Sunday, July 16, 2017

Portrait of three cities

शहर-१

पिवळ्या करड्य़ा रंगांच्या छटांत
गुरफटून झोपलेलं शहर
अरुंद रस्त्यांवर मिचमिचणाऱ्या ट्युबलाईट
आणि जवळच्या
शेताच्या बांधावर कोसळणारं क्षितीज

धुळीने मिटमिटलेली झाडांची पाने
भद्र स्वरांच्या अवचित लडी
नाक्यावरती शिळ्या पोरांच्या बाताड्या
आणि कोरड्याढाण नळातून सूं सूं वाहाणारी हवा

रुजू घातल्यासारखी माणसे
पाय फुटताच इथून स्थलांतरीत होतात

शहर- २

साऱ्या शहराला कवेत घेऊ पाहाणारा
व्हाईट नॉईज
विरत जातात त्यात
बेबंद गाड्यांचे निर्बुद्ध आवाज
आणि बुद्धाच्या ओठांवरचं धुसर स्मित


चव गेलेल्या जीभेची माणसं
शहरभर पसरलेल्या थडग्यांतून
आपल्या संस्कृतीचे नेमके अवशेष शोधू पाहातात
आणि चकवा लागल्यागत फिरुन फिरुन परत
आपल्याच घरी जातात


कारखान्यांचे कर्मठ भोंगे
गोठवत राहातात
शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रिया
बॅकप म्हणून तरीही शहराभोवती
उभी केली असतात बिनचेहऱ्याची महाद्वारे


स्थलांतरीत माणसे
रक्तबंबाळ पायांवर तीळ उमलताच
धावत सुटतात
बा
हे

च्या
दि
शे
ने

शहर-३
 

सारे ऋतु
एकच गंध पांघरुन उभे असणारे शहर
अश्वत्थाम्यासारखे कणाकणाने गळतेच आहे

ऒळख पुसून नव्याने नशिब लिहायला
निघणारा रोजचा जत्था
मिनीमम माणूसकीच्या आधारावर तगून राहातो
घामट खाऱ्या धारा रिचवत

थंडगार काचेच्या सेक्सड्प ईमारतीतून
अस्वस्थ झुग्ग्यातून
रंगीत चित्रं डकवलेल्या फ्लॅटातून
पसरलेला मैथून गंध
निर्विकार मिसळतो बेकरीतं भाजलेल्या ताज्या ब्रेडच्या वासात
उबवत कोह्म अद्वैत

जुनाट कमानींच्या काठाकाठाने वाहाणारे रस्ते
जिवंत ठेवतात सांस्कृतिक अवशेष
आणि नव्याने रचत राहातात उमाळ्यांचे चक्रव्युह
स्थलांतरीत माणसांना अडकवण्यासाठी
 
स्वागत आणि निरोप यांच्या पल्याडचं झेन वागवणाऱ्या शहरातून
तरीही काही स्थलांतरीत माणसे
गायब होतात
रातोरात
ओळख बदलून

No comments: