Wednesday, May 3, 2017

सिद्धार्थ कवडीवाले , हल्ली फार डेंजर असतं

हल्ली फार डेंजर असतं

निळ्या रंगाची बंदूक घेऊन
गढूळलेल्या डोळ्यांचा माणूस
सतत आपल्या पाळतीवर असतो

टू कीप डॉक्टर अवे म्हणून जराशी हिमालयन सफरचंदे
झूम बराबर झूम च्या  आनंदी  तालावर
नाचवावीत डोक्यावर
तर
निळ्या बंदुकीचं टारगट तोंड वळलेलं दिसतं
आपल्याच मोहरलेल्या डोक्याकडे

काचपेट्यांच्या शीतल मायेतून अंधाऱ्या ओव्हरब्रिज कडे जाताना गॉशियन आकारातल्या भीतीला
दटावण्यासाठी आपण जेव्हा करत असतो
भीमरूपी महारुद्राचं आणि अनोव्हीय नियमांचं फ्युजन,
पहाऱ्यावर असतेच
रोखून पाहणाऱ्या गढूळलेल्या डोळ्यांची जोडी

शुन्य-एक-शुन्य-एक-शुन्य-एक-शुन्य-एक स्वरांचा
तीव्र निषाद लावलेल्या पावसाचा फायदा घेऊन
आपण गर्दीत मिसळू पाहतो
तोंडाला पाने पुसणाऱ्या माणसांच्या
तेव्हा शेजारून जाणारा कुणी गुणगुणत जातो
गर्दीत गारद्यांच्या..
आणि बंदुकीची निळसर नळी बोटांना हलकेच दंश करून अदृश्य होते

हल्ली फार डेंजर असतं
माणसांची सर्वत्र झडती घ्यायला हवी असं म्हणत
आपण खसाखसा चेहरा पुसत आरसा बघतो
आणि कंबरेला खोचलेली निळ्या रंगाची बंदूक
मेजावर ठेवून
झोपायला जातो

No comments: