अदृष्यांच्या भेटींचे दृष्टांत

बेटां-बेटांनी बनलेली असतात माणसं. प्रत्येक ओळखी साठी एक नवाच कप्पा, एक नवंच बेट. वाहात बेटे जवळ आली तर माणसांचं जंगल होईल याची भिती. पूर आलाच तर काही बेटांना बुडवुनही पुराणकालीन नोहा सारखी बाकीची बेटे वागवत मानवजातीचं अस्तित्व मिरवत पुढे जायचं आपण. पण आता हे वेगळं. आता हे वेगळं, कारण मी स्वतःच स्वतःला तुझ्या बेटावर पुनर्वसित करत आहे. फाळणीसारख्या काही खुणा, किंचित कत्तलींचे इतिहास आणि आठवणी साठवणारया मेंदुंच्या काही पेशी मागे सोडून मी आज तुझ्या वसतीला आलोय. रंगांचे काही तलाव होते माझ्या बेटावर, तिथून तुला आवडणारे करडे, तपकिरी, काळपट रंग आणलेत मी. तश्याच काही विराण्या रागदारीतून अन शुष्क, विराण, बेभान ऋतु सोबतीला. तू म्हणालीस एकट्या माणसाला इतकं पुरेसं असतं.

मी तुझ्या वसतीला आलो आणि मी हे लपवले नाही. मी काहीच लपवत नसतो पण माझ्या आगमनाचे उत्सवही तू किंवा मी साजरे केले नाहीत. किंबहुना आता नवेच पाठशिवणीचे खेळ सुरु झाले आहेत. तुझ्या शहरात राहायचं आणि तुलाच टाळायचं. हे खेळाचे नियम की आपल्या संबंधांचे तोल सांभाळण्याचे आटोकाट प्रयत्न; मला कळत नसतं. तुझ्या असंख्य चेहरयातला एक आर्टी चेहरा मी निवडला. आणि तोच माझा झाला. तुझ्या कविता बेसावधपणे उलगडत गेल्या आणि माझ्याच झाल्या. तुझे शब्द, माझे झाले, तुझे आर्त, माझ्या उरी इतरले, तू म्हणजेच मी झालो; अपरंपार श्रद्धेचा एक उखाणा! घात झाल्यागत तुला एक पत्र आणि तेव्हा पासून माझे अस्तित्व तुझ्या प्रतिभासाधनेपुरतेच मर्यादित. माझ्या अनुभवांचे टोक, तुझ्या लेखणीला जोडलं अन तुझे चष्मे घट्ट माझ्या डोळ्यांवर (उचकटले तर डोळे ही सोबत निघतील असं तुला कधी वाटत नाही?). काचेच्या घरात राहात असल्यागत जगण्याचे सारे सोस तू इतरांसमोर उलगडत गेलीस, अन मी? मी, माझा हरेक श्वास, अस्तित्वाचे ताण, सुक्ष्मदर्शकाखाली ठेवून तुझ्या हवाली केले. मला भोगत, स्वतःचे भोग चढवण्याची कोण ही लगबग प्रिय!

बेटे जवळ आली की माणसांची जंगलं होतात. ओळखं, झाड म्हणून; रंग, एकजात हिरवा; सारी मुळे आपापसात हेवेदावे असल्यागत एकाच ठिकाणाहून पाणी शोधणारी. तस्संच होतय तुझ्या शहरात आल्यापासून. किंवा कसं, जणू कॅमेराची लेन्स झुम करत करत तुझी ओळख जवळ येत अस्पष्ट व्हावी तसं. तद्रूप, चिद्रूप, विद्रूप सारी तुझी विविध रुपे इथे, तुझ्याच शहरात उलगडत गेली. तुझ्या कवी असण्यापलीकडचे संदर्भ नकोच होते मला. माणूस म्हणून, प्रेयसी म्हणून, अमूक आणि तमूक म्हणून तू कशी असशिल याची भितीयुक्त उत्सुकता होतीच पण माझ्या मनातल्या प्रतिमांचं हसंही होवु द्यायचं नव्हतं मला आणि म्हणूनच तुला तोंडातोंडी सामोरी येण्याची सार्थ भिती.

या डोळ्यांतून त्या डोळ्यांत वाहाताहेत बेटं पण सामोरी कधीच येणार नाहीत. आपली ओळख, कवितेपासून कवितेपर्यंत आणि भेटींचे दृष्टांत कायमच अदृष्य.

Comments

आभार. निखळ आभार.
केसु said…
अप्रतिम, निव्वळ अप्रतिम.. पहिली प्रतिक्रिया...

अजून वाचतोय, उलगडतोय परत परत.. let it sink more, बाकी प्रतिक्रिया नंतर..
a Sane man said…
याद के बेनिशाँ जज़ीरों से...

बेटांच्या खूणा सापडल्या की पुढल्या प्रतिक्रिया...

तोवर "नितांत सुंदर" एवढंच! जियो!
Anonymous said…
मेघनाने आभार कशाबद्दल मानले आहेत ते कळलं नाही!
इतके क्लिष्ट, गुंतागुंतीचे शब्दभ्रम लोभस वाटले तरी आकळतातच असे नाही! बहुदा सुलभ, अर्थपूर्ण (आणि सुंदर!) असणं हे जुनाट, कालबाह्य ठरू लागलंय आजकाल!
Anand Sarolkar said…
aaplyala nahi jhepla buva he :(
Anonymous said…
तो तिच्या शहरात रहायला गेला आहे, आणि तिची आठवण आली तरी तिला टाळतो आहे, आणि तिचा आणि त्याचा कवितेचा संबंध आहे, असा अर्थ आहे का?
मेघनाने आभार म्हणणं म्हणजे ’ती’ मेघनाच आहे का? नीटसं कळलं नाही, तर निरागसपणे विचारतेय, कृपया गैरसमज नसावा.
Abhijit Bathe said…
संवेद - पहिल्या २-३ वाक्यांनंतर डिच मारला होता, पण मृणालची कमेंट वाचुन उत्सुकता वगैरे जागृत झाल्याने परत वाचलं. अगदीच डोक्यावरुन गेलं असं नाही म्हणणार, पण फुल टु कळलं असंही नाही. I guess तसं कळावं असा या लेखाचा उद्देशही वाटत नाही. शेवटी ’ज्याचा त्याचा प्रश्न’ सारख्या ’ज्याच्या त्याच्या कविता’!

अगदीच vague करत बोलायचं तर - समांतर अनुभव घेतल्यापासुन असं काही गढुळ बिढुळ ठेवायचंच नाही असं काहीतरी ठरलंय. एकतर शिव्या नायतर डोक्यावर. सपशेल पानी का पानी.

टेन्शन लेनेका नही - देनेका.
माणसांची सगळीच्या सगळी जंगलं मुळापासुन हलली पाहिजेत.

आता एवढं लिहिल्यावर माझी खात्री झालिए कि आयदर माझा बाण सपशेल बसतोय नाहीतर लईच तिरपिड गेलाय.

Anyway....
Samved said…
खरं तर मी फार शिष्टाचार पाळत नाही बहुदा पण मित्रांनो,Thanks.

अहो ऍनोनिमस राव (हे राव तो किंवा ती, दोघांनाही लागु बरं का), कुठे मनावर घेता इतकं. चार जास्तीचे संदर्भ माहीत असले (असा आमचा समज बरं का) की अशी पोस्टाला शिंग फुटतात. आता जे मला अजिबात आवडत नाही ते तुमच्यासाठी आणि मृणाल साठी करु द्या, ते म्हणजे या पोस्टामागची भुमिका.त्या आधी, जो प्रश्न तुम्ही दोघांनी विचारला की मेघनाने आभार का मानले. तर ते तिलाच माहित. पोस्ट आवडलं असेल असा मी सोईस्कर समज करुन घेतलाय. पण तुम्ही दोघांनीही प्रश्नचिन्ह डकवुन दिलत आणि माझ्या मनातही शंकासुर जागा झाला आहे. असो. पाल्हाळ नको.
तर पोस्टाच्या मागची भुमिका. असं म्हणतात की काही कलाकार कधीच एकमेकांना भेटले नाहित. भेटले नाहीत त्याचं कारण प्रतिमाभंगाची भिती, उदासिनता, बुजरेपणा इ. इ. उदा. जी. ए आणि सुनिताबाई, जी. ए आणि ग्रेस (खात्री नाही!), एमिली बाई अन बरीच जन्ता इ.इ. तर हा या लेखाचा एक भाग. दुसरा भाग बेसिकली, प्रतिमा आणि प्रतिभा यांचा संवाद आहे. प्रतिभेच्या चष्म्यामुळे प्रतिमा कश्या एकरंगी होतात याचं पाल्हाळ! असो. कळवावं आणि कळावं याचे अट्टहास नसावेत. लिहीणं झालं की निर्मम व्हावं हेच खरं!

ऍनोनिमस राव, दुर्बोध वगैरे ठीक आहे पण असुंदरतेचा आरोप काही पटला नाही बुवा. आता यात कुठे असुंदरता दिसली तुम्हाला? न भेटणे म्हणजे असुंदर? दुःखी? छे छे. तुम्हाला एक भारी किस्सा सांगतो. ग्रेसांची एक मुलाखत आहे. "ती गेली तेव्हा" कवितेवर दुःखी आरोप कवींनी तावातावांनी खोडून काढलाय. "लोकांना वाटतं आई देवाघरी गेलीय. का? माझी आई मला सोडून बाजारात गेली तर मला पराकोटीचं दुःख नाही होऊ शकत?" इ. इ. तर अर्थाचे घट जसे दिसतात तसे असावेत असा नियम नाही. उपसुचना-ग्रेसांचं उदाहरण वापरतोय, तुलना नाही.

मित्रा अभिजिता, तू आहेस की चक्क जिवंत!! कोण आनंद झाला म्हणून सांगु!!"I guess तसं कळावं असा या लेखाचा उद्देशही वाटत नाही. शेवटी ’ज्याचा त्याचा प्रश्न’ सारख्या ’ज्याच्या त्याच्या कविता’!" एकदम करेक्ट! आणि "माणसांची सगळीच्या सगळी जंगलं मुळापासुन हलली पाहिजेत." खरंच रे बाबा
रेनड्रॉप ट्री हे नाव नव्हतं माहित अमलताशचं.सुरेख आहे इतर नावांप्रमाणेच.आणि ह्या झाडाचे फोटो काढ नक्की ह्या ऋतु मधे.मोठं राजवैभवी झाड आहे हे.

तुझं हे पोस्ट खरोखरच मनस्वी आहे आणि अर्थातच सुंदर.काय दुर्बोध किंवा कठिण आहे त्यातलं न कळण्यासारखं हे मला उमगलच नाही.नेहमीपेक्षा वेगळ्या प्रतिमा आणि शब्दांची मांडणी करुन केलेलं लिखाण म्हणजे कठिणच असणार समजायला, हाही एक उगाचच करुन घेतलेला समज.अशांना ग्रेसच काय पण गुलझारही कठिण वाटतात वाचायला.थोडं वेगळ्या अंगाने वाचायची सवय करुन घ्यावी लागते.असो.
Sumedha said…
अजून एक खो दिलाय!

http://aapula-samwad.blogspot.com/2008/08/blog-post_28.html
Monsieur K said…
it is difficult to interpret abstracts - i went through your post again after reading your explanation - and experienced it differently.
yeah, "understanding" it partly or completely is beyond me.. i can only "experience" it..
Anonymous said…
माणूस म्हणून, प्रेयसी म्हणून, अमूक आणि तमूक म्हणून तू कशी असशिल याची भितीयुक्त उत्सुकता होतीच पण माझ्या मनातल्या प्रतिमांचं हसंही होवु द्यायचं नव्हतं मला !!

मनापासून पटलं.