Saturday, December 28, 2013

अनहत स्वगतांचे ढळणारे प्रतिध्वनी


॥ थोडं नंतर॥

रात्री ११ ते सकाळी ९ ही सर्वात वाईट ड्युटी. बरेच लोक ड्युटी आणि वाईट हे समानार्थी शब्दच समजतात. रिझवान सिद्दीकीनं घड्याळाकडं हताशपणे बघितलं. बरेच लोक घड्याळ आणि हताशपणा यांनाही समानार्थी शब्द समजतात. घड्याळाचा काटा फकाटपणे हात पसरवून हॉ... करत गेला कित्येक वेळ पावणेतीनचीच वेळ दाखवत होता. खास पोलीस स्टेशनातच वाजु शकतो तसा अश्या भलत्यावेळी रिझवान समोरचा फोन खणखणला.

"सर, मॉलसिटी बीट मधून जमाल बोलतोय" विलक्षण उत्तेजित आवाजात जमाल कमालीचा भरभर बोलत होता "इथे अल-बुर्जच्या तीसाव्या मजल्यावरुन एक बाई पडलीए म्हणजे तिला फेकलय असा एका बाईचा फोन आला होता म्हणजे तिनंच फेकलय म्हणे"

"जमाल, बाई पडलीए की फेकलीए? आणि मग ती फोन कसा करेल?" रिझवान आवाजातली उत्सुकता दाबत म्हणाला. भिंतीवरची दुबईच्या राजाची तस्वीर त्याच्याकडे बघून उगाच दाढीत हसली.

"सर" जमालच्या फुफ्फुसात आता पुरेशी हवा जमली होती "अल-बुर्जच्या तीसाव्या मजल्यावरुन आपण एका बाईला ढकललं असा सांगणारा एका बाईचा फोन आला होता. तिला तिथंच थांबायला सांगून मी तुम्हाला फोन केला. बीट वर मी आत्ता एकटाच आहे. तुम्हाला येताना हवालदार आणावे लागतील"

॥खुप आधी॥

पनामीनं खुप विचार केला. तिचे बाबाही खुप विचार करायचे आणि मग ते पुट्कन मरुन गेले. विचार केल्यानं कुणी मरत नाही. ते विचार करताना सतत सिगरेट ओढायचे आणि इतना निकोटीन आपको बिमार...बहोत बिमार बना सकता है याचा प्रत्यय येऊन ऎन चाळीशीत खलास झाले. "साला, हातातला अंगार दिसतो सगळ्यांना. इथला.." कधी डोक्यावर तर कधी छातीवर हात आपटत ते म्हणायचे "..इथला अंगार कुणाला दिसत नाही". ते बहुदा डाव्या विचारसरणीचे असावेत म्हणजे सतत उद्ध्वस्त, संतप्त वगैरे दिसायचे. आपल्या संतापाचं प्रतिक म्ह्णून त्यांनी त्यांच्या लाडक्या पनामा सिगरेटीवरुन मुलीचं नाव पनामी ठेवलं होतं.

पनामीनं आईकडे बघितलं आणि परत विचार केला "आई...दुबईला जाऊन येईन म्हणते" हुश्य..हे सोपं होतं..

"दुबई? कश्यासाठी? अगं असं एकट्या मुलीनं भलभल्त्या ठिकाणी नाही गं हिंडु" डाव्याची वामांगी, दोन नाही म्हणजे एक हो, या हिशोबाने उजव्यांसारखे विचार मांडु शकते. डावं सहज नसतं...

"आई, संपूर्ण छत्तीस वर्षाच्या बाईला कुणीही मुलगी म्हणत नाही" पनामीनं आवाजतलं ईरिटेशन कह्यात ठेवून उत्तर दिलं "आणि बाकीच्या ’मुली’ आहेत माझ्या सोबत"

डाव्याच्या वामांगीच्या आवाजात शंका कमी आणि अविश्वास जास्त होता "म्हणजे ती बाया बाया मिळून जातात ती ट्रीप का? सगळ्या बाया मिळून भोंडला खेळतात म्हणे ट्रीपमधे. जमणारै का तुला?"

॥ खुप आधी आणि थोडं नंतरच्या दरम्यान ॥

स्नेहलताला अमानुष छान वाटलं. आनंदी आनं..दगडे जिक्डे तिक्डे चोहीक्डे...मनात बंडु फाकडे..सांगेन मी??? सगळीकडे!!! अय्या अय्या अय्या.....तिनं गिर्र्कन गिरकी घेतली. नाच करत गाणं म्हणणं हा ठराविक लोकांचा मक्ता असतो. स्नेहलता ठराविक लोकांमध्ये मोडत नसते. त्यामुळे स्नेहलता अनुक्रमे गाण्याचे शब्द विसरली, ’क्डे’ च्या कोमल ’ध’ वर घसरली आणि शेवटच्या उद्गारवाचकावर सबंध निसटली. रमोलानं आत्मविश्वासानं तिला सावरलं. रमोला मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर असल्याने ती प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासानेच करते.

"केअरफुल डार्लिंग" रमोला तलम नाईटगाऊनचा बंद आवळत म्हणाली " आपल्याला अजून खुप बोलायचं आहे. आत्ताच धडपडु नकोस. चल, आपण या मुलींना उठवु या"

मुलींना बोलायला खुप आवडतं असं रमोला नेहमी म्हणते. मुली ऑफीस, शाळा, कॉलेज, हॉटेल सर्वत्र, सकाळ, दुपार, रात्र कोण्याही प्रहरी, प्रत्यक्ष, फोनवर, व्हॉट्साप कश्याही बोलु शकतात. बोललं की मनात मळभ राहात नाही असं संयुक्ता म्हणते. ती टीचरजी असल्यानं तिला सगळे सुविचार माहीत असतात. खुप बोलल्यानं खापराचं थोबाड असतं तर फुटलं असतं असं पनामीची आई म्हणते. पण त्यांना सगळीकडे प्रश्नच दिसतात असंही रमोला म्हणते.

’बोलायला हवं..’ स्नेहलताला मनापासून वाटलं ’पण इतक्या भलत्यावेळी सयाबायांना उठवावं का? त्यांची धड झोप ही झाली नसेल... थोर जागरण आणि दारु यांचा मेंदुवर समान परिणाम होतो असं शास्त्रज्ञ म्हणतात. दारु पिवून लोक पोटातलं भडाभडा ओकतात. झोप न झाली तर पित्त वाढूनही लोक ओकतात. दारु पिवून लोक मनातलं वचावचा बोलतात. मग झोप न झाली तर लोक बडबड बोलतील? बोलतील? मग काय... आनंदी आनं...दगडे’
पेंगुळलेल्या डोळ्यांनी पनामी खुर्चीत बसली. "रमो" पनामीला तक्रारीचा सुर वारश्या हक्कात मिळाल्या असल्याने ’ती’ विशिष्ट धार तिच्याकडे उपजतच होती " या ऎशी वातावरणात तू मला चळवळीची कामं सोडून कशाला बोलावलस?"

पेंगुळलेल्या डोळ्यांनी संयुक्ता खुर्चीत बसली. "समजतय का तुला रमोला, सहाव्या वेतन आयोगावर जाऊ नकोस पण असं तुझ्यासारखं मला दुबईफिबईला येणं परवडत नाही. त्यात दिवसभर आम्ही तोंड, स्वतःचं आणि पर्शीचं, उघडं टाकून या मॉलातून त्या मॉलात हिंडतोय. पायाचे तुकडे शिवून जरा पडले की आली ही बया उठवायला. करा आता चर्चा आमच्या झोपेच्या मढ्यावर..."

"मला लग्नाविषयी काही बोलायचय" पडेल सपक आवाजात स्नेहलता म्हणाली.

कु. पनामी, ३६, स्वच्छ जागी झाली. बुर्ज्वा विषयावर बुर्ज्वा बाईशी बोलायचं? मज्जा! तत्व, विचारसरणी घेऊन ध्येयाने प्रेरित संभाषण!!

कु. संयुक्ता, ३७, स्वच्छ जागी झाली. ’रेशीमगाठी..’ तिनं मनाशीच गुणगुणुन बघितलं.

कु. रमोला, ३६, स्वच्छ जागी होतीच. तिला वाटलं आपल्यालाही काही तरी ठामपणे वाटायला हवं. तिनं ठाम या शब्दाकडे तीव्रपणे बघायला सुरुवात केली. तिनं सगळ्यांसाठी दारुचे मठ्ठं ग्लास भरले. ठाम=इन्वर्स ऑफ मठ्ठ!

स्नेहलतानं दीर्घ श्वास घेतला. असं केल्यानं आतड्यापासून जठरापर्यंत, मेंदु पासून बिंदु पर्यंत, विचारापासून विकारापर्यंत सारं स्वच्छ होतं असं योगीबाबा म्हणतात.

"मला लग्नाविषयी काही बोलायचय" स्नेहलतानं सोडलेलं वाक्य तिथूनच उचललं "तुमची लग्नाची वय..." तिला कसं विचारावं तेच कळेना मग अलकाछाप कुबल कळवळ्यानं तिनं विचारलं "का? का नाही केली लग्न तुम्ही? शिकलेल्या आहात, सुरुप आहात, कमावत्याही आहात. मग का?"

रमोलानं आत्मविश्वासानं दारुचा कडुशार मोठा घोट घेऊन सुरुवात केली " गरज काय? माझ्याकडे घर आहे, गाडी आहे, शेवाळतील येव्हढे पैसे आहेत, मला कुण्याच्या बापाची भिती वाटत नाही, तर मग नवरा कश्याला हवा? मला हवं तेव्हा मी येते-जाते, कामासाठी-मजेसाठी परदेशात जाते, मला हवे ते कपडे घालते, वाटलं तर हॉटेलात खाते. असलं भारी स्वातंत्र्य निवळ लग्नाच्या मोहापाई घालवु म्हणतेस? मला मुलं, त्यांचे हागु-मुतु, त्यांचे वास काही काही आवडत नाही. माझ्यात ते नाहीच. मग डार्लिंग, लग्नाचा प्रश्न येतोच कुठे?"

"आणि सेक्स?" स्नेहलतानं लाजत विचारलं "बंडु म्हणतो, पहीली भूक पोटाची, दुसरी भूक शरीराची आणि तिसरी भूक मेंदुची असा काहीतरी पिरॅमिड असतो म्हणे. सगळ्या भुका नाही भागल्या तर माणूस बावचळतो"

स्नेहलताच्या गालावर हलकेच ओठ टेकवत रमोला म्हणाली "स्नेह डार्लिंग, सेक्ससाठी लग्न नाही करावं लागत. शीट कॅन हॅपन् युअर वे इफ य़ु हॅव मनी. नो लाईज, मलाही भूक लागते, माझ्याही आत काही तरी तट्तट तुटतं पण म्हणून लग्न? एखाद्या रात्रीपुरतं हवं तसं, हवं तेव्हढं, हवं त्याच्याकडून सुख मिळतं बाजारात मग उगाच इच्छा नसतानाचे बलात्कार कश्याला सहन करा? "

"अय्या, आणि हा बंडु कोण?" संयुक्ता अजूनही पहीला धक्का पचवायच्या प्रयत्नात होती.

"आनं...दी आनं..दगडे" स्नेहलतानं यावेळी सुर पक्का लावला होता "स्नेहलता-बंडु-फाकडे, बंडु- स्नेहलता....एक तेरा नाम...बंडु, बंडुराव, बंडोपंत...."


न-गायक माणुस खुप आनंदात किंवा दुःखात गाणं म्हणतो. न-गायक माणुस खुप दारु प्याली की गाणं म्हणतो. अश्या रितीने खुप आनंद किंवा दुःख = दारु. आदीम कोड्यांची उत्तरं काहीवेळा अशक्य सोपी असतात. समुद्र मंथन म्हणजे निव्वळ दंतकथा.
"अय्या, अय्या, अय्या" संयुक्ता कानावर हात ठेवून किंचाळली "कुठून येते अशी उर्जा, अशी स्वप्ने अन अशी सृजा? सनई आणि नाशिक बाजा, घोड्यावरती बंडु राजा"

"बंड्य़ा होईल हवल्या राजा आणि स्नेहलता काय शोषित प्रजा?" पनामीनं पुढली कविता रचली. वैताग हा डाव्याच्या मुलीचा स्थायी भाव असतो? दारु=कविता देखिल?

"मला समाज घडवायचाय" पनामीच्या वाक्यावर सगळेच दचकले "छोटी नाती, त्यांचे छोटे प्रश्न, खोट्या प्रतिष्ठांच्या कल्पना...मला काहीच नकोय. मला चळवळीपुढे असल्या गोष्टी कःपदार्थ वाटतात"

स्नेहलतानं क.पु. वाळेसरांचं स्मरण केलं. वाळेसरांना लाह्या फुटाव्यात तशी सुभाषितं फुटायची. ’गुंतलेल्या तंतवांतून नात्यांची रेशीमगाठ बांधणं म्हणजे लग्न, जीवनाच्या वाळवंटात शरीराचा दाह मिटवणारा अमृतकुंभ म्हणजे लग्न, समाजमनात नात्यांना प्रतिष्ठेचं कोंदण म्हणजे लग्न. ’ आणि पनामी काही तरी कः म्हणतेय...


संयुक्ताचं शर्टची कॉलर चावत "मला लग्न आवडतं" असं कन्फेशनसारखं वाक्य ऎकल्यावर स्नेहलताला जर बरं वाटलं "पण काय आहे नां की ते झालंच नाही. आणि आता इतका उशीर झालाय नां की उगाच त्याची अडचण नको."

सोप्प कधी कधी इतकं सोप्पं असतं की ते संपलं तरी कळत नाही.

खुप आनंद किंवा दुःख = दारु = कविता राऊंड ३.

"पण ते जाऊ दे, तू का लग्न करणार ते सांग" रमोलानं रास्त प्रश्न केला. प्रचलित कल्पनांना आव्हानं दिलं की त्यांचं बाळबोधपण शहारुन जातं असा तिचा अनुभव होता. थंडी, शहारा...नकोच ते. गणित हा नालायक विषय असतो.

"मला खरं तर कंटाळा आलाय" स्नेहलतानं मवाळ आवाजात सांगीतलं "मला असं वाटतं कुणीतरी आपली काळजी घ्यावी. दिवसाच्या शेवटी कसलेही आडपडदे न ठेवता मनात येईल ते कुणाशी तरी बोलता आलं पाहीजे. कधी तरी स्वयंपाक चुकला पाहीजे, त्यावरुन भांडण व्हायला पाहीजेत. कधी तरी भोचक कुचाळक्या करता यायला पाहीजेत आणि शेजारणीच्या नवऱ्यावर लाईन मारता यायला पाहीजे. त्यावरुन जळजळ होऊन अबोला व्हायला पाहीजे. नवऱ्याच्या घामट शर्टाची सवय व्हायला पाहीजे आणि त्याला पलंगावर हुकुमी पेटवण्याची कळही सापडायला पाहीजे. खुप खुप चुकून परत बरोबर होता यायला पाहीजे. मला नां, खरंच खुप कंटाळा आलाय. मला नां आता लग्नच करायचय. मला नां कुणाची तरी सवय लावून घ्यायचीय"

"लग्न करायला पाहीजे" संयुक्तानं रडक्या आवाजात म्हणाली. तिसरा ग्लास बोलु लागला "दळण आणणं, स्कुटीला कीक मारणं ही काय बाईनी करायची कामं आहेत? घरात एक पाल किंवा एक झुरळ असतं कधी कधी. रात्रभर एक कोपरा धरुन, हातातला पेपर सज्ज धरुन बघत बसावं लागतं त्यांच्याकडे. हलकट साले, झोकांडुन डोळा लागला की चुपचाप चालले जातात. एक नवरा असता तर संकटांना असं तोंड द्यावं लागलं नसतं कधी. झालंच तर बॅन्केचं पासबुक, गृहपाठाच्या वह्यांचे गठ्ठे आहेतच हमाल कामाला."

जांभई, पाणीपुरी, सर्दी, सेक्स आणि रडणं हे दुसऱ्याचं बघून स्वतःही लगेच करण्याची इच्छा होते.

संयुक्ता पाठोपाठ रमोलाला फुसफुसायला झालं. तिसरा ग्लास बोलु लागला " एक सुदृढ, निरोगी, मॅचोमॅन चालला असता, जरासा उद्धट आणि बेफिकीर. घरी-दारी, ऑफीसात सगळीकडे गुळगुळीत पुरुष भेटतात, कायम माझ्या दिसण्याच्या, पोझीशनच्या, पैशाच्या, अधिकाराच्या दबावाखाली पिचलेले, मस्त माज वाटतो की काय जिरवतो साल्यांची आपण, कित्येक पिढ्यांचा बदला घेतल्यासारखं... पण कुणी तरी ज्याला या कशाचीच पर्वा नाही आणि माझ्यावर, कोणत्याही फुलोऱ्याशिवाय निव्वळ माझ्यावर, मनसोक्त प्रेम करणारा कुणी भेटता तर कदाचित लग्नाबद्दल विचार केलाही असता. काही निर्णयांचं भयंकर ओझं त्याच्यावरही टाकलं असतं. टॉपचा एकटेपणा कदाचित त्याच्यासोबत वाटूनही घेता आला असता. पण त्या सोबत अजूनही काही वाटून घ्यावं लागलं असतं. आय ऍम निअरली व्हर्जिन, यु नो आणि मग त्याच्या सोबत पलंगही वाटून घ्यावा लागला असता, ही कुड टच माय बेअर स्कीन....ओप्स. माझा सोनेरी कडांचा कॉफी-मग कधी त्यानेही वापरला असता. माझा टॉवेल, माझं बाथरुम, माझा रिमोट...ओ माय गॉड, हे किती भयंकर, किती अस्वच्छ आहे!! सारं निव्वळ एका हव्यासापाई वाटून घ्यायचं"

"वाटून घेण्याच्या गणितात तुझा स्थिरांक पुरुष आहे बये" पनामीनं लाल झालेलं नाक चोळत तिच्या तिसऱ्या ग्लासाला बोलकं केलं " माझं ऎक, बाईला बाई किंवा बाप्याला बाप्या जेव्हढं उमजुन घेऊ शकतो तेव्हढं ते एकमेकांना नाही समजु शकत. पुरुषाचा स्पर्श मलाही परकाच वाटतो, त्यांचे गंध, त्यांचे श्वास, त्यांची शक्ती आणि पराभुतता, त्यांचं मोठेपण आणि पोरपण, मी कश्याशीच स्वतःला जोडु नाही शकत. एक सखी हवी आयुष्यात, आतलं-बाहेरचं बोलण्यासाठी, सरळ किंवा गाठीची गणितं सोडवण्यासाठी, सकाळच्या चहासोबत चर्चेसाठी आणि संध्याकाळी गळ्यात गळे घालून उनाडण्यासाठी. सखीच हवी निःसंकोच पलंग वाटून घेण्यासाठी किंवा श्रमाची वाटणी करण्यासाठी. सखीच हवी सममित शरीराची, अशीच वळणं आणि अश्याच रेषा असणारी, अगदी तुझ्या-माझ्या सारखी. ब्लडी हेल स्नेहलता, डावा हात ढुंगणावर ठेवून तुला सलाम. सलाम मला माझीच ओळख करुन दिल्याबद्दल, सलाम साचलेल्या पाण्याचा तळ ढ्वळुन काढल्याबद्दल "

दारु पिवून लोक घाऊक प्रमाणार भावूकही होतात. पनामीनं संयुक्ताच्या ओठांवर आपले ओठ घट्ट मिटले. ऊक्ती कृतीत आणणं हा चळवळीचा एक भागच असतो.
"बास्टर्ड..." स्नेहलताचं बकोट धरुन संयुक्तानं तिला गॅलरीच्या कठड्यावर ओणवी पाडली "तुझ्या मुळे झालं हे सगळं. आय वॉज ऑलमोस्ट रेप्ड"


त्या नंतर स्वस्त करमणुकीच्या सिनेमात ज्या पद्धतीचे अंगविक्षेपी विनोद होतात ते सारं तिथं घडलं, उदा. संयुक्तानं पनामीच्या बोटात गुच्चा हाणला, रमोलानं धडपडत दारुची बाटली महागडया गालीचावर सांडवली, पनामी सोफ्याच्या गुबगुबीत हातात हात अडकुन तोंडावर पडली, संयुक्तानं काचेच्या टेबलावर रमोलाला आदळवुन बसवली. इ.इ.

झोकांड्या खात रमोला ओरडली "स्नेह, यू कान्ट स्ट्रीप अस ऑफ आर डीझायर्स जस्ट लाईक धीस."

"चळवळीत गद्दाराला थारा नाही" पनामीचा आवाज हा तिथे असणाऱ्या कुणाहीपेक्षा वरचाच असतो. शिवाय कधी असंबद्ध घोषणा देणं हा ही चळवळीचाच अविभाज्य भाग असतो.

"ढकलं मेलीला" गाणं फिरुन समेवर यावं तसं जवळ जवळ एका सुरात रमोला आणि पनामी ओरडल्या. डावे आणि उजवे शेवटी एकत्र असे येतात. ’वर्तुळ पुर्ण होणे’चा हा उगम.

संयुक्तानं दचकुन हात सोडला की तिनं स्नेहलताला ढकलुन दिलं हे महत्वाचं नाही. शेवटी परिणाम महत्वाचा.

किंचीत भानावर आल्यावर संयुक्तानं फोन लावला "पोलीस..."

॥ आणि आत्ता अर्थात थोडं नंतरच्या नंतर ॥

जमालनं निराशेनं मान हलवली. त्याला कुठेही कोणतीही बॉडी सापडली नव्हती.
रिझवान सिद्दीकीनंही निराशेनं मान हलवली. त्याला हॉटेलमधे, विमान कंपनीत, ईमिग्रेशनमधे कुठेही स्नेहलता नावाची नोंद सापडत नव्हती.

पनामी, संयुक्ता आणि रमोलानं विमानतळावर सगळे सोपस्कार पार पाडले. "आता पुढच्यावेळी बाया आणि नेतृत्वगुण असा विषय घेऊ चर्चेला" स्नेहलतानं तिघींच्या मधे बसत सांगीतलं. त्या तिघीजणी चौथीला घेऊन परत भुर्रर उडाल्या.

2 comments:

Meghana Bhuskute said...

ए मला नाही बॉ झेपलीय. मधे मधे तर चक्क कंटाळा आला, नि तरी हे काहीतरी अवघड असेल नि मलाच कळत नसेलसं म्हणून मी नेटानं वाचलीय. तरी नाहीच कळलीय. आय नो, तुला समजावून सांगणे प्रकाराचा संताप आहे. पण आता तुझी गोष्ट माझ्यासाठी जामच वरून गेलीय, तर सांग बाबा. प्लीज.

ujjwala annachhatre said...

Mastach