Saturday, December 17, 2016

न-लिहीण्याची कविता

येऊ नका
सांगूनही शब्द ऎकत नाहीत.
अर्थान्वेषी छटांचे पलीते नाचवत
शब्द
पापण्यांवरुन घरंगळतात
आणि
लूचत राहातात डोळ्यांमधल्या काळ्या सूर्यांना

उताविळ  माझ्या बोटांमधून
झरझर झरतात
उताविळ तुझ्या बाजारात
संदर्भांची वस्त्रे फेडून
ऊठवळ
शब्द
नागवे होतात

अझदारी!
बोथट चवीचे शब्द उन्मादात घेरतात
छाती पिटत
भोसकत राहातात
उखाणातल्या तेविसाव्या श्रुतीला
साजिरा मातम अझदारी...
डोळ्यात मिटून घेतलेल्या काळ्या सूर्याचा
साजिरा मातम अझदारी...
दिवंगत दिगंबर अर्थाचा

Saturday, November 19, 2016

टोगो आणि ज्येनुफी बॉईजएखाद्या वास्तुचा चेहरामोहरा हळु हळु त्यात राहाणाऱ्या माणसांसारखा होत जातो. नुक्तंच लग्न झालेल्या कुण्या नववधूची वास्तु अंगावर रंगांची उधळण मिरवत असते, तिचं नवथरपण, तिची अनाघ्रात वळणे कुठल्याशा चुकार क्षणी झट्कन दिसून येतात. एखादं रोपटं कुणाला जुमानता सज्ज्याच्या तळातून उगवतं, ढासळत चाललेला एखादा अनवट चीरा जीवाच्या आकांतानी निर्जीव चुनखडीत बोटं रुतवु पाहातो, अश्या वास्तूत लांबलेल्या सावल्या पेलत जीर्ण वृद्ध तगून असतात. महालांचंही तसंच असतं. त्यांच्या चेहऱ्यावर उमटत नसतात कोणत्याच संवेदना, डोळ्यांनी दिसत नसतात जीवघेणी भुयारं- त्यांच्यात राहाणाऱ्या राजवंशी अस्तित्वांसारखीच. त्यामुळेच सबाला तिच्या महालाची झालेली वाटणी हृद्यभंगासारखी वाटली. सबाचा, सबाराणीचा महाल एकाच देठाला लहडलेल्या दोन फळांसारखा होता. अबोर आणि चिलका; आरश्यातल्या प्रतिमा असाव्यात तसे दोन भव्य प्रासाद! त्यांचे मार्ग वेगळे होते खरे पण त्यांचं उगमस्थान एकच होतं- कमलबिंदु. कमलबिंदुशी येऊन सबाराणी कोणत्या प्रासादात असेल याचा होरा बांधणं हा अगान महाराजांचा आवडता खेळ होता. कैकवेळा महाराजांनी या खेळात हरण्याची भरपाई रत्न-मोत्यांनी केली होती. पण आता चित्रातले रंग फितले होते. महाराज कुठल्याशा कामगिरीवरुन येताना नवी राणी घेऊन आले होते- रुना आणि चिलका महाल तिच्यासाठी तयार करावा असा महाराजांचा आदेश होता. सबाला आपल्या वाढत्या वयाची जाणीव होती, शरीराचं अवघडलेपण महाराजांसोबतच्या एकांतांत हिरमुसलं करुन सोडायचं. उतरणीला लागलेल्या महाराजांना मात्र त्यांच्या पौरुषाच्या कल्पनांना जिवंत ठेवण्यासाठी एका कोवळ्या देहाची गरज होती. नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या रुनाराणीकडे महाराजांचा ओढा राहीला तर नवल नव्हतं. सबाचा नुसता महालच नव्हे तर महाराजही आता सवतीसोबत वाटले गेले होते. चिलका महालातली प्रत्येक मौल्यवान गोष्ट सबानं अबोरसाठी ओरबाडून घेतली पण आठवणींचं काय? चिलका महालातल्या हलवता येणाऱ्या काही गोष्टी सबाच्या द्वेषापाई विद्रूप झाल्या. अबोर महाल बघता बघता बेढब आणि मत्सरी दिसू लागला.

रुना, नवी राणी, रुढार्थानं देखणी नव्हती. संध्याकाळ उधळावी तसा सावळा रंग, आवाजात कसला गंधार नाही पण डोळे मात्र विलक्षण नितळ, बोलके. संथ प्रवाही आवाजात बोलताना तिची दीर्घ बोटे हवेत लयदार फिरायची. ती गरीब घराण्यातून आली होती तरी शिक्षणातून रुजलेल्या शहाणपणासोबत तिच्या देहबोलीत काहीतरी विलक्षण आश्वासक होतं. रुना सोबत कसला लवाजमा नव्हता, होता तो फक्त तिचा भाऊ- टोगो. टोगोच्या अंगावर कायमच अंधार माळलेली शाल, केसांच्या चिंधुकल्या सावरायला कसल्याशा रंगीत मण्यांची माळ, हातात दुतोंडी काठी आणि डोळ्यात हरवलेले भाव असायचे. टोगो झाडांशी बोलायचा, पक्ष्यांशी खेळायचा, पाण्यात पाय सोडून तासंतास आकाश बघत राहायचा. टोगो माणसात असूनही माणसात नसायचा.

सबानं सावधपणे या नकोश्या पाहुण्यांची गणितं मांडायला सुरुवात केली.


 


धर्मग्रंथांचं जग वेगळं असतं. त्यात प्रवेश हवा असेल तर असीम श्रद्धा आणि शरणभाव हवा. घरातलं जळमटलेलं धार्मिक वातावरण आणि वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून सुरु झालेलं धर्मग्रंथांचं पठण यामुळे कहन आणि मयक हे दोन भाऊ लहान वयातच विद्वान म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या एका टप्प्यावर त्यांना जाणवलं की पुस्तकातल्या शब्दांची खोली जोखायची असेल तर कुण्या शहाण्या गुरुची गरज आहे. त्यांनी प्रार्थनास्थळे पालथी घातली, वाद-विवाद स्पर्धा बघितल्या, गावोगावच्या महात्म्यांच्या भेटी घेतल्या पण त्यांच्या आत्म्याने कसलेच संकेत दिले नाहीत. त्यांच्याच गावातला प्रमुख पण अहंकारी धर्मगुरु मफूत, ज्याचा प्रत्येक शब्द झेलायला अनुयायांची फौज होती, त्याने दिलेल्या आमंत्रणाचाही कहन आणि मयकने नम्रपणे आव्हेर केला. रस्ते हरवले की नदीच्या काठाने चालत राहावे अशी प्राचीन म्हण स्मरुन दोन्ही बंधू एका पहाटेच घर सोडून नदीच्या काठाकाठाने निघाले. धुळीने माखलेले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज काही लपत नव्हते. रस्त्यात कुण्या दरवेश्याने दुर्मिळ अस्वलांच्या केसांचा पुंजका दिला, कुठे कुण्या म्हातारीने दुपारच्या जेवणाची सोय केली, गुंजेच्या पाल्याचा चोथा कुणी रक्ताळलेल्या पायांभोवती बांधून दिला. प्रवास दिशाहीन असला तरी अहेतु नव्हता. सूर्य थकला तेव्हाच दोन्ही भावांनी पाय मोडले.

एका बाजुला रंगांच्या पसाऱ्यात सूर्य़ मावळत होता तर दुसऱ्या बाजुला काळ्यांची जादू सारत चंद्र उगवु पाहात होता. काही तरी विलक्षण भारावलेपण होतं काळाच्या त्या प्रतलात. नदीतले मासे संमोहनात असल्यागत पाण्याच्या पृष्ठभागावर स्थिरावले होते, चुकार वासरु डोळ्यांतला प्रलय आवरुन मुकाट उभं होतं, काटेरी झुडूपांमधून भणाणा वाहाणारा वारा अचानक स्थिरावला. पाठीच्या कण्यावरुन वरवर सरकणारी शिरशीरी दोन्ही भावांना एकाच वेळी जाणवली पण कोणीच बोलले नाहीत. डॊक्यातले सगळे विचार, शब्दांचं फसवं जंगल उन्मळून पडलं, अस्तित्वाच्या फाजील अहंकाराची जागा असीम वैश्विकतेनं घेतली, काळाची जाणीव आणि अवकाशाचे पाश विरुन गेले, नात्यांची गुंफण नव्याने उमजली तसा करुणेला नवा अर्थही लाभला. जमिनीतून अचानक प्रचंड झाड उगवावं, त्याला अंगभर बहरही फुटावा आणि तितक्याच उन्मनपणे क्षणार्धात त्याच्या फुलांचा सडा पडून जावा तसे कहन आणि मयक जमिनीवर कोसळले.


 


काळाच्या पसाऱ्यातून कुठलाही काळ चिमूटभर उचलला तरी त्यात अपऱ्या श्रद्धावंतांचा मेळा दिसू शकतो. कहन आणि मयकच्या बाबतीत असंच काहीसं झालं. कुणी म्हणालं त्या रात्री त्यांची शरीरं तेजःपुंजात चमकत होती, तर कुणी म्हणालं नदीच्या पाण्यानं त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी रात्रीतून पात्र बदललं. बघता बघता नदीच्या वाळवंटात कहन आणि मयकसाठी तंबू उभा राहीला आणि भेटायला येणाऱ्यांची झुंबड उडाली.

कहन आणि मयकची शिकवण ईतर धर्मगुरुंपेक्षा वेगळी होती. त्यांनी स्वतःत ईश्वराला पाहायला सांगीतलं, ईश्वरपण भोगण्यासाठी मीपण त्यागायला सांगीतलं, अहंकार करुणेत आणि करुणा अद्वैती प्रेमात बदलायला सांगीतली. त्यांनी सांगीतलं, ईश्वराला प्राप्त करण्यासाठी कुठल्या धर्मगुरुची, कुठल्या नवसाची- अर्पणाची, उपासतापासाची गरज नाही, ईश्वराला भेटण्यासाठी कुठल्या तीर्थयात्रेला, कुठल्या प्रार्थनास्थळी जावे लागत नाही. शब्दवेल्हाळ प्रार्थनांनी, स्वरबद्ध स्तवनांनी, अनाहत नादबिंदूंच्या स्वमग्न नृत्याने नदीच्या वाळवंटातील वाळूचा कण न् कण ईश्वरमय होत राहीला.

धर्माच्या दुकानातली गर्दी ओसरली तसे बरेचसे धर्मगुरु बेचैन झाले, त्यांचे नेतेपण मफूतकडे आलं. काही धष्टपुष्ट शिष्यांना गुरुमंत्र देऊन मफूतनं त्यांना कामगिरीवर पिटाळलं. धर्म आणि हिंसा यांच्यातल्या निद्रीस्त नात्यानं हलकेच कुस पालटली.


 
कहन आणि मयक जमलेल्या लोकांशी बोलत होते की तो स्वसंवाद होता सांगणं कठीण होतं. लोकांना आज काही तरी वेगळं घडतय याची फिकट चाहूल लागली होती. ईश्वराबद्दलची स्तवने बघता बघता निसर्गाच्या गाण्यात रुपांतरीत झाली. आकाश-धरणी-नदी-पहाड यांच्याशी माणसाचं असलेलं अदीम नातं गाता गाता कहन आणि मयक हरखुन नाचायला लागले. त्यांच्या अंगावरचे पायघोळ डगले लाटेसारखे उसळु लागले, एक हात आकाश पेलता झाला तर दुसऱ्या हाताने धरणीचा तोल सावरला, एकमेकांत विरुन जावे तशी त्यांची शरीरे एकतत्व झाली, कल्लोळलेल्या मनःस्थितीत त्यांनी नदीच्या पात्रात प्रवेश केला आणि सोनेरी वर्ख चढावा तसं नदीचं पाणी लख्ख चमकू लागलं. क्षणभराचा तो चमत्कार पाहून लोक आवाक झाले. नेमका तो क्षण साधून मफूतच्या शिष्यांनी लपवलेली शस्त्रे काढली आणि मार्गात येईल त्याला कापत कहन आणि मयकच्या दिशेने मुसंडी मारली. सर्वत्र अराजक मांडलं, लोक एकमेकांना तुडवून वाट फुटेल तिकडे पळू लागले, रक्तमासांचा चिखल नदीत मिसळत गेला तसा पाण्याचा साजरा रंग लाल होऊन गेला. काही शहाण्या लोकांनी स्वतःची पर्वा न करता कहन आणि मयक भोवती कडं केलं आणि त्यांना घेऊन ते नदीचं पात्र पोहून गेले. कहन आणि मयक किती वेळ - किती दिवस पळत राहीले याची त्यांना शुद्ध नव्हती, सोबतची विश्वासु माणसं गळत गेली.

 

मफूतच्या शिष्यांनी झाला सगळा प्रकार मफूतला सांगीतला. दोन्ही भाऊ जीवानिशी गेले नाहीत हे ऎकून त्याचा संताप झाला खरा पण सोनेरी वर्खाच्या पाण्याचा चमत्कार ऎकून तो जरा विचारात पडला.


 
॥४॥

माणसाचं मोठेपण हे संदर्भाच्या चौकटीत बंदीस्त असतं, चौकट बदलली की माणसाची पत आणि प्रतवारी कधीही बदलु शकते. राजघराण्यातल्या व्यक्तीचा रथ निघाला की रस्ते निर्मनुष्य व्हायचे, हा आदर की भिती की आणखी काही हे सांगणं तसं कठीण. राजघराण्याची पद्धत म्हणून सबा राणीच्या रथाच्या मागे-पुढे हातात कोरडा घेऊन धावणारे सेवक मात्र असायचे!

रुनाचा रथ धूळ उडवत निघाला तेव्हा रस्ते गजबजलेले होते. रुनाला राणीचा कुठला मान मिळू द्यायचा नाही याचं नीटस कारस्थान सबानं काही खास सेवकांमार्फत रचलं होतं. महाराजांचा फारसा सहवास न मिळाल्याने, रुनालाही राणीपणाच्या मान-सन्मानाची पुरेशी कल्पना नव्हती. रुना अजून रुजली नव्हती, तेव्हा तिला रस्त्यावरच्या गलबल्याचं नवल असं वाटलं नाही. रथाच्या मागच्या बाजुला कुठेच पोचण्याची घाई नसलेला टोगो रस्ता न्याहाळत निवांत होता. बाजाराच्या गलबल्यात टोगोनं दुकानांच्या कडेकडेनं चालणाऱ्या दोन व्यक्ती पाहील्या. त्यांनी डोक्यावरुन काळ्या रंगाचं वस्त्र ओढून घेतलं होतं, शरीर धुळकटलेलं, थकलेलं होतं आणि पाय रक्ताळलेले. कुठल्याशा अनामिक ओढीनं टोगोनं रुनाला रथ थांबवुन त्या दोन माणसांबद्दल विचारायला सांगीतलं.फकीरी वृत्तीच्या भावानं काही तरी मागितलं याचा रुनाला कोण आनंद झाला. तिनं सारथ्याला सांगून त्या दोन माणसांना महालात आणण्याची व्यवस्था केली. भितीच्या पलीकडे गेलेल्या कहन आणि मयकने निर्विकार होकार भरला.

 

चिलका महालाच्या मागे असणाऱ्या बागेत टोगोच्या शोधात कहन आणि मयकने प्रवेश केला. कडकडीत दिवस असूनही महालाभोवती खेळवलेल्या पाण्यामुळे आणि झाडांच्या अगत्यामुळे दिवस सुसह्य होता. अगान महाराजांनी हौसेने लावलेली आमराई फळांनी मोहरली होती. सुरक्षित आणि शांत वातावरणात आल्यावर कहन आणि मयकला ईतक्या दिवसांमध्ये पहील्यांदाच भुकेची जाणीव झाली. हातभर अंतरावर रसाळ फळ दिसत होतं पण बागेच्या मालकाला न विचारता फळ तोडायचं कसं? शेवटी या निसर्गाचा- झाडांचा त्राता तो एक ईश्वर असा विचार करुन त्यांनी नामस्मरण सुरु केलं आणि चमत्कार व्हावा तशी सगळी फळं झाडांवरुन आपोआप पडली.

कुठेतरी जवळच झाडीत खुसपुस ऎकु आली म्हणून कहननं स्वतःच नाव उच्चारलं "कहन". आत्म्याच्या तळातून यावा तसा प्रतिध्वनी आला "कऊन"

"मयक"......."मै एक"

स्वतःच्या आध्यात्मिक ताकदीची किंचीत जाण असणारे दोन्ही भाऊ दिग्मूढ अवस्थेत उभे राहीले. झाडाआडून टोगो प्रकट झाला.

"गरजेपेक्षा जास्त जमा केलं की पसारा वाढतो आणि मग पसाऱ्याचाच हव्यास वाढतो" सहज स्वरात बोलत टोगोनं दोन्ही भावांच्या हातात दोन-दोन आंबे ठेवले आणि प्रार्थनेसाठी डोळे मिटले. आंब्याचा चमत्कारी पाऊस जादू उलटावी तसा पलटला.

ज्या गुरुच्या शोधार्थ आपण घर सोडलं तो गुरु हाच याची आंतरिक खुण पटली तसे कहन आणि मयक भान हरपुन टोगोच्या पायावर कोसळले

 

॥५॥

मारेकऱ्याचा निश्चय दॄढ असेल तर त्याच्या खंजीराला गंज चढत नाही म्हणतात. दिवस गेले, महीने गेले तरीही मफूतने दोन भावांचा शोध थांबवला नव्हता. देवाचा शब्द म्हणजे धर्मग्रंथ, त्याच्या पल्याड जाणारी शिकवण म्हणजे शुद्ध पाप! विचार केला तरी मफूतच्या कपाळावरची शीर ताड्ताड उडायला लागली, काय तर म्हणे तुम्हीच ईश्वर आहात- ईश्वराला प्रार्थनास्थळी शोधू नका.... हे जग बुडण्यापासून वाचवायचं असेल तर धर्मभ्रष्ट माणसांचा वध करणं हे धर्माला धरुनच आहे. सैतानाला असंख्य कान असतात. मफूतला कुठूनशी कहन आणि मयकच्या नेमक्या ठिकाणाची माहिती मिळाली तसा तो वेळ न दवडता तिकडे जायला निघाला.

 

टोगोनं कसलेही धर्मग्रंथ वाचले नव्हते. त्याचं मन नांगरणी न झालेल्या जमिनीसारखं अहल्य होतं, त्यात जे होतं ते फक्त निसर्गाचं प्रतिबिंब. कहन आणि मयकला त्यानं कधी पाण्याच्या वाहाण्याची कारणं सांगीतली तर कधी झाडानं पान त्यागण्यामागचं गुपीत उघडं केलं. कोवळ्या उन्हात मांजरीसोबत अजाणपणे ध्यान लावून कसं बसायचा हे त्यानं शिकवलं तर कधी काळाच्या तालावर सुरवंटाचं फुलपाखरु होताना तो दाखवायचा. महाराजांच्या गैरहजेरीत करण्यासारखं विशेष काहीच नसल्यानं रुनादेखिल कहन आणि मयक सोबत चिंतनात बसायची. टोगोनं तिला निसर्गाची समिकरणं समतोल राखण्यात कसा स्त्री-तत्वाचा हात असतो हे दाखवून दिलं. रुनाला तिचा आरसा सापडला तशी ती भितीला हसून सामोरं जायला शिकली. ज्या उंचीवरुन कोसळण्याची तिला भिती वाटायची, त्याच उंचीवरुन एखाद्या वाघीणी सारखं पुढे जाण्यासाठी उडी कशी मारावी हे तिला थोडक्या काळात उमजून गेलं. सबाराणी कानावर रुनाचं परक्या पुरुषांसोबत एकांतात असणं वेगळ्या प्रकारे कानावर आलं.

 

महंत-पीर-साधू अश्या लोकांसाठी घरांचे चिलखती दरवाजे सहज उघडतात. मफूतनं सबाच्या अंतर्वतुळात प्रवेश मिळवला तोपर्यंत त्याच्याकडे राजघराण्यातल्या नातेसंबंधाचा नेमका गोषवारा आला होता. सबाची दुखरी नस कोणती, महाराजांची सध्याची मर्जी कशी याचा पुरेपुर अंदाज बांधून मफूतनं पुढची चाल खेळायचं ठरवलं. सबाच्या आंतरिक भितीला एक टेकू मिळाला.

 

रुना, कहन आणि मयक थोड्याच काळात निसर्गाचं प्रवाहीपण कसं असतं, त्याच्याशी एकरुप होऊन ध्यानात कसं जायचं, मौनाची परिभाषा शिकले. विचारांचा अंतहीन चक्रव्युह कसा भेदायचा, आला क्षण पुरेपुर कसा जगायचा, आदी आणि अंत यांची गाठ कुठे बसते जे जसं जसं त्यांना समजत गेलं, त्यांच्या भोवतालचं रिकामपण अर्थपुर्ण होत गेलं.

 

मफूतच्या सल्ल्याप्रमाणं, सबाराणीनं अगान महाराजांच्या तब्येतीचं निमित्त काढून रुनाला महाराज ज्या गावी मुक्कामी होते तिथं जाण्यास मनवलं. रस्ता लांबचा होता, रुनाच्या सोबत कुणी विश्वासाचं हवं म्हणून सबाराणीनं कहन आणि मयकला नेण्याचं सुचवलं. स्त्री-पुरुष भेदाच्या पल्याड गेलेल्या रुनाला त्यात काही वावगं वाटलं नाही. शिवाय प्रवासात निसर्गाची बदलती रुप उलगडताना आपल्याच जातीचं कुणी सोबत असेल तर मौनाची कसली भाषांतरही करावी लागली नसती.

जंगलातून जाणारा रस्ता दुर्गम पण जवळचा होता. त्या रस्त्याने रुनाराणीच्या बदफैलीच्या कहाण्या पेरत सबाच्या मर्जीतले काही सेवक गेले, जाताना मफूतलाही सोबत घेऊन गेले.

जंगलाशी टोगोचं खास नातं होतं, निसर्गनियमानुसार वाढणारी झाडं आणि लोक त्याला जवळचे होते. जंगलातल्या काही लोकांनी राजसेवकांनी उडवलेल्या वावड्या टोगोच्या कानावर घातल्या. रुना आणि दोन भावांसोबत झालेल्या धोक्याची जाणीव झाली तसा टोगो बेचैन झाला. त्यानं हक्काच्या काही लोकांना रुनाच्या मागावर पाठवलं आणि स्वतः महाराजांच्या भेटीला जवळच्या रस्त्याने निघाला. अर्ध्या रस्त्यातून रुनाराणीच्या काफील्यानं प्रवासाचा मार्ग बदलला. कहन आणि मयक आधीही मफूतच्या भितीमुळे पळाले होते, तेव्हाही त्यांच्या समोर कुठला गाव नव्हता. आजही ते मफूतच्या भितीने दिशाहीन निघाले होते पण वर्तमानात कसं जगायचं हे त्यांना टोगोनं शिकवलं होतं. रुनाराणीसाठी महाराजांच्या अस्तिवाभोवती गुंफलेलं गणित पार कोसळलं होतं पण त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी आता तिला कुणाचीच गरज नव्हती.

 

दिवसा मागून दिवस गेले तरी रुना अगान महाराजांपर्यंत पोचली नाही हे ऎकून सबाराणी अस्वस्थ झाली पण मफूतचा डाव बिनतोड होता. त्यानं मोठ्या धैर्यानं रुनाराणी परपुरुषासोबत पळून गेल्याचं भविष्य वर्तवलं. हलक्या कानांच्या महाराजांच्या अंगाचा कोण तीळपापड झाला. एका बाजुला मोहिमेच्या अपयशातून आलेला आर्थिक भार आणि दुसरीकडे राणी पळून गेल्याची नाचक्की! टोगो महाराजांच्या सामोरा गेला तो पर्यंत खेळाचा निकाल जवळ जवळ ठरुन गेला होता. टोगोने केलेल्या काही थोडक्या चमत्काराच्या बातम्या मफूतच्या कानी आलेल्या होत्या. त्यानं टोगोला महाराजांसाठी पाण्यातून सोनं निर्माण करायला सांगीतलं. टोगो निर्विकारपणे म्हणाला की ’महाराजांनी कितीही आज्ञा केली तरी जसं आंब्याचा झाडाला आंबाच येणार तसं पाण्यातून फक्त पाणीच उगवु शकतं. जे असतं त्या बद्दल कोणतंही मत बनवलं तरीही ते तसंच राहातं’

 

मफूतच्या सांगण्यानुसार टोगोच्या शरीरातून आरपार खिळे ठोकून त्याला लाकडाच्या ओंडक्यावर शब्दशः टोचलं गेलं आणि वेदनामय मृत्यु यावा म्हणून नदीच्या पात्रात त्या ओंडक्याला सोडून देण्यात आलं.

 

 

टोगोच्या रक्ताचं प्रायाश्चित घ्यावं तसं नदीचं पात्र पुढची कित्येक दशके कोरडं राहीलं

 

 

अगान महाराजांच्या राज्यापासून दूर, खुप दूर, टोगोने शिकवलेल्या प्रार्थनांमधून निसर्गाच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटत राहीले.

Thursday, October 20, 2016

हमामा रे पोरा हमामा रे

No, everybody's gotta learn, nobody's born knowin'...
 
झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्त तेव्हा तिथे असतो; उदा. शाळा सुरु होण्यावेळी ’उन्हाळ्याच्या सुट्टीतला माझा छंद’ टाईप विषयावर निबंध, पाढे-वर्ग-वर्गमुळं यांच्या दुःखद उजळण्या वगैरे वगैरे.

कु. सोमेश (नुक्तेच नववी ब) शाळा सुरु होण्या आधी अश्याच काही नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यात मग्न होता. "सोमेश" अशी मधूर हाक दुसऱ्यांदा येऊनही त्यानं दुर्लक्ष केलं कारण शाळेच्या नव्या गणवेशाची निळ्या रंगाची चड्डी अंगावर कशी दिसते याचं निरिक्षण करण्यात तो गुंग होता. त्याला बऱ्याच चिंता पडल्या होत्या उदा. पायांवरची नव्याने उगवलेली लोकर निळ्या रंगाची चड्डी झाकणार नसते वगैरे. हल्ली सोमेशला अश्या चिंता आणि सोबतच हळव्या कविता वगैरे सुचतात-

डार्क निळे आकाश

सागर फेन्ट निळा

निळ्या चड्डीत

सोम्या नादखुळा

(आपणही ’तुक्या म्हणे’ सारखं ’सोम्या म्हणे’ असा कवि व्हावं का? सोम्यानं लख्ख विचार केला)"सोम्या...."

या हाकेत मघासारखी पुंडलिकाची आर्तता नव्हती, शिवाय आवाजाचा उगम कुण्या पुरुषाचं स्वरयंत्र होतं, ही सगळी गणितं सेकदांच्या शतांशात करत सोमेशच्या मेंदूनं सोमेशच्या शरीराला योग्य त्या आज्ञा दिल्या आणि सोमेशचं शरीर तात्काळ खालच्या मजल्यावर आवाजाच्या उगमासमोर उभं राहिलं.

"ब्याग भरत होतो, तात" सोमेशनं पुटपुटतं स्पष्टीकरण दिलं.

जुने मराठी सिनेमे बघून संस्कार झाल्यागत सोमेशच्या आईनं झट्कन त्याला आपल्याकडे ओढला आणि म्हणाली "बघितलसं का आपल्याकडे कोण आलय? स्वाती आत्या आठवते नां तुला?" सोमेशला अशी कुठलीही आत्या आठवत नसल्यानं तो जास्तच जोरात होकारार्थी मान हलवतो.

"आणि हा रणवीर. हा आपल्याच शाळेत असणारै, तुझ्याच वर्गात" वसंतराव उर्फ तात उद्गारले. वसंतराव आणि सोमेश एकाच शाळेत असल्यानं आपली शाळा हे संबोधन योग्यच होतं.

रणवीर असं तद्दन फिल्मी नाव असलेला मुलगा सावळासा पण तरतरीत होता. त्यानं हसून सोमेशशी हात मिळवला. त्याच्या एका कानात सोन्याचं निस्तेज वळं होतं. "आणि ही माझी सुनिला दिदी" रणवीरनं त्या सबंध धांदरट खोलीत विसंगत दिसणाऱ्या सुंदर मुलीची ओळख सांगीतली. काही मुली सुंदर असतात, काही मुली कुठल्याशा वयात सुंदर दिसतात. सुनिला नक्की कुठल्या प्रकारात मोडते हे कळण्याचं सोमेशचं अजून वय नसतं. पण पारंपारिक शहाणपणातून तो आपली नजर फार काळ सुनिला ’दिदी"वर रेंगाळु देत नाही. पारंपारिक शहाणपणातून सोमेशची आई सुनिला आणि तिच्या आईला स्वयंपाकघरात घेऊन जाते. रिकाम्या खोलीत वसंतराव पारंपारिक सुस्कारा टाकतात. स्वाती त्यांची दूरची बहीण असते. प्रतापदाजींची बदली गुजरातेत झाल्यानं स्वाती आणि दोन पोरं मुंबईहून पुढच्या शिक्षणासाठी वसंतरावांच्या गावात आलेले असतात.

" तू तुझ्या पप्पांना काय बोलतोस?" रणवीरनं सोमेशच्या खोलीत आल्या आल्या विचारलं.

"तात" सोमेशनं ओशाळवाण्या आवाजात सांगीतलं

"म्हणजे मी पप्पांना पॉप्स म्हणतो तसं तू तात्यांना तात म्हणतोस?" रणवीरचे गावाकडच्या मुलांबद्दलचे ग्रह तारे जवळ जवळ पक्केच झाले होते.

"नाय रे" घाई घाईनं सोमेशनं स्पष्टीकरण दिलं "तात म्हणजे संस्कृत मध्ये वडील, ते शाळेत संस्कृत शिकवतात म्हणून..."

वयात येणाऱ्या मुलांना बाप या विषयात इतकंच कुतूहल असतं.

बाकी शाळा, शाळेतली मारहाण, शाळेतला स्त्री वर्ग इत्यादी विषयांवर चर्चा करुन रणवीर समाधानानं घरी परतला.

॥ हमामा रे पोरा हमामा रे हमामा घालितां ठकलें पोर करी येरझार चौर्‍याशीची


सोमेशच्या घरापासून रणवीरचं घर लांब होतं पण तात की लात पडल्यानं तो सायकल हाकत रणवीरच्या घरी आला. स्वाती आत्यानं त्याला ब्रेडचा उपमा देऊन रणवीरच्या खोलीत पाठवलं. रणवीर आणि सुनिला दिदीची खोली एकच होती. खोलीत इंग्रज दिसणाऱ्या काही पातळ लोकांचे पोस्टर होते. सोमेशला ते ओळखु येत नाहीत. ते सगळे बाप्ये असल्यानं बहुदा सुनिलानं लावलेले असावेत. एका कोपऱ्यात लाल फेरारीचा पेप्रात आलेला काळा-पांढरा फोटो होता. तो बहुदा रणवीरनं लावलेला असतो. सोमेशला तो ओळखु येतो.

"रणवीर येईल, तू बैस त्या पलंगावर" कोरड्या आवाजात सुनिला दिदीनं फर्मावलं "आणि तो ब्रेडचा चुराडा सांडु नकोस हां."

बर्म्युडा-टी शर्ट घालून स्वतःशीच मंद हसणारी सुनिला दिदी , खोलीतला डिओचा मंद सुगंध या सगळ्या वातावरणार आपण मंद दिसतोय असं वाटू नये म्हणून सोमेशनं खणखणीत आवाजात विचारलं "तू फुड टेक्नोलॉजी शिकते काय?". सोमेश अगदी शॅरलॉक होम्स नसला तरी सुनिलाच्या पलंगभर पसरलेली फुड टेक्नोलॉजीची पुस्तकं त्याला नक्कीच दिसु शकतात.

"हो" सुनिलानं पुस्तकातून मुंडक न काढता उत्तर दिलं.

"मला पण खायला खुप आवडतं" सोमेशनं प्रांजळपणे सांगितलं "मी चिकण, मटण, बैदा सगळं खातो. मला गावातले सगळे हॉटेलं पण माहीतै. मला फिशचे हॉटेलपण माहीतै"

सुनिलाला गंमत वाटते. ती उठून सोमेशच्या शेजारी येऊन बसते. सोमेशला मोराच्या भरगच्च पिसाऱ्याखाली गुदमरल्यासारखं अस्वस्थ व्हायला होतं.

"आम्ही आमच्या कॉलेजमधे खुप डेन्जर डिशेस बनवतो. खाणार का?" सुनिलाला सोमेशची गंमत करायची लहर येते

सोमेशला बर्म्युडा-टी शर्ट कडे न बघणं अशक्य झालं तसा तो उठून उभा राहिला आणि पलंगाच्या काठाला धरुन त्यानं जमेल तितक्या निरागसपणे विचारलं "मास्टरशेफ मध्ये करतात तसल्या?"

सुनिलाचं फुटून फुटून हसणं ऎकून स्वातीआत्या खोलीत आली आणि विनाकारण हसत विचारलं "काय बेत शिजतोय छोट्या दादा सोबत?"

(’यक्स’ सुनिलानं लख्ख विचार केला ’एक्दम बॅकवर्ड!’)

(’बेक्कार’ सोमेशनं लख्ख विचार केला ’छोटा दादा?’)

दिवस-दुसरा

रणवीरच्या घरी जायचं म्हणून सोमेशनं नीटस तेल लावून, नीटस पॉन्डस लावून, पिवळा शर्ट जिन्सच्या पॅन्टमध्ये खोचला. दारातच सुनिला दिदी बघून त्याला नीटस दिसत असल्याचं फारच बरं वाटलं.

दिवस-तिसरा

रणवीरच्या घरी जायचं म्हणून सोमेशनं नीटस तेल लावून, नीटस पॉन्डस लावून, गुलाबी शर्ट जिन्सच्या पॅन्टमध्ये खोचला. दारातच सुनिला दिदी बघून त्याला नीटस दिसत असल्याचं फारच बरं वाटलं.

दिवस-कितवा तरी

रणवीरच्या घरी जायचं म्हणून सोमेशनं नीटस तेल लावून, नीटस पॉन्डस लावून, कोणतातरी शर्ट कोणत्यातरी पॅन्टमध्ये खोचला. दारातच सुनिला दिदी बघून त्याला नीटस दिसत असल्याचं फारच बरं वाटलं.

"हल्ली चिरंजीव घरी नसतात" वसंतरावांनी पेपर मधून डोकं न काढता चंद्रकांत गोखले टाईप प्रश्न विचारला.

"बघावं तेव्हा रणवीरच्या घरी पडीक असतो" टिव्ही वरची नजर न हलु देता सुधाबाईंनी उत्तर दिलं.

"हं"

"हं"
॥ दुसर्‍या पहारा महा आनंदें हमामा घाली छंदछंदें दिस वाडे तों गोड वाटे परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥
शाळा सुरु झाल्यावर रितसर सर्व गुरुजनांनी रणवीरच्या कानातलं वळं ही भिकबाळी नसून नवसाचं वळं आहे याची खात्री करुन घेतली आणि त्याच्या धार्मिक आस्थेचं मनोमन कौतूक केलं.


शाळा सुरु झाल्यावर रितसर सर्व मुलांनी रणवीरच्या कानातलं वळं ही भिकबाळी नसून फ्याशन आहे याची खात्री करुन घेतली आणि त्याच्या फ्याशन सेन्सचं मनोमन कौतूक केलं.

रणवीर शाळेत गिअरच्या सायकलनं येतो.

रणवीर रोज बुट पॉलीश करतो.

रणवीरकडे वट्ट पन्नास रुपये असतात.

रणवीरच्या वह्यांवर डब्लूडब्लूएफचे पैलवान असतात.

रणवीर बॉल बास्केटात टाकतो.

रणवीर डब्यात सॅन्डवीच आणतो.

रणवीरचं नाव रणवीर होतं!

पृथ्वी कुणाभोवती का फिरेना, सोमेशचा वर्ग रणवीरभोवती फिरायचा.

शाळेतून घरी जाताना एकदा रणवीरनं सायकल चढावावर थांबवली.

"दमलास कां बे?" सोमेशनं सायकलच्या दांड्यावरुन एक पाय खाली सोडत विचारलं "गेर टाकून बघ नां"

"तू जरा हेकण्या आहेस का रे?" रणवीरनं बेदम वैतागून विचारलं "तिकडं बघ, महोक येतेय"

महोक येतेय म्हणून आपण का थांबायचं हे सोमेशला नेमकं कळत नाही. ’इथेच आहे भलती मेख, वर्गमुळात वजा एक’ असली गणितं रणवीरलाही येत नसल्यानं त्यालाही आपण का थांबायचं कळत नाही. त्यानं सुस्कारा सोडला आणि सायकल ढकलली.

हे असं फार काळ चालणार नसतं. शाळा सुटल्यावर एक दिवस सावकाश रणवीर महोकच्या मागे मागे गेला आणि तिचं घर शोधून काढलं.

दिवस- पहीला

रणवीरनं पाणी लावून केस पोमेड केल्यासारखे मागे वळवले आणि सोमेश सोबत सायकवरुन गावातल्या अनोळखी गल्ल्यांमधून चकरा मारल्या.

दिवस- दुसरा

रणवीरनं पाणी लावून केस पोमेड केल्यासारखे मागे वळवले, पुम्माचे लाल बूट घातले आणि सोमेश सोबत सायकवरुन गावातल्या अनोळखी गल्ल्यांमधून चकरा मारल्या.

दिवस- तिसरा आणि रोज

रणवीरनं पाणी लावून केस पोमेड केल्यासारखे मागे वळवले, पुम्माचे लाल बूट घातले,डोळ्यांवर पप्पांनी टाकून दिलेला मोठ्या फ्रेमचा रेबॉनचा गॉगल लावला आणि सोमेश सोबत सायकवरुन गावातल्या अनोळखी गल्ल्यांमधून चकरा मारल्या.

"हे महोकचं घर" बार्कोसनामातला एखादा गुप्त पत्ता सांगावा तसं आठवड्याभरानं रणवीरनं सोमेशला त्या अनोळखी गल्ल्यांमधलं रहस्य सांगीतलं.

"तीच आपली फ्लेम" रणवीरनं सायकलच्या दांड्यावर महेश कोठारे सारखा हात आपटला. "महोक?" सोमेशचं तोंड किती तरी वेळ उघडं राहीलं. ’महोक...’ रणवीर किती तरी वेळ त्याचा फॅन्टस्या सांगत बसल्या.


महोक पाण्यावरची नक्षी,

गळ्यामधे गाता पक्षी

महोक सुगंधी गुलबक्षी,

बेभान नदी वाहाते वक्षी

’रणवीरचं वेड्यासारखं घराभोवती घुटमळणं, सतत काही बोलण्याचं निमित्त शोधणं- हे सारं असं असतं? प्रेम?’ सोमेशनं सायकल ढकलत ढकलत विचार केला ’प्रेम?? आणि आपण रणवीरच्या घरी सतत जातो ते? सुनिलादिदी भेटली नाही की आपल्याला धसल्यासारखं होतं ते?’ सोमेशनं सायकलचा ब्रेक आवळला "नाही...हे साफ चुक असणार..सुनिलादिदीला आपण दिदी म्हणतो, ती आपल्याहून मोठी आहे...हे वैझाड चुक आहे. नक्की चुकच आहे नां? मग उद्या पासून रणवीरकडे जायचं नाही? पण मग सुनिलादिदी भेटणार नाही? किती बोर होईल....तसं काही नसतं, आपण रोजच्या सारखंच जायचं!’ सोमेशनं समाधानानं सुस्कारा सोडला.

 
॥ चौथ्या पहारा हमामा घालिसी कांपविसी हातपाय सुर्‍यापाटिलाचा पोर यम त्याचे पडलीस डाईं
 


"तुला आयरक्ताची शप्पत" रणवीरनं सोमेशला धर्मसंकटात टाकलं...

"महोक" सोमेशनं अनोळखी आवाजात हाक मारली पण ती कदाचित त्याच्या घश्यातून बाहेरच पडली नाही कारण महोकनं वळून सुद्धा बघितलं नाही.सोमेशनं रुमालानं खसाखसा घाम पुसला, कबड्डी खेळताना घेतात तसा छातीच्या भात्यात भरपूर दम भरुन घेतला आणि "म..हो..क" अशी हाक दिली. महोक मागे वळली तसं सोमेशला जमीन फाटून आपण तीत गडप व्हावं वाटलं.

"तुला रणवीर माहीतै नां? त्याला तुला बोलायचय, तो म्हणाला फ्रेन्डशीप करायचीय." सोमेशनं आठवलं तेव्हढं भाषण कसंबसं ओकलं. रणवीरनं त्याला सायकलींग, कार रेसिंग, ड्रम्स, फुटबॉल, ब्राऊन बेल्ट या सगळ्या बद्दल बोलायसाठी बजावलेलं असतं पण ऎनवेळी सोमेश त्या सगळ्याचा गोपाळकाला करतो.

"फक ऑफ" महोकनं चेहऱ्यावरची रेष न हलवता उत्तर दिलं आणि काहीच ऎकु न आल्यागत सोमेशनं उत्साहपुर्वक निश्वास सोडला. "मग मी काय सांगु रणवीरला?" त्यानं चिकाटीनं विचारलं.

"एकाकिनी भवितुमिच्छामि" स्त्रीयांची विनोदबुद्धी कधी उफाळुन येईल सांगता येत नाही "निरोप संस्कृतमधून दिलेला कळेल नां त्याला?" महोकनं धमकीवजा दिलेला निरोप सोमेशला नेमका कळतो. रणवीर तरीही शनीवारी मारुतीला माऱाव्यात तितक्या ईमानदारीत महोकच्या गल्लीतून फेऱ्या मारत राहातो. महोकच्या संस्कृत निरोपाचं त्यानं केलेलं ’एकाकी मुलीला माझी ईच्छा’ हे भाषांतर काही प्युअरिस्ट सोमेशला पटत नाही.


"ए बारक्या" कुणी तरी सायकल मागे खेचली म्हणून सोमेश सटपटला; घोडा असता तर मागच्या दोन पायांवर ’ह्यंह्यंह्यंह्यं’ करत स्टंटला असता. तोंडभर मुरुमाचे डाग, गुटक्याचा सुगंधी दरवळ, तेलाचं तोंडही न पाहिलेले केस, रंगपार शर्ट असं एक उमदं व्यक्तिमत्व सोमेशच्या मागे उभं होतं.

"काय नाव है रे तुजं?" उ.व्य. नं विचारलं.

"सोमेश....का? काय झालं हो?"

उ.व्य. चा हात सळसळला खरा पण त्याच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या मुलानं त्याला रोखलं. तो बराच सभ्य दिसत होता; सोनेरी काड्यांचा चष्मा, फिकट गुलाबी शर्ट, त्यावर कसलीशी एम्ब्रॉरयडरी इ.इ. . "तू संस्कृतच्या सरांचा मुलगा नां रे?" स.मु. ने विचारलं. सोमेशनं न समजून मान हलवली. स.मु. नं उ.व्य. ला डोळा मारला पण ते सोमेशला कळणार नसतं.

"तुझ्याकडे गिअरची सायकल आहे म्हणे"

"नाही, माझ्याकडे नाही. तो माझा मित्र आहे, रणवीर, त्याच्याकडे आहे"

"मला पण घ्यायचीय, एकदा चालवून बघायचीयै. उद्या सांगतोस का त्याला कॉर्पोरेशनच्या ग्राऊंडवर यायला"

कॉर्पोरेशनचं ग्राऊंड थोर मोठं होतं आणि त्याच्या काठावर पाण्याचा मोठा टॅन्क होता. स.मु., उ.व्य. आणि नारळासारखं उभं तोंड असलेला अजून एक मुलगा त्या टॅन्कावर बसून होते. रणवीरनं सायकल घासूनपुसून आणली होती. रणवीरला पाहून टॅन्कावरच्या मंडळींनी न दिसणारा ईलेक्ट्रॉनिक सिग्नल पास करावा तसं काहीतरी केलं.

’कड्’ किंवा ’काड्’ किंवा ’फाड्’

जो आवाज झाला त्याचं काहीसं वर्णन असं करता येईल.

रणवीरच्या सावळ्या गालावर पाच पांडव स्पष्ट दिसत होते.

"ए सोमेस, तू इथून सरळ घरी जायाचं हं. ईकडे तिकडे बघायचं नाही, कुणाला काही बोलायचं नाही" उ.व्य.नी त्याच्या खासगी आवाजात सांगीतलं ते ऎकून सोमेशच्या पोटात जोरदार मुरडा आला. काही तरी भलतचं सुरु झालयं आणि आपण काहीही करु शकत नाही याच्या फुद्दूसर जाणीवेनं त्यानं सायकल उलटी पळवली.

मॅचमध्ये रिप्ले दाखवतात तसं ’कड्’ किंवा ’काड्’ किंवा ’फाड्’ यापैकी एक आवाज परतून आला. रणवीरच्या कानातल्या निस्तेज सोन्याच्या वळाभोवती काळसर लाल रंगाची एक ढब्बु रेष उगवून आली.

"तुला फ्रेन्शसीप करायची का? मं आमच्याशी कर नां" उ.व्य. नी मिटींगचा नेमका अजेन्डा आत्ता सांगीतला. फावल्या वेळात नारळासारखं उभं तोंड असलेल्या मुलानं रणवीरच्या सायकलचे गिअर उचकटले, चेन उकलून ठेवली, ब्रेकच्या वायरी विश्वाइतक्या गुंतागुंतीच्या करुन ठेवल्या आणि सरतेशेवटी सिट निघत नाही या विफल जाणीवेतून रणवीरच्या डोक्यात टपली मारली.

"हा महोकचा कज्जीन" उ.व्य. नं स.मु.ची ओळख करुन दिली "तिच्याच बंगल्याशेजारी राहातो. तो तुला रोज बगतो, रेबॅन घालून. तू पुन्न्यांदा त्या गल्लीत दिसला नां सायकल सारखा उकलून ठेवनार" उ.व्य.ला अजून बरंच बोलायचं असतं पण त्याला सुचत नाही. शिवाय स.मु. अस्वस्थ होऊन ’चला आता निघा’ असं सारखं खुणावत असतो.

"बघून घेईन" तिन्ही गुंडे लांब गेल्याची खात्री झाल्यावर रणवीरनं स्वगत म्हटलं. स्वाभिमान आणि सायकलचे विस्कटलेले भाग जमा करुन तो निघाला तर अंधारातून सोमेश प्रकट झाला. "सॉरी यार, मला हे असलं होतं हे वाटलंच नाही" त्याच्या आवाजातला कंप अजून गेलेला नसतो.

"भिक्कुर्डा आहे तू" रणवीरच्या आवाजात ठोस कडवटपणा भरलेला असतो " भिक्कुर्डा, ढुंगणाला पाय लावून पळालास. दोस्तीत गद्दारी केलीस. आता सगळं फिनीश...सगळं फिनीश आपल्यात"

शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत रणवीर अंधारात निघून गेला.

’फिनीश?’ सोमेशला दोस्तीखात्यात वाईट वाटतं

तापल्या तेलात मोहरी टाकण्याचा शहाणपणा सोमेश करत नाही. तो दोन दिवसांनी रणवीरच्या घरी जातो.

"कुठे होतास रे दोन दिवस? आणि हा रणवीर कुठं पडला ते सांगायला तयार नाही. तू नव्हतास का सोबत?"

"नाही आत्या"
"कुठे होतास रे दोन दिवस? रणवीरला कुणी पिटला का? पोरीचं लफडं का? तो काही सांगायला तयार नाही. तू नव्हतास का सोबत?"

"नाही सुनिलादिदी"

" " (तुझ्या फ्लेमनं गद्दारी करुन तुझ्यावर गुंडे घातले की कळेल. आयरक्ताची शप्पत, आत लागलेलं जास्त दुखतै)


" " (खतरनाक...डोळा काळा, निळा की जांभळा? अर्रर्र)

॥ हमामा घालितां भ्याला तुका त्यानें सांडिली गड्याची सोई ॥

Wednesday, October 5, 2016

निळे हत्ती, निळे घोडे

निळे हत्ती, निळे घोडे,
पोट फाडलेला ष,
सारे झुलतात
शक्यतांच्या अमानुष टोकां दरम्यान.

ताणून बसवलेला सुर्य पीडीसीए सायकलच्या काठाकाठांनी
आणि नदीत सोडलेले यांशी लोकांचे वीस पाय,
मधेच करकचून घसरणारे बगळे पॉवर पॉईन्टच्या स्लाईडवरुन,
आणि त्यांच्या पाठीवर टाकलेल्या गोळ्या गोळ्यांच्या बुलेट्स,
सखीच्या पावसाळी किनाऱ्यांसाठी
तयार केलेला भरगच्च कंटींजन्सी प्लॅन...

ऎटदार टाय लावलेल्या
देवदुतांनो,
उपटा निर्वासित फुलपाखराचे पंख
आणि मारा भरारी करारी राखाडी आकाशात.

फुलवंतीला सुगंधाचे,
निळावंतीला शब्दांचे,
चित्रवतीला स्वरांचे
अभिशाप मात्र
जरुर द्या

Saturday, July 2, 2016

फुल्या-फुल्यांचं साहित्य

भूमिका : समजणं, आवडणं, मान्य करणं (किंवा या प्रत्येकाची विरुद्धार्थी कृती) आणि ती ठाशीव माध्यमात व्यक्त करता येणं या दोन भिन्न गोष्टी असू शकतात. फुल्या-फुल्यांचं साहित्य हा प्रकार माझ्यापुरता तरी असा आहे. वाचनाच्या ओघात बऱ्याच वेळा ओंगळवाणं ते कलात्मक (!) असे लैंगिक अनुभव व्यक्त करणारी पुस्तकं डोळ्यांखालून जात असतात आणि त्याबद्दलची विचारांच्या पातळीवरची प्रतिक्रिया ही निव्वळ खासगी स्वरूपाची असते. पण जेव्हा त्याबद्दल विचार करून लिहिण्याची वेळ येते, तेव्हा मला सततचा अवघडलेपणा जाणवत आहे. अशा अवघडलेपणाचा लेखाच्या गुणवत्तेवर आणि खोलीवर परिणाम होऊ शकतो का? तर हो, ती शक्यता मी या क्षणी नाकारत नाही. दुसरी मर्यादा, जी स्वीकृत आहे, ती म्हणजे हाताशी सगळे संदर्भ नसणं. या दोन्ही मर्यादा लक्ष्यात घेऊन लेखाची मांडणी मी किंचित वेगळी ठेवत आहे.
विचारांचा ढग : वेगवेगळे मुद्दे आणि त्यांचा परस्परांशी असणारे संबंध मांडायला विचारांचा ढग मदत करतो. यातले सर्व मुद्दे लेखात येतीलच असं नाही. शिवाय त्यांच्या आपापसांत असणाऱ्या संबंधांमुळे हे मुद्दे स्वतंत्रपणे मांडले जातीलच असंही नाही.
 

टिपा :
१. ’इरॉटिका’ हा शब्द ’इरॉटिका साहित्य’ या अर्थी वापरलेला आहे.
२. या प्रकारचं साहित्य लिहिलेल्या सगळ्या लेखकांचा किंवा सगळ्या पुस्तकांचा या लेखात उल्लेख होईलच असं नाही. यात तपशिलांपेक्षाही प्रवाहांचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
इरॉटिका / इरॉटिक साहित्य म्हणजे लैंगिक व्यवहारांचं चित्रण करणारं साहित्य. अश्या साहित्यात निव्वळ शाब्दिक प्रणयाच्या पुढे जाऊन लैंगिक व्यवहार; कधी त्याच्या जोडीने येणारी हिंसा, विकृती, बळजोरी; शिवाय भावना चाळवणारी वर्णनं आढळतात. तांत्रिक दृष्ट्या इरॉटिका आणि इरॉटिक साहित्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इरॉटिका प्रकारात निव्वळ संभोग हे साहित्यबीज असते, तर इरॉटिक साहित्यात ते एक इतर पात्रांप्रमाणेच पण महत्त्वाचे पात्र असते.
मराठी लेखकांनी (लेखक = कवी = नाटककार = कादंबरीकार) त्यांच्या लेखनातून विविध विषय हाताळले असले तरी मराठीत इरॉटिका प्रकाराचं साहित्य (फुल्या-फुल्यांचं साहित्य) फारसं नाही. गेला बाजार, शारीर अनुभवांचं चित्रणही मराठी साहित्यात तुरळकच आढळतं. इथे मी सर्वार्थानं स्वस्त असणाऱ्या पिवळ्या पुस्तकांबद्दल बोलणार नाही. कोणत्याही साहित्यिक मूल्यांपेक्षा वाचणाऱ्यांची लैंगिक भूक चाळवणं एवढ्याच एका हेतूनं लिहिल्या गेलेल्या अश्या पुस्तकांचं आयुष्यही अत्यंत मर्यादित असतं. पण इतर विविध विषय हाताळणाऱ्या मराठी साहित्यिकांसाठी हा एक विषय मात्र अस्पर्श्य राहिला.
थोडंसं पल्याड, युरोपियन वाङ्मयविश्वात डोकावून बघितलं, तर जवळ-जवळ तेराव्या शतकापासून लेखकांनी हा प्रकार हाताळलेला दिसतो (मराठीतला समकालीन ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी).
ऑटोमेडन (रोमन, Automedon - The Professional and Demetrius the Fortune), फिलॉडमस (रोमन, Philodemus - Chariot) आणि आपला चिरपरिचित शेक्सपिअर (Venus and Adonis, The Rape of Lucrece) या काही कवींच्या नावांची नोंद संदर्भग्रंथांमध्ये आढळते. गद्य लेखनातही याच सुमारास इरॉटिका प्रकार परत एकदा रोमन, ग्रीक आणि इटालियन लेखकांनी हाताळलेला दिसतो. जोवान्नी बोकाचो (इटालियन, Giovanni Boccaccio - Decameron), ब्राचोलिनी (इटालियन, Gian Francesco Poggio Bracciolini, the Facetiae) ही काही गाजलेली नावं. पिकोलोमिनी (Aeneas Sylvius Piccolomini, The Tale of Two Lovers) याचं 'द टेल ऑफ टू लव्हर्स' हे १४४४ मध्ये प्रकाशित झालेलं आणि सूचक चित्रांनी भरलेलं पुस्तक पंधराव्या शतकातलं बेस्ट सेलिंग पुस्तक होतं. पुढं हे गृहस्थ पोप (Pope Pius II) झाले. युरोपियन साहित्यात इरॉटिकाच्या पाऊलखुणा या इतक्या पुरातन आहेत.
याचाच अर्थ हा विषय लेखक जमातीसाठी नवाही नाही आणि त्याज्यही नाही. मराठी लेखक यापासून दूर राहण्यामागे मला दोन कारणं दिसतात. कोणताही लेखक लिहितो, फुलतो, वाढतो यामागे एक ढकल- ताण यंत्रणा असते. जेवढी ढकल जोरदार आणि ताण कमी, तेवढा तो लेखक आणि त्याचं लेखन समाजाकडून स्वीकारलं जाण्याची शक्यता जास्त. पण इरॉटिकाच्या बाबतीत मुळात मराठी लेखकाकडून ढकलही कमी दिसते आणि समाजाकडून ताणही जास्त.
 

यातला समाजाचा ताण हा लेखकाच्या व्यक्त होण्यातला अडथळा होय. एका अर्थानं ’कामसूत्र’ लिहिणारे वात्स्यायन सुदैवी. कारण त्यानंतर, का कुणास ठाऊक, पण समाजानं कामव्यवहारावरचं साहित्य नाकारलं (किंवा निदान उघडपणे स्वीकारलं नाही). कामवासना वाईट, कामव्यवहार हा अंधारात चोरून उरकायचा, या सगळ्या समजांतून इरॉटिका हा प्रकार मराठीत जवळ-जवळ रुजलाच नाही असं म्हटलं तरी चालेल. नव्वदीच्या दशकापर्यंत समाजानं आखून दिलेली नैतिक रेघ अदृश्य असली तरी स्पष्ट होती. विजय तेंडुलकरांसारखा ताकदीचा लेखक, ज्याच्या लेखनातले लैंगिकतेचे अंडरकरंट्स ('सखाराम बाईंडर', 'शांतता! कोर्ट चालू आहे') समाजानं स्वीकारले होते, त्याच्या 'कादंबरी - १' आणि 'कादंबरी - २' सारख्या पुस्तकांवर जबरदस्त टीका झाली. या पुस्तकांच्या वाङ्मयीन मूल्याबद्दल वाद होऊ शकत असले, तरी ते पिवळ्या पुस्तकांपेक्षा नक्कीच जास्त होतं. तर ही झाली यंत्रणेची एक बाजू. या बाजूवर लेखकाचं नियंत्रण नसतं. त्यामुळे लेखकावर इथे फार मोठी जबाबदारी नाही.
यंत्रणेची दुसरी बाजू - ढकल, हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. या बाजूवर लेखकाचं पूर्ण नियंत्रण असतं आणि तरीही मराठी लेखकांची ढकल कमीच राहिली आहे. याच कारण सापडतं ते फुल्या-फुल्यांचं साहित्य लिहायला जे स्रोत लागतात त्या स्रोतांमध्ये. हे स्रोत एखाद्या चौकटीसारखं काम करतात. चौकट एखाद्या कथेच्या / कादंबरीच्या / कवितेच्या सीमा आखते आणि त्या सीमांमध्ये जी कलाकुसर चालते, ती लेखकाच्या अनुभवांच्या / प्रेरणांच्या / कल्पनाशक्तीच्या बळावर. या स्रोतांचं फुल्या-फुल्यांच्या साहित्यात नेमकं काय स्थान आहे हे ओळखल्यावर, मराठीत हे साहित्य फारसं का नाही याचं उत्तर आपसूक मिळतं.
निव्वळ प्रेम आणि त्यातून उद्भवणारे शारीर व्यवहार हे फार मोठ्या इरॉटिक शक्यतांना जन्म देऊ शकत नाहीत. प्रेम ही भावना, भारतीय संदर्भात पवित्र-अशारीर-आत्म्यांचं मीलन-लग्न इ. इ. संकल्पनांशी निगडित आहे. यात शारीर व्यवहार काहीसे दुय्यम मानले जातात. शिवाय त्यात एक खासगीपण, संकोच आहे. त्यामुळे शरीरसंबंधाच्या कृतीचं किंवा अवयवांचं एक लेखक किती प्रकारे आणि किती वेळा वर्णन करणार? आणि केलं तरी ते ना. सी. फडक्यांनी ज्या पद्धतीच्या लाडीक गुलाबी कादंबऱ्या लिहिल्या, त्यापलीकडे ते जाणार नाही. हा प्रकार थोडा सॉफ्ट पॉर्न प्रकारात मोडतो. या काळाला मी सोयीसाठी 'लाडीक गुलाबी युग' म्हटलं आहे.
लेखकांसाठी निव्वळ शारीर व्यवहाराचं जे चित्रण मर्यादा ठरतं, तोच अवकाश कवींना मात्र बऱ्याच वेळा पुरेसा असतो. कविता हा फॉर्म हवी तेवढी संदिग्धता देतो. उपमा, उत्प्रेक्षा यांचा वापर करून, सांगायचं ते सांगून कवी नामानिराळे राहू शकतात. कवींची शृंगाररसाची परंपरा ही सर्व काळांत जपली गेली - बदल झाला तो व्यक्त होण्याच्या पद्धतीत. कालिदासाच्या ’कुमारसंभव’मध्ये इरॉटिझमच्या जवळ जाणारी शृंगारिक वर्णनं आहेत, पण तरीही कालिदासाच्या कवीपणाला कसला डाग लागला नाही. मर्ढेकरांची ’बोंड’, विंदांची ’वक्रतुंड’ नावाची विरूपिका, देहभानाने मनःपूत भारलेल्या ग्रेसांच्या असंख्य कविता, ढसाळांच्या 'गोलपिठा'तल्या कविता, ही याची उदाहरणं होत. नुसत्या कविताच नाही, तर लोकगीतं, लावण्या हे प्रकार जुन्या काळापासून अगदी सहजपणे कामुकता हाताळतात.
अबोला का हो धरिला
सखया बोला मजसी
शरीराची होते लाही
सोसवेना मजला बाई
का हो छळिता
किंवा
तुम्ही हीना मी दवण्याची काडी
बाई विषयाची गोडी
लागली तुम्हां फार
बारा वर्षे गेला पाऊस
जमीन करा गार…
(संदर्भ: बैठकीची घरंदाज लावणी: मुकुंद काळे, 'डिजिटल कट्टा’, दिवाळी २०१५)
प्रेम आणि तत्संबंधी शारीर व्यवहारातून निर्माण झालेल्या साहित्याची पुढची नैसर्गिक पायरी म्हणजे शारीरिक आकर्षण, वासना यांतून निर्माण होणारं साहित्य. यात प्रेमाचं आत्मिक, विशुद्ध इ. रूप मागे पडून ते भौतिक स्वरूपात प्रकट होतं. एव्हाना शहरीकरणाला, बेकारीकरणाला, बाईच्या घरातून बाहेर पडण्याला, पारंपरिक कुटुंबसंस्था उसवण्याला कुठंतरी सुरुवात झाली होती. दृष्टीआड कसोशीने लपवलेली काही पात्रं; देवदासी, जोगत्ये, तमासगीर, मुरळी, लाल आलवणातल्या तरुण विधवा, माजोरडे गावप्रमुख, लंपट म्हातारे, माजावर आलेली पोरं इ. लेखकांच्या रडारावर उगवू लागली. इथे कुठेतरी चौकटी मोडणारं युग सुरू झालं. मी युग हा शब्द कालखंड अश्या अर्थानं वापरतोय आणि तो कोणत्या नेमक्या आकड्यांमध्ये मांडता येईलच असं नाही. मराठीत काही दमदार धाडसी साहित्य निर्माण झालं ते या स्रोतापासून. खानोलकर, भाऊ पाध्ये, दळवी, श्री. ना. पेंडसे, पु. शि. रेगे, रत्नाकर मतकरी अश्या बिनीच्या लेखकांनी लग्नसंबंधामधली कुचंबणा, न भागणारी वासना, नाक्यावरच्या पोट्ट्यांची लगट (वासुनाका), बाहेरख्यालीपणा असे विषय हाताळले. या कालप्रवाहाला छेद देणाऱ्या काही लिखाणाची नोंद इथे घेणं प्राप्त आहे. आनंद साधल्यांचं ’आनंदध्वजाच्या कथा’ हे असंच एक पुस्तक. जुना काळ घेऊन, विनोदी आणि प्रसंगी तुच्छतादर्शक भाव ठेवून पुरेश्या अश्लील भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाची नोंद या विषयावर मराठीत लिहिल्या गेलेल्या जवळजवळ प्रत्येक लेखात आढळते. ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक वाङ्मयात या अनुषंगानं क्वचित येणारी काही उदाहरणं (अहिकच्या घामापासून मूल होणं किंवा तहिकची काचोळी तंग होणं इ.) ही अत्यंत तत्कालिक आणि संदर्भहीन ठरतात. त्या पार्श्वभूमीवर साधल्यांचं जुन्या काळात घेऊन जाणारं पुस्तक विशेष म्हणता येईल. नाटकांच्या बाबतीत बोलायचं तर ’महानिर्वाण’, ’शांतता! कोर्ट चालू आहे’ मधला लैंगिक अंडरकरंट, ’पुरुष’, ’सखाराम बाईंडर’, मधला रासवटपणा ते केवळ स्त्रियांसाठी म्हणून केले गेलेले ’योनी-मनीच्या गोष्टी’; अशी काही मोजकी नाटकं या विषयाला ओझरता स्पर्श करून गेली. मराठी रंगभूमीच्या मर्यादा ते नाटककारांचा वकूब या दोन टोकांमध्ये फुल्याफुल्यांचं नाटक फारसं झालंच नाही. लैंगिकतेचा परिघ हा देहपुर प्रेम, विकृती, हिंसा यांनी व्यापलेला आहे. मराठी रंगभूमीवर यांची समजूतदार मांडणी करणं तसं कठीण काम. जयवंत दळवीं आणि विजयाबाईंनी ‘बॅरिस्टर’ नाटकात लैंगिकतेचा मराठी रंगभूमीला पेलवेल इतकाच आणि तरीही धाडसी असा खेळ मांडला. मनाचा आजार आणि शारीर ओढ यांचा अप्रतिम मेळ दळवींनी नाटकभर राखला. तोल सांभाळला नाही तर असं लिखाण दर्जाहीन होण्याची शक्यता दाट असते. भैरप्पांचं ’मंद्र’ (मराठी अनुवाद- उमा कुलकर्णी) हे याचं एक उदाहरण (या पुस्तकाचं विच्छेदन: http://samvedg.blogspot.in/2012/06/blog-post.html). आणि त्याचमुळे मला खानोलकर (रात्र काळी घागर काळी) हे पार विलक्षण वाटतात. सहजपणे सवंग बनू शकणारा विषय, एक संवेदनशील कवी आणि अचाट प्रतिभेचा लेखक कसा शब्दबद्ध करतो, याचं हे उदाहरण (पण नेमकी फूटपट्टी लावायची तर हे लिखाण इरॉटिक साहित्य प्रकारात मोडेल. खानोलकरांना याची इरॉटिका करता आली असती का? ’रात्र काळी’चं कथाबीज पाहता याचं उत्तर होकारार्थी येईल.) :
रात्र काळी चित्र - १


 
रात्र काळी चित्र - २
 जे काळानुरूप बदल मराठी फुल्या-फुल्यांच्या साहित्यात होताना दिसतात, तसे बदल युरोपियन साहित्यात दिसत नाहीत. युरोपियन साहित्यात फुल्या-फुल्यांचं साहित्य वाढलं ते सर्वांगानं आणि सर्व काळांमध्ये. मुळातच एक समाज म्हणून त्यांचा लैंगिक संबंधांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा भारतीयांपेक्षा खूपच वेगळा आहे. त्यातून जे काही उद्भवत राहिलं, त्यामुळे युरोपियन लेखकांना लिहिण्याचे नेमके स्रोत मिळत गेले. या उपलब्ध असणाऱ्या चौकटीमध्ये तपशिलांची, कल्पनांची भर टाकून युरोपियन लेखकांनी साहित्यनिर्मिती केली. मराठी लेखकांसाठी हे स्रोत मुळातच उपलब्ध नव्हते/नाहीत किंवा अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध होते. याला समांतर उदाहरण देण्याचा मोह मला टाळता येत नाही. युरोपियन कलाप्रांतात उत्पात घडवणारे असंख्य प्रयोग झाले; त्यात आक्रोश, वेदना, माणुसकी, कुटुंबसंस्था, हिंसाचार, मानसिक आजार असे विषय गंभीरतेने हाताळले गेले. यातल्या असंख्य विषयांची मुळं कुठेतरी जागतिक महायुद्धांशी निगडित आहेत. भारताला महायुद्धांची झळ बसली नाही आणि तो अनुभव नसल्याकारणानं मराठी किंवा एकूणच भारतीय कलाकार पारंपरिक अनुभवांच्या परिघात फिरत राहिले. (अपवाद: फाळणीच्या दरम्यान झालेल्या अमानुष हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हाडांच्या तळापर्यंत पोचणारी तमस, होश्यारपूर टू लाहोर, पिंजर सारखी पंजाबी पुस्तकं). एकुणातच अनवट विषयाची टोकदार अभिव्यक्ती निव्वळ कल्पनाशक्तीच्या बळावर करता येणं अशक्य नसली तरी कठीण असते. अश्या कलाकृतींना अनुभवांचा सांगाडा नसेल तर कालौघात चमकदार कल्पना ओघळून त्या कलाकृतीला विकृत स्वरूप येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लैंगिकता आणि हिंसा या समाजातल्या आदिम भावना आहेत. युरोपियन साहित्यात यांचं एक घट्ट मिश्रण आढळतं. युरोपियन समाजाच्या उदार लैंगिक दृष्टिकोनामुळे की अजून कशामुळे ते माहीत नाही, पण या मिश्रणात फार जुन्या काळापासून लैंगिक विकृतीचीही भर पडलेली दिसते. तगड्या लेखकासाठी लैंगिकतेतून उद्भवणारी हिंसा आणि विकृती हे फार आकर्षक समीकरण आहे. इथे अजून एक मोठा फरक नमूद करायला हवा. लैंगिक हिंसा आणि विकृती यांवर आधारित साहित्य हे मोठ्या अंशी 'गुन्हेगारी साहित्य' (क्राईम फिक्शन) प्रकारात मोडतं आणि मराठी लेखक या प्रकाराला कायमच दुय्यम समजत आलेले आहेत. युरोपियन लेखकांनी होमोसेक्श्युऍलिटी, ऑर्जीज्, सॅडोमॅचोईजम, प्रॉस्टिट्यूशन, पेडोफिलिया, चाईल्ड अब्यूज असे अनेक विषय हाताळले. यात निव्वळ स्वस्तातली आणि कुतूहल चाळवणारी करमणूक करणं हा उद्देश नव्हता. कित्येक लेखकांनी फुल्या-फुल्यांच्या साहित्यातून तेव्हाच्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक स्थितीवर नेमकं बोटं ठेवलेलं दिसतं. इथे मला मार्की द साद (Marquis de Sade)चा उल्लेख करावा वाटतो. सतराव्या शतकाच्या मध्यावर जन्माला आलेला हा फ्रेंच लेखक त्याच्या इरॉटिक लिखाणामुळे प्रसिद्ध होता. त्याच्या पुस्तकातून त्यानं लैंगिक कल्पनाविलास, हिंसा, गुन्हेगारी यांचा आधार घेत कॅथलिक चर्चवर जबर टीका केली. आयुष्यातली ३२ वर्षं मानसिक रुग्णालयात घालवलेल्या या लेखकाचं एक वाक्य मी इथे देतो : "Sex without pain is like food without taste." या वाक्यावरून त्याच्या लिखाणाची दिशा लक्षात यावी. Sadism आणि Sadist हे इंग्रजी शब्द त्याच्या नावावरून तयार झालेले आहेत. गोया, पिकासो आणि कित्येक सरिअलिस्ट चित्रकारांवर सादच्या लिखाणाचा प्रभाव होता. थोडक्यात आपल्या नैतिक-अनैतिकतेच्या फूटपट्ट्या न लावता या विषयाकडे आणि लेखकांकडे बघण्याची आपली तयारी हवी. यात हिंसेचं किंवा विकृतीचं उदात्तीकरण करण्याचा हेतू नाही. पण केवळ आपल्या नीतिमत्तेत बसत नाही म्हणून, समाजात घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करण्याची जी खास भारतीय पद्धत आहे, त्यावर कुठेतरी कलावंतानं व्यक्त होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ज्या देशात अमानुष, हिंसक सामूहिक बलात्कार होतात, त्याची तपशीलवार वर्णनं वर्तमानपत्रांतून येत राहतात, तिथला कलावंत अश्या घटनांनी हलत नसेल, तर इतर लोकांबरोबरच त्याचीही कातडी गेंड्याची झाली आहे असंच म्हणावं लागेल. सिनेमा, फॅशन या विषयांना वाहिलेली उठवळ मासिकं चाळली, तरी त्यात कास्टिंग काऊच, जबरदस्तीनं (सम-/)लैंगिक संबंधांसाठी भाग पाडणं हे विषय आंबटपणे चघळले जातात. वेळोवेळी विविध धर्मस्थळांमधून तथाकथित धर्मगुरूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या बातम्याही आपल्याला नव्या नाहीत. पण समाजाकडून येणारा ताण आणि दस्तुरखुद्द लेखकाच्या बाजूने आवश्यक असणारी ढकल यांचा अभाव आपल्याकडे प्रकर्षानं जाणवतो. मग अशा विषयांच्या मुळाशी जाण्याकरता लागणारी मेहनत, संशोधन हे तर दूरच राहिलं. लैंगिक हिंसा आणि विकृती यांचं मिश्रण असणारं मराठीतलं (आणि एकमेव?) उदाहरण म्हणजे अनंत सामंतांची 'एम टी आयवा मारू'. 'एम टी आयवा मारू'मध्ये लैंगिकता हे एक पात्र आहे. लेखकाच्या, आयवा मारूच्या, दीपकच्या सोबत कधीतरी उज्ज्वलाची स्वतःची गोष्ट सुरू होते आणि एक लैंगिक पिसाटपण कादंबरीभर पसरून राहतं.
आयवा मारू - १
 

इरॉटिका साहित्यप्रकारातली काही मोठी नावं इथं सांगणं क्रमप्राप्त आहे. डी. एच. लॉरेन्स ('लेडी चॅटर्लीज लव्हर' - हे आपल्याकडे इंग्रजी एम.ए.च्या पातळीवर अभ्यासक्रमात असतं आणि बऱ्याच वेळा शिकवणाऱ्यांची त्रेधातिरपीट उडते), व्लादिमिर नाबोकोव्ह ('लोलिता' - ३७-३८ वर्षांच्या प्रौढ माणसाचे त्याच्या १२-१३ वर्षांच्या सावत्र मुलीशी असणारे संबंध) आणि जॉन क्लेलॅन्ड ('फॅनी हिल'). अजून कितीतरी नावं गूगलवर अगदी सहज मिळतील, पण जॉन क्लेलॅन्ड (John Cleland) हे नाव त्यांत महत्त्वाचं आहे. अठराव्या शतकाच्या मध्यात या माणसानं ब्रिटिश इरॉटिका साहित्यामधलं अत्यंत महत्त्वाचं, गाजलेलं आणि वादग्रस्त पुस्तक लिहिलं - 'Fanny Hill'. हे पुस्तक 'मेम्वॉर्स ऑफ अ वुमन ऑफ प्लेझर' या नावानंसुद्धा ओळखलं जातं. कादंबरीच्या स्वरूपात लिहिली गेलेली ही पहिली इंग्रजी इरॉटिका, जिच्यावर बहुसंख्य देशात बंदी आली होती. पौगंडावस्थेतल्या एका सामान्य मुलीच्या लैंगिक अनुभवांवर आधारलेल्या या पुस्तकावर पुढे सिनेमेही निघाले. (खरं म्हणजे या अनुभवांना निव्वळ पौगंडावस्थेतील अनुभव म्हणता येणार नाही, कारण यातली फॅनी सरळ सरळ वेश्याव्यवसायात ढकलली जाते.) ज्युडी ब्लूमचं १९७८ मध्ये आलेलं ’फॉरेव्हर’ (स्त्री-लैंगिकता), ’द मिसएज्युकेशन ऑफ कॅमरन पोस्ट’ (एमिली डॅन्फर्थ - गे स्त्रीपात्र), ’यू अगेन्स्ट मी’ (जेनी डाऊनहॅम - बलात्कार आणि आघात), ’व्हेअर द स्टार्स स्टिल शाईन’ (ट्रिश डोलर - लैंगिक हिंसा) ही काही ’यंग ऍडल्ट फिक्शन’मधली लैंगिकतेशी संबंधित पुस्तकं. यांतले अनुभव वैश्विक आहेत. पण मराठीत तर खऱ्या अर्थानं ’यंग ऍडल्ट फिक्शन’ अजून आलेलंच नाही. पौगंडावस्थेतील अनुभव, कुतूहल, गप्पा हे लेखकासाठी मोठं खाद्य खरं. पण परत एकदा - कदाचित समाजाकडून येणारा ताण असेल किंवा आणखी काही कारण असेल, या विषयावर मराठीत फारसं काही दिसत नाही. ’बाप-लेकी’ या पुस्तकात काही लेकींनी त्यांना पौगंडावस्थेत आलेल्या विचित्र अनुभवांचं वर्णन केलेलं आहे. पण तो धागा तिथेच संपला. इथे ऍन फ्रॅन्कचं उदाहरण योग्य ठरेल. बहुसंख्य वाचणाऱ्यांना तिच्या डायरीबद्दल माहीत आहेच. वयात येतानाच्या ऍनच्या देहशोधाबद्दलच्या नोंदी तिच्या वडलांनी गाळल्या. ठीक! पण मराठीत याचा अनुवाद येताना तो संपूर्ण संदर्भच हरवून जातो हे नवलच!
एकविसाव्या शतकात अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित दोन समांतर घटना घडल्या. इंटरनेट सामान्य माणसाच्या आवाक्यात आलं आणि स्त्री लेखक त्यांचे लैंगिक अनुभव, स्त्रीत्वाच्या शारीर जाणीवा धीटपणे लिहू लागल्या. एकाचवेळी खासगीपण आणि वैश्विकता जपण्याची अमाप मुभा देणारं इंटरनेटसारखं माध्यम आणि समाजाचे नीतिनियम/स्वतःचे संकोच झटकून कोशातून बाहेर पडू पाहणाऱ्या स्त्री लेखक हा फार छान योगायोग होता. पण इंटरनेटवर उधाण आलं ते अत्यंत उठवळ, अश्लील साहित्याला. हे साहित्य पूर्वीच्या पिवळ्या पुस्तकांपेक्षा साहित्यिक मूल्यांत काही वेगळं नव्हतं. शिवाय इंटरनेट दृकश्राव्य माध्यम असल्याकारणानं या परिघात इरॉटिक साहित्यापेक्षा पॉर्नहब म्हणून त्याची वाढ वेगात झाली. स्लॅश फॅनफिक्शन हे इंटरनेट साहित्यातलं एक वेगळं वळण म्हणता येईल. फॅनफिक्शन प्रकारातलं आणि स्त्री-इरॉटिका साहित्यामधलं एक दणदणीत आणि अगदी अलीकडच्या काळातलं नावं म्हणजे एरिका मिशेल उर्फ ई. एल. जेम्स (५० शेड्स ऑफ ग्रे). ५० शेड्सनं मम्मी पॉर्न (Mommyporn) असा नवाचं प्रकार जन्माला घातला. पण त्या आधी स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलेलं फुल्याफुल्यांचं साहित्य नव्हतंच असं नाही.
स्त्रियांच्या दृष्टिकोनातून लैंगिकतेचं चित्रण करणारं साहित्य अगदी तेराव्या-चौदाव्या शतकापासून लिहिलं गेलं. अशा साहित्याचे विषय म्हणजे, कधी वयस्क स्त्रियांनी नुकत्याच लग्न झालेल्या वधूला दिलेला सल्ला असायचा किंवा एखाद्या ननला तिच्या वासनांचं दमन करण्याबद्दलचा उपदेश असायचा किंवा वेश्यांमधला संवाद असायचा. पुस्तकातलं मध्यवर्ती पात्र स्त्री असली, तरी लिहिता हात पुरुषाचा होता. हे चित्र एकविसाव्या शतकात बदललं. स्त्री-लेखकांमुळे पाश्चात्त्य जगात रोमॅन्टिका, लेस्बियन इरॉटिका, पॅरानॉर्मल इरॉटिका, फेअरी टेल इरॉटिका, स्टेमपंक इरॉटिका असे अनेक प्रयोग सुरू झाले, वाढले. मराठीत स्त्रियांच्या देहभानाचं चित्रण करणाऱ्या केवळ दोन लेखिका पटकन आठवतात; गौरी देशपांडे आणि मेघना पेठे. दोघींच्या लिखाणातलं साम्य म्हणजे सुस्पष्ट स्त्रीवादी भूमिका. गौरी देशपांडेंच्या लिखाणात लैंगिकतेचे संदर्भ नात्यांच्या गुंफणीतून येतात, त्यात आक्रमकता कमी आणि स्वतःच्या देहाच्या स्वातंत्र्याचं भान जास्त असतं. पेठ्यांच्या लिखाणाला धारही असते आणि कित्येकवेळा लैंगिकता हे एक पात्र बनून येतं. म्हटलं तर या लेखिकांची अजूनही एक परंपरागत म्हणता येईल चौकट आहे. जो पॅटर्न (अनुक्रमे प्रेम, शारीरिक आकर्षण इ.) पुरुष लेखकांनी पाळला, जवळ जवळ तोच पॅटर्न स्त्री लेखकही पाळताना दिसतात. (याला सणसणीत अपवाद म्हणजे प्रोतिमा बेदींचं आत्मचरित्र- ’टाईमपास’) खरं म्हणजे स्त्री लेखकांना लिहिण्यासाठी खूप विस्तृत पटल आहे, रामायणातली उर्मिला (’लक्ष्मणाची रेघ आली उर्मिलेच्या कामी’ ही ओळ ग्रेसांनी उगाच का लिहिली!), महाभारतातल्या नायिका (कुंती-माद्री-द्रौपदी) ते थेट जीन्स आणि पायात जोडवे घालणारी आजची स्त्री. आज समाज दोन बिंदूमध्ये ताणला जातोय. एकाचवेळी समाजाचं अमेरिकीकरण (डेटींग, लिव्ह-ईन-रिलेशन, फ्लर्टींग, न्युक्लीअर कुटुंब, घटस्फोट) चालू आहे आणि त्याचवेळी त्या अमेरिकीकरणाला तोलून धरणारी समाजव्यवस्था मात्र उपलब्ध नाही. या विशिष्ट घडामोडींचा लैंगिकतेवर निश्चितच परिणाम होतो.
मराठी लेखिकांनी या विषयांवर लिहायचं ठरवलं तर या बदलत्या काळाचा तो एक अप्रतिम आढावाच होईल.
साहित्य समाजभान घडवतं (इथे मी किंचित साशंक आहे) - समाजशास्त्रज्ञांसाठी, मानसोपचारतज्ज्ञांसाठी तो एक आरसा असतो हे जर क्षणभर खरं मानलं, तर बदलत्या काळाचे पडसाद आपल्या साहित्यात पडणं आवश्यक आहे. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. ज्या संक्रमणातून समाज जात आहे, त्याचं आकलन, त्याचे विविध पैलू लेखकांनी हाताळलेच नाहीत; म्हणून ते प्रश्न अस्तित्वातच नाहीत असं समजणं मूर्खपणाचं लक्षण होय. इंटरनेटमुळे प्रत्येकाला वाट्टेल ते बघण्याचं स्वातंत्र्य, त्यातून उद्भवणाऱ्या विकृती / हिंसाचार, बदलत चाललेल्या कुटुंबपद्धती आणि निर्माण होणारे नवे प्रश्न, विविध संस्कृतींची सरमिसळ आणि बदलत जाणाऱ्या नैतिकतेच्या कल्पना, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांतल्या फिकुटत जाणाऱ्या सीमा या साऱ्या-साऱ्यांचा दस्तावेज म्हणजे फुल्याफुल्यांचं साहित्य. लेखकांनी उत्तरं शोधावीतच हा हट्ट नसतो, पण त्यांनी प्रश्न मात्र जरूर निर्माण करावेत.
संदर्भ:
१. www.wikipedia.org
२. A history of pornography: Montgomery
३. Fanny Hill: John Cleland
४. Lolita: Vladimir Nabokov
५. Lady Chatterley's lover: D.H. Lawrence
६. The 120 days of Sodom: Marquis de Sade
७. बैठकीची घरंदाज लावणी: मुकुंद काळे- डिजीटल कट्टा, दिवाळी २०१५
८. रात्र काळी घागर काळी: चिं.त्र्यं. खानोलकर
९. एम टी आयमा मारु: अनंत सामंत
१०. मंद्र: भैरप्पा । उमा कुलकर्णी
+ Project Gutenberg


मूळ लेख "ऎसी अक्षरे" : http://www.aisiakshare.com/node/5263

Tuesday, May 17, 2016

पांढऱ्या पायांची काळी मांजर

लोक कधी ही येऊ शकतात. लेकवी (ढ लोकांसाठी: लेखक + कवी = लेकवी) रिकामा असला तरी त्याला आपण उपलब्ध नाहीत सांगायला आवडतं. त्यामुळं आता दार उघडून लेकवी नुक्तेच सुक्ष्मात गेले असं विक्षिप्त उत्तर द्यावं की काय या विचारात असताना दुसऱ्यांदा दारावर टकटक झाली. खरं तर ही अशी सुर्य वितळत असतानाची वेळ म्हणजे व्याकूळ होऊन हातांना शब्दांचं सहावं बोट फुटण्याची वेळ. पण नेमकी लेकवीची दर्दभऱ्या गजलांची सीडी गेले दोन दिवस खरखरत असल्यानं त्याला पुरेसं व्याकूळ होता येत नव्हतं. त्याच्या कुठल्यातरी टेकी फ्याननं सांगीतल्याप्रमाणं त्यानं ती सर्फ मधे बुडवून उन्हात वाळत टाकली होती पण त्या गायकाचा गळा म्हणावा तितका अजून साफ झाला नव्हता. थोडक्यात ऎन संध्याकाळचा लेकवी चक्क मोकळा होता आणि आता तीच ती टकटक परत...

साशंक नजरेनं लेकवीनं दार किलंकिलं करुन बघितलं, पण बाहेर कुणीच नव्हतं. लेकवी ऑलमोस्ट अश्रद्धेय असल्यानं त्याचा भुताखेतांवर विश्वास नव्हता पण उगाच धोका नको म्हणून त्यानं ’श्रीराम’ म्हणत सुस्कारा टाकला. दार लावून तो वळला तर नेमकं पायात काही तरी गुबगुबीत अडखळलं. अल्टर ईगोनं यावं तसं अगदी सहजपणे एक मांजर आत आलं होतं. आमंत्रणाच्याबाबतीत अगदी संवेदनशील असणाऱ्या लेकवीला खरा धक्का बसला जेव्हा ते मांजर हक्कानं सोफ्याच्या उशीला टेकून बसलं. ’शुक शुक’ कुठल्यातरी जुन्या पुस्तकात दिलेला मांजर हाकलण्याचा मंत्र लेकवीला नैसर्गिकरित्या आठवला. मांजर ढिम्म हललं नाही. वैतागून लेकवींनं टेबलावरचा काठोकाठ भरलेला पिवळा स्ट्रेस बॉल मांजराच्या बाजुला पडेल अश्या बेतानं फेकून मारला. समिक्षक उचलतो तेव्हढीच बेताची नजर वर करुन मांजरानं बॉलचा आढावा घेतला.

"तुझं झालं असेल तर तू बसु शकतोस" किंचीत घसा खाकरुन मांजर बोललं "तुझंच घर आहे." स्वतःच्याही नकळत लेकवी समोरच्या सॊफ्यावर बसला. "बोलणारं मांजर बघण्यातलं नवलं संपलं की सांग, मग बोलू", भावनाविरहीत आवाजात मांजर बोललं तसं लेकवी आपलीच लाज वाटली. तेव्हढ्या काही सेकंदात त्यानं मांजराचं प्रोफायलिंग पुर्ण केलं होतं; उंची मांजरा एव्हढी, वय मांजरा एव्हढं, डोळे घारे, रंग काळा मिट्ट आणि पाय- पांढरे!

"तू...तू बोलतेस?" क्षणभर तू म्हणावं की तुम्ही असा लेकवीचा गोंधळ उडाला खरा पण तो सावरला "आणि इथे काय करतेस? काय काम आहे?"

मांजरानं डोळे मिटले, मिश्या किंचीत फिस्कारल्या आणि संयमी स्वरात ते उत्तरलं "मी वाट्टेल ते उत्तर देऊ शकते, उदा. मी छोटा चेतन आहे. पण त्यानं काय फरक पडणारै? मी सध्या फक्त एक मांजर आहे, काळ्या रंगाचं आणि पांढऱ्या पायांचं. मांजर अश्याकरता कारण सगळ्या पाळीव प्राण्यात आत्मभान असणारी मी एकमेव प्राणी आहे आणि त्याच मुळे स्वार्थीही. मी तुमच्यात असतेही आणि त्याचवेळी मी स्वतंत्र ही असते, कलावंत समाजात वावरतो तस्संच सेम टू सेम."

"हे बघ" राग आवरत लेकवी म्हणाला "मी विविध विषयांवर लिहीतो म्हणून मी बोलणाऱ्या मांजरावर लिहीनच असं नाही. शिवाय लिंगाचा किती हा गोंधळ; ती मांजर की ते मांजर? निदान तो मांजर म्हणजे बोका एव्हढं तरी नशीबानं ठरलय तुमच्यात...लेख भर मला हा लिंगोबाचा डोंगर चढत उतरत बसावं लागेल, नकोच ते...." लेकवीला सरतशेवटी एक तुच्छतापुर्ण विनोद करता आला याचा बक्कळ आनंद झाला. शिवाय हल्ली मांजराबद्दल वगैरे कोण वाचतं?

मांजरानं खास मार्जार स्टाईलनं लेकवीकडं पुर्ण दुर्लक्ष केलं. "म्हणजे तू लेखक समजतोस स्वतःला...." लेकवीच्या दृष्टीनं हा अक्षम्य अपमान होता पण मांजरानं आवाजातला करडेपणा जराही जाऊ दिला नाही "तुझ्या लेखकपणाचा ताळेबंद समजून घ्यायला तर मी आले आहे..." समिक्षकांनीच हे मांजर आपल्या अंगावर घातलं आहे हा लेकवीचा संशय आता जवळ जवळ फिटलाच. तरीही त्याला मनात कुठेतरी गुलाबी वाटून गेलं....पण म्हणून पांढऱ्या पायांचं काळं मांजर?

लेकवीच्या मागे मागे मांजर आतल्या खोलीत गेलं आणि आपण एका नव्या विश्वाची निर्मिती पाहातोय की काय या कल्पनेनं भ्रमित झालं.

उर्जास्त्रोतांनी भारलेल्या दोन खांबांदरम्यान विविधरंगी प्रकाश उत्सर्जित करणारा एक चौरस ठोकळा स्वतःच्या त्रिमीत कर्णाभोवती कुठल्याही आधाराविना फिरत होता. तो ठोकळा ना जमिनीवर टेकलेला होता ना त्यानं खांबांचा आधार घेतला होता, जणू की दुसरा त्रिशंकुच. सोबत कसलाही आवाज नाही, अधून मधून फक्त सोनेरी रंगाचे प्रकाशाचे काही शिंतोडे तेव्हढे जमिनीवर सांडत होते. एखाद्या यंत्राला जश्या तेल, वंगण पुरवणाऱ्या नळ्या असतात तश्या दोन नळ्या त्या ठोकळ्याच्या वर लटकत होत्या. एका नळीच्या वर भानामती असावी असे खुप सारे अंगठे आणि हसरे गोल होते आणि दुसऱ्या नळी जवळ कसलंस वर्गीकरण केलेली पुस्तकांची एक मर्यादित चळत होती.

मांजरानं डोळे भिरभिरे करणं थांबवलं तेव्हा त्याला चौरस ठोकळ्यावर कुठे ’टीव टीव टिटवी’, कुठे ’तू नळ्या’, तर कुठे ’फ-कर्म’ अशी संबोधनं दिसली. "सोशल मिडीया" लेकवीनं विनाकारणच नम्र सुरात माहिती दिली "मी आपलं गंमत म्हणून त्यांना वेगळ्या बाजाची नावं दिली आहेत; सामान्य भाषेत ट्वीटर, यु ट्युब आणि फेसबुक"

मांजरानं कुठून तरी डेटा ऍनॅलिसिसचं छोटेखानी यंत्र काढलं आणि लेकवीच्या फेसबुकाची कुंडली मांडली "तुझ्या ओळखीच्या लोकांपैकी १३% लोक तुझे नातेवाईक आहेत, ७% लोक तुझे ऑफीसवाले, ३५% लोक तुझे शाळा, कॉलेज मधले मित्र आणि तब्बल ४५% लोक नाव असलेले कलावंत आहेत."

"असतील" लेकवी आकडेमोडींनी फारसा प्रभावित होणाऱ्यांपैकी नसतो "यातली कलावंत मंडळी महत्वाची...त्यांची आणि माझी जात एकच. पुर्वी म्हणे साहित्यीक कट्टे असायचे तसंच आता हा आभासी कट्टा झालाय. आम्हाला इथं काळ-काम-वेगाच्या त्रैराशिकात न अडकता बोलता येतं, कल्पनांची देवाणघेवाण करता येते"

हसणारं मांजर आज पर्यंत कोणी बघितलेलं नाही पण लेकवीच्या उत्तरावर मांजरानं जो काही चेहरा केला त्यालाच बहुदा कुत्सीत हास्य म्हणत असतील "४५% कलावंतांपैकी जेमतेम पाच टक्क्यांनी तुला त्यांच्या फेसबुकात ’मित्र’ या कॅटगरीत टाकलं आहे, उरलेल्यांनी तुझी बोळवण ’निव्वळ ओळखीचा’ अशी केली आहे. तू जी कल्पनांची देवाणघेवाण म्हणतोस ती त्या कलावंतांनी टाकलेल्या कुठल्याही नोंदीवरची तुझी प्रतिक्रिया असते ’बरोबर आहे ताई’, ’मलाही अगदी अस्संच वाटतं’ किंवा ’क्या बात है मित्रा’ अश्या अर्थाची. शिवाय तुझ्या कुठल्याही नोंदीवर कुठल्याही कलावंतानं प्रतिक्रिया दिल्याचं मला तरी दिसत नाही"

नवी चप्पल म्हणत नाचत जायला आणि ताज्या उष्ण शेणात नेमका पाय पडायला एकच गाठ पडावी तसं काहीसं लेकवीचं झालं. "नेटवर्किंग म्हणतात त्याला" लेकवी पुटपुटला "साहित्यीक बनण्याची ती पहीली पायरी आहे." खोलवर दडवलेली गुपीतं उपटून काढत लेकवी मांजरापुढे का कोण जाणे पण नागवा झाला "तुला त्या दोन नळ्या दिसताहेत नां, त्यातली पहीली नळी नेमकी या मित्रांसाठी. त्यांची नोंद आली रे आली की आधी त्या नळीतून पिळून एक लाईकचा अंगठा आधी डकवायचा, कधीमधी बदल म्हणून स्मायली टाकायचा; नोंद नंतर वाचली किंवा कधी नाही वाचली तरी चालते. पण सतत मी तुझा भक्त आहे ही जाणीव त्या कलाकाराला व्हायला हवी. कलावंत स्तुतीवर जगतो गं, तुझ्यासारख्या मांजरीला नाही समजायचं ते. असे शेकडो लाईक बघितले की त्या कलावंतालाही भरुन येतं. कधी तरी मग त्याला ही हे जाणवतं की हा माणूस आपल्या प्रत्येक नोंदीवर आवर्जून मत देतो आणि मग एक अनुबंध निर्माण होण्याची शक्यता जन्माला येते"

"भाट लेकाचा" मांजरानं अर्थातच हे स्वगत म्हटलं आणि प्रकट प्रश्न विचारतं झालं "आणि ती दुसरी नळी? पुस्तकांच्या चळतीजवळची??"

"नुस्ती पुस्तकं नाही ती...त्यात सीड्यापण आहेत" लेकवीनं आवर्जून सांगीतलं "त्यातून लिहीण्याचा मूड तयार होतो..."

"आणि ईमेजही..." मांजरानं डेटा ऍनॅलिसिसचं यंत्र परत एकदा चालवलं "हे बघं, तू गेल्या महीन्यात बरोबर पाचवेळा दर्दभऱ्या गजलांची क्लीप टाकलीस आणि पंधरा लोकांनी तुझ्या संगीताच्या जाणीवेचं कौतूक केलं. आणि सत्तावीस लोकांनी तुझ्या आवडीच्या लेखकांचे उतारे आणि कवींच्या कविता..."

"इनफ.." लेकवी सात्वीक संतापला की त्याचं इंग्रजी बाहेर येतं " धिस इज ब्लडी इन्सल्टींग. माझ्या संवेदनशीलतेचा अपमान करते आहेस तू..."

"नाही, तसं नाही" मांजरीनं आपला हट्ट सोडला नाही "त्यांनी लिहीलेलं तू परत टाईपण्यात कसली आली संवेदनशीलता?"

"माझ्याच संवेदना जर त्यांनी शब्दबद्ध केल्या तर तीच गोष्ट मी परत का सांगायची?" लेकवीच्या मते हा बेजोड सवाल होता " निव्वळ व्यक्त होणं ही माझी त्या क्षणाची गरज असते आणि म्हणून मी माझ्याच अर्थाचे पण वेगळ्या हातांनी लिहीलेले शब्द परत लिहीतो, हे पुरेसं नाही?"

"ठीक, हे क्षणभर मान्य" मांजरानं स्वतःभोवती एक गिरकी घेतली "पण हे एव्हढंच आहे? आता या पुस्तकांचं वर्गीकरण बघ नां; गौरी आणि सानिया, गुलजार आणि गालीब, पु ल आणि वुडहाऊस, जी ए आणि ग्रेस, चित्रे आणि कोलटकर....कसं नेमकं आहे! तुला या पुस्तकातले मूड स्वतःवर रुजवून घ्यायला आवडतात. तू जीए किंवा ग्रेस पांघरुन घेतोस आणि तुला वाटतं की आपण पराकोटीचे दुःखी, नियतीवादी झालो आहोत. गौरी किंवा सानियाच्या कुशीत असलास की तुला वाटलं की आपण बंडखोर स्त्रीवादी आहोत. त्यांच्या लेखांचे प्यारे टाकून असं जाहीर रित्या सतत हुळहुळणं तुझ्या संवेदनशीलतेवर शिक्कामोर्तबच नाही का! जुनंच वाचून लोकांनी स्स्स....केलं की तुला एक नशिलं समाधान मिळतं. मग तसंच काहीस लिहून तू मोकळा होतोस. एक लेखक, कवी म्हणून, तुझं अस्तित्व ते काय? तू कोण आहेस?"

"मी महाकवी दुःखाचा । प्राचीन नदी..." लेकवीनं सुर पकडायचा प्रयत्न केला. त्याला अजूनही आपण एका पांढऱ्या पायांच्या काळ्या मांजराला का उत्तर देऊ लागतो हे उलगडलं नव्हतं.

"ते ग्रेसांचं.." मांजर एक पंजा वर करत लेकवीला थांबवत म्हणालं "तुझं काय?"

"कवींचे गोत्र एक असते" बाणेदारपणे लेकवी उत्तरला "मी माझं गद्य अमक्याच्या कवितेभोवती रचतो आणि तमक्याच्या गद्यावरुन मी उद्दीपित होऊन कविता करतो म्हणजे मी लेखक नाही? जगातली आठवी आणि त्यानंतरची प्रत्येक गोष्ट ही लेखकांनी केलेली नक्कलच आहे. मग माझ्याच लेखकपणावर आक्षेप का?"

मांजरानं शेपूट गुंडाळून प्रश्नार्थक चिन्ह तयार केलं "आठवी आणि त्यानंतरची प्रत्येक कथा त्या त्या लेखकाची दृष्टी घेऊन अवतरली. प्रत्येकाने मुळ कथाबीज वापरुन नव्या कथेत आपापल्या परीनं विरोधाभास, ताण निर्माण केला, आपले अनुभव, आपल्या नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना ओतल्या, आपण राहातो त्या समाजाच्या मर्यांद्या तोलून पाहील्या. तुझ्या कथांमधे तुझे स्वतःचे अनुभव कुठे आहेत? थोरामोठ्यांचे अनुभव आपलेच समजून तू त्यावर निव्वळ शब्दांच्या बेगडी झुली चढवतोस. लाईकच्या बदली लाईक आणि ’अप्रतिम सुंदर’ च्या बदली ’अप्रतिम सुंदर’ अशी दाद देणाऱ्या खुशमस्कऱ्यांच्या जाळ्यात अडकून त्यांना हवं ते लिहीतोस. अमाश्या पोर्णिमेच्या राती जोगत्याच्या अंगात देवी येते तसा एखादा लेखक तुझ्या अंगात येतो आणि तू लिहीत सुटतोस. तद्दन अंधश्रद्धेशिवाय काय म्हणावं याला! लिहायचं तर प्रतिभा, अनुभव आणि शब्दवंशाचे राजस शाप वागवता यायला हवेत. तुझ्या वाचनावर तू अगम्य मर्याद्या घालून घेतल्या आहेस. तुझं समाजभान सोशलमिडीया पलीकडे शुन्य आहे. तुझ्या लिखाणातल्या प्रतिमा, अगदी शब्दकळादेखिल, तू तत्क्षणी जे वाचत असतोस त्या लेखकासारख्या असतात. त्यामुळं तुझं लिखाण तात्कालीक, उथळ आणि खोटं आहे! तू आणि तुझ्या भोवतालची सगळीच ईको-सिस्टीम तुझा लेखक असण्याचा गंड सतत कुरवाळत असते पण माझ्या क्विझोट्या, कधी तरी शास्त्रकाट्याच्या कसोटीवर स्वतःच लिखाण तोलून तर बघ..."

लेकवीनं कराकरा डोकं खाजवलं आणि दणकन टेबलावर बुक्की मारली "हे फार क्रूर आहे, हे फार क्रूर आहे." मांजरासमोर रडणं कितपत बरं दिसतं हे न कळाल्यानं त्यानं वाहाणारं नाक तसंच वरपलं, किती तरी वेळ. किती तरी वेळ तो डोळे मिटून बसून राहीला आणि उसळणाऱ्या रक्ताचे कढ आवरत राहीला.

मांजरानं चोरपावलांनी जाऊन चहा करुन आणला "घे, कोरा चहा आहे. दूध मी प्याले...थंड दुध ऍसिडीटी मारतं म्हणे"

लेकवीला असं वाटलं की आपल्याला मांजराचं पटतय. त्याला कुणीही पुराव्यानिशी काही समजावलं की त्याला ते लगेच पटतं. पण आपल्या एका अस्तित्वाचे सारे पुरावेच असे नाकारायचे आणि तेही एका पांढऱ्या पायांच्या काळ्या मांजराच्या सांगण्यावरुन, म्हणजे कठीणच होतं.

"पुढच्यावेळी चहा कोरा करणार असशील तर चतकोर लिंबु पिळ त्यात. कोऱ्या चहावर पिवळ्या लिंबानं मी तुझंच नाव लिहीत गेलो....असो" लेकवीनं थोडं आवरतं घेतलं "मग मी लिहीणं बंद करु म्हणतेस? सगळं निरर्थक आहे?" लेकवीला कुणीतरी आपल्या आत्म्याचे स्वप्नघोष अलगद खुडून नेल्यासारखं वाटत होतं "म्हणजे आता कारकुन वापरतात तेच शब्द आम्ही वापरायचे..म्हणजे आता आम्ही भुकेच्या सीमा पोट आणि पोटाखाली आखून घ्यायच्या...म्हणजे आता आम्ही यो यो हनी सिंगची गाणी ऎकायची..."

"यो यो हनी सिंगचा देशीवाद नेमाड्यांपेक्षा फार वेगळा नाही बरं का" मांजर मिश्कीलपणे बोललं "सत्ताविसाव्या वर्षी काय कुरवाळायचं आणि तू उसनेवारीची दुःख कुरवाळत बसलासं..." मांजर अचानक संस्कारी झालं "जगाचं ओझं न घेता मस्त मोकळेपणानं एकदा नाचून बघ, चार वेगळ्या लेखकांची पुस्तकं कोणत्याही अपेक्षा न ठेवता वाचून बघ, जमलं तर एखादी छानशी मैत्रिण मिळवं , निरर्थक कुठल्याश्या गावाला चक्कर टाक आणि पारावरच्या म्हाताऱ्यांची चिवट जीवनेच्छा टिपून आण" मांजरानं टूण्णकन टेबलावर उडी मारली. आपला शुभ्र पंजा लेकवीच्या डोळ्यासमोर नाचवत ते म्हणालं "या पुढंच तुझं लिखाण कुणाच्याही भावनांच्या ऋणात राहू नये म्हणून मी तुला एक पंजा मारणार आहे. खरं तर मी तुला चावू ही शकते पण ते फार डाउन मार्केट दिसेल. शिवाय तुझ्या कपाळावर पॉटरांच्या हॅरी सारखी खुण बरीक शोभूनही दिसेल. या नंतर तुला कुणासारखं, कुणाच्या ओझ्याखाली लिहावं वाटलं की तुझ्या कपाळावरची ही खुण विलक्षण दुखून माझा प्रत्येक शब्द तुझ्या मेंदूत परत परत घुमत राहील. मी आता जाणारै. पण जायच्या आधी तुला एक मनीचा श्लोक सांगून जाणारै- तुला आवडणारा एखादा विषय पकडून त्याचा छान अभ्यास कर, त्याविषयी कुणासाठी म्हणून नाही तर तुला रुचेल ते, हवं तेव्हाच लिही. हल्ली लोक स्वतःच मी अमूक विषयातली तज्ञ असं जाहीर करतात, भलेही लिखाण पाककृतींबद्दल किंवा सामाजिक विषयावरचं रिपोर्ताज असू दे, स्वतःच ’मी लेखक’ अशी ओळख रुजवतात. या मोहात पडू नकोस. लेखकानं आधी स्वतःशी प्रामाणीक असायला हवं. भेटणाऱ्या शक्यतांना नाकारु नकोस पण त्यांना आत पाझरायला वेळ दे. अजून काय सांगु? म्या...हाव चा मंत्र लक्षात ठेव म्हणजे झालं"

पांढऱ्या पायांचं काळं मांजर जसं न बोलवता आलं होतं, तसंच न हाकलता गेलंही; जाताना लेकवीच्या मनातली अनिष्ट कोळीष्टकं घेऊन गेलं.