गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी
बयो, चाफ्याचं वेडं मोठं जीवघेणं. मणीदार सर्पाला ही सुटत नाही सुगंधाची चटक आणि तुझं वय हे असं, बेभान. म्हणालीस, पापण्यांवर तोलेन वरचेवर एखादं फुल, अस्पर्श, म्हणजे स्वप्नही भारलेलं सुगंधी पडेल. होतं असं? पडतात अशी ठरवुन स्वप्न? तुझ्या स्वप्नात चाफा, चाफ्याच्या स्वप्नात तू. परत चाफा, परत तू. आणि मग लहान लहान होत तुमच्या प्रतिमा एक होऊन जातील. तू चाफा-चाफा म्हणजेच तू. चाफ्याचं झाडं ही जरा अल्लडच. पानांचे बहर जेमतेम येताहेत तोवर टच्च गर्भार कळ्यांचे ऋतु पानांआडून बेबंद उलगडुही लागले. पानांची नवथर नवलाई निरखावी की कळ्यांचे गर्भार सोस जपावेत हा मोठा जीवघेणा प्रश्न. पानांवरच्या रेषांत भविष्य बघून तू म्हणालीस, कळ्यांना जपायला हवं. सावल्यांच्या दीर्घ साजणवेळी वाऱ्यावर वाहून आले असतील निळावंतीचे काही शब्द कानी, झाडांना तुझी भाषा समजते. पानांच्या कोषात कळ्यांचे संभ्रम दडून गेले. सुर्य कलथुन जाण्याआधी आमरशी रंगाचा पट्टा ओढतो तरी कळ्या शहारत नाहीत. वाऱ्याच्या भुलीला फशी पडून त्या गंधही उधळत नाहीत. उत्कट डोळ्यांनी पाहात राहातेस तू गुणसुत्रांची मायावी मांडणी. फुलांवर इतका लळा लावु नये कधी मुली. मोह, क...