रेषेवरची अक्षरे 2010

यंदाचं रेषेवरची अक्षरेचं तिसरं वर्ष. तिसरं म्हणजे खासचं नाही? हॅट-ट्रीक, साडे माडे तीन इ इ. प्रस्तावनेतून उचलेली ही कविता आणि ही लिंक, बघा काही कुतुहल चाळवतय का...बरं वाईट जसं वाटलं तसं कळवा अंक कसा झालाय ते. आपल्याही बाब्याचं कौतूक कधी करावं म्हणून नाही, पण यंदाचा अंक मला खरंच आवडलाय...
http://reshakshare.blogspot.com/


आम्ही लिहितोच आहोत

पैसाच्या खांबाला टेकून किंवा गणपत वाण्याच्या बिडी बंडलाला फुंकून
मुक्तपणे कधी आणि कधी प्रमाणबद्ध आकृतिबंधात.
इरेस पडलों जर बच्चमजी तर
आम्ही मोरूच्या बोरूनेही लिहिले असते
किंवा कमळाच्या सचित्र पानांवरही.

गणिताच्या वहीत मागच्या पानांवर आम्ही लिहीत होतो
आणि लिहीत होतो कोसळणार्‍या पावसात काचेच्या तावदानावर उन्मनीपणे.
आज विदेशी कळ-फलकावर मातृभाषेच्या पाऊलखुणा शोधत
आम्ही लिहितोच आहोत.

पण नंतर असेच झाले
अट्टल कलावंताचे होते तसेच झाले
प्रश्नचिन्हांनी फेर धरले
आमचेच शब्द गर्गरा फिरले.

अप्रकट विचार तरंगासाठी असतातच का नेमके शब्द?
आणि या सांकेतिक चिन्हांतून खरंच का हो होते अर्थबांधणी?
शब्दांवर शब्द रचत आमचाच अक्षर समुच्चय तेवढा भद्र

आणि जन्म-मृत्यूचे दाखले, वाण्याची सामानाची यादी, पिवळ्या पडत चाललेल्या वर्तमानपत्रातल्या रद्दी बातम्या -
अहमद घर बघ
कमळ बस
अभय निव्वळ काना-मात्राविरहित शब्दांची लगोर रच
म्हणजे सारे जनांचे श्लोक?

शांतं पापं- शांतं पापं
शांततेत पाप आहे!
शब्दांनी कर्ण्यातून मोठा कल्ला केला...

मग वाटलं अर्थांना शब्दाच्या नव्या त्वचा द्याव्यात
जसं उमजतं तसंच समजतं का हे बघावं
बघावेत आत्मजांचे प्रवास
निराकाराकडून आकाराकडे
अर्थांकडून शब्दांकडे
स्क्रीनवरच्या शुभ्र धुक्यातून
काळ्या पूर्णविरामाकडे.

Comments

अप्रतिम!!
तुझी कविता आणि अंकही सुरेख.
निवडलेल्या काही पोस्ट्सबाबत मतभेद जरुर आहेत पण सलग तिसर्‍या वर्षीचा हा उपक्रम नि:संशय अभिनंदनास पात्र.

जाता जाता...
मायबोली दिवाळी अंकातल्या तुझ्या लेखाची ही लिंक.लेख पाठवल्याबद्दल धन्यवाद!

http://vishesh.maayboli.com/node/867
Samved said…
Thank you Sharmila-- for encouraging comment as well as for the link
Btw.. miloon saryajani chya ya varshichya diwaLi ankamadhe reshewarachi akshare cha ullekh vachun chhan vatala.
Parag said…
Ekdum mast! Excellent!!!