Wednesday, July 9, 2014

अर्थाच्या गच्च चिखलावर बसून आहे


अर्थाच्या गच्च चिखलावर बसून आहे.

आशाळभुत कुत्र्यागत शेपूट हलवत शब्दांची झुंबड मेंदुला लगडून असते. एखादा साक्षात्कार भोगावा आणि प्रतिमांचे सुलभीकरण करावे असा नियम नसतोच, तो निव्वळ लिहित्या माणसाचा हव्यास. श्रीयुत ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी, तुम्ही मायन्या पल्याडची माणसं (आणि तशीही तुम्हाला कोऱ्या पत्राचीही सवय आहेच म्हणा) पण अक्षरामागे अक्षर ठेवावे आणि अर्थांची भाषांतरे व्हावीत असा सजीव सोहळा सहज होणे नाही.

It's a derived art form my friend. Painters are blessed ones. They can create absolute language. किंवा कसे, तंबोऱ्याची दाणेदार स्वरलिपी... निर्दोष लावावेत आणि नक्षत्र ओल कंठामध्येच मुरुन जावी तसे.

आणि इथे मी, प्रत्येक शब्दापोटी माझ्याच मुळाक्षरांची गुणसुत्रे तपासून घेत आहे.
तंद्रीला तीन मिती असतात; अनुभवांचे टोक निर्ममपणे पारखण्याची, आत्ममग्न लयीची आणि प्रस्तरांच्या पल्याड परकाया प्रवेशाची.

अनुभवांचे आरसे वाकवावेत तसंतसे नार्सिस्ट होत जातात. मी... मला... माझे....च्या गारगोट्या अस्पष्ट ठिणग्या उडवत राहातात. उद्धार करण्यासाठी कुणी गोरखनाथ ’चल मच्छींदर गोरख आया’ची हाक घालतो आणि स्व-प्रतिमांची एकके विलग होण्यास तेव्हढे निमित्तही पुरेसे असते. अनुभवातून जाताना प्रवासाचे कौतूक कमीच, घाई असते तो अनुभव संपवण्याची, मुक्कामी पोचण्याची. जेव्हा तो देजा-वु चा क्षण येतो आणि तो हुकुमी आणणं हे त्या लिहीत्या मनाचं कसब, तेव्हा तो अनुभव उलटसुलट पारखता येतो, असंख्य शक्यतांना जन्म देता येतो, अनुभवातून कोरडंठाण उभं राहाता येतं किंवा कॅलिडास्कोपसारखं गरगरा फिरवुन रंगीत चित्तरकथाही बघता येतात.

लयीला एक गत असते. स्वतःभोवती फिरत फिरत वर्तुळातून असंख्य वर्तुळे जन्माला घालणाऱ्या भोवऱ्यासारखी लय. कुणीतरी आपल्यापुरतं अवकाशाला पिळ घालतं आणि आपण आपलं विश्वामित्री नवं विश्व अस्वस्थपणे उसवत राहातो. माझ्या आत्ममग्न लयीला शांततेची दाट पार्श्वभुमी असते. पाण्याच्या एका थेंबाचं बेफाम कोसळणंही नकोच असतं मला. क्षणाक्षणाला जुळणाऱ्या आणि उसवणाऱ्या लय-बिंदुतून मला अनुभवांची एक साखळी ओवायची असते. एक प्रचंड आवर्त आणि मुठभर पारा, सृजनाच्या निव्वळ प्रार्थनांच्या बळावर आपण लिहीत राहातो.I lean to you, numb as a fossil. Tell me I'm here...
त्रयस्थपणे लिहीता येत नाही, कुणी तसा दावा करुही नये. माझा एक अंश, गुणसुत्रात लपवलेली एखादी नक्षत्रवेल माझ्या प्रत्येक पात्रात मला रुजवावीच लागते पण त्याही आधी वरवरचे पापुद्रे खरवडुन मला माझ्या पात्रांच्या आत्म्याला भिडावं लागतं..छे...मलाच पात्र व्हावं लागतं. सावित्री म्हणते तेच खरं स्वतःच मोर व्हायला हवं. पात्रांच सहज काहीच नसतं. लहरी ऋतुंनी झपाटून टाकावं तशी बेभरवश्याची असतात ती. एकेक ठिपका जोडून रांगोळी जोडावी तसा त्यांच्या भुतकाळ जोडावा लागतो. त्यांचे विखार, विकृती, चांगुलपण, त्यांचा भवताल अंगावर घ्यावा लागतो. आत्मभानाची टोके सुटू न देता पडभिंतीच्या सावल्या आपल्या अंगणात रुजु देणं तितकंस सोपं नसतं. तरीही डोळे मिटले की धुक्यातून त्यांना हक्कानं उमटावा लागतं तर त्यांच्या कहाण्या शब्दांच्या उधारबोलीवर लिहीता येतात. Kiss me, and you will see how important I am, हे स्वगत परतीच्या बोलीवर, लेखक शोधणाऱ्या प्रत्येक पात्राच्या कपाळावर आज मी पुन्हा लिहीतो.

No comments: