Friday, September 19, 2008

डॅड, डोन्ट किल सुपरमॅन

Hey Dad, तू कधीच कॉमिक्स आणून नाही दिलंस मला. विचारलं की म्हणायचास कल्पनाशक्ती झडते आणि मला ही ते नेहमी सारखं पटून गेलं! अधूनमधून हातात येणारया अमरचित्रकथा सोडल्या तर मधल्या काळात खानदानी पुस्तकं माझ्यात खोलवर रुजत गेलेली. पानांपानांवर उगवलेले शब्द आणि त्या शब्दांना लगडलेल्या अर्थांच्या कित्येक शक्यता यांनी मनावर गारुड घतलेलं. पण मग नवल झालं. जाळीफेक्या स्पायडी पुस्तकातून टीव्हीत घुसला. त्याचे अगम्य शत्रु पुराणकथांहून चमत्कारीक होते. त्याची अक्कल फा.फे.हून वेगळ्या कुळीची होती आणि त्याचं विश्व कदाचित विरधवलाहून चित्तथरारक होतं. मध्येच कधी तरी अर्चुनं सुपरमॅन, मॅन्ड्रेक आणि फॅन्टमशी ओळख करुन दिली आणि सुपरहिरोजची एक पंगतच माझ्या अंगणात झडली. नथिंग रॉन्ग आफ्टर अ पॉईन्ट ऑफ टाईम, यू सेड, खरं आणि खोट तुझं तुलाच कळेल! तू बरोबर होतास डॅड. चिरंतन सोबतीला कोणती पुस्तकं राहातील हे कळण्या इतपत शहाणा करुन सोडला होतास तू मला. नंतर कधी प्रकर्षानं कुठलाच सुपरमॅन नाही आठवला मला.

पण आज, जेव्हा मी तीन, तेरा किंवा तीस कुठल्याही वयाचा असू शकतो, मला सुपरमॅन कुठे तरी असावासा वाटतो. उन्मळुन पडणारी माणुसकीची मुळं, श्रद्धांचे आंधळे अतिरेकी अविष्कार आणि यंत्रवत निस्तेज आमची जात यांचे ओझे घेऊन युगाची पावले फार लांब नाही चालु शकणार आता. एका विकृत करणी सरशी होत्याचे नव्हते होईल तर कुणी थांबवायचे ते विनाशी तांडव?

'सुपरमॅन हे करेल?' असं विचारण्याआधी थोडं थांब डॅड. सत्याला नागडं न करता माझ्या विश्वासाला आंधळेपणानं लिंपता येणार असेल, तर प्लीज डॅड, डोन्ट कील सुपरमॅन

6 comments:

a Sane man said...

न पटणारी अगतिकता :(
....ती अजून पटत नाहीये ह्यातच सुख मानू दे सध्या..!

Nandan said...

poorvi 'sambhavami yuge yuge' cha aashray hota. aata superhumans chi khunTee. farak fakt tapasheelat.

Samved said...

सेन, प्रयत्नवादी आणि दैववादी हे वॉटरटाईट कप्पे असलेच पाहीजेत असंच काही नाही, नसतं बहूदा. प्रचंड ब्रम्हांडाच्या अंगणात, पृथ्वी एक क्षुल्लक कण आणि माणूस तर अजूनच सुक्ष्म. निसर्गाच्या लहरी, प्रकाशाचे, आवाजाचे खेळ, रोग, साथी आणि मानवनिर्मित संकटे यांच्यातून पार पडून ही जात आज इथवर आली आहे. कुठलातरी क्षण आलाच असेल की हातात धरायला एक हात माणसानं शोधला असेल. देवाचा हात? दैवाचा हात? किंवा अजूनही काही तरी नाव देता येईल. माणसाच्या दैववादी पणाची सुरुवात कदाचित इथेच कुठेतरी झाली असावी. या दोन टोकांमधे झुलणं कदाचित कधी कधी अपरिहार्य!

नंदन, हाच धागा पुढे वाढवतोय. हे पोस्ट बरंच लांबलं होतं, हे लिहीणं ही माझी गरज होती पण कात्री चालवली नसती तर खुप पसरट झालं असतं हे. तर कातरलेल्या भागातले काही संदर्भ तुझ्या प्रतिक्रियेच्या उत्तरार्थ. मला वाटतं माणसांच्या संस्कृतीनुसार त्यांचे देव आणि त्या देवांचे गुणावगुण ठरत गेले. रामानं हवेतुन बाण काढणं आणि स्पायडीनं हवेत जाळं फेकणं यात चमत्काराच्या दृष्टीनं काही फार फरक नाही. मघाशी म्हणल्यासारखा अडचणीच्या वेळी एका मोठ्या माणसाचा हात हातात धरणं हा भाव दोन्ही कडे सारखाच. संभवामी युगे युगेचे संदर्भ मी या पोस्टच्या संदर्भात नाकारले कारण हिंदु देव हे क्वचितच सामान्य माणसांतील एक होते. आपल्या चमत्कारांपुढे लीन-दीन होण्याच्या प्रथेनुसार, देवांचे प्रकट होण्याचे भाव देखील वाढलेले. प्रार्थना करा, तप करा तरच आम्ही येऊ ही आपल्या देवांची परंपरा. शिवाय देव माणसापेक्षा वेगळे, उच्च, कायमच. सुपरहिरोजचं तसं नाही. ते संकटाच्या वेळी स्वतःहुन हजर होतात (मला लिहीताना देखील मजेदार वाटतय), संकटांवर लक्ष ठेवून असतात आणि इतर वेळी सामान्यातीलच एक म्हणून वावरत असतात. दोन्ही संकल्पनांमध्ये बरं-वाईट अशी तुलना करण्याचा प्रयत्न नाही कारण आधी म्हटल्याप्रमाणे हा त्या संस्कृतीतील फरक आहे जिथे या संकल्पना जन्माला आल्या. इथे मुद्दाम सुपरहिरोजची संकल्पना वापरली आहे कारण असामान्य परिस्थितीत सामान्यांतीलच एक कुणीतरी उठून उभं राहाण्याची एक शक्यता कायम असते. आशावाद!

Abhijit Bathe said...

संवेद - तु कात्री चालवायच्या आधीचं पोस्ट वाचलं नव्हतं पण त्याबद्दल उत्सुकता नक्कीच आहे. I think ते कदाचित याच्यापेक्षा चांगलं असावं. Sorry to say but somehow पोस्ट involve करेल वाटत असतानाच abruptly end झालं. Post आवडलं नसतं तर मी कमेंट लिहिली नसती - नावडलं ही नाही म्हणुन लिहिली.

एनीवे...

Anand Sarolkar said...

"Bavra mann dekhne chala ek sapna..."
:)

Samved said...

अभिजीत, पोस्ट abruptly end होण्याचं आणखी एक कारण आहे जे मी नाही सांगीतलं तर कळणारच नाही. फारसं महत्वाचं नाही पण तू विषय काढलास म्हणून हा उपद्व्याप (excuse हा शब्द टाळतोय कारण लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी आपण घ्यायलाच पाहीजे नाही का?)
तर हा संवाद किंवा जे काही आहे त्यातला डॅड आणि मुलगा दोन्हीचा रोलप्ले माझाच आहे, डबलरोल म्हण हवं तर त्यामुळे कुठल्या वयाने कुठे थांबायचं त्याची गल्लत कातरकामात परिवर्तित झाली इतकच