Portrait of a poet

It doesn't belong to a day
It doesn't belong to a night
Hold on my dear, how can you select an evening for a dialogue? It belongs to poetry alone.

मिथकांचे जादुई प्रयोग करुनही मी कविता होणार नसतो.

प्रल्हादाचा बाप आठवतो मला; ऎन संध्याकाळी आतून उसवलेला, जणु सदेह कविताच! हसण्या न ह्सण्याच्या भ्रमात असतानाच कविता सामोरी येऊन उभी ठाकली. "मुळ मायेला विसरलास?" तिच्या स्वरात कधीच कसला भाव नसतो. "एक करार होता आपल्या दोघांत; ते आतलं जंगल वाचण्याचा" टाळ्यांच्या आवाजात माझं गात्र न गात्र बधीर झालेलं असतं तेव्हा आवाज कसे ऎकु येणार प्रिय? "सैतानाला आत्मा विकणारया माणसाची गोष्ट ऎकली आहेस तू?" मी ही निष्ठुरपणे बोललो. काळ्या फळ्यावर खडूचा कधीमधी चर्र्र असा सहन न होणारा आवाज होतो. मला उगाच आठवलं. नजरबंदीचा खेळ खलास झाला तेव्हा थकल्यासारखे आम्ही शांत बसलो आपल्या आपल्यातच. तिच्या संयमी, शांत चेहरयात संध्याकाळ विरघळत होती. "कन्फेशन्स!" चेहरे ओरबाडुन काढत मी हत्यार खाली टाकलं. प्रश्नचिन्हांचं गाठोडं तिनं उचकलं आणि एक जीर्ण प्रश्न माझ्या ओंजळीत ठेवून ती निघती झाली "कसल्याच खाणाखुणा नसलेल्या स्वगतागत सपाट पसरले आहे मी तुझ्या आयुष्यावर. जिथे तुला अर्थ सापडले, तिथे तू विरामचिन्हे पेरत गेलास, पुरुषासारखा. पण मग तुझ्या आत्मकेंद्रीत कथांच्या ऎन कविता होतानाच त्यांना स्त्रीत्वाचं रुपक का लाभतं?"

हा आरोप की आत्मवंचना की आणखी काही? मला अपरिहार्यपणे कवितेचं एक कडवं आठवतं

वास्तव परिमाणात मोजली जातात नाती
देवी, तुझ्या अनुग्रहानेच झाले हे दिव्य ज्ञान
तू वास्तवाच्या स्पर्शाचा दाहक झल्लोळ
कल्लोळ नंतर केंद्रात
देवी, कुठे फेडशील हे पाप?
मी कवी होणे हे विधीलिखीत असेलही
पण तू झालीस निमित्तमात्र

आता कवितेचं मुळ शोधणं आलं. स्त्रीसुक्ताचं असणं इतकं का अपरिहार्य आहे कवितेत? तिच्या निर्मितीक्षमतेशी कुठे नाळ जोडली गेली असेल कवितेची? की जनुकातुन आलेल्या गुणसुत्रांप्रती आपुलकी दाखवण्याचा एक किंचितसा प्रयत्न? हुसेनची बॅकलेस गजगामिनी आठवते अश्यावेळी. पंढरपुरच्या वाळवंटात हरवलेली आई शोधत भरकटणारया त्याच्या रेषा थबकल्या थेट स्टुडिओतल्या एका दिपशिखेपाशी. शांतारामबापुंचा तो कवी, नाव आठवत नाही त्याचं मला, त्याच्या कजाग बायकोत कविता शोधतो तेव्हा निर्मितीप्रक्रियेची कोणती गणितं मांडत असतो तो?

नर-मादी या मुळ, शाश्वत नात्याला जोखणारया असंख्य कलाकृती आहेतच पण केवळ त्या धुंदीत व्हिन्सीनं नटवीला कान कापून दिला असेल? बदलणारया हरेक मौसमातील रहस्य अस्वस्थ आत्म्याच्या तळाशी बाळगणारी ऋतुमती कुळामुळाच्या पार पल्याड उभी असते. तिची रहस्यं लिपीबद्ध करणं एव्ह्ढच तर ठरवलं होतं त्यानं. पार विस्कटून टाकलेला रुबिकक्युब रंगसंगतींच्या कित्येक शक्यता दाखवतो, तसं स्त्रीसुक्ताचं असणं रंग-अक्षरांच्या खेळात.

अनेक शक्याशक्यता तर्काच्या बोलीवर पारखुन पाहात असतानाच कविता पाठी मागे वळली "प्रश्नाला उत्तराची जोड दिली की प्रश्न संपतात असंच जरुरी नाही. सारी कोडी सोडवशील तर उभ्या ठाकलेल्या असंख्य उत्तरांच काय करावं हा अजूनच गहीरा प्रश्न निर्माण होईल. Let the riddle be riddle, Dear"

Comments

Sorry. Complete bouncer. Let the riddle be riddle... :(
chaan lihilays....barach veL lagala paN samajaayala....
Megha said…
faar anakalneey lihitos tu kadhi kadhi...tari pan baryapaiki samajala....but need to be explained a bit more...