देवी

देवी, नेसत्या आत्म्यानिशी भेटलेल्या स्त्रीयांची माणूस-रुपं. तीन वेगवेगळ्या कालखंडात (!?) लिहीलेल्या कविता, एकत्र जोडून काही अर्थपुर्ण होतय का ते बघतोय...



देवी-१


//१//

बर्फ वितळतो मणक्यात माझ्या,

मरणगंध पुन्हा दरवळतो

त्याच्या अभिषेकात.

सांगा देवीजी,

तुमचं अस्तित्व एखाद्या अभिशापासारखं का भासतं?

माझे रंग, गंध, सूर, छंद

सारे कसे ओढून घेतात स्वतःला स्वतःतच

//२//

आज तुमच्या नावाचा गोंधळ देवीजी,

जागरणाला याल नां तुम्ही?

आमच्या उभ्या देहाचा

पेटलाय पोत,

त्यात मनाच्या गाभारयात घुमतं

तुमचं बोलणं उदासारखं.

घुसमटतो माझा प्राण.

आत्मव्देषाचा हा उत्सव

तुमच्याच आशिर्वादाने

पार पाडतोय मी.

तुम्ही दिलेल्या लक्ष लक्ष

जिव्हारजख्मा प्रत्येक क्षणात मरणाशी तडजोड करतात

कवितांच्या बोलीवर.

या कविताही तुमच्या व्रताचं उद्यापन

//३//

तुम्ही माझ्या?

मी मात्र सर्वस्वी तुमचाच.

माझ्याकडून बांधलेले संबंधांचे दोर

आणि तुम्ही तगवलेलं

नातं निव्वळ दुःखाचं सुंदर


देवी-२


//१//

देवी, तू जननी या शोधाची

आणि सनातन नात्याची आद्यकडी.

माझ्या रक्तातील पेशीपेशीत तुझं

अस्तित्व गडद

महान अद्वैतासारखं.

या प्रवासाची तू अपरिहार्य सुरुवात

//२//

वास्तव परिमाणात मोजली जातात नाती,

देवी, तुझ्या अनुग्रहानेच झाले हे दिव्य ज्ञान.

तू वास्तवाच्या स्पर्शाचा दाहक झल्लोळ

कल्लोळ नंतर केंद्रात.

देवी, कुठे फेडशील हे पाप?

मी कवी होणे हे विधीलिखित असेलही

पण तू झालीस निमित्तमात्र

//३//

देवी,

तुझ्याशिवाय अपूर्णच आयुष्याची प्रस्तावना.

खुपसं प्रेम आणि तीव्र द्वेषानंतर

निवळतेपणीही तरळते

फसवणुकीची तीच भावना साधार.

दुखावणारया तुझ्या प्रत्येक शब्दातून माझे

कवितेत रुपांतर झाले पण त्या आहेत

ऋणमुक्त.

देवी, ते ओझे तर मी फेडतो आहे

सदेह.

मला हवा आहे मात्र तुझाच आशिर्वाद की

मी नाकारु शकेन कण्याला पेलणारे

तुझे मायावी हात

//४//

अस्पष्ट आणि धुसर

उमटलाय तुझा चेहरा

तरीही दुःखाच्या प्रचंड क्षणी जाणवलं

पोटातून

देवी, सनातन नात्यातील तुच दुसरी कडी.

दुःखाच्या ज्या निसटत्या समांतर स्पर्शाचे

आपण भागीदार, तिथूनही तू

मला

उगवतीलाच ऒढतेस.

देवी, हेही तितकंच खरं,

मी अस्पर्श ठरेन

म्हणून पायरीवरुनच मी कृतज्ञ

//५//

सवयीने उमजत जातात पुरातन लिपीचे अर्थ.

ती पुरातन असते की आपणच मोठे

होतो ती समजण्याइतपत रोजच्या अगणित

श्वास घेण्याच्या जन्मजात सवयीतून?

त्यानंतर

देवी, तू मला, मी तुला वाचत जाणं

आपल्यातील पिढीच्या अंतराला जोखणं होतं

//६//

ऎन बहरात थबकून

एखाद्या समृद्ध स्वगतासारखी

वाट्याला आलीस.

मौनातील ठसठसते दुःख

तुझ्या एका स्पर्शासरशी

उमलुन यावे इतके अतूर होते?

देवी, तू सनातन नात्यातील

तिसरी कडी.

तू प्रेयसी होण्याआधी परावर्तित भासातील माझी

उमजही तितकीच खरी

//७//

देवी

अनंत..

आणि आदी सुद्धा


देवी-३


//१//

पोत विझले,

चंद्र निजले,

पहाटतारे हिर्व्या तळ्यात

विझत, जळत, उजळत राहीले.

देवी,

तुझे कालातीत डोळे देखील

हळुहळू माणूस झाले

//२//

देवी,

चिमूटभर ओंजळीत

ओलेत्या आणभाका

घातल्या की

वारयावर वाहात येऊन

अंगभर रुजत जातात

हळदीच्या पिवळ्या हाका.


स्थिरावल्या की

तुझ्या ओटीपोटीत

नाळेच्या एका टोकाला

पेरतात

एखादा आश्वासक उखाणा

//३//

रांगा

रांगा

रांगा.

सरळ,

गोलंगोल

आणि वक्र रांगा.


माणसे,

माणसे,

माणसे.

स्थलांतरीत होत राहातात माणसे

एका रांगेतून दुसरया रांगेत

जसे जन्माचे फेरे


सात रांगा फिरुनही

गाभारा गिळत नाही मला.

श्रद्धा आणि सोय यांचे गणित

मांडत-विस्कटत असतानाच

प्रसादाचे केळे दह्यात मान टाकते

आणि घटीका भरल्यागत

देवी,

तुझे महाद्वार मज साठी उघडते


एका आत्ममग्न कसोशीने

टेकवतो मी कपाळभर तुझ्या माझे भाळ

आणि हातांवर एकरुप हात

करणी उलटवल्यागत.


ललाटरेषांच्या सामुदाईकीकरणाचा एक विस्फोटक प्रयोग

किंवा

तुझ्या दगडी देहावर

जीवाश्म होऊन अनंतकाळ उरण्याचे काही असंबद्ध प्रयत्न


देवी,

कोलाहल

नाही कानांना

स्पर्श

नाहीत शरीराला

आकार-विकार

नाहीत

देहभानाला


हळुहळु चंद्र चढतो माथ्यावर

आणि चांदण्यांचे आकाश डहुळत राहाते

हिर्व्या तळ्यात


कवड्यांची माळ घातलेला

येतो कुणी पोत

नाचवत तुझ्या अंगणात


देवी,

तुझे डोळे चमकतात पोताच्या अर्धवट प्रकाशात

काळजात खोचलेल्या षडजासारखे

शुद्ध आणि स्वच्छ

दैवी चांदीचे


Comments

Harshada Vinaya said…
[:)]
देवी..प्रश्नार्थक नजरेने पाहणारी की सगळ्या पापांची भर स्वतःच्या पदरात झाकून ठेवणारी कि अजून कोणी... सणावारांना घूमणारी.. की ती जी रोज धावत पळत ट्रेन पकडून पिल्लासाठी जीव घेऊन घरच्या ओढीने पळणारी..

काय माहीत कोणती देवी???
पहिल्या दोन बाउन्सर. :(

तिसरी आवडली. पण कवितेला - ’या’ कवितेला - ’आवडली’ इतकीच प्रतिक्रिया पुरेशी आहे का? खरं तर नाही. पण तूर्तास काही म्हणत नाही.

’निव्वळ आभार’ मानते! ;)