ऋतुसंभव



लहानपणी मोठ्ठेच प्रश्न पडायचे.
निबंध यायचा "माझा आवडता ऋतु". नक्की वसंत, शिशिराबद्दल लिहायचे की हिवाळा, पावसाळा या बद्दल लिहायचे हे ठरे पर्यंत पेनचं नीब वाळून जायचं. असं वाटायचं की सध्याचा जो ऋतु आहे त्या पेक्षा नेहमीच दुसरा कोणताही ऋतु चांगलाच असणार. पावसाळ्यात पाऊस पडून सगळा राडा होणार, हिवाळ्यात ऎन थंडीत खाकी चड्डी घालून सकाळी सकाळी शाळेत जावं लागणार आणि उन्हाळा म्हणजे तर सगळी कडे कहर नुस्ता.

पण मग ऋतुंना नवे गंध, रंग, चव आणि स्पर्शही फुटले.

धम्म पिवळा आंबा आणि डझनांनी पुस्तकं घरी आली की ओळखायचं उन्हाळा आला. मोगरयाचं फुल टाकलेलं माठातलं डोहगार सुगंधी पाणी, कधी फ्रीज मधलं कॉनसन्ट्रेटेड रसना डायरेक्ट प्यायची लहर, वेलची टाकलेलं पन्हं आणि कैरीची वाटलेली डाळ... कुणाची बिशाद आहे उन्हाळ्याला वाईट म्हणण्याची!

ऎन पावसाळ्यात तासंतास पन्हाळीचं पाणी ओंजळीत जमा करत खिडकीत डोकं टेकवुन डोळे कधी स्वप्नांनी तर कधी पाण्याने भरण्याचे ही काही ऋतु होतेच कधी. गवताच्या पात्यावर टेकलेला एखादाच चुकार थेंब टिपलाच नाही तर मोती बनेल याची खात्री देणारा रंगबावरा ओला ऋतु. छत्री, रेनकोट न उघडताच रस्त्यावरुन रमतगमत गाणी गुणगुणण्याचे योग वसतीला यायचे कधी.

धुक्यातुन सायकल हाकत हिवाळा यायचा. लुनावाला मित्र उदारपणे खांदा द्यायचा. त्याला पकडून सायकलवर मांडी घालून सुखेनैव प्रवास व्हायचा. ट्युशन संपली की विझत आलेल्या शेकोटी शेजारी बसून कटींग टाकली की हिवाळा हळुच टपली मारायचा. खो-खो खेळताना खरचटलेला गुडघा कधीमधी कुरकुरायचा. वर्गातल्या कधीच न बोलणारया मुली कौतुकाने त्या लंगडीकडे बघून हसल्या की आपणच वर्ग जिंकुन दिल्यागत हिवाळा डोळा बारीक करुन गाल्यातल्या गालात हसायचा...वात्रटपणे!

मग पाऊस ही बदलला.. कधी कुमारांच्या स्वरातुन झिरपायचा तर कधी बरखा ऋतु आयी म्हणत किशोरीच्या इम्मॉर्टल स्वरात भिजायचा. मेघा झर झर बरसत रे म्हणणारया दृष्टीतल्या डिम्पलच्या दुर्बोध डोळ्यात पाऊस नुक्ताच दचकवुन गेलेला. कविता लिहीणारा पाऊस, कविता उसवणारा पाऊस, पावसाच्या कविता आणि पावसातही होड्या होऊन तरंगणारया कविताच. पाऊस चविष्टही. ओवा घातलेली गरमागरम खेकडा भजी, कोवळ्या कणसाचा अगम्य नावाला न जागणारा चवदार फजिता आणि मंद दरवळणारी कॉफी. पोराचा हात धरुन पहीला पाऊस अंगणात नाचत येतो तेव्हा सावित्रीचा मोर सोबत सोबतच असतो.

सिनेमातल्या ऋषीकपुरप्रमाणे देखणा तरुण हिवाळा ढिगभर स्वेटर घालायला लागला. "अंग से मेरे अंग लगा तू ऎसै, आज तू भी बोल मेरे गले से" एका झुळुकीचे निमित्तही पुरते दोघांना एका शालीत गुरफटुन धुक्याचे सैलसर पदर संथ दुपारभर पसरवायला. हिवाळा घुक्कट गुलाबी...हिवाळा म्हणजे शॉवर मधून पडणारे अनंत पाणी, हिवाळा म्हणजे महंमदासारखा लहरी जॉग, हिवाळा म्हणजे अजूनही पौष्टीक खावु आवश्यक आहे असे समजुन केलेले कॅलरीबहाद्दर डबाभर लाडु.

उन्हाळा तसा संतप्तच. बघावं तिकडं प्रकाशाचं थैमान. गॉगलच्या रंगीत काचेतुन आपल्यापुरता सौम्य करता येतो तो पण तरीही उग्रच. पण मग गंमत सुरु होते. एका झाडाला गाणं सुचतं, रंगांचं आणि बघता बघता बरीच झाडे कोरस मधे गावु लागतात. रंगांचं गाणं म्हणता म्हणता झाडं इतकी गुंग होतात की झाडांचेच रंग होतात. बहावा सदेह बुद्ध होतो. नाजूक पिवळे पावुस-बिंदु डोळ्यात मावत नसतात पण बहाव्याचं फुलण काही संपत नाही. धिप्पाड शरीराला न शोभणारी फिक्कुट गुलाबी फुलं वागवत शिरीष येतो. त्याचं गाणं तर सुगंधीही. हात लावला तर फुल विस्कटेल अशी भिती वाटत असतानाच वारयाच्या एका लहरीवर रात फुलों की बात फुलों की म्हणत फुलांचाच अभिषेक घडवतो शिरीष. डोळाभर रंग पसरावेत आणि तरीही संपु नये असं झाडांचं गाणं.

तुझ्या पापण्यांच्या टोकांवर
ऋतुंनी अलगद डोके टेकविले आहे प्रिय
जरा जपून उघडशील-मिटशील तुझे डोळे तर
ऋतुंचे सारेच संभव तुला भेटतील

आणि मलाही

Comments

:-)

You kept your promise. Thanks!
खूप मस्त आहे
Karadkar said…
saMved, sahi lihile aahes. kuthehi avadaMbar naahi sahaj aalay agadi.
Megha said…
mastach masta......ultimate...shevtahi surekh
a Sane man said…
apratim....afaaT surekh...shabd n shabd sundar!
Monsieur K said…
apratim!
rutu yetaat.. tya baddal barech lihitaat hee..
pan, tey lihitaanaa itka samaras houn jaana.. rutu jari tech asle.. tari varsha sarli.. mhanun jhaalele badal..
mast tipla aahe :)
Yogesh said…
khup sundar. doahgaar ani Rutusambhav he shabd hi mastach.
Priya said…
Kya baat hai! :) Khup aawaDla!
Samved said…
Thanks मित्रांनो. या लिहिण्याची एक गंमतच असते. सुरु केलं तेव्हा २-४ ओळी लिहून तसच ठेवुन दिलं मग काही तरी खरडलं, खोडलं पण हा format येईल असं कधी वाटलं नाही. पहीलं ऋतुचक्र झाल्यावर वाटलं, अरे, आपले impressions तर बदलत गेलेले मग ते का नाही आलं लिहिण्यात? आणि मग ऋतुसंभवाचे योग आले..
अरे मग दुसरं काय म्हणणार? कुणीतरी चार शब्द खरडतं तेव्हा त्याचे आभार तरी मानण्याचा शिष्टाचार पाळायलाच हवा ना? ऍक्चुअली मीपण पकलेय.. :) पण आता बहुतेक नाही यायची वेळ. संपणार हे इथेच! सो, चिल...
आहात कुठे? की काही अभूतपूर्व लिखाण चाललं आहे?
आहात कुठे? की काही अभूतपूर्व लिखाण चाललं आहे?
Samved said…
अभूतपूर्व?...अद्भुत म्हण हवं तर...फक्त ब्लॉगच्या ऎवजी ब्लॉक!!
AB said…
mast watla... saglach surekh :-)