक्यात प्रकाश पडणं शब्दशः खरं झालं नसलं तरी दिवसा तारे दिसणं मात्र सॅन्डीला नक्कीच अनुभवता आलं. सॅन्डीनं शेवटचा मार बहुदा शाळेत, निदान ५-६ वर्षांपुर्वी खाल्लेला त्यानंतर प्रथमच कुणी तरी गंभीरपणे त्याला मारत होतं. युजलेससारखं शेवटी त्यानं रडूनपण दिलं.

सॅन्डीची इस्त्री बिघडवुन झाल्यावर डोली अजिबात वेळ न घालवता एनपीकडे वळला. एनपीच्या बाबतीत तो बिल्कुल चान्स घेऊ शकत नाही. हातात नंगी तलवार घेऊन डोली हॉस्टेलकडं धावत सुटला.

बेसावध एनपीनं कसाबसा तलवारीचा रपकन वरुन खाली येणारा वार चुकवला. तलवारीच्या पात्यानं नुस्तीच हवा कापली. एनपीचा कान कटता तर? एनपी नक्कीच व्हॅन गॉग किंवा कान कापल्या कुत्र्याच्या श्रेणीत गेला असता. ३-डी सिनेमात दिसतो तसा, डोलीचा हात मुस्काडात मारण्यासाठी पुढे येताना एनपीला दिसला. तो चुकवता चुकवता एनपी सिमेन्ट ब्लॉकमधे अडखळुन पडला. सरकारी कॉलेजमधे स्ट्रेस टेस्टींगसाठी आलेले प्रमाणबद्ध ब्लॉक ते. एनपीनं पडता पडता एक उचलला आणि त्याच्यावर झुकलेल्या डोलीच्या कवटीवर खाण्णकन हाणला. सिमेन्ट ब्लॉकचा तो लॉट कुठल्याश्या नव्या कॉन्ट्रॅक्टरचा असावा. इतक्या जोरात इम्पॅक्ट होऊनही त्याचा साधा एक कपचा देखिल उडाला नाही! पण डोली हलला. मुळापासून हलला. रक्त कधीच न बघितल्यासारखा बेशुद्ध होऊन बावळट पडला.

इतकं रामायण झाल्यावर कॉलेजचा लोकशाही वरचा विश्वास उडतो न काय? मंदासारखं रॅकंर १ आणि २ ला त्यांनी जीएस आणि व्हीजीएस जाहीर करुन टाकलं.

पुढला भाग:।३/४।-सॅन्डी, भाड्या कुठं आहेस तू?

Saturday, January 9, 2010

अपुर्णांकाची अवतरणे- |१/४।-रम्य ते अभयारण्य

जात-संमेलनाला जायचं खरं तर पॅडीला फारसं पटलं नव्हतं. शाळा-कॉलेजच्या फॉर्मबाहेर त्याची जात कधी आली नव्हती पण इथं सगळं वेगळंच होतं. हॉस्टेलच्या खोलीत प्रवेश करताच रम्यानं कोण, कुठला, अमका नातेवाईक, तमकी सोयरीक असं करत शेवटी कोड क्रॅक केलाच. "म्हणजे तू आपल्यातलाच!" रम्यानं निर्णय जाहीर केला "सॅन्डी आपल्यातला नाही पण चॉईस नव्हता. त्याचे भाय-कॉन्टॅक्ट आहेत म्हणे. रॅगिंगच्या वेळी उपयोगी येतील म्हणाला. चल, आता आपल्या जातीचा मेळावा आहे आत्ता." डब्याबाहेर आलेला तुपाचा ओघळ बोटानं निपटून डब्यात ढकलावा तसं चापून चापून रम्यानं पोट पॅन्टमधे बसवलं. पॅडी तरीही मख्ख. आपले सिनिअर्स तिथे अभ्यासाच्या पुस्तकांची लिस्टपण देतात ऎकल्यावर कसाबसा पॅडी गेला.

जातीवर अन्याय....ढॅण्ढॅढॅण्ढॅढॅण्ढॅ . पॅडीला मोनोटोनस भाषणं भयंकर आवडली, त्याचे डोळे आपसूक लागायला लागले.

सगळीकडं आरक्षण, नौकरी नाही...ढॅण्ढॅढॅण्ढॅढॅण्ढॅ. पॅडीला स्वप्नात आपल्या जातीतली सगळी भावंडं नौकरी..नौकरी अशी याचना करताना दिसली. मधेच मोरपंखी निळा ड्रेस घातलेली मुलगी त्याच्याकडे बघून गोड हसली. पॅडीच्या पापण्या किलोकिलोच्या झालेल्या. पॅडीला वाटलं आपण झोपेतच मरणार.

सगळ्या जातींच्या संघटना आहेत. आपण एकत्र आलो की मात्र आपण जातीयवादी. आपल्याला एक व्हायला....ढॅण्ढॅढॅण्ढॅढॅण्ढॅ.

"च्युत्या काय रे तू?" रम्यानं पॅडीचं झोपणं फारच पर्सनल घेतलं "सालं सगळेजण कंठशोष करतायत की आपल्यावर अन्याय होतोय"

"कुठं? " पॅडीनं येडझव्यासारखा प्रश्न विचारला आणि रम्या खदाखदा फुटला.

"चल च्यामारी, तू पण नां..." रम्यानं यारी खात्यात पॅडीचा अपराध माफ करुन टाकला

हॉस्टेलच्या गेटवरच सॅन्डी भेटला. ओळख, हाय हॅलो झाल्यावर त्यानं पॅडीला सिगरेटच्या धुराचं प्रश्नचिन्ह बनून दाखवलं. पॅडीला सिगरेट आवडत नसली तरी ते प्रश्नचिन्ह भारी आवडलं. त्यानं हसून नुस्तीच मान हलवली. मागोमाग अजून एक प्रश्नचिन्ह. पॅडीच्या डोळ्यांसमोर बोट नाचवत सॅन्डी म्हणाला "हस्तो काय राव? दोनदा विचारलं कुठून आलात" "आम्ही होय? हे इथूनच की" पॅडीला काय बोलावं हे न सुचून त्यानं निरर्थक उत्तर दिलं. त्याच्या तोंडातून जात-मेळा शब्द काही निघाला नाही. "बरं ते जाऊ दे. तुम्हाला एन.पी. ला भेटायचं का?"

"एनपी" खर्जाच्या आवाजात तिकडून ओळख आली
"मी रमाकांत विश्वासराव भोगणकर" रम्यानं इंजिनिअरींग कॉलेजच्या परंपरेनुसार संपूर्ण नाव सांगत एक कडक सॅल्युट ठोकला.
"पॅडी" पॅडीनं हॅन्डशेकसाठी हात पुढे करत ओळख करुन दिली
"पॅडी? पुर्ण नाव?"
"पॅ-डीच. एनपी. "
मिनीटभराची सणसणीत शांतता. सॅन्डीला वाटलं झक मारली आणि या भानगडीत पडलो.
एनपीच्या बाजुला उभा असलेला काळा पहाड रागारागात पुढे येत असतानाच एनपीनं त्याला थांबवलं आणि पॅडीशी हातमिळवणी केली.
एनपीनं काळ्या पहाडाची ओळख करुन दिली "डोली बाबा"
डोली बाबा-उंची-जेमतेम ५ फुट ४ इंच-रंग- सहाणेवर उगाळलेल्या अमावस्येसारखा -पातळ कारकुनाच्या मांडीइतपत जाड दंड आणि टक्कर ढाल छाती.
अनोळख करत डोली पचकन थुंकला "एनपी, जाय्चं का? सॅन्डी, भाड्या, कायी लागलं तर सांग"

"सॅन्डी, भाड्या, काही लागायच्या आधी सांग हे काय प्रकरण आहे?" पॅडीनं डोली बाबाची पाठ वळताच वातावरण हल्कं केलं.
"एनपी आपल्या स्टुडंट कौन्सिलचा प्रमूख आहे. गेली ७ वर्ष तो शिकतोच आहे. आहे. इथल्या आमदारासाठी तो काम करतो विद्यार्थी संघटनेचं." हातपंपातून हापसून भसाभसा पाणी काढावं तसं सॅन्डी सिगरेटचा धूर ओकत सांगत होता "एनपी माझा गाववाला म्हणून तो माझ्या ओळखीचा पण हे डोली बाबा प्रकरण मात्र नवंच दिसलं."

कॉलेज जोमात सुरु झालं तसं पॅडीच्या डोक्यातून हे प्रकरण पुर्णपणे गेलं. दिलेल्या मेंदूतून एक विचार जातो तेव्हा त्याच वस्तुमानाचा दुसरा विचार मेंदू व्यापतो; पण मेंदू कधी रिकामा राहात नसतो. पॅडीला रॅगिंगसाठी म्हणून खास पाठ केलेले फिजिक्सचे विचित्र नियम आठवले. मोरपंखी निळा ड्रेस पॅडीच्या मेंदूभर पसरायला लागला.

"ओळख करुन देऊ का?" नको तितकं, नको तेव्हा स्पष्ट बोलणं हा स्थायी भाव असणारया मीरानं पॅडीला आतून बाहेरुन वाचत विचारलं.
"मीरा-मिरी-मिरीटले! तू माझी लेथ पार्टनर आहेस की लेथल पार्टनर?" पॅडीनं निळ्या ड्रेसच्या नादात लेथचा मोठा कट मारला आणि कडरकट्ट आवाज करत टूल तुटलं. "अरे दळभद्री, संपत आलेला जॉब नासवलास की" दंडाला धरुन पॅडीला वर्कशॉप बाहेर काढताना मीराचा संताप संताप झालेला. "तिचं नाव दमयंती. गडचिरोलीची आहे. बाप जंगल कॉन्ट्रॅक्टर आहे. पृथ्वी नष्ट करण्याचं काम आहे त्याचं" मीरानं कॅन्टीनमधे जाताच केकचा मोठा तुकडा तोडत पॅडीचा लचका तोडला. "बरं" लाकूडतोड्याच्या पोटी असं रत्न जन्माला यावं हे कसलं दैव असला काही तरी विचार करत पॅडीनं निरर्थक होकार भरला. "बरं काय? मंदचैस. तिचं नाव दमयंती कसं असेल? अनिला नाव है तिचं. अजून माहीती हवीये?" मीरानं विनोद वाया गेलेला पाहून त्याचं ससंदर्भ स्पष्टीकरण दिलं. पॅडीला उगाच भारी वाटलं.पुढला भाग: अपुर्णांकाची अवतरणे- ।२/४।-सपाट इस्त्रीसारखा मेंदू