देऊळ

देऊळ

 

मी   casual believer  आहे. म्हणजे हे माझं हे लेटेस्ट स्टेट्स आहे. मी कट्टर धार्मिक वगैरे कधीच नव्हतो पण मध्यंतरी माझं आणि देवाचं काही फारसं बरं नव्हतं. तेव्हढा एक अपवाद सोडला तर मी साधारणतः casual believer या  प्रकारात रमून गेलेलो आहे. ही जमात अमूक वारी देऊळात जाणं, तमूक उपास करणं, ढमूक मंत्र ’य’ वेळा म्हणणं अश्या  व्याखेत बसत नाही. पण हे करणाऱ्या लोकांबद्दल त्यांची तक्रारही नसते.

आणि असं असूनही मला देऊळ या प्रकाराबद्दल विशेष ममत्व आहे. प्रसन्न वाटणारी, गर्दी नसलेली, जुनाट देऊळं चट्कन जाऊशी वाटतात. त्या वास्तुला काही विशेष स्ठापत्य, नदीचा शेजार किंवा दंतकथेचा काठ असावा हे जरुरी नाही.

माझ्या आज्जी घरच्या देऊळाला यातलं काहीच नव्हतं.

तालुक्याचा जिल्हा होऊन इतिहास झाला तरी अगदी नव्वदीच्या दशकातही लातूर फारसं बदललं नव्हतं. जुन्या लातूरमधल्या वीतभर रस्त्यावरून गर्दी वाहात सिद्धेश्वरच्या जत्रेला जायची. त्याच रस्त्यावर आज्जीचं घर आणि देऊळ होतं. ही गावातली आद्यं दैवतं. नंतर बिर्लाछापाची, समाजदैवतांची, काही ऊन-पाऊस पेलणाऱ्या भव्य मुर्त्यांची मंदीरं उभी राहीली. पण ग्राम दैवतांच अप्रूप काही कमी झालं नाही.

आज्जीच्या देऊळाला फार जुना इतिहास नसावा. मराठवाड्यावर इंग्रज आणि हैद्राबादच्या निजामाचं राज्य होतं. रझाकाराचं मूळ घराणं लातूरचं आहे म्हणतात. त्यामुळं अनिष्ट टाळण्यासाठी मुर्त्या विहीरीत टाकणं, जमिनीत गाडणं सर्रास होत असावं. तर देऊळातली अंबाबाईची मुर्ती ही अशीच शेतात सापडलेली. चार-पाच फुटाची ती अंबाबाईची मुर्ती सलग काळ्या दगडात कोरलेली असावी. गाभाऱ्यात जायचं तर मान वाकवून जावं लागायचं आणि आत गेल्यावरही जेमतेम तीनेक लोकांना सरळ उभं राहाता येईल एव्हढीच जागा. भर दिवसाही तिथं लावलेल्या दिव्यांचा पडायचा तेव्हढाच प्रकाश. गाभाऱ्याचं दार सोडलं तर बाकी देऊळ दोन बाजूंनी सताड उघड होतं. गल्लीच्या टोकावरुन वळलं की पाच पावलं आणि चार पायऱ्यात देऊळ यायचं. उजव्या बाजुला अडीचेक फुटाची नागोबाची शीळा होती. मग गाभारा आणि त्या भोवती कल्लोळ काळ्या अंधारात बुडालेला, एका वेळी जेमतेम एक माणूस जाऊ शकेल एव्हढा प्रदक्षिणेचा मार्ग. उन्हाळ्यात आमचा मुक्काम देऊळात. चिऱ्याचे दगड श्वास घेतात, कोरड्या ठाण उन्हाळ्यातही, देऊळ कसं लख्खं गार असायचं. प्रदक्षिणेच्या  कमानीखाली थंड अंधारात आजोबा दुपारी लवंडले की आम्ही भावंड देऊळ तोलणाऱ्या चार लाकडी खांबाभोवती पळापळ करायचो. हिंमत वाढली तसं आम्ही प्रदक्षिणेच्या अंधाऱ्या मार्गावरही लपायला लागलो. नवरात्रीचे दिवस सोडले तर या देऊळाला माफक जाग असायची. नाही म्हणायला समोरच्या बाजुला असणाऱ्या महाप्रचंड पिंपळाची सळसळ तेव्हढी रात्रंदिवस देऊळाच्या सोबतीला असायची. आता तिथं यातलं फारसं काही उरलं नाही. पण दैवतांची काळाची परिमाणं निराळी असतात आणि म्हणून कवडी भर आठवणीचं अप्रूप तेव्हढं आपल्या वाट्याला येतं. 

 

कॅनव्हासभर राखाडी काळसर रंगाचं राज्य.

मणामणाचे असावेत बहुदा, पुरुषभर उंचीचे दगड, बेफीकीर रचलेले

भिंतीचं अनंतपण अधोरेखित करत,

आणि खाचांमधून खोचलेले

मातकट पिवळ्या रंगाचे पलिते,

ताजेच तेल प्यालेले असावेत असे तकतकीत.

कॅनव्हासच्या ऎन मध्यात,

बाजूने आणि ऎन समोरुन रेखलेले

एकमेकांत गुंतलेले बाईच्या चेहऱ्याचे धम्म ठसे. 

पलित्यांच्या पातळ उजेडात सर्वशक्तीनिशी बाई चेहऱ्यावरुन चेहरे ओरबाडून काढते आहे.

गडद लाल-हिरव्या रंगात रंगवलेले,

कसले मुखवटे म्हणायचे हे

मळवट भरलेले?

आणि समोरुन रेखाटलेल्या चेहऱ्यावर,

मुखवट्याच्या रंगाचे व्रण अजूनही ताजेच असावेत

अशा काही भीडस्त खुणा.

डोळ्यांच्या मिनाकारी खाचात मात्र

चांदीची दैवी वाटावी अशी कोरीव नक्षी....

 

आमच्या गावाला नदी म्हणजे असून नसल्यासारखी. गंगेसारखा तिचा उगम सापडत नाही आणि सरस्वतीसारखी ती कुठे गायब होते ते कळत नाही. त्यामुळं नदी काठचं देऊळ वगैरे निव्वळ पुस्तकातली कल्पना. मोठेपणी  वाईच्या घाटावरचं देऊळ वैगेरे बघेपर्यंत निब्बरपण मस्त रुजलेलं. मग कधी तरी एकदा गोव्याला निघालो. जाताना तांबडी सुरल्याला देऊळ बघायचं असं ठरलं. गोव्याला जाताना देवदर्शन, गावाचं नाव या वरुन खेचाखेची सुरु होतीच, शिवाय परंपरेनुसार रस्ताही चुकून झालेला. कधी न बघितलेली गोव्याची "कंट्रीसाईड" ओळखीच्या गोव्यापेक्षा ठार वेगळी होती. रस्त्यावरुन वाकडंतिकडं वाहत जाताना  तांबडी सुरला एकदाचं सापडलं.

कुठल्याशा अभयारण्यच्या एका बाजूला असलेलं तांबडी सुरल्याचं देऊळ तसं अलिप्त उभं आहे. आणि कदाचित म्हणूनच पोर्तुगिज आक्रमणापासून सुरक्षितही राहीलंय. गोवा सोडून आपण देवळात जातोय याची खोच लपवत आम्ही हिरव्या निळ्या छत्रीखालून पाचेक मिनीटं चाललो असुनसू की पट्टीनं आखावा असा गवताचा सळसळता आयत समोर आला. गवत मुद्दाम लावलं असावं तसं एकाकार. आणि या आयताच्या मधोमध पॉप-बुकमधून उघडावं तसं बसकं, दगडी देऊळ. आत बसलेले शंभॊ महाराज दगडी, त्यांच्या महालाचे खांब दगडी, त्यांचा नंदीही दगडीच. उपासनांचे उत्सव माणसांनं देवघेवीच्या हिशोबातून बांधले, दैवतांच्या पापण्या तर दगडी असतात. आणि कदाचित म्हणूनच इथल्या कारागिरांनी आपल्या प्रार्थनांचे छिन्नी-हातोडे केले असावेत. त्यांनी शतकांची गणित ओलांडून फुललेल्या कमळांची मांडण इथे रचली, खांबावरच्या नक्षीत बेबंद अश्व अन् हत्ती  बंदीस्त केले आणि देवळातल्या प्रत्येक मंडपाला स्वतंत्र अस्तित्व दिलं. या देऊळाला नदीचं अस्तर नसतं तर काही तरी अपूर्ण वाटलं असतं. त्या परिसरात आवाज म्हणाल तर तेव्हढाच. देऊळातल्या पुराणपुरुषासाठी जंगलात याहून एकट आणि सुशेगाद जागा शोधूनही सापडली नसती.

नियम म्हटलं की सोबत अपवाद आलेच. माझ्या सोईस्कर श्रद्धेच्या गणितात एक उद्गारवाचक चिन्ह आहे. का ते सांगणं कठीण, पण ते आहे हे मला नीट ठाऊक आहे. त्यामुळं पंजाबला जायचं ठरलं तेव्हा सुरुवात स्वर्णमंदीरापासून करायची हे सहजच आलं. देवळं नाहीत, आणि चकचकीत आणि गर्दी असणारी देवळं तर नाहीच नाही हा नियम बाजुला ठेऊन आम्ही ऎन दिवाळीतल्या काळात अमृतसरला स्वर्ण मंदीरात गेलो. अमृतसर... अंबरसर, अमृताचं सरोवर असणार गाव, लव-कुशांचं जन्मगाव, गुरु ग्रंथसाहीबचं गाव आणि भळभळत्या जखमांचं गाव...मंदीराच्या अलीकडे लागलेल्या पण बंद असलेल्या जालियनवाला बागेची ठसठस साठवून आम्ही पुढे सरकलो. आपल्याकडे तीर्थस्थळी असतात तशी असंख्य छोटी मोठी दुकानं, त्यावर चढाओढीच्या आवाजात लागलेला सत्संगतेव्हढ्यात कुणी तरी डोक्यावर केशरी पटका बांधला. एक पैशाची बात नाही, सवय नसते आपल्याला अश्या वागण्याची. पाण्यानं धुतलेले लाल जाजम पायाखाली आले की थंडी थेट हाडापर्यंत जात होती. कमानीतून आत गेलं की दिव्यानं लखलखलेलं स्वर्णमंदीर! असंख्य वेळा सिनेमात, चित्रात बघितलेलं आणि तरीही नजरबंदीची ताकद राखणारं, सोन्यानं मढवलेलं मंदीर! रात्रीची वेळ असूनही छान गर्दी होती पण त्या गर्दीला स्थानाचं भान होतं. मला पोलादी आडव्या खांबामधून वाहाणाऱ्या गर्दीची भिती वाटते. ती एक-प्रवाही असते. एकदा त्या रांगेत माणूस उभा राहीला की परतीची सोयच नाही. चेंगराचेंगरी, ओढाताण झाली तर चिरडून गेल्याची काही कमी उदाहरणं नाहीत आपल्याकडं. पण इथंल्या रांगांना कसली घाई नव्हती, ढकलाढकली नव्हती.  लाऊडस्पीकरवर शांत स्वरात कीर्तन वाचन सुरु पण त्यात उन्माद नव्हता.  इथे येताना तुम्हाला तुमचा धर्म-जात कुणी विचारत नाही, इथून जाताना कुणी उपाशी जात नाही. नाही म्हणायला धर्माच्या राजकारणानं मारलेल्या पंजाचे काही खोल व्रण अधून मधून जाणवत राहातात पण मत्था टेकताना सारं निरंजन होत जातं.

 

श्रद्धा ही मोठी विचित्र गोष्ट आहे. तिथं प्रश्नचिन्हांना फारशी जागा नसते आणि पेरायचीच म्हटलं तर तुमच्यात मोठी ताकद लागते किंवा बेफिक्री. देऊळ प्रकाराबद्दल बऱ्यापैकी निर्लेप असतानाही हे एव्हढं लिहावं म्हणजे? कदाचित बेफिक्रीच असावी.

Comments