यमुआत्त्याचं अचाट धाडस

यमुआत्त्यांनी डोळे किलकिले करुन बघीतलं तेंव्हा त्यांच्या इतक्याच जुन्या घड्याळाने सहाचे ठोके दिले. "वसंतराव असते तर घड्याळ्याच्या ठोक्याला चहा द्यावा लागला असता" यमुआत्त्यांनी सुस्कारा सोडला. यमुआत्त्यांखेरीज, वसंतरावांच्या आठवणी आणि हे घड्याळ अश्या दोनच गोष्टी त्या वाड्यात ताज्या होत्या. यमुआत्त्यांनी परत उगाचच सुस्कारा सोडला. वेणीफणी केली तर कदाचित थोडं प्रसन्न वाटेल असं वाटून त्यांनी जरा हालचाल केली आणि तेवढ्यात त्यांचे गुडघे बोलले. "हरे राम! हरे कॄष्ण!! सगळं बसल्या जागी होतय म्हणून बरं आहे. अन्यथा या गुढघ्यांनी जेरीला आणलं आहे. देवा.." यमुआत्त्या जमीनीवर हात रोवत कशाबश्या उठल्या. दिवाबत्ती केली नाही तर वसंतराव वरुनही आपल्यावर ओरडतील अशी त्यांना सारखी भिती वाटायची. तसं बघीतलं तर वसंतराव कोणीतरी महाभयंकर जमदग्नीचे अवतार होते अश्यातला भाग नव्हता. रेव्हेन्युतून रिटायर्ड झालेले ते एक साधेसुधे कारकुन होते. ते जिवंत असताना गल्लीतली शेंबडी पोरंही त्यांना घाबरली नसतील पण हिंदुधर्माच्या परंपरेनुसार ते म्हणजे यमुआत्त्यांचं सर्वस्व होते. आता अश्या बायकांसाठी नवरा नाही हे सत्यच आयुष्यभर पुरणारं असल्याने वसंतराव कधी गेले याचं यमुआत्त्यांना भानच नव्हतं. आजुबाजुला कोणी नाही हे बघून त्या कधीकधी फोटोफ्रेम मधल्या वसंतरावांशी गप्पा पण मारायच्या. जे त्यांच्या हयातीत कधी झालं नाही, ते आत्ता यमुआत्त्यांना करावं वाटत होतं. यमुआत्त्यांना या नावाने संबोधीत न करणारे वसंतराव एकटेच होते. जाहीररीत्या अगं आणि खाजगीत यमु..त्यांच्या अंगावर आत्ताही गोड काटा आला. यमुआत्त्या राहायच्या दादा-गोपाळदादांच्या वाड्याच्या एका भागात. गोपाळदादांची मुलं, त्यांना आत्त्या म्हणायची आणि प्रथेनुसार सारीच त्यांना आत्त्या म्हणायला लागली इतकचं. त्यांच्या सरळसोट आयुष्यात "तो एक प्रसंग" जर घडला नसता तर कदाचित आजही त्यांना कोणीतरी आत्त्या म्हणून हाक मारली असती. ऎन संध्याकाळी यमुआत्त्यांना ती आठवण नकोशी आणि अशुभ वाटली. त्यांनी खिडकीतून दादाच्या वाड्याकडे नजर टाकली. अचानक भरलं ताट कोणीतरी सोडून जावं असा तो वाडा दिसत होता; अंधारा आणि उदास. चष्म्याच्या काचा पुसल्या तर अजूनही तिथे हालचाल दिसेल असं त्यांच्या वेड्या मनाला परत एकदा वाटून गेलं. आत्ता पर्यंतच्या अनेक अशा प्रयत्नांना यश न आल्याने त्यांनी यावेळी पुढचे कष्ट घेतले नाहीत.

जिन्यावर कसलासा आवाज झाला आणि त्यांची तंद्री भंग पावली. "आता यावेळी कोण आलं असावं?" त्यांना एकाच वेळी यावेळची येणावळ हवीशी आणि नकोशी वाटली. कोणाशी तरी शिळोप्याच्या गप्पा होतील या आशेने जिना उतरलेल्या यमुआत्त्यांना अचानक दोन लहान मुलं दिसल्यानं जितकं दचकायला झालं तितकचं त्यांना बघून ती दोन मुलंही दचकली. "दार उघडं राहीलं की काय?" यमुआत्त्या आधीच क्षीण झालेल्या स्मरणशक्तीवर जोर देऊन आठवू पाहात असतानाचं "तुमचं नाव काय आहे? तुम्ही इथेच राहाता? आम्ही मुंबईहून आलोयत. मी साना आणि हा राघव. आम्ही बहीण-भाऊ आहोत." नाजुक घंट्या किणकिणल्या सारख्या आवाज आला. यमुआत्त्यांना खुदकन हसु आलं. "मी यमुआज्जी, मी कुठूनच नाही आले, मी इथेच असते." सानाची भिती जरा चेपली. कोपरयाने ढुशी मारणारया राघवकडे दुर्लक्ष करत सानाने अजून थोडा भोचकपणा सुरु केलाच होता की यमुआत्त्यांनी विचारलं "तुम्ही कोणा कडे आला आहात? कुठे राहाता?" सानाने तत्परतेने उत्तर दिलं "आम्ही आई-बाबां बरोबर आलो आहोत. आम्ही या बाजुच्या बंगल्यात उतरलो आहोत." "दादाच्या बंगल्यात? इतके वर्ष माणसाचा वावर नसणारया वाड्यात कोण आलं असेल?" यमुआत्त्यांची विचाराची साखळी सुरु झाली होती. "त्या प्रसंगा"नंतर त्यांनी दादाच्या वाड्यात कधीच पाऊल टाकलं नव्हतं. अगदी दादांनी घर सोडताना त्यांच्या लाडक्या मीराने यमुआत्त्यासाठी टाहो फोडला होता तरी त्या गेल्या नव्हत्या. किंबहुना त्यांची हिंमतच झाली नव्हती. गेल्या कित्येक वर्षात त्यांनी दादाची कोणतीच बातमी ऎकली नव्हती. कधी कोणी त्या वाड्यात आलंही नव्हतं. "कोणाची गं तुम्ही मुलं?" काहीतरी संदर्भ लागेल म्हणून त्यांनी त्या मुलांना विचारलं. इतक्या वेळ संधीची वाट पाहाणारया राघवने त्याच्या ताईच्या आधी घाईघाईने उत्तर दिलं "आई-बाबांची" साना आणि यमुआत्त्या एकदमच हसल्या. "आमच्या बाबांचं नाव समर आणि आईच नाव सखी आहे. आमचं आडनाव समर्थ आहे" सानानं माहीती पुरवली. "आता अंधार झाला. आम्ही जातो. उद्या परत येऊ" सानानं परवानगी विचारल्यापेक्षा सांगीतलच जास्त आणि ते यमुआत्त्यांना एकदम आवडून गेलं. पोरांच्या हातावर निदान खडीसाखर तरी द्यायला हवी होती असं वाटायच्या आत पोरं अचानक आल्यासारखी अचानक हवेत पसारही झाली होती.

पुढचे कितीतरी दिवस पोरांचा आणि त्यांच्या यमुआज्जींचा मस्तच कार्यक्रम ठरुन गेला होता. मस्तपैकी धुडगुस मग आज्जी कडून गोष्ट आणि जाताना साखरफुटाणे किंवा खडीसाखर. वेगवेगळ्या प्रकारे चौकश्या करुनही त्यांना या कुटूंबाचं दादाच्या वाड्यात येण्याचं प्रयोजन मात्र कळत नव्हतं. थोडी हिंमत करावी आणि दादाच्या वाड्यात जाऊन या लोकांची चौकशी करावी, त्यांना काही लागलंसवरलं तर विचारावं असं यमुआत्त्यांनी मनोमन ठरवून टाकलं.

चार वाजताच जिना करकरला तसं यमुआत्त्यांनी बसल्याबसल्या दुसरया खिडकीतून बघीतलं. "पोरं लवकरच आली वाटतं आज" यमुआत्त्या मनाशीच पुटपुटल्या. त्यांनी वरुनच आवाज दिला "साना, बाळा मला आज जरा कसकस वाटतीय. तुम्ही खेळा खाली" " हो आज्जी" राघवनी ओरडून सांगीतलं.

"समर, ही बघ पोर इथे आहेत. आपण आपले सगळीकडे शोधतोय आणि यांना त्याचं काही आहे का?" सखीने टिपीकल "आई" टोन लावत समर कडे तक्रार केली. अंधाराला डोळे सरावले तसं समरनी त्या वाड्याकडे निरखुन बघीतलं. मधे मोठी चौकोनी जागा होती, तिन्ही बाजुला पडवी, एका बाजुला जिना आणि वर एक मोठ्या हॉल सारखी खोली. आत्ता ते जिथे उतरले होते त्याची एकदम आरश्यातल्या सारखी प्रतिकृती , mirror image! त्याने तसं बोलून दाखवताच सखी हसली. "अरे नसायला काय झालं? आहेच मुळी. हा यमुआत्त्यांचा वाडा आणि आपण राहातोय तो त्यांच्या भावाचा वाडा. ते बांधताना mirror image सारखेच बांधले आहेत" समरच्या तोंडावरचं प्रश्नार्थक चिन्ह बघून सखीनी कहाणी सुरु ठेवली "यमुआत्त्या म्हणजे माझी आई-मीरा, तिची आत्त्या; आईच्या बाबांची, गोपाळ आजोबांची बहीण" डोळ्यांना फारसं दिसत नसलं तरी यमुआत्त्यांचे कान अजून शाबुत होते. आनंद, भय, उत्सुकता असे सारे भाव त्यांच्या मणक्यातून एकाच वेळी सरसरले. "म्हणजे ही सखी माझ्या मीराची मुलगी? आणि ही चिटकी मुलं माझी परतवंडं?" यमुआत्त्यांचा डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. गोपाळदादांनी नाही तरी त्यांच्या लाडक्या मीराने त्यांना समजुन घेतलं होतं, माफ केलं होतं. ज्या जखमा अश्रु आणि माफींनी भरल्या नव्हत्या, त्या काळाने भरल्या होत्या. बरं वाटत नसतांनाही त्या घाईघाईने उठल्या. नातजावयाला सामोर जायला चांगलं तयार व्हायला पाहीजे या विचारांसरशी त्यांचा अंगातला ताप कुठल्या कुठे पळून गेला. त्या चांगलं पातळ घालून तयार व्हायला लागल्या.

सखीची टकळी सुरुच होती आणि समरही आता त्या गोष्टीत रंगून गेला होता. "मीरानं, माझ्या आईनं, जाण्या आधी माझ्याकडून इथे येण्याचं वचन घेतलं होतं. आजोबांच्या हट्टापायी या आधी इथे कुणीच आलं नव्हतं" समरच्या डोक्यातला गोंधळ त्याच्या चेहरयावर उमटला तसं सखीनी तो भयंकर प्रसंग सांगायला सुरुवात केली "मीरा यमुआत्त्याची खुप लाडकी होती. यमुआत्त्याला मुलबाळ नसल्यानं तिचा सारा जीव मीरात होता. मीरा आणि तिचा लहान भाऊ मदन बहुतेक वेळ याच वाड्यात असायचे. मीराच्या आईला मात्र ते काही फारसं आवडायचं नाही. यमुआत्त्याचा वांझॊटेपणा तिला कायमच खुपायचा. आणि एक दिवस तो प्रसंग घडला. याच जिन्यावर मदन खेळत होता. मीराला काहीतरी लागलं आणि ती रडायला लागली. घाईघाईने जिना उतरणारया यमुआत्त्याच्या पायात मदन घुटमळला आणि दोघांचाही तोल गेला. जिन्याच्या रेलिंगच्या दोन खांबातून कोसळणारा मदन जिवाच्या आकांतानं धरु पाहूनही यमुआत्त्यांच्या हातून निसटलाच. निपचित पडलेला मदन पाहून यमुआत्त्याच्या पायतलं बळच गेलं. मीराच्या आईनं आख्खा वाडा डोक्यावर घेतला. सुड आणि शोक आंधळे असतात. महीन्याभरात मीराच्या आईनं सगळी आवरावर करुन वाडा आणि गाव सोडायचा निश्चय केला. मीरानं पदोपदी सांगूनही यमुआत्त्यांना कोणी माफी द्यायला तयार नव्हतं. यमुआत्त्यांनी तर स्वतःला या वाड्यात कोंडूनच घेतलं होतं. सगळ्यांनी एक प्रकाराचा बहिष्कार टाकला यमुआत्यांवर. त्यानंतर आज खुप वर्षांनी आपण इथे येतोय मीराच्या, म्हणजे माझ्या आईच्या आग्रहावरुन"

"आई.." खेळण्यात दंग झालेल्या साना आणि राघवचं आत्ता त्यांच्या आई-बाबांकडे लक्ष गेलं. "तुम्ही इथे काय करताय? इथे किती अंधार आहे" समर आता लाईटचं बटण शोधायला लागला. " बाबा, थांबा. आम्ही आज्जीला बोलावतो" कोणी काही बोलायच्या आत साना आणि राघवनी धुम ठोकली. "मी आधी" "नाही. मी आधी" डगमगत्या जिन्यावरुन पोरं भान हरपून धावत होती. सखीचा जीव थोडाथोडा होत होता आणि एका निसरड्या पायरीवरुन राघवचा पाय निसटला. आत्ता सांगीतलेली गोष्ट फ्लॅशबॅकसारखी सखीच्या डोळ्यांसमोरुन झर्रकरुन निघून गेली. "राघव..." सखीच्या तोंडून बाहेर पडलेली किंकाळी ऎकून एका प्रतिक्षिप्त क्रियेसारखी यमुआत्त्यांनी स्वतःला खिडकीबाहेर झोकून दिले. देहाचे बंधन नसल्याने पिसासारखे तरंगत त्यांनी राघवला हलकेच झेललं आणि जमिनीवर ठेवलं. समर ऎवढ्या वेळात लाईट लावून पळत मधल्या चौकात आला होता. राघवला तरंगत खाली उतरताना बघून त्याला आणि सखीला जेवढे आश्चर्य वाटत होते तेवढेच आश्चर्य यमुआज्जींचा हार घातलेला फोटो बघून सानाला वाटत होतं.

हवेतला वाढलेला गारवा यमुआत्त्यांना सुखावत होता. फोटोतून हसताना त्यांना आज एका ऋणातून उतरल्याचा भास होत होता.

***************************************************************************************************
नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी, ज्यांनी कायमच आपल्याला घाबरवलं, त्यांच्या साठी ही गोष्टं.
*****************************************************************************************************

Comments

Hee wachayla maja aalee. But you are better with the previous form of writing, to be frank!
BTW - hi: hi: hi:! :P (for the comment on koham's post!)
फारच छान लिहिता तुम्ही. डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं.
mad-z said…
संव्या. का जाणे कोण, मला सुरूवातीला ब्लॉगची साईझ पहायची सवय आहे आणि तुझ्या या ब्लॉगची साईझ पाहून "अबबं" एवढंच आठवलं. आणि नंतर वाचायला लागलो. अमीत बाथेचा "भुताचा डाव" आणि नंतर हे .. बहूतेक सर्वंच भुताटकी अशी आडवी आणि ऊभी असावी.

फर्स्टक्लास. "यमूआत्या" हे नावंच मुळात आवडंलं .. कारण काय तर ब्लॉगचा शेवट वाचला आणि यमदेव तीचा कोणीतरी नातलग असावा असं वाटून गेलं. jokes aside, पण छान जमलाय. शेवट पर्यंत कळालं नाही सस्पेंस स्टोरी होती ते ... आणि मग शेवटात सगळं काही ऊलगडलं.

तुझ्या नेहमीच्या ग्रेसच्या छापापेक्षा हे वेगळं आहे. ग्रेस पचवायचा म्हणजे ३ वेळा वाचावं लागतं .. हे एका वेळेत निभावलं .. म्हणजे सामान्यांना पचेल असं काहीतरी तुला लिहीता येतं हे आज समजलं.

नोकरी सोड आणि फ़ुल्ल टाईम लिखाण सुरू कर ... ऊपाशी नाही राहू देणार आम्ही लोक तुला.
TheKing said…
Nice story.

Good to find this blog.
Sneha Kulkarni said…
Sundar lihila aahe ekdum! Purvicha template baghaychi savay zali aahe tyamule thodasa vachatana ha 'Samvedchach blog vachtoy ka' asa feel zala ekdum. Baki majhya blogvarchya postsathi thanks! Aaplya suchanepramane kalch post takli aahe. Aata vachun comment pan taak!! ;)