टोगो आणि ज्येनुफी बॉईज



एखाद्या वास्तुचा चेहरामोहरा हळु हळु त्यात राहाणाऱ्या माणसांसारखा होत जातो. नुक्तंच लग्न झालेल्या कुण्या नववधूची वास्तु अंगावर रंगांची उधळण मिरवत असते, तिचं नवथरपण, तिची अनाघ्रात वळणे कुठल्याशा चुकार क्षणी झट्कन दिसून येतात. एखादं रोपटं कुणाला जुमानता सज्ज्याच्या तळातून उगवतं, ढासळत चाललेला एखादा अनवट चीरा जीवाच्या आकांतानी निर्जीव चुनखडीत बोटं रुतवु पाहातो, अश्या वास्तूत लांबलेल्या सावल्या पेलत जीर्ण वृद्ध तगून असतात. महालांचंही तसंच असतं. त्यांच्या चेहऱ्यावर उमटत नसतात कोणत्याच संवेदना, डोळ्यांनी दिसत नसतात जीवघेणी भुयारं- त्यांच्यात राहाणाऱ्या राजवंशी अस्तित्वांसारखीच. त्यामुळेच सबाला तिच्या महालाची झालेली वाटणी हृद्यभंगासारखी वाटली. सबाचा, सबाराणीचा महाल एकाच देठाला लहडलेल्या दोन फळांसारखा होता. अबोर आणि चिलका; आरश्यातल्या प्रतिमा असाव्यात तसे दोन भव्य प्रासाद! त्यांचे मार्ग वेगळे होते खरे पण त्यांचं उगमस्थान एकच होतं- कमलबिंदु. कमलबिंदुशी येऊन सबाराणी कोणत्या प्रासादात असेल याचा होरा बांधणं हा अगान महाराजांचा आवडता खेळ होता. कैकवेळा महाराजांनी या खेळात हरण्याची भरपाई रत्न-मोत्यांनी केली होती. पण आता चित्रातले रंग फितले होते. महाराज कुठल्याशा कामगिरीवरुन येताना नवी राणी घेऊन आले होते- रुना आणि चिलका महाल तिच्यासाठी तयार करावा असा महाराजांचा आदेश होता. सबाला आपल्या वाढत्या वयाची जाणीव होती, शरीराचं अवघडलेपण महाराजांसोबतच्या एकांतांत हिरमुसलं करुन सोडायचं. उतरणीला लागलेल्या महाराजांना मात्र त्यांच्या पौरुषाच्या कल्पनांना जिवंत ठेवण्यासाठी एका कोवळ्या देहाची गरज होती. नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या रुनाराणीकडे महाराजांचा ओढा राहीला तर नवल नव्हतं. सबाचा नुसता महालच नव्हे तर महाराजही आता सवतीसोबत वाटले गेले होते. चिलका महालातली प्रत्येक मौल्यवान गोष्ट सबानं अबोरसाठी ओरबाडून घेतली पण आठवणींचं काय? चिलका महालातल्या हलवता येणाऱ्या काही गोष्टी सबाच्या द्वेषापाई विद्रूप झाल्या. अबोर महाल बघता बघता बेढब आणि मत्सरी दिसू लागला.

रुना, नवी राणी, रुढार्थानं देखणी नव्हती. संध्याकाळ उधळावी तसा सावळा रंग, आवाजात कसला गंधार नाही पण डोळे मात्र विलक्षण नितळ, बोलके. संथ प्रवाही आवाजात बोलताना तिची दीर्घ बोटे हवेत लयदार फिरायची. ती गरीब घराण्यातून आली होती तरी शिक्षणातून रुजलेल्या शहाणपणासोबत तिच्या देहबोलीत काहीतरी विलक्षण आश्वासक होतं. रुना सोबत कसला लवाजमा नव्हता, होता तो फक्त तिचा भाऊ- टोगो. टोगोच्या अंगावर कायमच अंधार माळलेली शाल, केसांच्या चिंधुकल्या सावरायला कसल्याशा रंगीत मण्यांची माळ, हातात दुतोंडी काठी आणि डोळ्यात हरवलेले भाव असायचे. टोगो झाडांशी बोलायचा, पक्ष्यांशी खेळायचा, पाण्यात पाय सोडून तासंतास आकाश बघत राहायचा. टोगो माणसात असूनही माणसात नसायचा.

सबानं सावधपणे या नकोश्या पाहुण्यांची गणितं मांडायला सुरुवात केली.


 


धर्मग्रंथांचं जग वेगळं असतं. त्यात प्रवेश हवा असेल तर असीम श्रद्धा आणि शरणभाव हवा. घरातलं जळमटलेलं धार्मिक वातावरण आणि वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून सुरु झालेलं धर्मग्रंथांचं पठण यामुळे कहन आणि मयक हे दोन भाऊ लहान वयातच विद्वान म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या एका टप्प्यावर त्यांना जाणवलं की पुस्तकातल्या शब्दांची खोली जोखायची असेल तर कुण्या शहाण्या गुरुची गरज आहे. त्यांनी प्रार्थनास्थळे पालथी घातली, वाद-विवाद स्पर्धा बघितल्या, गावोगावच्या महात्म्यांच्या भेटी घेतल्या पण त्यांच्या आत्म्याने कसलेच संकेत दिले नाहीत. त्यांच्याच गावातला प्रमुख पण अहंकारी धर्मगुरु मफूत, ज्याचा प्रत्येक शब्द झेलायला अनुयायांची फौज होती, त्याने दिलेल्या आमंत्रणाचाही कहन आणि मयकने नम्रपणे आव्हेर केला. रस्ते हरवले की नदीच्या काठाने चालत राहावे अशी प्राचीन म्हण स्मरुन दोन्ही बंधू एका पहाटेच घर सोडून नदीच्या काठाकाठाने निघाले. धुळीने माखलेले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज काही लपत नव्हते. रस्त्यात कुण्या दरवेश्याने दुर्मिळ अस्वलांच्या केसांचा पुंजका दिला, कुठे कुण्या म्हातारीने दुपारच्या जेवणाची सोय केली, गुंजेच्या पाल्याचा चोथा कुणी रक्ताळलेल्या पायांभोवती बांधून दिला. प्रवास दिशाहीन असला तरी अहेतु नव्हता. सूर्य थकला तेव्हाच दोन्ही भावांनी पाय मोडले.

एका बाजुला रंगांच्या पसाऱ्यात सूर्य़ मावळत होता तर दुसऱ्या बाजुला काळ्यांची जादू सारत चंद्र उगवु पाहात होता. काही तरी विलक्षण भारावलेपण होतं काळाच्या त्या प्रतलात. नदीतले मासे संमोहनात असल्यागत पाण्याच्या पृष्ठभागावर स्थिरावले होते, चुकार वासरु डोळ्यांतला प्रलय आवरुन मुकाट उभं होतं, काटेरी झुडूपांमधून भणाणा वाहाणारा वारा अचानक स्थिरावला. पाठीच्या कण्यावरुन वरवर सरकणारी शिरशीरी दोन्ही भावांना एकाच वेळी जाणवली पण कोणीच बोलले नाहीत. डॊक्यातले सगळे विचार, शब्दांचं फसवं जंगल उन्मळून पडलं, अस्तित्वाच्या फाजील अहंकाराची जागा असीम वैश्विकतेनं घेतली, काळाची जाणीव आणि अवकाशाचे पाश विरुन गेले, नात्यांची गुंफण नव्याने उमजली तसा करुणेला नवा अर्थही लाभला. जमिनीतून अचानक प्रचंड झाड उगवावं, त्याला अंगभर बहरही फुटावा आणि तितक्याच उन्मनपणे क्षणार्धात त्याच्या फुलांचा सडा पडून जावा तसे कहन आणि मयक जमिनीवर कोसळले.


 


काळाच्या पसाऱ्यातून कुठलाही काळ चिमूटभर उचलला तरी त्यात अपऱ्या श्रद्धावंतांचा मेळा दिसू शकतो. कहन आणि मयकच्या बाबतीत असंच काहीसं झालं. कुणी म्हणालं त्या रात्री त्यांची शरीरं तेजःपुंजात चमकत होती, तर कुणी म्हणालं नदीच्या पाण्यानं त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी रात्रीतून पात्र बदललं. बघता बघता नदीच्या वाळवंटात कहन आणि मयकसाठी तंबू उभा राहीला आणि भेटायला येणाऱ्यांची झुंबड उडाली.

कहन आणि मयकची शिकवण ईतर धर्मगुरुंपेक्षा वेगळी होती. त्यांनी स्वतःत ईश्वराला पाहायला सांगीतलं, ईश्वरपण भोगण्यासाठी मीपण त्यागायला सांगीतलं, अहंकार करुणेत आणि करुणा अद्वैती प्रेमात बदलायला सांगीतली. त्यांनी सांगीतलं, ईश्वराला प्राप्त करण्यासाठी कुठल्या धर्मगुरुची, कुठल्या नवसाची- अर्पणाची, उपासतापासाची गरज नाही, ईश्वराला भेटण्यासाठी कुठल्या तीर्थयात्रेला, कुठल्या प्रार्थनास्थळी जावे लागत नाही. शब्दवेल्हाळ प्रार्थनांनी, स्वरबद्ध स्तवनांनी, अनाहत नादबिंदूंच्या स्वमग्न नृत्याने नदीच्या वाळवंटातील वाळूचा कण न् कण ईश्वरमय होत राहीला.

धर्माच्या दुकानातली गर्दी ओसरली तसे बरेचसे धर्मगुरु बेचैन झाले, त्यांचे नेतेपण मफूतकडे आलं. काही धष्टपुष्ट शिष्यांना गुरुमंत्र देऊन मफूतनं त्यांना कामगिरीवर पिटाळलं. धर्म आणि हिंसा यांच्यातल्या निद्रीस्त नात्यानं हलकेच कुस पालटली.


 
कहन आणि मयक जमलेल्या लोकांशी बोलत होते की तो स्वसंवाद होता सांगणं कठीण होतं. लोकांना आज काही तरी वेगळं घडतय याची फिकट चाहूल लागली होती. ईश्वराबद्दलची स्तवने बघता बघता निसर्गाच्या गाण्यात रुपांतरीत झाली. आकाश-धरणी-नदी-पहाड यांच्याशी माणसाचं असलेलं अदीम नातं गाता गाता कहन आणि मयक हरखुन नाचायला लागले. त्यांच्या अंगावरचे पायघोळ डगले लाटेसारखे उसळु लागले, एक हात आकाश पेलता झाला तर दुसऱ्या हाताने धरणीचा तोल सावरला, एकमेकांत विरुन जावे तशी त्यांची शरीरे एकतत्व झाली, कल्लोळलेल्या मनःस्थितीत त्यांनी नदीच्या पात्रात प्रवेश केला आणि सोनेरी वर्ख चढावा तसं नदीचं पाणी लख्ख चमकू लागलं. क्षणभराचा तो चमत्कार पाहून लोक आवाक झाले. नेमका तो क्षण साधून मफूतच्या शिष्यांनी लपवलेली शस्त्रे काढली आणि मार्गात येईल त्याला कापत कहन आणि मयकच्या दिशेने मुसंडी मारली. सर्वत्र अराजक मांडलं, लोक एकमेकांना तुडवून वाट फुटेल तिकडे पळू लागले, रक्तमासांचा चिखल नदीत मिसळत गेला तसा पाण्याचा साजरा रंग लाल होऊन गेला. काही शहाण्या लोकांनी स्वतःची पर्वा न करता कहन आणि मयक भोवती कडं केलं आणि त्यांना घेऊन ते नदीचं पात्र पोहून गेले. कहन आणि मयक किती वेळ - किती दिवस पळत राहीले याची त्यांना शुद्ध नव्हती, सोबतची विश्वासु माणसं गळत गेली.

 

मफूतच्या शिष्यांनी झाला सगळा प्रकार मफूतला सांगीतला. दोन्ही भाऊ जीवानिशी गेले नाहीत हे ऎकून त्याचा संताप झाला खरा पण सोनेरी वर्खाच्या पाण्याचा चमत्कार ऎकून तो जरा विचारात पडला.


 
॥४॥

माणसाचं मोठेपण हे संदर्भाच्या चौकटीत बंदीस्त असतं, चौकट बदलली की माणसाची पत आणि प्रतवारी कधीही बदलु शकते. राजघराण्यातल्या व्यक्तीचा रथ निघाला की रस्ते निर्मनुष्य व्हायचे, हा आदर की भिती की आणखी काही हे सांगणं तसं कठीण. राजघराण्याची पद्धत म्हणून सबा राणीच्या रथाच्या मागे-पुढे हातात कोरडा घेऊन धावणारे सेवक मात्र असायचे!

रुनाचा रथ धूळ उडवत निघाला तेव्हा रस्ते गजबजलेले होते. रुनाला राणीचा कुठला मान मिळू द्यायचा नाही याचं नीटस कारस्थान सबानं काही खास सेवकांमार्फत रचलं होतं. महाराजांचा फारसा सहवास न मिळाल्याने, रुनालाही राणीपणाच्या मान-सन्मानाची पुरेशी कल्पना नव्हती. रुना अजून रुजली नव्हती, तेव्हा तिला रस्त्यावरच्या गलबल्याचं नवल असं वाटलं नाही. रथाच्या मागच्या बाजुला कुठेच पोचण्याची घाई नसलेला टोगो रस्ता न्याहाळत निवांत होता. बाजाराच्या गलबल्यात टोगोनं दुकानांच्या कडेकडेनं चालणाऱ्या दोन व्यक्ती पाहील्या. त्यांनी डोक्यावरुन काळ्या रंगाचं वस्त्र ओढून घेतलं होतं, शरीर धुळकटलेलं, थकलेलं होतं आणि पाय रक्ताळलेले. कुठल्याशा अनामिक ओढीनं टोगोनं रुनाला रथ थांबवुन त्या दोन माणसांबद्दल विचारायला सांगीतलं.फकीरी वृत्तीच्या भावानं काही तरी मागितलं याचा रुनाला कोण आनंद झाला. तिनं सारथ्याला सांगून त्या दोन माणसांना महालात आणण्याची व्यवस्था केली. भितीच्या पलीकडे गेलेल्या कहन आणि मयकने निर्विकार होकार भरला.

 

चिलका महालाच्या मागे असणाऱ्या बागेत टोगोच्या शोधात कहन आणि मयकने प्रवेश केला. कडकडीत दिवस असूनही महालाभोवती खेळवलेल्या पाण्यामुळे आणि झाडांच्या अगत्यामुळे दिवस सुसह्य होता. अगान महाराजांनी हौसेने लावलेली आमराई फळांनी मोहरली होती. सुरक्षित आणि शांत वातावरणात आल्यावर कहन आणि मयकला ईतक्या दिवसांमध्ये पहील्यांदाच भुकेची जाणीव झाली. हातभर अंतरावर रसाळ फळ दिसत होतं पण बागेच्या मालकाला न विचारता फळ तोडायचं कसं? शेवटी या निसर्गाचा- झाडांचा त्राता तो एक ईश्वर असा विचार करुन त्यांनी नामस्मरण सुरु केलं आणि चमत्कार व्हावा तशी सगळी फळं झाडांवरुन आपोआप पडली.

कुठेतरी जवळच झाडीत खुसपुस ऎकु आली म्हणून कहननं स्वतःच नाव उच्चारलं "कहन". आत्म्याच्या तळातून यावा तसा प्रतिध्वनी आला "कऊन"

"मयक"......."मै एक"

स्वतःच्या आध्यात्मिक ताकदीची किंचीत जाण असणारे दोन्ही भाऊ दिग्मूढ अवस्थेत उभे राहीले. झाडाआडून टोगो प्रकट झाला.

"गरजेपेक्षा जास्त जमा केलं की पसारा वाढतो आणि मग पसाऱ्याचाच हव्यास वाढतो" सहज स्वरात बोलत टोगोनं दोन्ही भावांच्या हातात दोन-दोन आंबे ठेवले आणि प्रार्थनेसाठी डोळे मिटले. आंब्याचा चमत्कारी पाऊस जादू उलटावी तसा पलटला.

ज्या गुरुच्या शोधार्थ आपण घर सोडलं तो गुरु हाच याची आंतरिक खुण पटली तसे कहन आणि मयक भान हरपुन टोगोच्या पायावर कोसळले

 

॥५॥

मारेकऱ्याचा निश्चय दॄढ असेल तर त्याच्या खंजीराला गंज चढत नाही म्हणतात. दिवस गेले, महीने गेले तरीही मफूतने दोन भावांचा शोध थांबवला नव्हता. देवाचा शब्द म्हणजे धर्मग्रंथ, त्याच्या पल्याड जाणारी शिकवण म्हणजे शुद्ध पाप! विचार केला तरी मफूतच्या कपाळावरची शीर ताड्ताड उडायला लागली, काय तर म्हणे तुम्हीच ईश्वर आहात- ईश्वराला प्रार्थनास्थळी शोधू नका.... हे जग बुडण्यापासून वाचवायचं असेल तर धर्मभ्रष्ट माणसांचा वध करणं हे धर्माला धरुनच आहे. सैतानाला असंख्य कान असतात. मफूतला कुठूनशी कहन आणि मयकच्या नेमक्या ठिकाणाची माहिती मिळाली तसा तो वेळ न दवडता तिकडे जायला निघाला.

 

टोगोनं कसलेही धर्मग्रंथ वाचले नव्हते. त्याचं मन नांगरणी न झालेल्या जमिनीसारखं अहल्य होतं, त्यात जे होतं ते फक्त निसर्गाचं प्रतिबिंब. कहन आणि मयकला त्यानं कधी पाण्याच्या वाहाण्याची कारणं सांगीतली तर कधी झाडानं पान त्यागण्यामागचं गुपीत उघडं केलं. कोवळ्या उन्हात मांजरीसोबत अजाणपणे ध्यान लावून कसं बसायचा हे त्यानं शिकवलं तर कधी काळाच्या तालावर सुरवंटाचं फुलपाखरु होताना तो दाखवायचा. महाराजांच्या गैरहजेरीत करण्यासारखं विशेष काहीच नसल्यानं रुनादेखिल कहन आणि मयक सोबत चिंतनात बसायची. टोगोनं तिला निसर्गाची समिकरणं समतोल राखण्यात कसा स्त्री-तत्वाचा हात असतो हे दाखवून दिलं. रुनाला तिचा आरसा सापडला तशी ती भितीला हसून सामोरं जायला शिकली. ज्या उंचीवरुन कोसळण्याची तिला भिती वाटायची, त्याच उंचीवरुन एखाद्या वाघीणी सारखं पुढे जाण्यासाठी उडी कशी मारावी हे तिला थोडक्या काळात उमजून गेलं. सबाराणी कानावर रुनाचं परक्या पुरुषांसोबत एकांतात असणं वेगळ्या प्रकारे कानावर आलं.

 

महंत-पीर-साधू अश्या लोकांसाठी घरांचे चिलखती दरवाजे सहज उघडतात. मफूतनं सबाच्या अंतर्वतुळात प्रवेश मिळवला तोपर्यंत त्याच्याकडे राजघराण्यातल्या नातेसंबंधाचा नेमका गोषवारा आला होता. सबाची दुखरी नस कोणती, महाराजांची सध्याची मर्जी कशी याचा पुरेपुर अंदाज बांधून मफूतनं पुढची चाल खेळायचं ठरवलं. सबाच्या आंतरिक भितीला एक टेकू मिळाला.

 

रुना, कहन आणि मयक थोड्याच काळात निसर्गाचं प्रवाहीपण कसं असतं, त्याच्याशी एकरुप होऊन ध्यानात कसं जायचं, मौनाची परिभाषा शिकले. विचारांचा अंतहीन चक्रव्युह कसा भेदायचा, आला क्षण पुरेपुर कसा जगायचा, आदी आणि अंत यांची गाठ कुठे बसते जे जसं जसं त्यांना समजत गेलं, त्यांच्या भोवतालचं रिकामपण अर्थपुर्ण होत गेलं.

 

मफूतच्या सल्ल्याप्रमाणं, सबाराणीनं अगान महाराजांच्या तब्येतीचं निमित्त काढून रुनाला महाराज ज्या गावी मुक्कामी होते तिथं जाण्यास मनवलं. रस्ता लांबचा होता, रुनाच्या सोबत कुणी विश्वासाचं हवं म्हणून सबाराणीनं कहन आणि मयकला नेण्याचं सुचवलं. स्त्री-पुरुष भेदाच्या पल्याड गेलेल्या रुनाला त्यात काही वावगं वाटलं नाही. शिवाय प्रवासात निसर्गाची बदलती रुप उलगडताना आपल्याच जातीचं कुणी सोबत असेल तर मौनाची कसली भाषांतरही करावी लागली नसती.

जंगलातून जाणारा रस्ता दुर्गम पण जवळचा होता. त्या रस्त्याने रुनाराणीच्या बदफैलीच्या कहाण्या पेरत सबाच्या मर्जीतले काही सेवक गेले, जाताना मफूतलाही सोबत घेऊन गेले.

जंगलाशी टोगोचं खास नातं होतं, निसर्गनियमानुसार वाढणारी झाडं आणि लोक त्याला जवळचे होते. जंगलातल्या काही लोकांनी राजसेवकांनी उडवलेल्या वावड्या टोगोच्या कानावर घातल्या. रुना आणि दोन भावांसोबत झालेल्या धोक्याची जाणीव झाली तसा टोगो बेचैन झाला. त्यानं हक्काच्या काही लोकांना रुनाच्या मागावर पाठवलं आणि स्वतः महाराजांच्या भेटीला जवळच्या रस्त्याने निघाला. अर्ध्या रस्त्यातून रुनाराणीच्या काफील्यानं प्रवासाचा मार्ग बदलला. कहन आणि मयक आधीही मफूतच्या भितीमुळे पळाले होते, तेव्हाही त्यांच्या समोर कुठला गाव नव्हता. आजही ते मफूतच्या भितीने दिशाहीन निघाले होते पण वर्तमानात कसं जगायचं हे त्यांना टोगोनं शिकवलं होतं. रुनाराणीसाठी महाराजांच्या अस्तिवाभोवती गुंफलेलं गणित पार कोसळलं होतं पण त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी आता तिला कुणाचीच गरज नव्हती.

 

दिवसा मागून दिवस गेले तरी रुना अगान महाराजांपर्यंत पोचली नाही हे ऎकून सबाराणी अस्वस्थ झाली पण मफूतचा डाव बिनतोड होता. त्यानं मोठ्या धैर्यानं रुनाराणी परपुरुषासोबत पळून गेल्याचं भविष्य वर्तवलं. हलक्या कानांच्या महाराजांच्या अंगाचा कोण तीळपापड झाला. एका बाजुला मोहिमेच्या अपयशातून आलेला आर्थिक भार आणि दुसरीकडे राणी पळून गेल्याची नाचक्की! टोगो महाराजांच्या सामोरा गेला तो पर्यंत खेळाचा निकाल जवळ जवळ ठरुन गेला होता. टोगोने केलेल्या काही थोडक्या चमत्काराच्या बातम्या मफूतच्या कानी आलेल्या होत्या. त्यानं टोगोला महाराजांसाठी पाण्यातून सोनं निर्माण करायला सांगीतलं. टोगो निर्विकारपणे म्हणाला की ’महाराजांनी कितीही आज्ञा केली तरी जसं आंब्याचा झाडाला आंबाच येणार तसं पाण्यातून फक्त पाणीच उगवु शकतं. जे असतं त्या बद्दल कोणतंही मत बनवलं तरीही ते तसंच राहातं’

 

मफूतच्या सांगण्यानुसार टोगोच्या शरीरातून आरपार खिळे ठोकून त्याला लाकडाच्या ओंडक्यावर शब्दशः टोचलं गेलं आणि वेदनामय मृत्यु यावा म्हणून नदीच्या पात्रात त्या ओंडक्याला सोडून देण्यात आलं.

 

 

टोगोच्या रक्ताचं प्रायाश्चित घ्यावं तसं नदीचं पात्र पुढची कित्येक दशके कोरडं राहीलं

 

 

अगान महाराजांच्या राज्यापासून दूर, खुप दूर, टोगोने शिकवलेल्या प्रार्थनांमधून निसर्गाच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटत राहीले.

Comments