Sunday, January 29, 2012

आभासी विश्वाचे वास्तव

वेब २.० आलं आणि दुतर्फा संवादाच्या असंख्य शक्यता नव्याने जन्माला आल्या. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग इ. ही सारी वेब २.०ची अपत्ये. प्रत्येकाचा हेतु एकच-संवाद. संवाद या एका मुलभुत गरजेच्या किती म्हणून मिती असाव्यात याच्या साऱ्या कल्पनांना मोडीत काढत, या माध्यमांनी, नवनवीन आभासी विश्वांना जन्म दिलाय.
ब्लॉग बद्दल बोलायचं तर थोडसं नोंदवही/डायरी, असं रुप असलेलं, तुलनेनं अनाकर्षक असं हे माध्यम. आपण लिहीलेलं कुणी आणि का वाचावं या संभ्रमात असलेले ब्लॉगर्स (ब्लॉग-लेखक), शब्दांच्या महापुरात नेमकं काय आणि किती वाचावं याचा अंदाज घेऊ न शकणारे वाचक आणि (मुख्यतः) इंग्रजीतून संवादाचं बंधन यामुळे या माध्यमाचं भविष्य काय हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच युनिकोडच्या रुपानं प्रादेशिक भाषांमधे लिहीणाऱ्यांसाठी एक छोटीशी क्रांतीच झाली. युनिकोडमुळे कुठल्याही विशेष सॉफ्टवेअर्सच्या गरजांशिवाय मातृभाषेत लिहीण्याची सहजच सोय झाली. बघता बघता मराठीतही ब्लॉगर्सचा सुकाळ झाला. साहित्यीक, पाककलाविषयक, भविष्याबद्दल, तांत्रिक माहीती देणारे असे एक ना अनेक विविध विषयांवर मराठी ब्लॉग वेगाने उदयाला आले आणि बरेचसे वेगाने बंदही झाले.
याच सुमारास, ब्लॉगवरच्या साहित्यविषयक नोंदींचं संकलन करण्याच्या संकल्पनेला एक ठोस स्वरुप देण्यासाठी संवेद (http://samvedg.blogspot.com/), मेघना (http://meghanabhuskute.blogspot.com/), अ सेन मॅन (http://asanemanthinks.blogspot.com/) आणि ट्युलिप (http://tulipsintwilight.blogspot.com/) ही ब्लॉगर मंडळी एकत्र आली. या मंडळींनीं रेषेवरची अक्षरे (http://reshakshare.blogspot.com/) या नावाने २००८ मधे पहीला ब्लॉग-दिवाळी अंक काढला. या उपक्रमाचे सर्वात महत्वाचे नियम म्हणजे निवडलेल्या नोंदी साहित्य-प्रकारात मोडणाऱ्या असाव्यात आणि ठराविक कालावधीत प्रसिद्ध झालेल्या त्या सर्वोत्तम नोंदी असाव्यात. या साऱ्या प्रक्रियेत संपादक म्हणून आमच्यापुढे असंख्य अडचणी असतात. काही समान आवडींमुळे आम्ही चौघे एकत्र आलो आहोत पण ही ओळख इंटरनेटच्या आभासी विश्वाला साजेशीच आहे. आम्ही चौघे कधीही एकत्र भेटलेलो नाहीत. काही टोपणनावांखालच्या खऱ्या ओळखी सोडल्या तर अगदी चेहरेही सर्वथा अनोळखी! दिवाळीच्या काही महीने आधी आम्ही आमच्या वाईट्ट व्यावसाईक वेळापत्रकातून वेळ काढून, जगाच्या कोण कोपऱ्यातून रात्रीबेरात्री इंटरनेटच्या माध्यमातून भेटतो. सर्वसाधारणपणे १५०-२०० ब्लॉग आणि त्यावरच्या पाचसहाशे नोंदी आम्ही संपादकाचा चष्मा लावून चाळून काढतो. प्रत्येक संपादकानं निवडलेली प्रत्येक नोंद ही कशी सर्वोतम आहे हे इतर तीन संपादकांनां पटे पर्यंत प्रत्येक लेखाचा कीस पाडला जातो. आणि इतर बऱ्याच खटाटोपींनंतर रेषेवरची अक्षरेचा अंक प्रकाशित होतो.
आज गेली चार वर्ष सलग हा उपक्रम चालवल्यानंतर मागे वळून बघताना या उपद्व्यापामागच्या उर्जेचा शोध घेताना बरंच काही उमजत गेलं. रेषेवरची अक्षरे सुरु केलं तेव्हा ब्लॉगवरच्या काही सर्वोत्तम साहित्यिक नोंदींचं संकलन एव्हढाच ढोबळ उद्देश होता. पण या मागची व्यापकता कालांतराने उलगडली. ब्लॉग हा तसा बऱ्यापैकी हौशेचा मामला. आपापले व्यवसाय सांभाळत लिहीताना काळ-काम-वेग या त्रैरासुराच्या राज्यात लिखाणाचा कोंभ कधी कोमेजून गेला हे बऱ्याच चांगल्या ब्लॉगर्सनां समजलंही नाही. अनुभवांनां निव्वळ शब्दबद्ध करणं म्हणजे लिखाण नाही, गजलेचं वजन सांभाळल्यानं चांगली गजल बनत नाही, बेताल कविता म्हणजे मुक्तछंद नाही हे आणि असेच जुनेच अनुभव संपादक म्हणून आम्हाला नव्यानं आले. इंटरनेटच्या महाजालात चांगलं लिहीलेलं विरुन जायला वेळ लागत नाही हे ही लक्षात आलं. संपादकाची भुमिका थोडीशी गंभीर झाली. रेषेवरची अक्षरेचे चारही वर्षांचे अंक आम्ही संदर्भासाठी म्हणून एका जागी आणले. ब्लॉगरनां लिहीण्याची उर्मी सोडली तर कसलंच मोटीव्हेशन, फायदा नसतो. त्यांना लिहीतं ठेवण्यासाठी नोंदींचा खो खो असे काही उपक्रमही आम्ही केले. "मला मुळात लिहावं का वाटतं?" किंवा "मावशीबोलीतल्या कविता" हे काही समाधान देऊन गेलेले खो खो. एका ब्लॉगरनं लिहायचं आणि परिचित ब्लॉगरला याच विषयावर लिहीण्यासाठी खो द्यायचा असं काहीसं या खेळाचं स्वरुप. या वर्षी एक पायरी ओलांडून आम्ही "लैंगिकता आणि मी" या विषयावर रेषेवरची अक्षरेच्या अंकात मुक्तचिंतन ठेवलं होतं. त्याला लिहीणाऱ्यांचा आणि वाचणाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकाच विषयावर कथा, कविता, आत्मचिंतन अशा कित्येक प्रकारे ब्लॉगर प्रकट झाले.
ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही मराठी साहित्याला नवं वळणं द्यायचा प्रयत्न करतो असं म्हणणं फार धाडसाचं आहे. पण आमच्या ग्लोबल गावकरी असण्याने, विविध संस्कृतींना सामोरे जाण्याने, बहुभाषिक असण्याने मराठीत नवे संदर्भ येताहेत हे नक्की. कथांमधे चित्रकलेसारखे क्युबिझमचे प्रयोग केले जाताहेत. चित्रकलेला शब्दात रंगवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जागतिक संस्कृतीचे दुवे स्थानिक संदर्भात मिसळुन गंभीर कथा लेखन होत आहे. एकीकडे पारंपारिक वळणाच्या अलंकारीक कवितांना उजाळा मिळताना दिसतोय तर दुसरीकडे स्वतःला अंतर्बाह्य तपासणाऱ्या कविता मुक्तछंदातून प्रकट होताना दिसताहेत. पारंपारिक अर्थाने किंवा प्राध्यापकीय समिक्षा नसेल पण कविता: आधी, आता आणि पुढे? किंवा कोसला आणि कॅचर इन द राय - एक तुलना असे अत्यंत गंभीरपणे केलेले लिखाण समिक्षेच्या आयामात आपल्या परिने भर घालत आहे.
ब्लॉग हे माध्यम आम्ही गंभीरपणे घेतोय. गरज आहे ती या प्रयत्नांना प्रोत्साहान देण्याची, मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाशी या नव्या दमणुक करणाऱ्या माध्यमाला एक समांतर प्रवाह म्हणून मान्यता देण्याची. विविध व्यवसाय, विविध देश, विविध भाषा आमच्या लिहीण्यावर, वाचण्यावर, विचारक्षमतेवर पूर्वी कधीच नव्हता एव्हढा प्रभाव टाकताहेत. त्यातून मिळणारे अनुभव काही प्रस्थापित चौकटी मोडणारेही असतील आणि काही नवनिर्माण करणारे असतील. या आभासी विश्वाचं खरं तर एव्हढंच वास्तव!

>>>> युनिक फीचर्स गेल्या वर्षीपासून ई-साहीत्यसंमेलन भरवतय. गेल्यावर्षी रत्नाकर मतकरी या संमेलनाचे अध्यक्ष होते तर या वर्षी ग्रेस. यंदाच्या अंकात ब्लॉग माध्यमात नक्की काय चाललय याचा धांडोळा घेण्याची संधी मला मिळाली. हा लेख मुळ स्वरुपात इथे उपलब्ध आहे. एका चांगल्या उपक्रमाचे आणि अजून महत्वाचे म्हणजे ब्लॉगवरच्या साहीत्यीक लिखाणाला गंभीरपणे घेतल्याबद्दल युनिक फीचर्सचे आणि शितलचे मनःपुर्वक आभार!

1 comment:

Megha said...

छान लेख....आता पर्यन्त चे सगळे दिवाळयी अन्क वाचलेले आहेत. अतिशय उत्तम उपक्रम आहे. बहेरच्या देशात राहणार्या लोकाना दिवाळी ची मेजवानी आहे ही. 2011 च्या अन्का मधला 'लैन्गिकता आणि मी' हा विभाग विशेश(पोटफोड्या श कसा लिहयचा?) आवडला.