आईने के उस पार...

तसं बघितलं तर मला चरित्र, आत्मचरित्र इ. प्रकार फारसा आवडत नाही. ज्या वयात पुस्तकं वाचायला सुरुवात केली त्या वयात पुस्तकात सतत काही तरी घडलं पाहीजे असं वाटणं फार नैसर्गिक होतं. त्यामुळे आत्मचरित्रांचा संथ आणि पसरट पसारा तेव्हा नाही आवडला तो नाहीच आवडला. पण गंमत म्हणजे गंभीरपणे वाचायला सुरुवात केल्यावर वाचलेल्या पहील्या दोन-तीन पुस्तकात गाडगीळांची ’दुर्दम्य’ होती. पण हा अपवाद. त्या नंतर किती तरी वर्ष या प्रकाराच्या वाटेला मी कधी गेलो नाही. नाही म्हणायला लोकवाङमयची आणि तशीच रुपडं असणारी इतर प्रकाशनांची डार्वीन, मेरी क्युरी, युरी गागारीन वगैरे शास्त्रज्ञ तत्सम मंडळींच्या पुस्तकांचा फडशा पाडणं सुरु होतं पण त्यांना नेमकं चरित्र म्हणता येईल का ही एक शंकाच. मग एका उन्हाळ्याच्या सुटीत, कदाचित सातवीच्या उन्हाळ्याच्या सुटीत, गंभीरपणे चरित्र वाचण्याचं फर्मान निघालं. गाढव वयात गाढव विचार असतात (असं थोड्या थोड्या वर्षांनी मागं वळून पाहीलं की परत परत वाटतं हा एक वेगळा विषय!). गांधी, आंबेडकर इ मंडळी कुठल्याही विशिष्ट कारणाशिवाय शत्रुपक्षात होती. विचारसरणी, तत्वज्ञान शब्द फार मोठे होत पण उगाच मत बनवणं ही त्या वयाची गरज असते तसंच काहीसं झालं असेल. मित्रांपेक्षा शत्रुंचा जास्त अभ्यास करावा म्हणतात. मग त्या सुटीत धनंजय कीरांनी लिहीलेली आणि इतरही बरीच चरित्र/आत्मचरित्र वाचून काढली. बरेच चष्मे उतरले, बऱ्याच गोष्टींचं रॅशनलायझेशन झालं. पण म्हणून चरित्र/आत्मचरित्र हा वाङमय प्रकार आवडता झाला असं नाही. पुढची कितीतरी वर्ष यात काही फारसं वाचलं गेलं नाही. मग अचानक खुप बाया एकामागे एक आयुष्यात आल्या. माधवी देसाई, सुनिताबाई देशपांडे, कमल पाध्ये इ.इ. पहील्यांदा चरित्र/आत्मचरित्र यांच्या जवळ जाणारं काही तरी आवडलं. नात्यांचे तरल तर कधी उसवलेले पोत, सहजीवनातल्या उसळत्या-पडत्या बाजु, शब्दांच्या खरवडी खालचे लेखकराव, स्वत्वाच्या लख्ख जाणीवा सारं कसं लयबद्ध सोलत जाणारं होतं. हे छानच होतं. मानवी स्वभावाचे पापुद्रे सुटे करणं, त्यांचे सुक्ष्मदर्शकाखाली अवलोकन करणं, त्यांना उलटसुलट जोडून त्यांचा क्युबिझम जोखणं, आख्खा माणूस दुर्बिणीतून निवांत पाहाणं, त्याचं दैवीपण आणि त्याचे मातीचे पाय अभ्यासणं यासारखी मजा नाही.

पण आज हे आठवण्याचं कारण निराळं. एका मागोमाग एक चक्क तीन चरित्र/आत्मचरित्र मी विकत घेतली. नारळीकरांचं ’चार नगरातले ...’, विजयाबाईंचं ’झिम्मा..’ आणि गोडबोल्यांचं

"मुसाफिर’. तीन वेगवेगळ्या प्रांतातली उंच माणसं, वेगवेगळ्या पार्श्वभुमी आणि लिखाणाचा पोतही निराळा.

अच्युत गोडबोल्यांना सीईओ, लेखक, गान रसिक ते फसलेला किंचित नक्षलवादी अशी कितीतरी स्टिकर लावता येतील. आमचा धंदा एक असल्यानं (फक्त टोकं वेगळी!) ते इत्यादी इत्यादी होण्या आधीपासून त्यांची माहिती होतीच. त्यामुळे पुस्तकात निदान माझ्यापुरतं तरी काहीतरी नव्यापेक्षा डिटेलींग जास्त होतं. एखाद्या माणसाला एका जन्मात वेगवेगळी चार-पाच आयुष्यं जगायची असतील तर काय होतं याचा हा इतिहास. (एरवी ही सोय फक्त सिनेमातल्या लोकांना असते). म्हटलं तर अंगभुत गुणवत्ता आणि जबर चिकाटी असलेला माणूस सोलापुरसारख्या ’मोठ्या खेड्यातून’ येऊन कुठे पोचला याची ही गोष्ट किंवा सहवेदना आणि वास्तव यांच्या उरफाट्या ओढाताणीची ही गोष्ट. पुस्तक वाचताना काही प्रश्नही पडले. चार गोष्टी जमतात, आवडतात म्हणून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रत्येक गोष्ट करायची आणि नंतर रस्तेच बदलायचे ही यशस्वी मराठी माणसाची वृत्ती की मर्यादा? गोडबोले वाचताना कितीतरी वेळा नारायण मुर्तींची आठवण होते. मुर्तींनी जो फोकस शेवटपर्यंत जपला तो गोडबोल्यांनी का बरं नसेल जपला? की सामाजिक बांधिलकी, यशाची भिती ही टिपीकल मराठी पिशाच्चं त्यांच्यावरही स्वार झाली? जेव्हा समाजवादी भांडवलशाही/ फिलॉन्थ्रॉपिस्ट समाज परिवर्तनाचे नवे प्रयोग करत आहेत, तेव्हा समाजवादी टोकनिझममधून/प्रुफ ऑफ कन्सेप्ट मधून परिवर्तनाचे तेच ते प्रयोग किती दिवस करायचे? पैशाच्या बळावर जे बफेट, गेट्स, प्रेमजी, मुर्ती करु पाहताहेत, ते धाडस गोडबोल्यांनी दाखवायला हवं होतं. यात नुकसान त्यांच्यापेक्षा समाजाचंच जास्त झालं. असो. निबर लोकांपेक्षा अजूनही काही घडु शकतं यावर विश्वास असणाऱ्या कॉलेजिअन्सनी हे पुस्तक नक्कीच वाचावं.

विजयाबाई हे माझ्या पिढीसाठी केवळ मिथक आहेत. त्यांची नाटक आम्ही पाहीलेली नाहीत, त्यांच्या चळवळी आमच्यापर्यंत पोचायच्या आधी संपून गेल्या होत्या. पण त्यांनी घडवलेले नट आम्ही पाहीले, लाईफलाईन सारख्या त्यांच्या मालिका आम्ही पाहील्या, डिव्हीडीवर त्यांचे सिनेमे पाहीले पण प्रत्यक्ष विजयाबाई जश्या ओळखल्या जातात, तश्य़ा त्या आम्हाला भेटल्या नाहीत. म्हणून झिम्मा महत्वाचा. झिम्माची सुरुवातीची काही पान वाचताना विजुची गोष्ट जाम कंटाळवाणी वाटायला लागली. पण मग जसं नाटक सुरु झालं, तसं बाई उंच उंच होत गेल्या. एखाद्याला नाटक बसण्याच्या गोष्टीत रस असेल तर या पुस्तकाला टाळणं वेडेपणाचं होईल. बाई ऎकून माहीत होत्या ते बॅरिस्टर, एक शुन्य बाजीराव, वाडा चिरेबंदी, अश्या काही नाटकांसाठी. पण अशी किती तरी ग्रेट नाटकं आहेत जी बाईंनी केली आणि ती कशी केली हे माहीत करुन घेणं गरजेचं आहे. आणि नुस्ती मराठीत नाही तर जर्मनी मधे सुद्धा. मधे मधे बाईंची स्पेशल टीपण्णी आहे, नटांविषयी, दिग्दर्शकांविषयी, संगीताविषयी. प्रायोगिक रंगभुमीवर अवघडलेल्या कुंडल्या पसरुन बसलेल्या बऱ्याच नव्या कुडमुड्या जोतिष्यांनी या टिपण्या जरुर वाचाव्यात. नाटक म्हणजे एक गोष्ट सांगणं किंवा अंगविक्षेप करणं किंवा बद्धकोष्टीय चर्चा करणं किंवा काही..तरी..वेगळं..करणं असा ज्यांचा कुणाचा समज असेल त्यांनी नाटक बसण्याची प्रक्रिया या पुस्तकातून जरुर समजावुन घ्यावी. विक्रम गोखल्यांना बॅरिस्टरच्या भुमिकेसाठी डोळे शोधायला सांगणं असु दे किंवा भक्ती बर्वेच्या सोलो अभिनय पद्धतीमुळं आलेल्या मर्यादांचं भान असु दे, गोडश्य़ांच्या नेपथ्याचं विश्लेषण असु दे किंवा चंदावरकरांच्या संगीताची चर्चा असु दे, नाटक ही एक पुर्णाकृती म्हणून कसं आकाराला येतं याचं तारतम्य बाईंनी कधी सुटू दिल्याचं दिसत नाही. इंग्रजीमध्ये टू क्लोज टू पिक्चर असं म्हणतात. काही दिग्दर्शक नाटकातल्या कथेवर, काही नात्यांमधल्या ताण-तणावांवर, काही अभिनयावर, काही शारीर हालचालींवर, काही पात्रं विकसित करण्यावर भर देतात. पण एक कलाकृती म्हणून ते नाटक पुर्णार्थानं कसं आकार घेत आहे हे टू क्लोज टू पिक्चर राहूनही बघणं ही फार कठीण गोष्ट. बाईंना ती गोष्ट जमून गेलेली वाटते. ज्याला पुर्ण पुस्तक वाचायला वेळ नाही त्या दुर्दैवी जिवानं निदान पीटर ब्रुक्सच्या महाभारताचं जे वर्णन बाईंनी केलय किंवा बॅरिस्टरच्या आकाराला येण्याची गोष्ट तरी जरुर वाचावी.

या मालिकेतलं शेवटंच पुस्तक म्हणजे नारळीकरांचं आत्मचरित्र. विजयाबाईंचा मोठेपणा माझ्या पिढीला जसा काही नाटकापुरता मर्यादित माहीत आहे तसंच काहीसं नारळीकरांच्या बाबतीतपण आहे. मराठीतला थोर शास्त्रज्ञ (काय शोधलं असं लगेच नाही विचारायचं), प्रेषित, वामन सारखी विज्ञान कादंबरी-कथा लिहीणारे लेखक आणि फार तर आयुका यापलीकडे नारळीकर म्हणजे नक्की काय हे माहीत नसणं आपल्या व्यक्तीपुजक मराठी संस्कृतीला साजेसं आहे. नारळीकरांचं चरित्र ही विलक्षण बुद्धीमत्तेची गोष्ट आहे. काही लोकांचे डीनए उच्च प्रतीच्या बुद्धीमत्तेसाठी प्रोग्रॅम केलेले असतात अश्या अर्थाचं इंद्रा नुईचं एक वाक्य प्रसिद्ध आहे. नारळीकरांची गोष्ट वाचताना पदोपदी या वाक्याची आठवण येते. जे पदक उच्चशिक्षण घेताना वडील मिळवतात तेच पदक मुलगाही कमावतो हे एक नवल पण मधल्या २०-२५ वर्षात कुणालाही ते स्वर्णपदक मिळवता आलं नसतं ही त्यातली खरी मोठी गंमत. पुस्तक वाचताना पुनःपुन्हा इंग्रजांचं विद्यापिठ आणि आपलं विद्यापिठ यांची तुलना होत रहाते. वैष्यम्य वाटत राहातं की मुलभुत विषयांचा, विज्ञान-गणित यांचा अभ्यास आपण कधी करणार, कुटूंबनियोजनाच्या केसा शोधण्या ऎवजी संशोधन करणारे गुरुजन आपल्याला कधी लाभणार. नारळीकर स्वतःच म्हणतात तसं त्यांना पाहायला गर्दी करण्याऎवजी त्यांचं संशोधन आपण कधी समजुन घेणार..एक चांगली गोष्ट घडली म्हणजे नारळीकरांच्या बुद्धीमत्तेचं योग्य वयात योग्य पद्धतीनं कौतूक झालं. तैलबुद्धीला, मेहनतीची साथ मिळाली आणि योग्य संधी मिळाली तर एक मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेला माणूस कुठे जाऊ शकतो याचं नारळीकर हे उत्तम उदाहरण आहेत. नंदन निलकेणी एका प्रसंगी म्हणाले होते की माणूस जसा मोठा होत जातो तसा तो अजून नम्र होत जातो. पुस्तकभर नारळीकरांचा साधेपणा, नम्रपणा कुठलाही आव न आणता सहजपणे जाणवत राहातो. पण लेखन म्हणून याचा एक साईड-ईफेक्टही आहे. मेघनाचे शब्द वापरायचे तर पुस्तक जुन्या शैलीत लिहीलेले एक सरळ गोष्ट आहे. छोट्या छोट्या घटना, शिलींग-पौंडाचे बारके हिशोब कधी कधी रसभंग करतात खरं पण त्याचीही एक बाजु आहे. तो काळच तसा होता. टाटाच्या शिष्यवृत्तीवर जाणारी मुलं, पैसे वाचावेत म्हणून कोडवर्डसारखे टेलीग्राम पाठवणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जीव गुंतणं हे कदाचित आज समजुन घेणं कठीण आहे. तो काळ मध्यमवर्गीय मुल्यांना बुर्ज्वा म्हणून हिणवायचा नव्हता, साधं-सोपं म्हणजे कंटाळवाणं अशी लेबलं लावायचा नव्हता, समाजातला सिनिसिझम मर्यादित होता. काळाचा तो संथ पण निश्चीत प्रवाह, साधेपणा नारळीकरांच्या चरित्रभर वाहात राहातो. बुद्धीच्या, शैक्षणिक पात्रतेच्या बळावर पुढे जाणाऱ्या लोकांबद्दल ज्यांना आदर वाटतो, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. ज्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत रस आहे त्यांनीही हे पुस्तक नक्की वाचावं. ज्यांची मुलं आज नुक्तीच शाळेत जाणार आहेत त्यांनी दर काही वर्षांनी हे पुस्तक परत परत वाचावं.

Comments

Pranav Jawale said…
Hello,

Let me know if it's ok to post this on https://marathibookreviews.quora.com

Is author's name Samved?
Samved said…
Hi Pranav,

You can post it there with my name as author and link to this blog.
Thanks
-Samved

’झिम्मा’बद्दल अगदी अगदी. शिवाय कामाबद्दल इतकं चोख बोलताना बाई लागूंच्या चरित्रासारख्या उगाच कोरड्या-काटेकोर न होता वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी, आनंद, वाटचाल समरसून नोंदतात, हे विशेष. मला एक मात्र खटकलं. ’आविष्कार’पासून त्या वेगळ्या झाल्यानंतर पुढे आविष्कारनं केलेल्या कामाबद्दल चकार नाही. सगळंच कसं लिहिणार हे मान्य आहे. पण विजयाबाईंच्या चरित्रात हे नाही येणार तर कुठे येणार, असंही वाटलंच.
नारळीकरांच्या चरित्राबद्दल - नारळीकरांचं मोठेपण अमान्य करायची माझी काय लायकी? प-ण पुस्तक म्हणून मला ते भारी नाही वाटलं. "मी इथून तिथे गेलो-प्रवासाला साडेतीन तास लागले-वाटेत थांबू्न आम्ही सफरचंदं खाल्ली-प्रा. अमुक अमुकच्या साध्या पण हृद्य वागणुकीमुळे अधिकच मजा आली..." असं सतत वाचून वैताग होतो. साध्या शब्दांत लिहिलेली सरळ गोष्ट आहे हे मान्य. थोडं संकलन झालं असतं, तर पुस्तक रंजक झालं असतं, किंमतही थोऽऽऽडी कमी झाली असती, तरी चाललं असतं, असा खवचट विचार डोक्यात येतोच.
’मुसाफिर’ मी वाचलं नाही. मला गोडबोले थोडे विकीपिडिया टाईप वाटतात. पुन्हा एकदा - माझी काय लायकी, हे मला मान्य आहे. पण ते देतात ती सगळी माहिती मला मनात आणलं तर शोधाशोध करून मिळेल. मग त्यांचं काय मोठेपण? तरी मुद्दामहून त्यांची काही महत्त्वाची पुस्तकं मध्यंतरी मिळवून वाचली. माझं मत अजूनच पक्कं झालं. त्या बळंच मधुर भांडारकरी उर्फ आर्थर हेले प्रकारातल्या पुस्तकांहून मला त्यांचे दिवाळी अंकातले आत्मपर लेख आवडतात. त्यातून त्यांचे निर्णय, अडचणी, आवडीनिवडी दिसतात... म्हणजे बहुदा मला ’मुसाफिर’ आवडावं! वाचीन... :)
बाकी - लई दिसांनी लिहिलंत. बरं वाटलं. :)
आणि हो, शीर्षकाबद्दल शुद्ध जळजळ झाली. पूर्णविराम.
Samved said…
Meghana- To a very large extent, I completely agree with what you said in comment, I mean almost!
Yes, writing after such a big gap is courageous but guess I haven't lost it entirely :)

And yes, about title! I actually wrote a sher! but then limited title to just few words!! I had exactly same reaction for Maunachi Bhashantare. I will never forgive Khare for coining such a wonderful title before I could do so
Manasi said…
ही तिन्ही आत्मचरित्रे सध्या गाजत आहेत. तुम्ही तिन्ही वाचलीत- ग्रेट!
मी झिम्मा वाचलंय...आवडलंय. बघू बाकीची दोन वाचण्याचा कधी योग येतोय..
झिम्माविषयी बोलायचं तर एकदा हातात घेतल्यावर पूर्ण केल्याशिवाय सोडवत नाही इतकं ते पुस्तक वाचनीय आणि रंजक आहे. तो काळ, ती नाटकं पाहिलेली नसल्यामुळे ऐतिहासिक पुस्तक वाचल्यासारखे वाटते, आजच्या, माझ्या काळाशी ते रिलेट होत नाही, हेही तितकेच खरे!
Samved said…
थॅन्क्स मानसी. हल्ली चांगली पुस्तकं इतकी कमी झाली आहेत की एखादं जरी दिसलं तरी झडप घालायला होतं.
झिम्माची गंमत अशी की त्यातले संदर्भ, भले नाटक जुने असले तरी, अजूनही ताजेच आहेत.
Samved said…
थॅन्क्स मानसी. हल्ली चांगली पुस्तकं इतकी कमी झाली आहेत की एखादं जरी दिसलं तरी झडप घालायला होतं.
झिम्माची गंमत अशी की त्यातले संदर्भ, भले नाटक जुने असले तरी, अजूनही ताजेच आहेत.
aativas said…
ही तीनही पुस्तकं वाचलेली नाहीत - त्यातली दोन आवडतील असं वाटतंय :-)
Samved said…
तुझी कोणती दोन माहीत नाही. पण झिम्मा आणि चार नगरातले...नक्की वाच
Gouri said…
"झिम्मा" आणि "चार नगरातले" दोन्ही विषयी - अगदी अगदी !
मुसाफिर (उगाचच) विशेष वाचावंसं वाटत नाहीये. समोर पडलंय, पण अजून वाचलं नाही!