Friday, June 17, 2011

झेन आर्ट ऑफ सुसाईड- बुडबुड्यांचं खच्चीकरण

बोलणे- कंठातून अर्थपुर्ण आवाज काढून संवाद साधणे
वाङमयीन ऊपयोग- खापराचं तोंड असतं तर फुटलं असतं, उचलली जीभ लावली टाळ्याला, बोलेल तो करेल काय, बोलाची कढी, कर्माला बोल लावणे इ इ
अबोलण्याचे अनेक फायदे असूनही नेतेमंडळी बोलतात.
अबोलण्याचे अनेक फायदे असूनही अभिनेतेमंडळी बोलतात.
अबोलण्याचे अनेक फायदे असूनही शिक्षकमंडळी बोलतात.
अबोलण्याचे अनेक फायदे असूनही प्राध्यापकमंडळी बोलतात.
नेते-अभिनेते मंडळी बोलून करोडो रुपये कमावतात. शिक्षक-प्राध्यापक मंडळीही बोलून लाखभर रुपये जमवतात.
अबोल विद्यार्थ्यांनाही वाटलं आपण बोलून फायदा करावा. फायदा-तोटा इयत्ता चौथीत शिकवतात. भांडवलशाही इयत्ता चौथीत शिकवतात.
जमा - खर्च = फायदा
अबोल - अ =बोल
बोल(णे) =फायदा
म्हणून अबोल = जमा इ. इ.
विद्यार्थीदशेत अकलेची कमतरता असल्याने ही जमा पुंजी उधळण्यासाठी प्राध्यापकांच्या खोलीबाहेर रांग लावून तोंडी परिक्षेसाठी मुले उभी होती.बाळासाहेबही उभा होता. निर्लेपपणे त्यानं रांगेत मागेपुढे बघितलं. क्वचित एखादा-दुसरा चेहरा ओळखीचा वाटला तसं त्यानं कसंनुसं हसुहसु केलं. मुलं आपापल्या तांड्यात मुक्तपणे खिदळत होती. बाळासाहेबाकडे बघून कुणीच हसुहसु केलं नाही. त्याचा किंचित चेहराही कुणाला ओळखीचा वाटला नाही. सहा महीन्याच्या सेमिस्टरात बाळासाहेब हजेरी लावून आपलं इंजिनिरिंग कॉलेज सोडून मित्रांसोबत भलभलत्या कॉलेजातले वर्ग आणि कट्टे पालथे घालत होता. आणि आता त्याच्या नावाचा कुणीतरी पुकारा केला तेव्हा त्याला स्वतःलाही त्याचं नाव अनोळखी वाटलं.
"Have a sit Mr. B. K. ummmm" तोंडी परिक्षेसाठी दुसऱ्या कॉलेजातून आलेले गुरुवर्य बाळासाहेबाच्या आडनावावर अडखळले
"Sir, please call me Balasaheb" चेहऱ्यावर खानदानी चंद्रबळ आणत बाळासाहेबानं गुरुवर्यांची सुटका केली.
दुसऱ्या कॉलेजातून आलेल्या गुरुवर्यांना सोबत म्हणून एक घरगुती गुरुवर्यपण परिक्षा घ्यायला बसले होते. एक माणुस एकटा असतो. दोन माणसे दुकटी असतात म्हणजेच दोन माणसे एकटी नसतात असं तर्कसिद्ध गणित या व्यवस्थेमागे होतं. व्यवस्था म्हणजे सोय. व्यवस्था म्हणजे तयारी. व्यवस्था म्हणजे समाजाची घडी. व्यवस्था म्हणजे भडभुंजांना तथाकथित क्रांती करता यावी म्हणून असलेला अदृष्य क्रुर चेहरा.
घरगुती गुरुवर्यांनीं हातातल्या फायलीतून मान वर करुन बसलेल्या तिन्ही शिष्यांना निवृत्त नजरेनं न्याहाळलं.
"You, Balasaheb, I never remember you seeing in the class. I know these other two fellows for sure. What are your names by the way?"
"Umesh, Sir" पुटपुट १
"Daulat, Sir" पुटपुट २
"But I was present in the class Sir, always. You can check attendence record" बाळासाहेब रेटून बोलला.
अ‍ॅटेन्डन्स असला म्हणजे माणुस वर्गात उपस्थित होता असं समजायचं? घरगुती गुरुवर्यांची नजर अजूनच निवृत्त झाली. तात्विक प्रश्नांची व्यावहारीक सोडवणूक फार कठीण असते. घरगुती गुरुवर्यांची नजर अजूनच निवृत्त झाली. दुसऱ्या कॉलेजातून आलेल्या माणसासमोर असंल प्रकरण किती ताणायचं? घरगुती गुरुवर्यांची नजर अजूनच निवृत्त झाली. शिवाय, याचं नाव बाळासाहेब.असंल भारदस्त नाव म्हणजे हा कदाचित आपला जातवाला देखिल असेल. घरगुती गुरुवर्यांची नजर अजूनच निवृत्त झाली.
"Tell me something about buoyancy force" दुसऱ्या कॉलेजातून आलेल्या गुरुवर्यांनी प्रश्न विचारला.
उमेशनं निराशाग्रस्त मान क्र.१ हलवली.
दौलतनं चतकोर वाक्य इंग्रजीतून बोलून उरलेलं उत्तर मराठीत दिलं.
उमेशनं निराशाग्रस्त मान क्र.२ हलवली.
"Anything from you Balasaheb?"
"I always used to think as a kid, why Lifebuoy is not Lifeboy. But I was taught why Lifebuoy is not Lifeboy in this college" बाळासाहेब काहीतरी बोलला.लहानपणी लाल रंगाची लाईफबॉयची छोटी वीट डोक्यात पडून आलेलं टेंगुळ त्याला नकळत आठवुन गेलं.
उमेशनं निराशाग्रस्त मान क्र.३ हलवली.
नंतर बाळासाहेबानं दौलतच्या मराठी उत्तराचं छापेबाज इंग्रजीत भाषांतर करुन अनुवाद स्वतःच्या नावावर खपवला. इंग्रजीत शिकलं पाहीजे हा बागायतदार पप्पांचा आग्रह किती कामाला आला हे पाहून बाळासाहेबाला गहिवरुन आलं. लहानपणी "आय वॉन्ट टू गो टू टुलेट" हे मम्मीला न कळल्यानं त्याचा भविष्यकाळ "हागु झालं" कळाल्यावर झालेल्या धुलाईच्या यादेनं बाळासाहेबाला गहिवरुन आलं.
परिक्षेतून बाहेर आल्यावर बाळासाहेबानं गहीवरुन दौलतला मिठी मारली.
मिठी मारली की मैत्री होते हे बाळासाहेबाचं साधं तत्वज्ञान. बाळासाहेबाची कुठल्याही मुलीशी मैत्री नव्हती.
"तू नेहमी पांढरा शर्ट आणि निळी पॅन्ट का घालतोस? तू नेहमी तेल लावून भांग का पाडतोस?" बाळासाहेबानं दौलतला विचारलं.
"त्यानं स्वच्छ वाटतं. मी मग या हॉस्टेलच्या बाकीच्या मुलांसारखा दिसत नाही," दौलत
"तू नेहमी इतकं प्रयत्नपुर्वक स्वच्छ का बोलतोस", बाळासाहेब
"त्यानं स्वच्छ वाटतं. मी मग या हॉस्टेलच्या बाकीच्या मुलांसारखा दिसत नाही," दौलत
"तू मला इंग्रजी शिकवशील का? मग मला अजून स्वच्छ वाटेल. मी शिकेन, सुशिक्षित होईन. बाप म्हणाला त्याच्यापेक्षा मी वेगळं काहीतरी करायचं. माय म्हणाली मी स्वच्छ दिसायचं, स्वच्छ काम करायचं, स्वच्छ पैसे कमावायचे, स्वच्छ बायको करायची" दौलत
"ग्रेटैत रे तुझे बाप-माय. काय क्लॅरिटी आहे थॉट्समधे. मला यायचंय तुझ्या घरी सुट्टीत" बाळासाहेब
दौलतचा स्वच्छ नकार "तू नाही राहु शकणार तिथे"
मग सुट्टीत दोघंही बाळासाहेबाच्या घरी गेले.
रात्री गप्पा मारताना मधेच बाळासाहेब गॅसवर चहाचं आधण ठेवून आला.बाळासाहेबाला खरंतर दारु प्यायला आवडतं कारण ती गॅसवर चढवावी लागत नाही. बाटलीतून पेल्यात ओतली की सरळ पिता येते. शिवाय किडनी स्टोन वितळतो ते वेगळंच. झालंच तर दारु प्याली की बाळासाहेबाला मोकळं बोलता येतं. बाळासाहेबाला मित्रांशी मोकळं बोलायला आवडतं.
पण दौलत दारु पित नाही, पण दौलत मित्र आहे, पण दौलतशी मोकळं बोलायचंय म्हणून चहाचं आधण.
चहा उतु येतो.
फस्स्स्स्स्स
दौलतला जोरात पळता येतं. त्यानं पळत जाऊन चहा वाचवला.
चहा पिताना बाळासाहेबानं नाक वर करुन वास घेतला, "कसला तरी वास येतोय. गॅस नीट बंद केलास नां?"
नाक अजून फेंदारुन बाळासाहेबानं निदान नक्की केलं "हा गॅसचाच वासै"
"अरे नाही रे", दौलत "मी आग विझवुन आलोय रे. चांगलं २ वेळा फुंकून फुंकून विझवलं चुल्हण"
"अरे गॅसचा नॉब बंद करायचा असतो, आग नाही विझवायची" बाळासाहेबाची सापेक्ष चिडचिड
"मला गॅस बंद करायला शिकवशील का? मला फार आवडेल .."

सुट्टी संपून बाळासाहेब कॉलेजात परतला तेव्हा स्नेहसंमेलनाचं वारं पसरलेलं.
बाळासाहेबाच्या वर्गानं स्नेहसंमेलनात महाराष्ट्राची लोकधारा की असंच कायसं करायचं ठरवलं.
महाराष्ट्राचे सण, संस्कृती, महापुरुष यांची महती आपणंच गायची असं ठरलं.
सणांमधलं छान छान कार्यक्रमात घ्यायचं ठरलं.
महापुरुषांमधलं छान छान कार्यक्रमात घ्यायचं ठरलं.
संस्कृतीमधलं छान छान कार्यक्रमात घ्यायचं ठरलं.
लोकधारेच्या दिवशी बाळासाहेब प्रसन्न मुद्रेनं, प्रसन्न कपडे आणि त्यावर प्रसन्न फेटा घालून बैलगाडीत मिरवत आला. बैलगाडीत ठेवलेल्या कर्ण्यांमधून येणाऱ्या उडत्या चालीच्या गाण्यांवर मुलं दुडक्या चालीत नाचत होती.
घरगुती गुरुवर्यांनी खुणेनं बाळासाहेबाला बोलावलं, "अरे, आपली संस्कृती म्हणजे ढोल-ताशा, हलगी. आपली संस्कृती म्हणजे वाघ्या-मुरळी, तमाशा. आपली संस्कृती म्हणजे तडक जाळ बकरं-कोंबडी."
घरगुती गुरुवर्य १०.५ अंशात झुलत संस्कृतीची व्याख्या करतात.
बाळासाहेबही १०.५ अंशात झुलत उत्तरतो "सर, ढोलवाले फार पैसे मागतातै म्हणून डॉल्बी आणलं. तुम्ही म्हणाल तर तुमच्या क्वार्टरवर कापु कोंबडी"
दोघंही सारख्या अंशात झुलत असल्यानं एकमेकांना ते सापेक्ष सरळ कोनात वाटतात.
घरगुती गुरुवर्य वेलदोड्याच्या वासाखाली दारुचा वास झाकत मनःपुर्वक होकार देतात.
बाळासाहेब पानमसाल्याच्या वासाखाली दारुचा वास झाकत एका हरकाम्याला मनःपुर्वक कामाला लावतो.
दोघंही दारुच्या सारख्याच अंमलाखाली असल्यानं त्यांना एकमेकांचा सापेक्ष सरळ वास येतो.
"सर, तो दौलत ढोल, हलगी मस्त वाजवतो. ऎ बाळासाहेब, तू सांग की. तुझ्या ऎकण्याबाहेर नाही तो" दुसरा हरकाम्या बोलला.
"मला कसं माहीत नाही?" बाळासाहेबाचा जरासा बावचळुन प्रश्न
"अरे माझ्याच हॉस्टेलला राहातो तो. मला माहीतै. सांग तू," हरकाम्या
दौलतचा सपशेल नकार.
बाळासाहेबा कडून दोस्तीची कसम.
दौलतचा सपशेल नकार.
सगळ्या जमावाचा दबाव.
दौलतचा सपशेल नकार.
घरगुती गुरुवर्यांची घरगुती मार्कांबाबत आठवण.
दौलतचा नाईलाज.
त्याला खरं तर सांस्कृतीक असं फारसं काही आवडत नाही. संस्कृती म्हणजे जुन्या अवशेषांचा इतिहास. गुलाबीसर असं तपकिरी काही.आपली मुळं सापडण्याची दाट शक्यता असलेली डेंजर जागा म्हणजे संस्कृती.संस्कृती म्हणजे किंचितही धक्यानं तडकणारा काचेचा महाल. संस्कृती म्हणजे जाज्वल्य, स्वाभिमान, मोडीतला तपशील आणि मोडीत काढलेला तपशिल.
दड्म
डंडं दड्म
डंडंडं दड्म दड्म
विचारात मग्न दौलतच्या नकळत हातातल्या काड्यांनी हलगीवर ठेका धरला आणि विद्यार्थीवृंद बेभान होऊन सांस्कृतीक नृत्यात तल्लीन झाला.
मिरवणुक कॉलेजभर हिंडून घरगुती गुरुवर्यांच्या क्वार्टरवर गेली आणि अल्पोपहारानंतर महाराष्ट्राची लोकधारा संपल्याचं घोषित करण्यात आलं.

दुसऱ्या संध्याकाळी बाळासाहेब काहाबाही करु पाहातो. पण त्याचा वेळ जात नाही. त्यानं १३, १७, २३ आणि २९ चा पाढा आठवुन पाहीला. त्यानं ञ च्या आधी आणि नंतर कुठली मुळाक्षरं येतात आठवुन पाहीलं. वेळ जातंच नाही म्हटल्यावर मग तो दौलतच्या हॉस्टेलावर आला. दौलत रुमवर नव्हता. म्हणजे भौतिकशास्त्राच्या नियमानुसार तो दुसरीकडे कुठेतरी असणार. बाळासाहेबाला बारावीत भौतिकशास्त्रात कितीही मार्क पडते तरी त्यानं दौलतला शोधून काढलंच असतं. कारण हॉस्टेलच्या गच्चीवर हलगीचा बेभान तुकडा वाजत होता.

"हे बघ, आलास दोस्ता, मी उलटी हलगी वाजवतोय" झोकांड्या खात दौलत जागचा उठला ’डंची ददड्म चिग्डम चिग्डम’ "कुणी मेलं की असं वाजवतात. काल साला आपला मृत्यु झाला. आज आपण तो सेलिब्रेट करतोय"
दौलतचा बाप देवीसमोर हलगी वाजवतो. हल्ली खुप देव निघालेत. पण हलगी फक्त देवीसमोरच का वाजवतात दौलतला माहीत नसतं. दौलतला हलगी वाजवायला आवडत नाही.
कुणी मेलं की मढ्याला नेतानासुद्धा दौलतचा बाप हलगी वाजवतो पण उलटी. हल्ली लोक सहजी मरत नाहीत. दौलतला उलटी हलगी वाजवायलाही आवडत नाही.
दौलतच्या बापाला कुणीही ड्रमर म्हणत नाही. तो हलगीवालाच राहातो. अनेक पुस्तकात अनेक थोर लोकांनी लिहूनही लोक काम, प्रतिष्ठा, पैसा आणि जात यांचा संबंध लावतात. हल्ली थोर लोकांचं कुणी ऎकत नाही. दौलत हा सामान्य विद्यार्थी असल्यानं त्याचंही कुणी ऎकत नाही. दौलतला काल सर्वांनी हलगीवाला व्हायला भाग पाडलं. दौलत हा सामान्य विद्यार्थी असल्यानं त्याचं कुणीही ऎकत नाही.
दौलतचा बाप स्वतःची हलगी स्वतःच बनवतो. तो स्वयंपुर्ण आहे. मेलेलं जनावर ओढून तो स्वतःच्या बुचक्या अंगणात आणतो.रापीनं ते सोलतो. त्याचं कातडं कमावतो आणि हलगी बनवुन वाजवतो.
दौलतला रक्त-मांस याचा अंगणात पडलेला सडा बघवत नाही. म्हणून तो डॉक्टर न होता इंजिनिअर होणार आहे. पैसे नसल्यानं दौलत तसाही डॉक्टर होणार नसतो. दौलतला बहुतेक हलगीवालाही व्हायचं नसतं.
दौलतची माय अंगणातला रक्त-मांसाचा चिखल तुडवत अंगण सारवुन काढते.तरीही दौलतला घरभर मेल्या जनावराचा भास होत राहातो. मायच्या स्वच्छ धुतल्या लुगड्याला, तिच्या स्वयपाकाला, तिनं घातलेल्या गोधडीला, चुलीतल्या लाकडाला सडक्या मांसाचा वास येत राहातो असं दौलतला सारखं वाटतं. म्हणूनच बहुतेक सगळ्या सुट्ट्या दौलत हॉस्टेलवरच्या त्यातल्या त्यात स्वच्छ खोलीत घालवतो. दौलतच्या मायलाही वाटतं की दौलतनं स्वच्छ राहावं. दौलतला आत्ता सारखं वाटतय की काल क्वार्टरवर कापलेल्या कोंबडीच्या रक्ताचे डाग आपल्या डोळ्यात उतरुन धुवट पांढऱ्या शर्टावर उमटलेत.
दौलतला वाटतय की काल आपला मृत्यु झालाय. स्वतःच्या मृत्यु पावण्याला आत्महत्या म्हणतात.
दौलतला असं बरंच काही बोलायचं असतं. पण तो अबोल राहातो.
अबोल = जमा इ. इ.
सगळं समजुन बाळासाहेबही अबोलपणे उरलेली दारुची बाटली तोंडाला लावतो.
अबोल = जमा इ. इ.

8 comments:

a Sane man said...

तोंडावर फेकलेले शब्दांचे तुकडे कपाळावरच्या अठ्यांनी चुकवत चुकवत गोष्ट गाभ्याशी आली नि "झालं की" असं सोंग आणून कंटाळून नेहमीप्रमाणे संपली.

"संस्कृती म्हणजे जुन्या अवशेषांचा इतिहास. गुलाबीसर असं तपकिरी काही." म्हणजे काय?

Meghana Bhuskute said...

_/\_

हा तुकडा संपूर्ण आहे.

पण त्याच्या आगेमागे बरंच काही असेल, असं वाटतं आहे.

जर काही असून अर्धवट टाकलंस, तर तुझ्या हार्डडिस्कची शंभर शकलं होतील, याद राख.

Megha said...

Typical 'Samved' style zalay lekh....aavdala.

Samved said...

मेघना- :) येवढंच. मागचं पुढचं लिहून होईपर्यंत तोंड उघडणार नाही. त्यामुळे कुणालाच काही कळणार नाही:)
मेघा- TanQ
सेन- तुला गोष्ट कशी भेटली आणि भिडली यावर कुणाचंच नियंत्रण नाही. कळाली नसेल इतकीही ती अवघड नाही. हां, एक जरुर आहे, सुरुवात-नाट्य-शेवट या तीन अंकी प्रयोगाच्या बरीच पुढे जागतीक कथा कधीचीच निघून गेली आहे. आधी सामाजिक आणि नंतर मानसिक (कधी हा सिक्वेन्स उलटा किंवा एकत्रही आला असेल)आलेखांच चित्रण कथेतून करण्याचा टप्पाही आता पार पडला. चित्रकलेच्या भाषेत सांगायचं तर अभिजात कथा सध्या (निदान माझा तरी असा समज आहे) क्युबिझमच्या अवस्थेतून जात आहे. तू जिथून उभा आहेस, ज्या संवेदना घेऊन आहेस, तेव्हढीच आणि तशीच कथा तुला भेटेल.

Shraddha Bhowad said...

संवेद,
हा प्रश्न तुला मला कधीपासून विचारायचा होता.
तू हे इतकं क्लिष्ट लिहीतोस हे असंच क्लिष्ट रुपात तुझ्या डोक्यात येतं की ते शब्दात उतरवताना क्लिष्ट होतं? म्हणजे तुला लिहीताना क्लिष्ट नसेल वाटत, पण मला वाटतं आणि येस्स तो माझा प्रॉब्लेम आहे. तुझ्या रुपक अलंकार, उपमा-उत्प्रेक्षांचे प्रयोग मला आवडतात पण तू लिहीत असताना ते तसेच डोक्यात येतात का? जस्ट कुतुहल.
म्हणजे या पोस्ट बद्दल नाही म्हणतेय-ही मला कुठेही ब्रेक लागायला न होता ’संपूर्ण’ कळली-म्हणजे निदान मला असं वाटतंय. वाचताना भय्या नागपूरकर, सांगवीकर, तेंडुलकरांचा बबन्या, माझ्या कॉलेजचा हिंगमिरे मास्तर असं सॉल्लिड कॉकटेल झालं होतं.

Samved said...

श्रद्धा, मला वाटतं प्रत्येक गोष्ट स्वतःचा फॉरमॅट घेऊन येते. काही गोष्टी सरळ न सोप्याच असाव्या लागतात पण काही कठीण "होत जातात", मुद्दाम कराव्या लागत नाहीत. खुप वेळा रुपरेखा डोक्यात असते, लिहीता लिहीता भरतकाम होत जातं. मुद्दाम अनवट टाके घालावे लागत नाहीत. काहीवेळा वाक्य न वाक्य डोक्यात असतं मग फक्त कारकुंडी करायची न काय

yogik said...

shityik charcha mala kalat nahi!! he je ahe fakkad!!

Ram said...

Great work. Indescribable. Keep it up.