...आणि डार्लिंग

"आठवणी येताहेत जन्मापासून
जन्मापूर्वीच्या. जन्मानंतरच्या. गर्भाशय हादरले,
तडकले, जागोजाग तेव्हाच्या.
आठवणी येताहेत तळघरातील भातुकलीच्या शेजारी
निवांत निजलेल्या अधोरेखित टिपणाच्या.
..
आठवणी येताहेत पहाडामागून, पहाडापूर्वीच्या.
एका उपनदीचे नाव डार्लिंग."




नदीला असतात आकार, उगम, अंत आणि काही नावे. मी अगस्त्य, समुद्र म्हणू तुला डार्लिंग? अट्टहास आणि परिणाम एकत्र तोलायचे नाहीत या जीवघेण्या बोलीवर तुझे अनंग अस्तित्व वसतीला आले माझ्या. शब्दहीन अर्थांचे पुंजके लगडले आहेत मेंदुला तेव्हा पासून. रंगीत पुंजके. निळे, हिरवे पिवळे उदाहरणार्थ अनंतपण, वासना आणि विरक्ती अनुक्रमे. आणि हो काळे आणि पांढरेसुद्धा. निम्बस; घनकल्लोळ काळेपणाला आकृतीबंधात गुंफणारा सोनेरी धागा, तो ही आहेच. रंगांचे इतके सहजी वर्गिकरण होणे नाही पण पॅलेटमधे कुस्करलेल्या रंगांच्या ट्युब्स काही तरंग सोडून जातात मनात. मी मुळचाच निसर्गवादी; पुज्य आणि सांख्य, धन आणि ऋण, निर्मिती आणि विनाश आणि हो, काळे आणि पांढरे एकत्रित आवडतात मला. या न्यायाने तुझ्या अनंग अस्तित्वाचे दुसरे शारीर टोक असणार कुठे तरी. शोधु म्हटले तर सापडणार नाही. आभाळ थोडेसे कलेल तेव्हा हाकेच्या अंतरावर थांबशील तू? कावळ्यांचे हाकारे रान उठवित नाहीत पण आत्ममग्न जंगलाची वीण उसवण्याचे सामर्थ्य असते त्यांच्या ओरडण्यात.



तू अर्थ, माझ्या शब्दातीत, शब्दहीन कवितांचे. अनुभवांचे, प्रतिमांचे ध्रुवीकरण झाले की गाभूळलेल्या पावूस थेंबागत मेंदुच्या कुठल्याश्या पाकळीत हल्केच फुलतेस तू. डार्लिंग, तुला जशी शब्दांची तहान नाही तसे मलाही तुझ्या वैश्विकरणाचे मोह नाहीत.



मैत्रिण आठवते मला. तिच्यावर रचलेले काही शब्दपुंजके, कविता म्हणते ती त्यांना, तिला भेट दिले कुणी. अपेक्षेपेक्षाही मला ते शब्दपुंजके दाखवुन वेडावण्याचेच भाव जास्त होते त्यात. काय साध्य करायचे असते त्यातून? माझी आत्ममग्न लय मोडण्याचे दुःसाहस? शब्दांची मायावी शक्ती? की डार्लिंग तुझ्या दुर्बोध, अशारीर अस्तित्वाला प्रत्यक्षात येण्याचे आव्हान?




"राम चालला पुढे असे जुनेच वाटले" आठवणी येताहेत जन्मापासून जन्मापूर्वीच्या. जन्मानंतरच्या. अंधाराचा लख्ख कवडसा चमकतो क्षणभर. अहिल्येला मिळालेला शाप हे रघुरामाच्या स्पर्शापुरते निमित्त. स्पर्शाच्या साक्षात्कारात तुझे शब्दमल्हार, शब्दवेल्हाळ, शब्दगंधार अस्तित्व नव्याने उदयाला येते डार्लिंग आणि माझ्या कवितांना शब्दांचे शक्य आयाम मिळतात. तुझे आकार साकारताना माझ्या कविता देहचूर होतात.



राजपुत्र


लडाखच्या वाळवंटात बौद्ध भिक्षुणी चोरुन जमिन उकरते. खोलवर आत दडवलेला आरसा काढून स्वतःचे तारुण्य न्याहाळते. मोहाशिवाय मुक्ती नाही हे तिला कळेल कधी तरी? काही गोष्टी उगाच आठवत राहातात.

राजपुत्राने आरसा पाहीला. प्रतिबिंबाच्या डोळ्याला डोळा देताना बुबूळात उमटत जाणारया अंतहीन प्रतिमांच्या इंद्रजालाची त्याला भूलंच पडली. कवितांचे अमानुष वादळ संध्याकाळभर घोंघावत राहीले.

Comments

Samved said…
कवितांच्या ओळी, राजपुत्र आणि डार्लिंग, ग्रेसांचे ऋण
Bipin said…
सुरेख! फ़ारच छान..
^:)^
Abhijit Bathe said…
संवेद - ईमानदारीत एक तक्रार आहे मॅन....
तु मेजर अवघड लिहितोस. आता माझी रिऍक्शन सांगतो - तुझं पोस्ट पाहिल्यावर. टायटल तर झकासच आहे. कवितांच्या ओळी पण लगेच गूढ वगैरे मूडमध्ये घेऊन गेल्या. पण त्यानंतर तू तुझ्या एलेमेंटमध्ये गेलास. मग मला प्रत्येक वाक्याचा अनुवाद करुन ते वाक्य वाचायला लागलं. अगदीच अनाकलनीय नव्हतं. इनफॅक्ट सूंदर वगैरे पण होतं. आता मी मागे जाऊन वाक्यं वगैरे कोट करण्याचा विचार केला पण मग मी काय सांगत होतो ते विसरीन. पण हे म्हणजे संस्कृत सुभाषितं एकामागुन एक वाचण्यासारखं वाटलं. कूर्मगतीने एकेक वाक्याचा अर्थ लावत जायचं आणि शेवटी पोचेपर्यंत सुरुवात विसरायचं!

आता कालीदास वगैरे पण मला कुणी अनुवाद करुन सांगितल्यावर समजतो. आणि तो ग्रेट बिट असेलही. पण सद्यस्थितीत ओरिजनल कालिदास जरी माझ्याशेजारी बसुन त्याची सुभाषितं सांगायला लागला तरी मी म्हणीन - का पकवतोयस बाबा!

गैरसमज नको - तुझं पोस्ट विचार करायला लावणारं आहे (बहुतेक). पण त्याचा अर्थ मेजर गळत गळत येतो आणि शेवटी विचार अर्थापेक्षा अनुवादाचा जास्त रहातो.

असं माझं वैयक्तिक मत.
मी ’राजपुत्र आणि डार्लिंग’ वाचलेलं नाही. त्यामुळे मला काही म्हणता काही कळलेलं नाही. इथे ते मिळणंही मुश्किल. :(
Samved said…
खरं तर राजपुत्र आणि डार्लिंगचे संदर्भ खुप मर्यादित आहेत, कवी आणि कविता यांचं मेटाफर म्हणून.
किशोरी आमोणकरांनी एकदा शब्दाचं (अ)महत्व सांगीतलं की राग-मांडणीत अगदी ४-५ शब्दच असतात आणि तेही फार महत्वाचे नसतात. पण जेव्हा एखाद्या कलाकाराला लोकांपर्यंत पोचायचं असतं तेव्हा शब्दांत समजावुन सांगणे याला पर्याय नाही. शेवटी त्यांनाही पुस्तक लिहावंच लागलं. कुमारांनी बरंच लिहील आणि ते विचारवंत गायक झाले (म्हणजे ते मुळात होतेच, आपल्याला ते कळालं इतकंच). मग जे शब्दात येत नाही त्यांचं काय? उदा. नृत्य, शिल्प, चित्र इ. इ.. या अभिजात कला सर्वसामान्य माणसांपर्यंत न पोचण्याचं कारण असं होतं का की त्यांना शब्दांच्या चौकटीत कुणी बसवुन लोकांना समजावुन सांगीतलं नाही?

शब्दांची अचाट शक्ती जेव्हा लेखक/कवींची कला पारखते तेव्हा काय होतं? आपल्या मनात आधी अर्थ येतात की नुस्तेच शब्द? अर्थांना तसंच विदेही ठेवलं, शब्दांची त्वचा दिली नाही तर काय होतं? एक कवी म्हणून मला कविता लिहील्याचं समाधान मिळेल? किती मिळेल? किती दिवस मिळेल? कधी तरी हे समाधान संपेल का? संपलं की शब्दांची गरज भासेल? खुप दिवस हे प्रश्न भेडसावत होते...म्हणून हे पोस्ट
Abhijit Bathe said…
संवेद - तुझे हे प्रश्न ’नाजायज’ नक्कीच नाहीत, पण I think thats the beauty of writing! अमोणकर काय किंवा कुमार काय (I hope तु कुमार ’गंधर्वांबद्दल’ बोलतोयस - शानू बद्दल नाही! :)))
तर - हे काय किंवा आणखी कुणी....हे लोक 'ड्युड्स’ असतील (नव्हे आहेतच) - पण ते आपापल्या way of expression मध्ये! इथे संगीतात!! ते लेखक होऊ शकतीलच असं नाही!!! तुला कदाचित मी भरकटतोय असं वाटेल - पण मी मुद्याला चिकटुन रहायचा प्रयत्न करतो. मला माझ्या गाण्यातुन ’असं’ म्हणायचं होतं हे त्यांना ’शब्दातुन’ सांगावं लागलं तर कदाचित ते त्यांचं अपयश झालं! तेंडुलकरच्या बॅक फुट स्ट्रेट ड्राईव्हची नजाकत तेंडुलकर शब्दांत सांगुच शकत नाही. त्याचं वर्णन हर्षा भोगळेनंच करावं!

तुला मुद्दा कळतोय का?
सर्वसामान्य माणुस म्हणजे कोण? हे थोर गायक जेव्हा गातात तेव्हा ते ’सा रे ग म’ audiences साठी गात नसतात. हे त्यांनाही माहित असतं. त्यांच्या गाण्यात रस घेऊन त्यातले nuances कळुन घेण्याचा ईमानदार प्रयत्न करणारे श्रोते हा त्यांचा audience असतो. जर अशा जाणकार/इच्छुक श्रोत्यांपर्यंत ते पोचु शकले नाहीत, तर I think something is missing! त्यामुळे तुझं "पण जेव्हा एखाद्या कलाकाराला लोकांपर्यंत पोचायचं असतं तेव्हा शब्दांत समजावुन सांगणे याला पर्याय नाही" हे वाक्य पटलं नाही. तेंडुलकरच्या शॉटची नजाकत प्रेक्षकांना कळलीच पाहिजे, पण फक्त बघुन कळली पाहिजे. त्याच्यावर ’आह!’ आपोआप उमटला पाहिजे. हर्षाचे शब्द ऐकुन त्या नजाकतीचा आनंद ’द्विगुणीत’ झाला पाहिजे. पण हर्षाचे शब्द तो आनंद re-create करतात - create नव्हे.

दुसरं म्हणजे "शब्दांची अचाट शक्ती जेव्हा लेखक/कवींची कला पारखते तेव्हा काय होतं?" - तर तो लेखक/कवी जीव देतो. देत नसेल तर दिला पाहिजे. आणि जगायची जर तेवढीच प्रबळ इच्छा असेल तर शब्दांना वश केलं पाहिजे. हे जे ग्रेस बीस लोक तु quote केलेत हे काही नुसते गोट्या खेळुन ग्रेट नाही झाले! existence चा प्रश्न निर्माण झाला तेव्हा ग्रेसनी कविता लिहिली, जी.एं. नी गोष्ट लिहिली. त्याच्या खालचं सगळंच खत्रुड. माझ्या ब्लॉगवर मेघनाने एक लिस्ट करुन ’मग याला साहित्य म्हणायचं नाही कि काय? (ऑ!)’ असा प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर कदाचित हे असेल.

अर्थाला शब्दाची त्वचा....हे म्हणजे परत क्रिकेटचं उदाहरण द्यायचं झालं तर - तेंडल्याने शॉट तर खेळलाय आणि तुला जाम म्हणजे अजिबातच तो शब्दांत मांडता येत नाहिए तर काय करावं?
परवा मला ट्युलिपने एक उदाहरण सांगितलं. ग्रेस कॉलेजात वगैरे शिकवायचे आणि भरपुर पॉप्युलर वगैरे होते तेव्हा त्यांच्या वर्गात हा विषय निघाला. पोरं पोरी विचारायला लागली कि ’सर सर, असं लई आतुन लिहावंसं वगैरे वाटत असेल आणि व्यक्त करता वगैरे नाही आलं तर किती वाईट घुसमट होते माहित्ये का? असं झालं कि काय करावं?’ त्यावर ग्रेसचं उत्तर मोठं मजेशीर आहे.
ग्रेस म्हणाले - ’भोसडीच्यांनो, प्रतिभा म्हणजे काय तुम्हाला तुमची रांड वाटली? जेव्हा वाटेल तेव्हा जवळ करावी? असं झालं कि गपगुमान कूस बदलायची आणि झोपुन जायचं!’
(आणि शॉटचं वर्णनच करायचं असेल तर ’खुदी’ ला एवढं ’बुलंद’ करायचं कि शब्द स्वत:च बंद्याला विचारेल ’बाळा - तुला ’रजा’ चा अर्थ माहितिये का?’ (हा जोक मला आत्ताच सुचला आणि मला माझं घोर कौतुक कौतुक वाटतंय))

Oh BTW - मी तुला सांगितलं का कि तुझी कमेंट वाचुन परत तुझं पोस्ट वाचल्यावर मला ते ’बॉस’ वाटलं. पण पहिल्यांदा ते वाचताना यंदा केलेल्यातला झाट एकही विचार तेव्हा डोक्यात आला नव्हता. आणि ’संदर्भासहीत’ स्पष्टीकरण दिलं नाहीस हे एक मेजर बरं केलंस!
prasad bokil said…
अरे मित्रा, ग्रेस असा थेट पोचवल्याबद्दल धन्यवाद.
वाचून खूप छान वाटलं.
Samved said…
धन्यवाद मित्रांनो.

अभिजीत, चर्चेला बराच वाव आहे पण सध्या वेळ्कमी आहे. पण कधी तरी बोलु या विषयावर
Samved said…
सगळ्यांनी नवे कपडे घेतले. मग आम्हीही दिवाळी केली :)
Megha said…
u look handsome in y'r new dress!!!!
Happy Diwali! Mast disatayt nawe kapade.. :)
a Sane man said…
he chakachak disatay!
Samved said…
शिंपीदादांना तुमच्या कॉम्प्लिमेन्टस पोचवण्यात आल्या. धन्यवाद :)